"भाग भाग डीके बोस, डीके बोस, डीके बोस, भाग भाग डीके बोस डीके भाग..." अशी आर्त स्वरातली विनंती न ऐकून चालणारच नव्हतं. पहिल्यांदा हे गाणे ऐकले तेव्हा मला प्रश्न पडला की हा का एवढं 'भागायला' सांगतोय. बरं, गंमत म्हणजे हे गाणं मी एका रम्य आणि शांत सकाळी पहिल्यांदा ऐकलं होतं. मी अर्धवट झोपेत होतो; खिडकीतून उन्हाची कोवळी तिरीप माझ्या देखण्या चेहर्यावर प्रभा फाकवत होती; गॅसवर ठेवेलेल्या चहाच्या आधणाचा गोडसर उबदार वास नाकात शिरत होता; सोसायटीच्या पाण्याच्या पंपाचा मंद आवाज अस्पष्टपणे कानावर पडत होता, लिफ्टच्या दरवाजाचा आणि तो उघडा ठेवल्यानंतरच्या कर्कश अलार्मचा आवाज अधून-मधून कानावर पडत होता. किचनमधून बाबांनी पूजा झाल्यावर लावलेल्या उदबत्तीचा सुगंध नाकात शिरत होता. आता थोड्या वेळातच अंथरुणातून नाईलाजास्तव का होईना पण उठावे लागणार आहे असे 'इशारे' येण्यास सुरुवात झाली होती...आणि अचानक फुल्ल डॉल्बी साऊंडमध्ये "भाग भाग डीके बोस, डीके बोस, डीके बोस, भाग भाग डीके बोस डीके भाग..." असे जोशपूर्ण आव्हान सुरु झाले. अर्धवट झोपेत सुसंगत आणि तर्कसंगत विचार करणे मेंदूला तसे फारसे जमत नसावे. माझ्या मनाला प्रश्न पडला, माझ्या 'बेली'ची आर्त हाक मला अशी बाहेरून का ऐकू येतेय? आणि ती ही असल्या तारस्वरात? इतका मनकवडेपणा (तनकवडेपणा?)? गाण्याचा वेग आणि आवेग इतका जबरदस्त होता की आता दरवाजा ढकलून आत जाण्याची उसंत तरी मिळते की नाही असा विचार मनाला चाटून गेला आणि एकदम पोटात कळ उठली; खाडकन डोळे उघडले, पांघरूण बाजूला फेकले गेले आणि अस्मादिक तीरासारखे धावत जाऊन त्या परमसुखदायकउदरकळशामकगृहात गडप झाले. थोडी उसंत मिळाल्यावर मी त्या गाण्यावर विचार करू लागलो. च्यायला, हे काय नवीनच गाणे? कोण हा डीके बोस? आणि त्याने का पळायचं? शेजारच्या फ्लॅटमधल्या पोराने लावलेले ते गाणे अजूनही मला ऐकू येत होते. मी जरा लक्षपूर्वक ऐकू लागलो आणि अचानक गॅलिलिओने 'युरेका' करावे त्याप्रमाणे मला त्या गाण्यातली छुपी गंमत कळली. अस्स आहे होय हे? सेंसॉर बोर्डला चकवा (शिवी) देण्याचा हा प्रकार भलताच भारी होता. यथावकाश बाहेर आल्यावर तृप्तीचा ढेकर देत मी माझ्या इतर कामांकडे वळलो. नंतर कित्येक दिवस हे गाणे मला ऐकू येत राहिले. विशेषतः कॉलेजकुमारांमध्ये हे गाणे खूपच लोकप्रिय असल्याचे मला माझ्या सूत्रांकडून कळले. टीव्हीवर एक-दोनदा बघण्यात आले. 'दिल्ली बेली' काहीतरी वेगळंच प्रकरण असल्याची खात्री पटली.
दरम्यान 'दिल्ली बेली' रीलिज झाला. चिकार गर्दीत हा चित्रपट चालू आहे अशी महिती मिळाली. परीक्षण वाचून उत्सुकता चाळवली. 'दिल्ली बेली'ने खूप हुशारीने चित्रपटाविषयी चर्चेची राळ उडवून दिली होती. एक हमखास यश मिळवून देणारे मार्केटिंग तंत्र वापरून 'दिल्ली बेली' चे प्रमोशन सुरु होते. आमच्या कार्यालयातदेखील 'दिल्ली बेली'च्या यशाच्या चर्चा झडू लागल्या. शिवाय अभिनय देव या मराठी माणसाने दिग्दर्शित केलेला चित्रपट इतकी गर्दी खेचतोय म्हटल्यावर 'दिल्ली बेली' बघण्याची कारणे वाढत गेली. शेवटी आम्ही 'दिल्ली बेली' पहायचे ठरवले.
"यात काहीतरी खूप किळसवाणं, घाण आहे असं मी ऐकलंय; तुला बघायला चालणार आहे का?" मी.
"म्हणजे काय आहे?" बायको चेहरा वाकडा करत विचारती झाली.
"मला नक्की माहित नाही. भाषा खूप शिवराळ आहे हे मला नक्की माहिती आहे. वाक्या-वाक्यागणिक शिव्यांचे अत्तर शिंपडले आहे. तुला चालणार आहे का?"
"बघूया. बघीतल्यानंतरच ठरवू"
आमचा निर्णय ठरला. मल्टीप्लेक्सला तिकिट मिळण्याचा प्रश्नच नसल्याने आणि आमची चारशे रुपये एका चित्रपटात आणि पन्नास रुपये पिवळ्या लाह्यांमध्ये घालवण्याची ऐपत नसल्याने आम्ही मोर्चा स्वस्त, मस्त आणि टिकाऊ अशा नीलायमला वळवला. कधी नव्हे ते नीलायमला सुगीचे दिवस आले होते. आवार कॉलेजकुमारांनी ओसंडून वाहत होते. मी भिरभिरत्या नजरेने पाहिले. एकही स्त्री/मुलगी/महिला त्या गर्दीत दिसत नव्हती. मी एक कटाक्ष बायकोकडे टाकला. शेवटी हिय्या करून तिकिट घेतले. बाल्कनीची तिकिटे संपलेली असल्याने आम्ही ड्रेस सर्कलची तिकिटे काढली. आता १८-२० वयोगटातल्या मुलांना ड्रेस सर्कल, स्टॉल, मॅटीनी, बाल्कनी, बॉक्स ही टर्मिनॉलॉजी माहित नसेल कदाचित. स्थानापन्न झालो. आधीच टाळ्या, शिट्ट्या सुरु झालेल्या होत्या.
चित्रपटाची सुरुवातच एका अत्यंत गलिच्छ खोलीत होते. कॅमेरा हळू-हळू फिरत एका निद्रिस्त अवस्थेत असलेल्या माणसाच्या अस्ताव्यस्त पसरलेल्या देहाचे दर्शन घडवतो. एका विशिष्ट अवयवावरून अगदी संथ गतीने कॅमेरा जात असतांनाच टाळ्या आणि शिट्ट्यांचा गजर टिपेला पोहोचतो.
चित्रपट पुढे सरकत होता. पारिजातकाच्या झाडाखालून जातांना पारिजातकाची फुले टपटप अंगावर पडावीत त्याप्रमाणे शिव्यांमधून बरसणारा अमृतरस कानात ओतला जात होता. तीन तरुणांकडून अजाणतेपणी एका गुंडाचे हिरे हरवतात आणि मग तो गुंड ते हिरे मिळवण्यासाठी जीवाचे रान करतो इतकी साधी, सोपी गोष्ट सांगण्यासाठी लेखक, दिग्दर्शक मंडळींनी जो धिंगाणा घातला होता तो म्हटलं तर खूप मनोरंजक होता आणि म्हटलं तर किळसवाणा होता.
हिरे हरवणं (शान), कुठेतरी सुरक्षित ठेवून ती जागा माहित असणार्याचा मृत्यू ओढवणं (व्हिक्टोरिया नं. २०३, फिर हेराफेरी), चलाखीने हिरे चोरून बाहेर आणणं (शान), हिरे सांडून गंमती-जमती घडणं (अंदाज अपना अपना) इत्यादी हिर्यांचे पैलू आतापर्यंत बघण्यात आले होते. 'दिल्ली बेली'मध्ये एक वेगळाच 'पैलू' अगदी धडधडीतपणे समोर आला. इतका धडधडीतपणे आला की तो पैलू बघून आमच्या पोटाचे मळवली, नालासोपारा व्हायचे बाकी राहिले. नायिका हिर्यांचे पाकिट कुणालातरी द्यायला म्हणून नायकाकडे देते. नायकाला वेळ नसल्याने ते पाकिट तो त्याच्या मित्राकडे देतो. तो मित्र त्यांच्या एका दुसर्या मित्राकडे ते पाकिट देतो. एवढ्यावरच हे हिरेपुराण संपलं असतं तर मग 'दिल्ली बेली' ऐवजी निर्मात्याने हिर्यांच्या व्यापारावर एखादी डॉक्युमेंटरी नसती बनवली? इथे येतो एक ट्विस्ट! डॉन अगदी थाटात गर्भरेशमी रुमाल टेबलावर अंथरून हिर्यांची सुबक डबी रीती करतो आणि काय चमत्कार, त्या गर्भरेशमी लाल कापडावर चक्क आपल्या नको असलेला आणि म्हणून आपण प्रातःकाळी टाकून देणारा पदार्थ अगदी डौलात येऊन विराजमान होतो. कॅमेरा अगदी जवळ जाऊन आपल्याला त्या अमूल्य पदार्थाचे येथेच्छ दर्शन घडवतो. जेवढ्या भक्तीभावाने आपण देवाच्या मूर्तीकडे बघत नाही तेवढ्या भक्तीभावाने डॉन त्या थाटात निवांत बसलेल्या पदार्थाकडे बघतो. मी बायकोकडे पाहिलं; तिने तोंड मागे फिरवले होते; तिच्या चेहर्यावरचं हसू मात्र लपत नव्हतं हे खरं; उगीच खोटे कशाला बोला? माझ्या चेहर्यावरदेखील हसू होते; किंबहुना गडगडाट होता हे ही तितकेच खरे. म्हणजे आम्हाला तो प्रसंग आवडला होता का? कदाचित दृष्य आवडण्यासारखे नव्हते पण प्रासंगिक विनोद नक्कीच हसवणारा होता. 'कायमचूर्ण' किंवा 'धौतीयोग चूर्ण' या 'सुलभ शौचालय'छाप औषधांची जाहिरात हे प्रसंग वापरून नक्कीच चांगल्या प्रकारे होईल असे मला क्षणभर वाटून गेले. तसेही मुन्नीने बदनाम होता-होता झंडु बामचे 'नाम रोशन' केल्याचे उदाहरण आहेच. आणि आजकाल टीव्हीवरच्या जाहिरातींची झेप कुठपर्यंत पोहोचली आहे हे वेगळे सांगायला नकोच (उदाहरणार्थ तमाम पर्फ्युम्सच्या जाहिराती, नुकतीच आलेली आयडियाची लोकसंख्येवर गंभीर टिप्पणी करणारी जाहिरात).
नीलायममध्ये हास्याची कारंजी वारंवार उसळत होती. ज्युसचा अभिनव उपयोग बघून तर प्रेक्षकांच्या घशाला कोरड पडली होती. पलंगावरचे धाडसी प्रसंग बघून प्रेक्षकांच्या अंगावरचे केस उभे राहिले होते. आंबा या फळाशी निगडित असणार्या क्रियापदाचा वापर करून योजिलेला एक (हिंदीत डब केलेला) संवाद सगळ्यांच्या (फक्त 'आंब'टशौकीनांच्या नाही) आंबावर...सॉरी, अंगावर रोमांच उभे करून गेला. तीन नायकांपैकी एकाचे शौचालयातले विविध प्रयोग बघून हसून-हसून मुरकुंडी वळत होती.
"शी, काय घाणेरडं दाखवलंय हे..." असं म्हणत-म्हणत हसणं मात्र कुणी टाळत नव्हतं. दीड तासाच्या या अभूतपूर्व गोंधळानंतर आमिर खान आणि अनुष्का दांडेकर यांच्यावर चित्रित झालेल्या एका धमाकेदार गाण्याने चित्रपट संपला आणि सगळे हसू दाबत बाहेर पडले.
चित्रपटात शिव्या, आचरटपणा, वाह्यातपणा, अश्लीलपणा, बीभत्सता यांची मनमुक्त उधळण होती. ही सगळी कथेची गरज होती असेही नाही. या सगळ्या पाहुण्यांशिवायही 'दिल्ली बेली' बनवता आला असता पण मग त्याचं नाव 'डायमंड - द चेस' वगैरे ठेवावे लागले असते. मग चित्रपट नक्की कसा होता? माझं प्रामाणिक मत विचाराल तर घाणेरडेपणाची फोडणी घातलेला एक मनोरंजक चित्रपट म्हणून 'दिल्ली बेली' चे वर्णन करावे लागेल. हिंदी चित्रपटांच्या इतिहासात अशी थेट भाषा आणि माणसाच्या मनातली विकृती बेधडकपणे पडद्यावर रंगवणारा चित्रपट म्हणून 'दिल्ली बेली' ची नोंद करावी लागेल. माणसं विचार करत नाहीत किंवा कल्पना करू शकत नाहीत असा कुठलाच प्रसंग चित्रपटात नव्हता यावरूनच 'दिल्ली बेली'चे वेगळेपण जाणवते. एक बिनधास्त घाणेरडा पण वेगवान, मनोरंजक चित्रपट म्हणून 'दिल्ली बेली' एकदा बघण्यास माझी तरी हरकत नव्हती. कदाचित यामुळेच तो 'सुपर हिट' चित्रपटांच्या पंक्तीत जाऊन बसला....तो जर मनोरंजक नसता तर त्याचे भवितव्य 'डरावनी रात', 'रात की रानी' सारखे दयनीय असले असते...म्हणून सगळे डीके एकसाथ चित्रपटगृहाकडे 'भागले'...आणि हसले!
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
5577
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
परिक्षण नेहमी प्रमाणे
एकदा
In reply to परिक्षण नेहमी प्रमाणे by गणेशा
मस्त!
लै भा हा री ही
खरं
In reply to लै भा हा री ही by मी-सौरभ
आवडेश...
परीक्षण आवडले. सिनेमा
नाही
In reply to परीक्षण आवडले. सिनेमा by शुचि
अहो पण त्या हिर्याच्या
In reply to नाही by समीरसूर
त्या हिर्याच्या प्रसंगात
In reply to अहो पण त्या हिर्याच्या by शुचि
अगागागा.. पिठले खाणे अजून एक
In reply to त्या हिर्याच्या प्रसंगात by माझीही शॅम्पेन
तुम्हाला
In reply to अहो पण त्या हिर्याच्या by शुचि
परिक्षण आवडले.
परीक्षण वाचूनच पोटात कसेसेच
आपल्या आयुष्यात एकही शिवी न देणारा इथे कोणी आहे का ?
अग्गो, चायला काल रात्री हा
म्हणजे?
In reply to अग्गो, चायला काल रात्री हा by पिंगू
झकास
का हो?
In reply to झकास by परिकथेतील राजकुमार
दे टाळी
In reply to झकास by परिकथेतील राजकुमार
परिक्षण आवडले. उत्कृष्ट.
In reply to दे टाळी by रमताराम
हा चित्रपट म्हणजे फारेली
ऑ?
In reply to हा चित्रपट म्हणजे फारेली by नगरीनिरंजन
बरोबर आहे. कथाबीज नाही म्हणत
In reply to ऑ? by परिकथेतील राजकुमार
इथे
In reply to हा चित्रपट म्हणजे फारेली by नगरीनिरंजन
आँ? तुम्ही अगदी स्पष्ट
नाईलाजास्तव
In reply to आँ? तुम्ही अगदी स्पष्ट by गवि
वेल
In reply to नाईलाजास्तव by समीरसूर
चित्रपट अतिशय किळसवणा वाटला
कमल हासनचा 'पुष्पक'