मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

स्टॅनली का डब्बा

मस्त कलंदर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
खूप दिवस पाहायचा पाहायचा म्हणून हा पिक्चर पाहायचा राहूनच गेला होता. अलग वेळ देणं होत नसेल तर मी सिनेमे दहा-पंधरा मिनिटांच्या तुकड्यांत बघते. माझ्या या तंत्राला चांगले सिनेमे मात्र दाद देत नाहीत. ते एकाच बैठकीत कधी पाहायला भाग पाडतात हे कळतही नाही. बर्‍याच दिवसांनी असा पिक्चर पाहण्याचा योग आला. डिस्क्लेमर: लेखावरून बरीचशी कथा कळतेय. ज्यांना असा रसभंग व्हायला नकोय त्यांनी इथंच थांबावं. नाहीतरी वरच्या चार वाक्यांतून पिक्चर चांगला आहे असं या लेखाचं तात्पर्य कळतं आहेच. नेहमीसारखीच एक सकाळ. शाळेत सोडायला आलेली कुणाची आई प्रेमाने मुलाला झापतेय. आणि चौथीच्या वर्गात ढॅण्टॅढॅण म्हणत पोरासोरांनी सॉल्लीड धिंगाणा घातलाय. एकदम जिवंत, निरागस आणि तितकंच लोभसवाणं चित्र. सुखवस्तू घरातला अमन. हा खेळायला थांबला तर त्याच्या घरून त्याच्यासह सर्व मित्रांसाठी खाणं येतं. अभिषेक, आणि त्याच मुलांतला एक मुलगा स्टॅनली. स्टॅनली वर्गातल्या मुलांहून थोडासा वेगळा आहे. नाचताना वर्गाचा हिरो आहे. आवडत्या टीचरसाठी तो कविता स्वत:हून पाठ करून म्हणतो, वर्गातल्या प्रोजेक्टसाठी दीपस्तंभाची छोटीशी प्रतिकृतीच उभारतो. तसा गोंडस आहे पण कधीमधी चेहरा मारामारी केल्यासारखा काळानिळा करून घेऊन, कधी सुजवून घेऊन येतो. म्हणे बाजारात कुण्या मुलीला वाचवताना त्याला हे इतकं लागलेलं असतं. तशी त्याला पुस्तकांची पानं फाडणारी लहान बहीण आहे, पटकन उडी मारून बस पकडणारी, धावत ट्रेन पकडणारी सुपरवुमन आई आहे, आणि बाबा आहेत. हे सगळं कधी दिसत नाही, पण त्याच्या निबंधांत, मित्रांबरोबरच्या गप्पांतून जाणवत राहातं. तसंही वर्गातल्या कुणाचंच घर किंवा घरचे सिनेमात नाहीत, त्यामुळे याच्या आईबाबांचं न दिसणं खटकत नाही. शाळा बहुतेक सकाळची असावी. त्यामुळं छोट्या सुटीतला नाष्टाच सगळे डब्यातून आणतात. अमनचा डबा विशेष असावा. त्याची आई त्याला छान छान पदार्थ करून देते. तसे सगळेच डबे आणतात पण दोन लोक मात्र कधीच आणत नाहीत. सिनेमाच्या नावावरूनच कळतं, की यातला एक आहे स्टॅनली आणि दुसरे आहेत हिंदीचे टीचर बाबुभाई वर्मा. स्टॅनली डबा का आणत नाही कळत नाही. त्याला इतरांचा डबा खाणंही मनाला डाचतं. म्हणून तो कधी कधी नसलेल्या दोन रूपयांचा वडापाव खातो असं खोटंच सांगून थंडा फराळ करून येतो. पण त्याचे मित्र चांगले आहेत. विशेषत: अमन. त्याच्या घरचे पराठे तेही आईने बनवले म्हटल्यावर स्टॅनली एकदम असोशीने ते खायला जातो, पण.... बाबुभाई म्हणजे एक पात्र आहे.त्याला सगळेजण खडूस म्हणतात. वर्ग अर्ध्यावर सोडून तो सहकार्‍यांनी आणलेले डबे चोरून खातो, पुन्हा सगळे जेवताना मधी मागून तर कधी कधी मला नको आहे, पण आता तुम्ही देतच आहात तर खातो बापडा म्हणून सतत खात असतो. त्यातही हे नको ते नको असे त्याचे नखरे आहेत. आताशा सगळ्यांना त्याच्या या वागण्याची सवय झालीय आणि मनात ’घे मेल्या गिळ’ असंच म्हणत त्याला खाणं ऑफर करतात. तो स्वत: फुकटचं खातो पण स्टॅनली डबा आणत नाही म्हणून त्याचा सतत पाणउतारा करतो. स्वाईन फ्ल्यूमुळं शाळांना दिलेली सुटी महागात पडते आणि शाळेला रोजचे तास वाढवणं भाग पडतं. आपसूक छोट्या सुटीसोबत आता एक मोठी सुटीही येते आणि स्टॅनलीचा डब्याचा प्रश्न आणखीच आ वासतो. अमनला तर आता चार कप्प्यांचा मोठा डबा येतो. साहजिकच वर्गातला सगळ्यात मोठा डबा आहे तो. खडूसचा त्या डब्यावर डोळा आहे. स्टॅनली एकदोनवेळा घरून जेऊन येतो म्हणून गेला पण त्याला फाटकापाशीच घुटमळताना अभिषेकनं पाह्यलंय. म्हणून स्टॅनलीची आई गावाहून येईपर्यंत अमनला स्टॅनली्सोबतच डबा शेअर करायचाय. यावरचा एकच उपाय आहे की वर्गात डबा खायचाच नाही. या उंदीर-मांजराच्या खेळात मुलं डबा खाण्याचं रोज एक वेगळं ठिकाण सांगतात आणि खडूस त्यांना वेड्यासारखा शोधत राहतो. मुलं जाऊन जाऊन जाणार कुठं? एक दिवस ही मंडळी त्याच्या तावडीत सापडतात आणि डबा घेऊन आल्याशिवाय शाळेत यायचं नाही अशी स्टॅनलीला तंबी मिळते. स्टॅनली शाळेत यायचा बंद होतो. त्याच्यावर प्रेम करणार्‍यांना, त्याला रागवणार्‍यांना, इतकंच काय पण खडूसलाही त्याची अनुपस्थिती खटकते. मध्यंतरी एका आंतरशालेय समारंभासाठी मुलांची निवड होण्याची वेळ येते पण नेमका स्टॅनली तेव्हा या डबा प्रकरणात शाळेत येत नसतो. स्टॅनलीच्या आवडत्या रोझीटीचरला हा प्रकार कळतो आणि आधीच पश्चात्ताप होत असलेल्या खडूसला ती खडे बोल सुनावते आणि अभिषेककडून त्या समारंभाची माहिती मिळून स्टॅनली थेट मुख्य ठिकाणीच जातो आणि तिथे त्याची निवड होते हे सांगायला नकोच. त्यानंतर एक दिवस स्टॅनली खडूससाठी मोठ्ठा डबा घेऊन जातो आणि त्याच्याकडे वर्गात बसण्याची परवानगी मागतो. यावेळी मात्र खडूस सरळ राजीनामा देऊन शाळाच सोडून जातो. त्या आंतरशालेय समारंभाच्या कार्यक्रमानंतरही आंतरशालेय समारंभाच्या आईबाबांना त्याला आणायला उशीर होतो आणि शाळेचे फादर त्याला घराजवळ सोडून जातात. तो घरी पोचल्यावर कळतं, आई, बाबा, बहीण हे सगळं खोटं आहे आणि तो अनाथ आहे. तो एका दूरच्या काकाच्या हॉटेलमध्ये काम करतो आणि हा काका त्याचा अतिशय छळ करतो. घरी पोचल्यापोचल्या तो हसतमुखाने कामाला लागतो आणि स्टॅनलीच्या नवीन डब्याचं गुपित कळतं. रात्रीचे राहिलेले पदार्थ दोघे मिळून डब्यात भरतात आणि दुसर्‍या दिवशी काकाच्या नकळत हा डबा स्टॅनलीसोबत शाळेत जातो. त्यानंतरही रोज तो डबा घेऊन तर जातोच आणि फक्त मित्रांनांच नाही, तर टीचर्स, शाळेतला शिपाई या सगळ्यांना आईने किती लवकर उठून आणि मेहनतीने बनवलाय याचे किस्से सांगत खिलवत राहतो. स्टॅनली लहान आहे, त्या वयाची निरागसता त्याच्या चेहर्‍यावरून ओसांडून जाताना दिसते. तो खोटं बोलतो पण त्यात बनेलपणा नाही. जेव्हा त्याच्या खोटं बोलण्याचं कारण कळतं तेव्हाही त्याच्या चेहर्‍यावरचं हसू लोपत नाही. परिस्थितीची नीट जाणीव असलेला तरी तिच्यासमोर त्यानं आपलं बाल्य हरवलं नाहीय. स्टॅनलीची भूमिका केलीय अमोल गुप्तेच्या मुलाने-पार्थो गुप्तेने. त्याचे मित्र अमन आणि अभिषेक- हे ही दोघे नवीनच चेहरे आहेत. अभिनयाच्या बाबतीत लहानांनी मोठ्यांवर बाजी मारलेय. खडूसमुळे आपला मित्र शाळेत यायचा बंद झालाय पण मास्तरवर राग कसा दाखवायचा अशा स्थितीत घुश्शात असलेला वर्ग एकदम गोडुला दिसतो. साधारणपणे लहान मुलांच्या सिनेमात मुलं मोठ्यांसारखे लेक्चर झोडत असतात. असाही इथं आव नाही ही एक जमेची बाजू. गाणी बरी आहेत पण अगदी आठवणीत राहावीत अशीही नाहीत. पिक्चरभर स्टॅनली डबा का आणत नसावा हा प्रश्न सतावत राहातो. मनाशी अंदाजही बांधले जातात. तसं ओळखणं अगदी अवघडही नाही. चित्रपट बालकामगारांच्या आकडेवारीच्या स्लाईड्सनी संपतो. चित्रपट एका बालकामगारावर असला तरी ही अनिष्ट प्रथा थांबवण्यासाठी काही संदेश देत नाही. सिनेमाचा समस्त कलाकारवृंदः आवर्जून सांगावंसं असं काही;- १. तसं पाहायला गेलं तर सिनेमात काम करणं ही पण एक मजूरीच. बरेच बालकलाकार त्यासाठी शाळा बुडवतात आणि स्वत:चे खास टीचर्स ठेवतात. इथं अमोल गुप्तेने या चित्रपटाचं शूटिंग मुलांची शाळा बुडू न देता सुटीत आणि तेही मधल्या दोन मध्यतरांसह दररोज पाच तास याप्रमाणे पूर्ण केलंय. इतर चित्रपटनिर्माते आणि विशेषत: मालिकावाल्यांनी अमोलकडून काही शिकावं आणि त्या मुलांचं बालपण हिरावून घेणं थांबवावं. २. एका फ्रेममधे घराबाहेर पडताना कोलॅप्सिबल दरवाज्याच्या आड स्टॅनली असतो आणि बाहेर रस्त्यावर उभा असतो ’कमवा आणि शिका’ चे प्रवर्तक आणि पुरस्कर्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचा धीरगंभीर आश्वासक पुतळा!!!! न बोलता हे दृश्य बरंच काही सांगून जातं. हा ’गुप्ते टच’ मला अगदी मनापासून आवडला. :-)

वाचने 10118 वाचनखूण प्रतिक्रिया 35

टारझन Wed, 06/15/2011 - 23:24
वा देशपांडे बै वा !! तुमचे लेखण म्हणजे अगदी हे आहे ... आणि हे परिक्षण म्हणजे अगदी ह्याचात हे आहे. मला हे सापडत नाहीये तुमचे हे मानायला ... इतक्या दिवसांनी हे केलं आहे पण अगदी ह्याच्या दर्जाचं ... - प्रो.बारटक्के

अनामिक Wed, 06/15/2011 - 23:54
चित्रपटाची छान ओळख करुन दिली आहे. चित्रपट तसा खास असूनही कुठेतरी कमी पडल्या सारखा वाटतो. कदाचित बर्‍यापैकी प्रेडिक्टेबल असल्याने असू शकेल. स्टॅनली आणि अमन दोघेही त्यांच्या सहज सुंदर अभिनयामुळे आवडून जातात. पण चित्रपटभर स्टॅनलीचे आई-वडील न दाखवून, त्याच्या पाणी पिऊन, किंवा नसलेल्या दोन रुपयात वडापाव खावून दिवसभर शाळेत राह्यलेले दाखवून त्याच्या बालकामगार असल्याची किंवा सावत्र वागणूक मिळत असल्याची खात्री चित्रपटाचा मध्यांतर व्हायच्या आधीच होते. पण नक्की हेच आहे की नाही, किंवा आता पुढे काय हे पाहण्यासाठी आपण चित्रपट पाहत राहतो. खडूसचं चित्र अर्धवटच राहून जातं. तो कधीही डब्बा आणत नाही, पण दुसर्‍यांचे चोरुन, मागुन, काय आणलंय विचारुन खाताना दाखवलाय. शिवाय मुलांच्या डब्यातलंही त्याला कमी पडतं. तो तसा का आहे, किंवा त्याचं बॅकग्राऊंड काय ह्याबद्दल चित्रपटात काहीच येत नाही. स्टॅनलीवर केलेल्या अन्यायाची बोच त्याच्या मनावर खोलवर जखम करते. कुणीतरी खायला दिलेले तो चक्क नाही म्हणतो, आणि त्यानंतर राजीनामा देऊन निघून जातो. चित्रपटात दिव्या दत्ताचं काम अगदी कमी आहे, पण चांगलं केलंय अस वाटलं. तरी मला त्या साऊथ इंडियन टिचरचा अभीनय सरस वाटला. अजून एक म्हणजे, असं म्हणतात की शिक्षकांच मुलांकडे बारीक लक्ष असतं. विशेषतः लहान मुलांकडे. ते काय करतात, कसे वागतात ह्याची ते नेहमी चाचणी करत असतात. मग अशावेळी स्टॅनली ने सतत डब्बा न घेता येणे हे त्यांच्या निरिक्षणातून कसं राहून जातं? असो, ह्या अश्या लहान लहान त्रुटी चित्रपटात आहेत, पण त्याकडे आपण दुर्लक्ष करू. चित्रपट एकवेळतेरी नक्की पहावा असा आहे. गाणी चांगली आणि लक्षात राहण्याजोगी असती तर चित्रपट अजून प्रभावी झाला असता असेही वाटते.

स्वाती दिनेश Wed, 06/15/2011 - 23:56
ऐकले होते ह्या सिनेमाबद्दल, आता तुझे परीक्षण वाचून तर नक्की पाहवासा वाटतो आहे.. स्वाती

यकु गुरुवार, 06/16/2011 - 01:44
व्वा! सुंदर सिनेमाची मस्त ओळख. हे वाचलं तरी नक्कीच पाहायला आवडेल.. नाही, नाही हे वाचल्यामुळे पाहाण्याची आणखी इच्छा होतेय.

ऋषिकेश गुरुवार, 06/16/2011 - 08:58
चित्रपट पाहिला आहे त्यामुळे अख्खे परिक्षण वाचले परिक्षण आणि चित्रपट दोन्ही छान आहेत..

राजेश घासकडवी गुरुवार, 06/16/2011 - 08:59
वाचून सिनेमा बघावासा वाटतो. मुलं जिवंत आणि खरी वाटतात. इतक्या लहान मुलांकडून चांगलं काम करून घेणं हे सोपं नाही.

परिकथेतील राजकुमार गुरुवार, 06/16/2011 - 12:40
मस्त परिचय ग मके. चित्रपटाचा फक्त ट्रेलर पाहिला होता, मात्र तुझे लेखन वाचुन चित्रपट पाहायलाच हवा असे वाटतय.
चित्रपट एका बालकामगारावर असला तरी ही अनिष्ट प्रथा थांबवण्यासाठी काही संदेश देत नाही.
हे खासच. उगा संदेश वैग्रे द्यायच्या प्रयत्नात चित्रपट भरकटत जाण्याचे प्रमाणच जास्ती आहे. अवांतर :- ह्यावेळी 'बम बम बोले' न झाल्याबद्दल अभिनंदन ;)

किसन शिंदे गुरुवार, 06/16/2011 - 12:54
गेल्याच आठवड्यात सलग २ वेळा हा चित्रपट पाहिला आणी तेव्हाच ठरवलं याच्यावर परिक्षण लिहायचं पण ते काम तुम्ही माझ्या आधी केल्यामुळे तुमचे आभार. सुरुवातीच्या दॄश्यात आणी संपुर्ण चित्रपटात स्टॅनलीच्या चेहरयावर आणी अंगावर उठलेल्या वळांचा खरा अर्थ शेवटास उमगतो. स्टॅनलीचे काम केलेल्या पार्थो गुप्ते आणी त्याच्या मित्रांनी अप्रतिम काम केले आहे. त्याच्याशी नेहमी ड्ब्बा शेअर करणारा अमन मेहरा खुप गोंड्स दिसतो विशेषतः आपला मित्र शाळेत यायचा बंद झाल्यावर तो ज्या रागाने खडूसकडे बघतो त्या वेळेस. जाता जाता असं सांगावस वाटतं, तारे जमीन पर या चित्रपटाचे सर्व क्रेडिट आमीरला गेल्याने दुखावलेल्या अमोल गुप्तेंनी या चित्रपटाची निर्मिती केली असावी.

मृत्युन्जय गुरुवार, 06/16/2011 - 12:54
वा. सुंदरच ओळख. याआधी पण कुठल्यातरी साइटवर चित्रपट परीक्षण वाचले होते. पण हे त्याहुन जास्त चांगले आहे. चित्रपटही असाच सुंदर अंसेल अशी खात्री आहे.

स्मिता. गुरुवार, 06/16/2011 - 14:00
चित्रपटाचा परिचय आवडला. तसं बरंच ऐकलं होतं या चित्रपटाबद्दल. बरं झालं कथानक आधीच कळलं, नाहीतर अनपेक्षितपणे असे बघताना मनाला त्रास होतो :(

चतुरंग गुरुवार, 06/16/2011 - 17:11
चित्रपट सुंदर आहे. एकदम साधाच. एखाद्या डॉक्युमेंटरीपटासारखा सुरु होतो. लहान मुलांच्या तोंडी न शोभणारे जडजंबाळ संवाद आणि दृश्ये नाहीत. चालू शाळेतच चित्रीकरण केल्याने मुलं अतिशय निवांत आहेत. स्टॅनलीची गरिबी किंवा त्याचे बालकामगार म्हणून होणारे हाल अजिबात अंगावर येतील असे दाखवलेले नाहीत. जो काय संदेश पोचवायचा आहे आणि सहृदय व्यक्तीला त्याची जी काही बोच लागायला हवी तेवढेच. उगाच आड्यन्सला धो धो रडवायचे उद्योग नाहीत. जरुर बघा. मला अतिशय आवडला. -रंगा

मोहन गुरुवार, 06/16/2011 - 17:41
मी पहिल्याच आठवड्यात पाहीला. "खुप्ते तिथे गुप्ते" मधे अमोल गुप्ते कडूनच या चित्रपटा बद्दल समजले होते. तेंव्हाच हा पाहायचा नक्की केले होते. फारच छान आहे. गंभीर विषयाची फार समर्पक हाताळणी केली आहे. वर चतुरंग म्हणतात त्याला १००% सहमत आहे.

रेवती गुरुवार, 06/16/2011 - 22:38
मलाही आवडला हा सिनेमा. काहीतरी मिसींग आहे असं मात्र वाटत राहिलं. काय ते सांगता येणार नाही. स्टॅनलीबद्दल, घराबद्दल काही आडखे बांधणे आपोआप सुरु होते. बालमजूर वगैरे विचार मनात आला पण तसा तो करायला आवडला नाही. शेवटी मात्र त्या लेकराचा निरागसपणाही बघवेना.

निशदे Fri, 06/17/2011 - 03:21
काही दिवसांपूर्वीच पाहिला. अतिशय उत्तम कन्सेप्ट आणि सहज अभिनय यामुळे नेहेमीच्या बिनडोक हिंदी सिनेमांमध्ये उठून दिसला. मोठ्या विषयांना हलकाफुलका 'टच' द्यायचा प्रयत्न सध्या चालू आहेत (हरिश्चंद्राची फॅक्टरी, निशाणी डावा अंगठा, गाभ्रीचा पाऊस) त्यातलाच हा एक उत्तम प्रयत्न वाटला. :)

रामदास Fri, 06/17/2011 - 12:27
माझ्या मुलांनी आग्रह केला होता की बाबा तुम्हीच बघण्यासारखा सिनेमा आहे म्हणून .हे चित्रपट परीक्षण वाचून आता सिनेमा बघण्याची आवश्यकता संपली आहे. अभिनंदन. या सिनेमाची कथा वाचून वसुधा पाटील (जमुनाके तीर )यांच्या एका कथेची आठवण तीव्रतेने झाली. त्या कथेचे नाव आहे श्रीनिवास पानसेचे अंगण . जमल्यास जरूर वाचा. जर त्यांची माझी भेट झाली तर त्यांच्या परवानगीने मूळ कथा मिपावर टाकेन.

मस्त कलंदर Fri, 06/17/2011 - 18:00
अनामिक,रेवती यांच्या चित्रपटात कुठेतरी अपूर्णता जाणवते या मताशी मी ही सहमत आहे. खडूसचं पात्र असं का वागतं याच्यामागची कारणमीमांसा दाखवली नसली तरी त्याची तशी वृत्ती बनलीय हे कळतं. स्टॅनलीचा नाईलाज आहे , पण खडूसला डबा आणणं शक्य आहे. (कमावता आहे. डबा नसेल मिळत तर वडापाव खाण्यासाठी दोन रूपये नक्कीच असतील) अशा वेळी स्टॅनलीचं स्वतःहून खाणं न मागणं, खोटं बोलून शक्य तितकी सहानुभूती नाकारणं हे त्याचा चांगुलपणा आणखीच अधोरेखित करतं. मुलांनी अभिनय चांगला केला आहेच, आणि रंगाकाका म्हणतात तसा तो सहजसुंदर आहे. शाळाही कुठली हाय-फाय नाही.
उगाच आड्यन्सला धो धो रडवायचे उद्योग नाहीत.
हे विशेष पटले. @परा,
उगा संदेश वैग्रे द्यायच्या प्रयत्नात चित्रपट भरकटत जाण्याचे प्रमाणच जास्ती आहे.
आकडेवारीच्या स्लाईडसोबत एखादी छानशी कॅचलाईन असलेली स्लाईड चालली असती, असं मला वाटतं.
ह्यावेळी 'बम बम बोले' न झाल्याबद्दल अभिनंदन
:-). आता वेळ मिळाला की रस्किन बाँडच्या कथेवरील आधारित ' द ब्ल्यू अंब्रेला' व आणखी एक लहान मुलांवरचा सिनेमा 'तहान' वर लिहायचा विचार आहे. तोवर कुणी लिहिलं तर आनंदाने प्रतिसाद द्यायलाही तयार आहे. :-) जाता जाता: मला आवडलेली फ्रेम-

स्वाती दिनेश Fri, 06/17/2011 - 20:06
आजच यु ट्युब वर पाहिला सिनेमा, आवडला. खडुस असा का वागतो? नंतर त्याला पश्चात्ताप का होतो? असे काही प्रश्न अनुत्तरित राहतात तरीही, संदेश, बिंदेश देण्याच्या भानगडीत न पडता आणि उगाच गोग्गोड शेवट न करता साध्या रीतीने परिस्थिती मांडली आहे, ते विशेष भावले.आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सगळी मुले टिपिकल हिंदी सिनेमा/सिरियलांमधली आगाऊ कार्टी न वाटता त्यांच्या वयाला साजेसे काम करतात. त्यांच्या तोंडचे संवादही साधे, सोपे, रोजच्या बोलीतले आहेत त्यामुळेही ती अ‍ॅक्टिंग करत आहेत असे न वाटता 'खरी' वाटतात. स्वाती मके, तुझे परिक्षण वाचल्यामुळे लग्गेच मिळवून पाहिला ग बाई, धन्यु, नाहीतर या बाबतीत मी जरा आळशीच आहे.

पल्लवी Sun, 06/26/2011 - 20:24
सिनेमा आवडला. पण कुठेतरी काहीतरी राहुन गेलेय असं शेवटी वाटतं खरं. खडुस असा काय वागतो आणि शेवटी निघुनच काय जातो - ह्याचा काही संबंध लागतच नाही... पण बाकी सिनेमा मस्त. मिसेस अय्यर एकदम कल्ला ! :) :) सगळ्या मुलांचा डान्स वगैरे पण छान..उगाच मारुन मुटकुन कोरीओग्राफ केलेला नाही वाट्ला..