पुण्यातल्या दिवसेंदिवस असह्य होत जाणार्या वाहनवरातीतून कसेबसे रस्ता काढत आम्ही आठ वाजता सिटी प्राईडला पोहोचलो. 'बालगंधर्व'चे खूप कौतुक ऐकून होतो; त्यामुळे हा चित्रपट पाहणं क्रमप्राप्त होतं. शिवाय 'नटरंग'मुळे रवी जाधव काय ताकदीचे दिग्दर्शक आहेत हे लक्षात आलं होतंच. आगाऊ तिकिट काढून देखील अगदी कोपर्यातली तिकिटे मिळाली होती. स्थानापन्न झालो. पुढील सव्वादोन तास अक्षरश: मंतरलेल्या अवस्थेत चित्रपट पाहिला. कशाकशाचं तोंड भरून कौतुक करावं? शब्दात कसं पकडायचं ते गारुड? एखाद्या घाटातल्या, झाडाफुलांनी नटलेल्या रस्त्यावरून जातांना अचानक कुठल्या तरी अनामिक फुलांचा सुगंध अलगद आपल्या मनाला प्रफुल्लित करून जावा आणि मग घरी आल्यावर 'ससुराल गेंदा फूल' किंवा 'मन उधाण वार्याचे' बघतांना कुणाला तरी तो शब्दात व्यक्त करून सांगावा; ऐकणार्याने देखील सुहानाला किंवा 'मन...' मधल्या गौरीला बघतांना नुसतेच नाटकी 'हो का?' असे म्हणून पुन्हा मालिकेच्या घाण्याला आपली मान जुंपावी, तसच काहीतरी माझं होणार आहे 'बालगंधर्व' विषयी सांगतांना! सुगंधाचं वर्णन शब्दात करता येत नाही; तो अनुभवावा लागतो; श्रावणसरींमध्ये चिंब भिजल्याशिवाय कवितांमधल्या श्रावणाची मजा कळत नाही. 'बालगंधर्व' बघणे हा एक संस्कार आहे; मनाला भुरळ पाडणारं ते एक सोनेरी पान आहे. 'तार्यांचे बेट' हा एक अनुभव होता; जगणे शिकवणारा अनुभव! 'बालगंधर्व' एक सोहळा आहे, डोळे दिपवणारा सोनेरी सोहळा!
'बालगंधर्व' पाहल्यानंतर माझा मराठी असण्याचा अभिमान नुसताच द्विगुणितच झाला नाही तर त्यावर आपल्या मराठी मनाच्या अभिरुचीसंपन्नतेची एक लखलखती महिरप देखील जडवली गेली. बालगंधर्व, गणपतराव बोडस, राम गणेश गडकरी, किर्लोस्कर, देवल, केशवराव भोसले, टेंबे ही मंडळी त्यांच्या क्षेत्रांमध्ये श्रेष्ठ तर होतीच पण दैवी चमत्कार या श्रेणीमध्ये मोडणारी होती. आताचे लताबाई, आशाताई, सचिन तेंडुलकर, मागच्या काळातले पुल, वपु, अजून नावे घ्यायची तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, बहिणाबाई, शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, टिळक, सावरकर, पं. हॄदयनाथ मंगेशकर, कर्वे, फुले, पठ्ठे बापूराव, होनाजी बाळा, आगरकर ही आणि अशी शेकडो नावे कालस्थलाच्या तुच्छ मर्यादा ओलांडून अजरामर झाली. लखलखत्या तार्यांसारखे त्यांचे स्थान अढळ झाले आणि यापुढे ही राहील यात शंकाच नाही. काय किमया आहे यांच्यासारख्या हिमालयाएवढ्या यशवंतांची! 'बालगंधर्व' बघतांना बालगंधर्वांच्या अगाध गायकीला सलाम तर जातच होता पण तितकाच कडक सलाम जात होता चित्रपट सादर करणार्यांना. जवळपास एका शतकाआधी संगीत नाट्यभूमीला जिवंत करणारा एक नट बघायला आयपॉड आणि आयपॅड ऐकत फेसबूक अपडेट करण्याने दिवसाची सुरुवात करणार्या नवतरुणांनी गर्दी करणे हे चित्रपटाचे यश नाही का? तुडुंब भरलेल्या चित्रपटगृहात 'एकच प्याला' आणि 'मानापमान' मधली नाट्यपदे ऐकतांना जाणवणारी तल्लीनतेची लहर कशाचे द्योतक आहे? नवनवीन विषयांवरचे आशयसंपन्नतेइतकेच मनोरंजनला महत्व देणारे चित्रपट खूप कमी बनतात. मराठी चित्रपट या सुगंधी गॅलरीत अगदी मोक्याच्या स्थानावर विराजमान आहे ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट! 'श्वास', 'जोगवा', 'मी शिवाजीराजे...', 'वळू', 'नटरंग', 'तार्यांचे बेट', 'पारध', 'झेंडा', 'निशाणी डावा अंगठा'....किती नावे घ्यायची? मराठी मातीचा सुगंध अगदी बावनकशी आहे हेच खरे!!
बाल'बालगंधर्व' मैफीलीत गात असतात या प्रसंगाने चित्रपट सुरु होतो. मग किर्लोस्कर कंपनीत प्रवेश, लग्न, गंधर्व नाटक कंपनी, दिवाळखोरी, गोहरजान असे टप्पे घेत चित्रपट पुढे सरकतो. नाट्यपदांची मुक्त पखरण चित्रपटाचा आत्मा आहे. खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीवर चित्रपट लिहिणं खूप अवघड असावं; कारण त्यात उत्कंठावर्धक रहस्ये नसतात किंवा प्रत्येक प्रसंगाला एका उंचीवर नेऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं काल्पनिक चित्रपटांमधलं नाट्य ही नसतं. अनपेक्षित वळणे घेऊन प्रेक्षकांना अचंबित करण्याची संधी ही फारशी नसते. अशा चित्रपटांमध्ये खरा कस लागतो तो पटकथाकाराचा. अभिराम भडकमकरांनी अप्रतिम पटकथा लिहिलेली आहे. त्यांनी अतिशय बांधीव, आखीव-रेखीव आणि सुदॄढ अशी पटकथा लिहून चित्रपटाच्या मांडणीमध्ये जान ओतलेली आहे. चित्रपट कुठेच कंटाळवाणा होत नाही किंबहुना क्षणाक्षणाला मन चित्रपटात अधिकाधिक गुंतत जातं. अशा चित्रपटांमध्ये डोकावू शकणारा माहितीपटाचा फील कुठेही औषधालाही जाणवत नाही.
दिग्दर्शक रवी जाधव एक कसलेले दिग्दर्शक आहेत हे नक्की! एकूणच आवाका त्यांनी इतका उत्तम हाताळलाय की जवाब नही. बारीक-सारीक तपशीलासह चित्रपटाचा वेग, वातावरण, आणि उत्सुकता या सगळ्यांचा त्यांनी उत्तम मेळ साधलेला आहे. अगदी कोपर्यात असलेल्या तबलजीची तबल्यावरची हाता-बोटांची हालचाल तबल्याच्या ठेक्याशी तंतोतंत जुळते. रंगप्रकाशाचा खेळ करून, नेपथ्यातल्या घटकांचा वापर करून पात्रांच्या मनातले भाव अगदी अफलातून पद्धतीने समोर आणण्यात दिग्दर्शक यशस्वी झालेले आहेत.
१९११ च्या आसपासचा महाराष्ट्र खूप छान दाखवलेला आहे. कला दिग्दर्शन सरस आहे. भामिनी किंवा द्रौपदीची वेशभूषा, केशभूषा, तिचे दागदागिने, त्या काळातले रंगमंच, पोषाख इत्यादी खूप संदर पध्दतीने चितारले आहे. महेश लिमयेंचे छायाचित्रण बिनचूक आहे. नदी तीरावर बालगंधर्व तल्लीन होऊन गात आहेत हा प्रसंग अगदी दॄष्ट लागण्यासारखा दिसतो. कोल्हापूरचा राजवाडा, बडोद्याचा राजवाडा, त्या पार्श्वभूमीवर घडणार्या घटना खूप छान टिपल्या आहेत.
कौशल इनामदारांचं संगीत कौतुकास्पद आहे. आनंद भाटे, आर्या आंबेकर, शंकर महादेवन, राहुल देशपांडे श्रवणीय! नाट्यपदांसोबतच स्वानंद किरकिरेंचं 'परवरदिगार..' हे कव्वालीसदृष गाणं खूप मस्त जमून आलंय. कौशलनी चाल छान बांधलीय.
'बालगंधर्व'चा आत्मा ठरलेला आहे सुबोध भावे! काय काम केलंय या माणसाने!? तरुणपणातली उमेद, नंतर मिळणार्या यशाचा थोडासा उन्माद, कठोर सचोटी, कलेला आणि रसिकांना आयुष्य अर्पण केल्याची भावना, व्यवहारशून्यता, उतारवयातली लाचारी, तडजोड न करण्याची वृत्ती, मुलगी वारल्याचे दु:ख, कालानुरुप न बदलण्याचा ताठरपणा, खचून गेल्यावर होणारी तगमग इत्यादी विविध कंगोरे असणारी क्लिष्ट भूमिका साकारणे आणि नाट्यमयतेचा अतिरेक न होऊ देणे हे एक मोठे आव्हानच होते. परंतु सुबोधने हे सगळे कंगोरे समर्थपणे नुसते पेललेच नाहीयेत तर तो ही भूमिका अक्षरशः जगला आहे. समोर बालगंधर्वच आहेत असे ठामपणे वाटावे इतका अस्सल अभिनय सुबोधने केला आहे! ही भूमिका आणि हा चित्रपट त्याच्या कारकीर्दीतला एक मैलाचा दगड आहे यात शंकाच नाही. पारितोषिकांचा वर्षाव (चित्रपटावर देखील) निश्चित समजा!!! चित्रपटाच्या मध्यंतरात बाहेर आलो तर चक्क सुबोध प्रेक्षकांच्या गराड्यात उभा होता. प्रेक्षकांनी त्याला वेढा घातला होता. मोबाईलवर फोटो काढणे सुरु होते. सगळ्यांची त्याला भेटून त्याचे अभिनंदन करण्याची धडपड सुरु होती. गर्दीतून वाट काढत मे देखील कसाबसा त्याच्याजवळ पोहोचलो आणि त्याच्याशी हस्तांदोलन करून त्याचे अभिनंदन केले. तो ही सगळ्यांना हसून प्रतिसाद देत होता. ज्याचा चित्रपट आत बघत आहोत त्यातला मुख्य कलाकार बाहेर उभा आहे आणि आपण त्याला भेटतो आहोत असा माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता. खूप मस्त वाटले.
अविनाश नारकर, विद्याधर जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अभिजीत केळकर, किशोर कदम, राहुल देशपांडे, मुकेश ॠषी, प्रसन्न केतकर, ओंकार कुळकर्णी, विभावरी देशपांडे, सुहास जोशी, मनोज जोशी, श्रीरंग गोडबोले इत्यादी सगळ्यांनी खणखणीत काम केलेले आहे.
आपल्या बायको-पोरांना आणि वृद्ध आईला सोडून बालगंधर्व कायमचे का निघून जातात याचा उलगडा मात्र नीटसा झाला नाही. तो भाग थोडा स्पष्ट करून दाखवायला हवा होता. शेवटच्या काही प्रसंगात डोळ्याच्या कडा ओलावतात. ही नाट्यमयता थोडी कमी असली असती तरी चालले असते. अर्थात हे दोष नव्हेतच!
काही काही चित्रपट असे मनाच्या मेमरीवर लोड करून ठेवण्यासारखे असतात. असे वाटते हे चित्रपट वाट्टेल तेव्हा मनात चालवून बाहेर कुठल्यातरी पडद्यावर बघता यावेत (कदाचित येईलही असे तंत्र). किंवा डोळे बंद करून मनाच्या पडद्यावर स्मरणशक्तीतून आठवणींची किरणे परावर्तित करून हे चित्रपट बघता यावेत. 'बालगंधर्व' त्यातलाच एक हिरा! जपून ठेवावा असा, वाटेल तेव्हा बाहेर काढून मनमुराद बघावा असा! नक्की बघा, सगळ्यांना दाखवा, डीव्हीडी आल्यावर संग्रही ठेवा!
--समीर
वाचने
6690
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर...खूप छान लिहिलय..
धन्यवाद समीरसुर, छान
बालगंधर्व एक चित्रपट म्हणुन
२५,०००रुपयांची अत्तरं ?
In reply to बालगंधर्व एक चित्रपट म्हणुन by टारझन
२५,०००रुपयांची अत्तरं ?
In reply to बालगंधर्व एक चित्रपट म्हणुन by टारझन
२५००० अत्तर?
In reply to २५,०००रुपयांची अत्तरं ? by विसोबा खेचर
बालगंधर्व जो शालु नेसत तो
In reply to २५००० अत्तर? by योगी९००
धन्यवाद
In reply to बालगंधर्व जो शालु नेसत तो by स्पंदना
धन्यवाद..
In reply to बालगंधर्व जो शालु नेसत तो by स्पंदना
एकाच चित्रपटाचं तिसरं
>>कला आणि व्यवहार एकत्र जाउ
In reply to एकाच चित्रपटाचं तिसरं by ५० फक्त
परीक्षणे
आवडीचा प्रश्न, आणि इतर शक्यता
In reply to परीक्षणे by नितिन थत्ते
चौथी शक्यता
In reply to आवडीचा प्रश्न, आणि इतर शक्यता by पंगा
'अत्तरे' आनी 'रुम फ्रेशनर'
In reply to चौथी शक्यता by गोगोल
तिसरी शक्यता - बालगंधर्वांना
In reply to आवडीचा प्रश्न, आणि इतर शक्यता by पंगा
जिलबी, गुलाबजाम
In reply to परीक्षणे by नितिन थत्ते
गुलाबजामचा महाराष्ट्रीय
In reply to जिलबी, गुलाबजाम by राही
गुलाबजाम ??????????
In reply to परीक्षणे by नितिन थत्ते
सुरेख
वरील
सहमत..!
In reply to वरील by तिमा
नक्की पिक्चर बघावा कि नाही?
पिक्चर पहावाच. उत्तम
In reply to नक्की पिक्चर बघावा कि नाही? by वेताळ
असहमत परंतू
In reply to पिक्चर पहावाच. उत्तम by नितिन थत्ते
समीरसूर
क ड क !
बालगंधर्व पाहीला पण आवडला कि
सिनेमॅटीक लिबर्टी
आज उभ्या महाराष्ट्राला एक
In reply to सिनेमॅटीक लिबर्टी by समीरसूर
समृद्धी
In reply to सिनेमॅटीक लिबर्टी by समीरसूर
अवश्य बघेन
अगदी...
In reply to अवश्य बघेन by प्रियाली
समीरसूर नेहमीप्रमाणे सुंदर
गजर
In reply to समीरसूर नेहमीप्रमाणे सुंदर by गणेशा
थोर माणसांची यादी
पंडित
In reply to थोर माणसांची यादी by रामपुरी
चित्रपटाबद्दल आधीच खुप असलेली