Skip to main content

बालगंधर्व, आम्ही तुम्हाला पाहिलं!

लेखक समीरसूर यांनी रविवार, 15/05/2011 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातल्या दिवसेंदिवस असह्य होत जाणार्‍या वाहनवरातीतून कसेबसे रस्ता काढत आम्ही आठ वाजता सिटी प्राईडला पोहोचलो. 'बालगंधर्व'चे खूप कौतुक ऐकून होतो; त्यामुळे हा चित्रपट पाहणं क्रमप्राप्त होतं. शिवाय 'नटरंग'मुळे रवी जाधव काय ताकदीचे दिग्दर्शक आहेत हे लक्षात आलं होतंच. आगाऊ तिकिट काढून देखील अगदी कोपर्‍यातली तिकिटे मिळाली होती. स्थानापन्न झालो. पुढील सव्वादोन तास अक्षरश: मंतरलेल्या अवस्थेत चित्रपट पाहिला. कशाकशाचं तोंड भरून कौतुक करावं? शब्दात कसं पकडायचं ते गारुड? एखाद्या घाटातल्या, झाडाफुलांनी नटलेल्या रस्त्यावरून जातांना अचानक कुठल्या तरी अनामिक फुलांचा सुगंध अलगद आपल्या मनाला प्रफुल्लित करून जावा आणि मग घरी आल्यावर 'ससुराल गेंदा फूल' किंवा 'मन उधाण वार्‍याचे' बघतांना कुणाला तरी तो शब्दात व्यक्त करून सांगावा; ऐकणार्‍याने देखील सुहानाला किंवा 'मन...' मधल्या गौरीला बघतांना नुसतेच नाटकी 'हो का?' असे म्हणून पुन्हा मालिकेच्या घाण्याला आपली मान जुंपावी, तसच काहीतरी माझं होणार आहे 'बालगंधर्व' विषयी सांगतांना! सुगंधाचं वर्णन शब्दात करता येत नाही; तो अनुभवावा लागतो; श्रावणसरींमध्ये चिंब भिजल्याशिवाय कवितांमधल्या श्रावणाची मजा कळत नाही. 'बालगंधर्व' बघणे हा एक संस्कार आहे; मनाला भुरळ पाडणारं ते एक सोनेरी पान आहे. 'तार्‍यांचे बेट' हा एक अनुभव होता; जगणे शिकवणारा अनुभव! 'बालगंधर्व' एक सोहळा आहे, डोळे दिपवणारा सोनेरी सोहळा! 'बालगंधर्व' पाहल्यानंतर माझा मराठी असण्याचा अभिमान नुसताच द्विगुणितच झाला नाही तर त्यावर आपल्या मराठी मनाच्या अभिरुचीसंपन्नतेची एक लखलखती महिरप देखील जडवली गेली. बालगंधर्व, गणपतराव बोडस, राम गणेश गडकरी, किर्लोस्कर, देवल, केशवराव भोसले, टेंबे ही मंडळी त्यांच्या क्षेत्रांमध्ये श्रेष्ठ तर होतीच पण दैवी चमत्कार या श्रेणीमध्ये मोडणारी होती. आताचे लताबाई, आशाताई, सचिन तेंडुलकर, मागच्या काळातले पुल, वपु, अजून नावे घ्यायची तर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, बहिणाबाई, शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, टिळक, सावरकर, पं. हॄदयनाथ मंगेशकर, कर्वे, फुले, पठ्ठे बापूराव, होनाजी बाळा, आगरकर ही आणि अशी शेकडो नावे कालस्थलाच्या तुच्छ मर्यादा ओलांडून अजरामर झाली. लखलखत्या तार्‍यांसारखे त्यांचे स्थान अढळ झाले आणि यापुढे ही राहील यात शंकाच नाही. काय किमया आहे यांच्यासारख्या हिमालयाएवढ्या यशवंतांची! 'बालगंधर्व' बघतांना बालगंधर्वांच्या अगाध गायकीला सलाम तर जातच होता पण तितकाच कडक सलाम जात होता चित्रपट सादर करणार्‍यांना. जवळपास एका शतकाआधी संगीत नाट्यभूमीला जिवंत करणारा एक नट बघायला आयपॉड आणि आयपॅड ऐकत फेसबूक अपडेट करण्याने दिवसाची सुरुवात करणार्‍या नवतरुणांनी गर्दी करणे हे चित्रपटाचे यश नाही का? तुडुंब भरलेल्या चित्रपटगृहात 'एकच प्याला' आणि 'मानापमान' मधली नाट्यपदे ऐकतांना जाणवणारी तल्लीनतेची लहर कशाचे द्योतक आहे? नवनवीन विषयांवरचे आशयसंपन्नतेइतकेच मनोरंजनला महत्व देणारे चित्रपट खूप कमी बनतात. मराठी चित्रपट या सुगंधी गॅलरीत अगदी मोक्याच्या स्थानावर विराजमान आहे ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट! 'श्वास', 'जोगवा', 'मी शिवाजीराजे...', 'वळू', 'नटरंग', 'तार्‍यांचे बेट', 'पारध', 'झेंडा', 'निशाणी डावा अंगठा'....किती नावे घ्यायची? मराठी मातीचा सुगंध अगदी बावनकशी आहे हेच खरे!! बाल'बालगंधर्व' मैफीलीत गात असतात या प्रसंगाने चित्रपट सुरु होतो. मग किर्लोस्कर कंपनीत प्रवेश, लग्न, गंधर्व नाटक कंपनी, दिवाळखोरी, गोहरजान असे टप्पे घेत चित्रपट पुढे सरकतो. नाट्यपदांची मुक्त पखरण चित्रपटाचा आत्मा आहे. खरं म्हणजे एखाद्या व्यक्तीवर चित्रपट लिहिणं खूप अवघड असावं; कारण त्यात उत्कंठावर्धक रहस्ये नसतात किंवा प्रत्येक प्रसंगाला एका उंचीवर नेऊन प्रेक्षकांना खिळवून ठेवणारं काल्पनिक चित्रपटांमधलं नाट्य ही नसतं. अनपेक्षित वळणे घेऊन प्रेक्षकांना अचंबित करण्याची संधी ही फारशी नसते. अशा चित्रपटांमध्ये खरा कस लागतो तो पटकथाकाराचा. अभिराम भडकमकरांनी अप्रतिम पटकथा लिहिलेली आहे. त्यांनी अतिशय बांधीव, आखीव-रेखीव आणि सुदॄढ अशी पटकथा लिहून चित्रपटाच्या मांडणीमध्ये जान ओतलेली आहे. चित्रपट कुठेच कंटाळवाणा होत नाही किंबहुना क्षणाक्षणाला मन चित्रपटात अधिकाधिक गुंतत जातं. अशा चित्रपटांमध्ये डोकावू शकणारा माहितीपटाचा फील कुठेही औषधालाही जाणवत नाही. दिग्दर्शक रवी जाधव एक कसलेले दिग्दर्शक आहेत हे नक्की! एकूणच आवाका त्यांनी इतका उत्तम हाताळलाय की जवाब नही. बारीक-सारीक तपशीलासह चित्रपटाचा वेग, वातावरण, आणि उत्सुकता या सगळ्यांचा त्यांनी उत्तम मेळ साधलेला आहे. अगदी कोपर्‍यात असलेल्या तबलजीची तबल्यावरची हाता-बोटांची हालचाल तबल्याच्या ठेक्याशी तंतोतंत जुळते. रंगप्रकाशाचा खेळ करून, नेपथ्यातल्या घटकांचा वापर करून पात्रांच्या मनातले भाव अगदी अफलातून पद्धतीने समोर आणण्यात दिग्दर्शक यशस्वी झालेले आहेत. १९११ च्या आसपासचा महाराष्ट्र खूप छान दाखवलेला आहे. कला दिग्दर्शन सरस आहे. भामिनी किंवा द्रौपदीची वेशभूषा, केशभूषा, तिचे दागदागिने, त्या काळातले रंगमंच, पोषाख इत्यादी खूप संदर पध्दतीने चितारले आहे. महेश लिमयेंचे छायाचित्रण बिनचूक आहे. नदी तीरावर बालगंधर्व तल्लीन होऊन गात आहेत हा प्रसंग अगदी दॄष्ट लागण्यासारखा दिसतो. कोल्हापूरचा राजवाडा, बडोद्याचा राजवाडा, त्या पार्श्वभूमीवर घडणार्‍या घटना खूप छान टिपल्या आहेत. कौशल इनामदारांचं संगीत कौतुकास्पद आहे. आनंद भाटे, आर्या आंबेकर, शंकर महादेवन, राहुल देशपांडे श्रवणीय! नाट्यपदांसोबतच स्वानंद किरकिरेंचं 'परवरदिगार..' हे कव्वालीसदृष गाणं खूप मस्त जमून आलंय. कौशलनी चाल छान बांधलीय. 'बालगंधर्व'चा आत्मा ठरलेला आहे सुबोध भावे! काय काम केलंय या माणसाने!? तरुणपणातली उमेद, नंतर मिळणार्‍या यशाचा थोडासा उन्माद, कठोर सचोटी, कलेला आणि रसिकांना आयुष्य अर्पण केल्याची भावना, व्यवहारशून्यता, उतारवयातली लाचारी, तडजोड न करण्याची वृत्ती, मुलगी वारल्याचे दु:ख, कालानुरुप न बदलण्याचा ताठरपणा, खचून गेल्यावर होणारी तगमग इत्यादी विविध कंगोरे असणारी क्लिष्ट भूमिका साकारणे आणि नाट्यमयतेचा अतिरेक न होऊ देणे हे एक मोठे आव्हानच होते. परंतु सुबोधने हे सगळे कंगोरे समर्थपणे नुसते पेललेच नाहीयेत तर तो ही भूमिका अक्षरशः जगला आहे. समोर बालगंधर्वच आहेत असे ठामपणे वाटावे इतका अस्सल अभिनय सुबोधने केला आहे! ही भूमिका आणि हा चित्रपट त्याच्या कारकीर्दीतला एक मैलाचा दगड आहे यात शंकाच नाही. पारितोषिकांचा वर्षाव (चित्रपटावर देखील) निश्चित समजा!!! चित्रपटाच्या मध्यंतरात बाहेर आलो तर चक्क सुबोध प्रेक्षकांच्या गराड्यात उभा होता. प्रेक्षकांनी त्याला वेढा घातला होता. मोबाईलवर फोटो काढणे सुरु होते. सगळ्यांची त्याला भेटून त्याचे अभिनंदन करण्याची धडपड सुरु होती. गर्दीतून वाट काढत मे देखील कसाबसा त्याच्याजवळ पोहोचलो आणि त्याच्याशी हस्तांदोलन करून त्याचे अभिनंदन केले. तो ही सगळ्यांना हसून प्रतिसाद देत होता. ज्याचा चित्रपट आत बघत आहोत त्यातला मुख्य कलाकार बाहेर उभा आहे आणि आपण त्याला भेटतो आहोत असा माझ्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग होता. खूप मस्त वाटले. अविनाश नारकर, विद्याधर जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अभिजीत केळकर, किशोर कदम, राहुल देशपांडे, मुकेश ॠषी, प्रसन्न केतकर, ओंकार कुळकर्णी, विभावरी देशपांडे, सुहास जोशी, मनोज जोशी, श्रीरंग गोडबोले इत्यादी सगळ्यांनी खणखणीत काम केलेले आहे. आपल्या बायको-पोरांना आणि वृद्ध आईला सोडून बालगंधर्व कायमचे का निघून जातात याचा उलगडा मात्र नीटसा झाला नाही. तो भाग थोडा स्पष्ट करून दाखवायला हवा होता. शेवटच्या काही प्रसंगात डोळ्याच्या कडा ओलावतात. ही नाट्यमयता थोडी कमी असली असती तरी चालले असते. अर्थात हे दोष नव्हेतच! काही काही चित्रपट असे मनाच्या मेमरीवर लोड करून ठेवण्यासारखे असतात. असे वाटते हे चित्रपट वाट्टेल तेव्हा मनात चालवून बाहेर कुठल्यातरी पडद्यावर बघता यावेत (कदाचित येईलही असे तंत्र). किंवा डोळे बंद करून मनाच्या पडद्यावर स्मरणशक्तीतून आठवणींची किरणे परावर्तित करून हे चित्रपट बघता यावेत. 'बालगंधर्व' त्यातलाच एक हिरा! जपून ठेवावा असा, वाटेल तेव्हा बाहेर काढून मनमुराद बघावा असा! नक्की बघा, सगळ्यांना दाखवा, डीव्हीडी आल्यावर संग्रही ठेवा! --समीर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6691
प्रतिक्रिया 38

प्रतिक्रिया

बालगंधर्व एक चित्रपट म्हणुन अत्यंत सुमार चित्रपट आहे असे आमचे मत आहे. काही प्रसंग बळेच ओढुन ताणुन मांडले आहेत. बालगंधर्व एकदा नाटकात प्रयोग म्हणुन हरणाच्या जागी खरं बकरीचं पिल्लु आणतात , जे प्रेक्षकांत घुसते. प्रेक्षकांना बहुदा तो रेडा किंवा वाघ सिंह वाटला असं पब्लिक पळत सुटतं. २५,०००रुपयांची अत्तरं ? बालगंधर्वाला रसिक मायबापाला भव्यदिव्यतेच्या अनुभवासाठी भारी शालु , रत्नालंकार वगैरे दाखवायचे असतात ते ठिक , पण २५,००० च्या अत्तरांनी कोणता थाट होणार होता ? बालगंधर्वांनी शौकिनता दाखवण्यासाठी फुगवुन सांगितलेला प्रसंग वाटतो. व्यवहारात मुर्ख दाखवलेले बालगंधर्व चुक कळल्यावरही ती दुरुस्त करण्या ऐवजी एकदम एक्स्पेक्टेशन पेक्षा वेगळं काहीतरी करतात. आणि सरतेशेवटी आपण काही करतंच नाही. आपण फक्त पात्र आहोत, त्याने लिहीलेल्या नाटकाला सादर करणारे नट आहोत वगैरे :) बाकी नटरंग मध्ये स्त्रीपार्टी कलाकाराकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोण आणि गंधर्वांकडे बघण्याचा दृष्टिकोण ह्यात प्रचंड तफावत जाणवते. चित्रपटात सुरुवातीला दाखवलेले लोकमान्य टिळक पाहुन मी खुर्चीत हसुन आडवा झालो होतो. त्यात ते नारायणाला गाताना पाहुन ( जस्ट आत येता येता) "अरे हा तर बालगंधर्व " हे ज्या काही थाटात म्हंटलंय .. त्या नंतर पोटाला वात येतोच येतो =)) अर्थात, पिक्चर प्रॅक्टिकली पटलेला नाही. :) बाकी सुबोध भावे सोडला तर चित्रपटात पहाण्यासारखं काही नाही.

In reply to by टारझन

अत्तराचा सुगंध पिटापर्यंत पोहचला पाहीजे हा बालगंधर्वांचा हट्ट असायचा .बालगंधर्वांची चरीत्रे/ त्यांच्या आयुष्यावरचे जेव्हढे लेख वाचले आहेत त्या सर्व लेखनांमध्ये असे उल्लेख आढळतात.. उत्तम उत्पन्न जमा होण्याच्या काळात कलाकाराच्या खर्चावर चाप लावणारी व्यक्ती अभावानेच त्यांच्या सान्नीध्यात असते.साहजीकच उतरती कळा लागल्यावर पैशाची चणचण भासते. कलाकारांच्या चमत्कारीक मागण्या आणि अवाजवी खर्च हा नेहेमीच चर्चेचा विषय असतो.

In reply to by टारझन

२५,०००रुपयांची अत्तरं ? बालगंधर्वाला रसिक मायबापाला भव्यदिव्यतेच्या अनुभवासाठी भारी शालु , रत्नालंकार वगैरे दाखवायचे असतात ते ठिक , पण २५,००० च्या अत्तरांनी कोणता थाट होणार होता ? बालगंधर्वांनी शौकिनता दाखवण्यासाठी फुगवुन सांगितलेला प्रसंग वाटतो.
शक्यता आहे, परंतु खूप संशोधन, अभ्यास करून हा चित्रपट काढलेला आहे. गेले दीड वर्ष या चित्रपटाचं मेकिंग आणि त्यामागे घेतले गेलेले परिश्रम मला माहीत आहेत. टारझनराव, तुम्हा-आम्हा सामान्यांना कल्पनाही करता येणार नाही असाच थाटमाट त्या राजहंसाच्या गंधर्व नाटक मंडळीत होता, ही वस्तुस्थिती आहे...!
अर्थात, पिक्चर प्रॅक्टिकली पटलेला नाही.
पटणारही नाही. परंतु थोडक्यात कल्पना यावी म्हणून एकच दाखला देतो. द्रौपदी नाटकाच्या वेळेस नारायणरावांना खरोखरंच दीड लाखाचं कर्ज होतं. आजच्या जमान्यात त्या कर्जाची किंमत अजमावायची असेल तर साधारण पडताळणीसाठी एकच परिमाण देतो; ते म्हणजे त्यावेळचा सोन्याचा भाव. तो होता १० रुपये तोळा..! सोनं जेव्हा १० रुपये तोळा होतं तेव्हा नारायणरावांचं कर्ज होतं रुपये दीड लाख. आज सोन्याचा भाव २०००० रुपये आहे, यावरून तुम्हाला आजची दीड लाखाची किंमत काढता आली तर अवश्य प्रयत्न करून पाहा..! :) (नारायणराव राजहंसांचा भक्त) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सोनं जेव्हा १० रुपये तोळा होतं तेव्हा नारायणरावांचं कर्ज होतं रुपये दीड लाख. आज सोन्याचा भाव २०००० रुपये आहे, यावरून तुम्हाला आजची दीड लाखाची किंमत काढता आली तर अवश्य प्रयत्न करून पाहा..! गणितानुसार ३० करोड...एवढे कर्ज आजकाल अमिताभ बच्चन ही सहन करू शकणार नाही. तेच लॉजिक जर अत्तराच्या बाबतीत लावले तर २५००० रु. खर्च करण्याएवढे कोणते महाग आणि किती प्रमाणात अत्तर विकत घेतले गेले असावे? त्याकाळाचा विचार केला गेला आणि महागातले महाग जरी अत्तर प्रत्येक प्रेक्षकाला जरी लावले तरी एवढा खर्च येईल असे वाटत नाही. (अर्थात प्रत्येक प्रेक्षकाला जर एक एक अत्तराची बाटली दिली तर होऊ शकेल).. अर्थात हा चित्रपट अजून मी पाहिला नाही त्यामुळे २५००० रू. अत्तरावर केलेला खर्च हा एका प्रयोगासाठी की बालगंधर्वानी केलेल्या नाटकांच्या सर्व प्रयोगांसाठी हे माहीत नाही. इथे बालगंधर्वांची किंवा चित्रपटाची चेष्टा करायचा माझा उद्देश नाही आहे पण तात्यांनी दिलेल्या उत्तरावर टिप्पणी करायचा मोह आवरता आला नाही. बाकी चित्रपट पहाण्याची उत्सूकता आहे. तीन तीन परिक्षणे वाचून तर केव्हा हा चित्रपट पहायला मिळेल असे वाटत आहे.

In reply to by योगी९००

बालगंधर्व जो शालु नेसत तो चापुन चोपुन बसावा म्हणुन ओला म्हणजे त्यावर थोड पाणी शिंपुन नेसत, ही पद्धत माझी नऊ वारी नेसणारी आजी ही बाळगत असे, नाही तर एव्हढ्या मोठ्या साडीचा फुगुन बोंगा होतो अस ती म्हणायची. अन बालगंधर्व हा शालु पुरा अत्तरात भिजवत अस ऐकुन आहे. अत्तरात म्हणजे आता बादली भर अत्तर अस चेष्टा उडवत म्हणण्या ऐवजी जे पाणी त्या शालुवर शिंपल जाई , ते ही महागडी अत्तर घालुन सुवासिक बनवल जाई हे समजुन घ्या. ईव्हन दुर्गा खोटेंच्या आत्मचरीत्रात बाल गंधर्वांच्या अश्या महागड्या गोष्टी वापरण्याच्या हट्टाचा उल्लेख आहे. अन त्या कालच्या अनेक आत्मचरीत्रात बालगंधर्व स्टेजवर प्रवेशले, की पुरं थेटर घमघमुन उठत असे असे उल्लेख मी वारंवार वाचलेत. त्या मुळ २५,००० ची अत्तर ही गोष्ट मला तरी खटकत नाही. त्या काळी अत्तर ही राजामहाराजांची अन अमीर उमरावांची मक्तेदारी होती. त्यामुळे अन अत्तर बनवायची काही ठराविक घराणीच असल्यान, प्लस , अत्तर बनवायचे आजच्या काळासारखे औद्योगीकरण नसल्याने, अत्तर महागच होती.

In reply to by स्पंदना

त्या काळी अत्तर ही राजामहाराजांची अन अमीर उमरावांची मक्तेदारी होती. त्यामुळे अन अत्तर बनवायची काही ठराविक घराणीच असल्यान, प्लस , अत्तर बनवायचे आजच्या काळासारखे औद्योगीकरण नसल्याने, अत्तर महागच होती.
हे माहित होतं पण असा विचार या ठिकाणी करता आला नाही. अपर्णा, धन्यवाद. आता हे पैशांचं गणित फार विचित्र वाटत नाही. पुन्हा एकदा, चित्रपटात दाखवलेलं आहे ते सत्याबरहुकूम आहे का नाही हा विषय होऊ शकतो; बालगंधर्व असेच का होते, हा चित्रपटाचा आणि तत्संबंधी चर्चेचा आवाका नसावा.

In reply to by स्पंदना

ईव्हन दुर्गा खोटेंच्या आत्मचरीत्रात बाल गंधर्वांच्या अश्या महागड्या गोष्टी वापरण्याच्या हट्टाचा उल्लेख आहे. अन त्या कालच्या अनेक आत्मचरीत्रात बालगंधर्व स्टेजवर प्रवेशले, की पुरं थेटर घमघमुन उठत असे असे उल्लेख मी वारंवार वाचलेत. त्या मुळ २५,००० ची अत्तर ही गोष्ट मला तरी खटकत नाही. त्या काळी अत्तर ही राजामहाराजांची अन अमीर उमरावांची मक्तेदारी होती. त्यामुळे अन अत्तर बनवायची काही ठराविक घराणीच असल्यान, प्लस , अत्तर बनवायचे आजच्या काळासारखे औद्योगीकरण नसल्याने, अत्तर महागच होती. पटलं.. अपर्णा-अक्षय आणि खालचा समिरसूर यांचा प्रतिसाद वाचून मलाही रु. २५००० हे अत्तरावरील खर्च असू शकेल असे वाटते. माझा प्रतिसाद अर्धवट माहिती आधारे दिलेला होता. बाकी येथे कोणाचीच चेष्टा करायचा माझा उद्देश नाही आहे. जस्ट वाटले ते लिहीले. बाकी बालगंधर्व यांच्या काळात जन्माला नाही आलो आणि त्यांची नाटके नाही पहाता आली याचा नेहमीच खेद मला राहील.

एकाच चित्रपटाचं तिसरं परिक्षण, बरं झालं आता हा लगेच जाउन पाहायची गरज उरली नाही, २-३ महिन्यात येईलच दुरदर्शनवर तेंव्हा पाहेन. वर टारझन या चित्रपटाबद्दल म्हणतो तसा, नटरंग हा देखिल एक अतिशय सुमार चित्रपट आहे असे माझे मत सुरुवातीची ' वाजले की बारा' ची अम्रुता सोडली तर शुद्ध वेडेपणा. परीक्षणावरुन असं वाटतंय की, बालगंधर्व हे कलेच्या बाबतीत जेवढे समर्पित होते तेवढेच उधळपट्टीच्या बाबत पण. कला आणि व्यवहार एकत्र जाउ शकत नाहीत हे ग्रुहितक धरुन आयुष्य जगायचे, असं एक चित्र समोर उभं राहतंय.

In reply to by ५० फक्त

>>कला आणि व्यवहार एकत्र जाउ शकत नाहीत हे ग्रुहितक धरुन आयुष्य जगायचे, असं एक चित्र समोर उभं राहतंय. हा सिनेमा पाहिला नसला तरी जे चित्र समोर दिसते आहे ते योग्य वाटले नाही.. कला ..कलाकार आणि कलाकाराचे व्यवहार ह्या वेगळ्या गोष्टी आहेत.. सिनेमामध्ये कलाकाराच्या कलेस जास्त प्राधान्य असते .. कदाचीत तुम्ही म्हणता त्याप्रमाणेच अव्यवहारी असणार्या माणसाकडे ही उत्तम कला असु शकते .. असे ही चित्र उभे राहु शकते असे वाटते ... शेवटी कला उत्तम असल्यास फक्त व्यवहारावर त्या कलेचा लेखाझोका नको असे वाटते... ------------ नटरंग पिक्चर म्हणजे त्याची स्टोरी मला ही आवडली नाही.. पण तो पिच्कर स्टोरी साठीच किंवा सोनाली साठी न पाहता १. अजय - अतुल च्या संगितासाठी पहावा ( मराठी सिनेमासाठी माईलस्टोन असेन हा चित्रपट या साठी)... २. डॉ. आनंद यादव यांच्या सारख्या उत्कृष्ट लेखकासाठी पहावा.. भले ही स्टोरी नसेल चांगली पण काय सांगावे उद्या मराठीत "झोंबी" येइल .. आणि मग सगळॅ रेकॉर्ड ब्रेक होतील ... निदान अश्या मराठी कलाकाराच्या .. लिखानासाठी मातीतुन सोने करणार्‍या शब्दांसाठी हा सिनेमा पहावा ... ३. गुरु ठाकुर च्या शब्दांसाठी हा सिनेमा पहावा ... (अप्सरा आली या गाण्याचे शब्द खरेच जबरदस्त .. आनि खेळ मांडला तर हाईट ). ४. बर्याच दिवसांनी दर्जेदार असलेल्या वाजले की बारा या लावणीसाठी हा चित्रपट पहावा ... -- एका चित्रपटासाठी प्रामाणिक मेहनत घेणार्‍या .. सतत काहीतरी उल्लेखनिय .. नाविन्यपुर्ण दाखवण्याच्या धडपडीत असणार्या मराठी कलाकारांसाठी .. मराठी चित्रपट पहावेत असे मला वाटते.. अगदी हिंदी थ्री.इडीएट घेतला तरी मुळ पुस्तकापेक्षा तो सरस नव्हताच असा वाद झाला.. पण त्याने तो चित्रपट सुमार होता हे कोठेच दिसत नाही... आपणच आपल्या पिक्चर ची बोळवन करत असु तर नंतर दक्षिनेकडील/हिंदी सिनेमे आणि मराठी सिनेमे यांची व्यर्थ चर्चा करुन काहीच फायदा होत नाही.. तेंव्हा चल उठा, टीव्ही वर न बघता.. कलेसाठी आयुष्य दावणीला लावलेल्या बालगंधर्वांसाठी हा पिक्चर बघु या.. वाटल्यास एकत्र जावु या ...

बालगंधर्व चित्रपटाची किती परीक्षणे येणार आहेत? टारझनच्या प्रतिक्रियेशी काहीसा सहमत आहे. पण मला चित्रपट आवडला. कदाचित मराठी चित्रपटाकडून फार अपेक्षा न ठेवता गेल्यामुळे असेल. नाटक कंपनीत रोज जिलब्यांच्या जेवणाच्या पंगती का होत होत्या याचा संदर्भ लागला नाही. (जिलबी ही पक्वान्नांमध्ये सर्वात स्वस्त असते असे वाटते. रसिकता म्हणून दररोज गुलाबजाम असायला हवे होते.)

In reply to by नितिन थत्ते

नाटक कंपनीत रोज जिलब्यांच्या जेवणाच्या पंगती का होत होत्या याचा संदर्भ लागला नाही. (जिलबी ही पक्वान्नांमध्ये सर्वात स्वस्त असते असे वाटते. रसिकता म्हणून दररोज गुलाबजाम असायला हवे होते.)
रसिकतेच्या कल्पना या बहुधा व्यक्तिसापेक्ष असाव्यात. (किंवा, दुसर्‍या शब्दांत, त्यांना जिलब्या आवडल्या, त्यांनी जिलब्या ठेवल्या. म्हणून पिक्चरमध्ये जिलब्या दाखवल्या. त्यांच्या जागी जर आपण असतात, तर कदाचित दररोज गुलाबजाम ठेवले असतेत, आणि मग पिक्चरमध्ये तसे दाखवले असते. तिसरा कोणी असता, तर रोज श्रीखंडपुरी ठेवली असती. पिक्चरवाल्यांनी तसेही दाखवले असते. आहे काय नि नाही काय? पंगतीत काय मेनू ठेवायचा ते पंगत देणार्‍याने ठरवावे, पिक्चरवाले तसे दाखवतील - पिक्चरवाल्यांना काय फरक पडतो?) किंवा, दुसरी शक्यता - कदाचित बालगंधर्वांना गुलाबजामांची अ‍ॅलर्जी असू शकते. (गुलाबजाम खाल्ल्यावर शिंका येत असाव्यात. आणि अशा शिंका दुसर्‍या दिवशी काम करताना आल्या, तर पदराला नाक पुसण्याची उर्मी अनावर होत असावी. त्यापेक्षा नकोच ते!) तिसरी शक्यता - बालगंधर्वांना गुलाबजामांची चव ती काय? (या वाक्याचा हवा तसा अर्थ काढायला मोकळीक आहे. कृपया मला अर्थ विचारू नये. किंबहुना, मलाच याचा अर्थ माहीत नाही.)

In reply to by पंगा

खूप गुलाबजाम खाल्ले तर अत्तरांवरचा खर्च अजून वाढवायला लागला असता.(या वाक्याचा हवा तसा अर्थ काढायला मोकळीक आहे. कृपया मला अर्थ विचारू नये. किंबहुना, मलाच याचा अर्थ माहीत नाही.)

In reply to by पंगा

तिसरी शक्यता - बालगंधर्वांना गुलाबजामांची चव ती काय?
असं टोचुन बोलु नये.(या वाक्याचा हवा तसा अर्थ काढायला मोकळीक नाही. कृपया याचा अर्थ मला खवतुन विचारू शकता. मला याचा अर्थ माहीत आहे.) 'बालगंधर्वांना गुलाबजामांची चव ती काय?' याचा अर्थ शोधन्याचा गहन प्रयत्न केला. (किंबहुना उभ्या आयुश्यात गहन विचार करन्याची हि माझी पहिलिच वेळ असावी) तर लहानपनि मला आठवते, शेजारच्या (खडुस) काकु नेहमी एक म्हन म्हनत असंत. 'गाढवाला गुळाची चव काय' इंटर्नेट वर या म्हनीचा शोध घेतला आनि आप्ल्या वाक्यात आनि यात खुप सिमिलॅरीटीज् आढळुन आली. फक्त काही शब्द पुढे मागे झालेले आहेत. (तेवढे चालते हो !) आनी हो, आनखिन एक निरिक्शन ' 'गाढवाला गुळाची चव काय' याच्या शेवटी '?' नाही. (निदान इंटर्नेटवरील सापडलेल्या म्हनीं प्रमाने) पन आपल्या 'बालगंधर्वांना गुलाबजामांची चव ती काय?' या वाक्यात शेवटी '?' आहे. याचे कोडे काय उलगडले नाही बुवा. याबाबतित पुन्हा खुप गहन विचार करन्याचा प्रयत्न केला. पन नंतर ते 'एकट्याने समुद्र मंथन करन्याइतके अवघड' वाटु लागले. त्यामूळे प्रयत्न सोडुन दिला.

In reply to by नितिन थत्ते

जिलबी हे पक्वान्न सद्ध्या स्वस्त असले तरी एकेकाळी ते निगुतीने करावे लागत असे म्हणून सर्रास उपलब्ध नसे. तीच गोष्ट बुंदीच्या लाडवांची. एकेकाळी लग्नाच्या जेवणातले मुख्य पक्वान्न बुंदीचा लाडू हे असे आणि अहमहमिकेने,पैजा लावून लाडू खाल्ले जात हे आज कुणाला खरे वाटणार नाही. मोठ्या प्रमाणात बुंदी पाडणे आणि अगदी यथायोग्य पाकात त्या घालून भराभर लाडू वळणे हे कष्टाचे आणि कौशल्याचे काम असे.तीच गत जिलबीची. गुलाबजामचा महाराष्ट्रीय जेवणातला प्रवेश फार जुना नसावा.कारण शतकापूर्वीच्या मराठी साहित्यात गुलाबजामचा उल्लेख सहसा आढळत नाही. खव्याचे पदार्थ ही दूधदुभत्याची रेलचेल असलेल्या उत्तर भारताची खासियत आहे.महाराष्ट्रासारख्या कायम दुष्काळी प्रदेशात फक्त कृष्णा आणि गोदेकाठीच काय ते दूधदुभते मुबलक मिळे. इतरत्र बहुतेक सर्वत्र खडखडाट असे.

In reply to by राही

गुलाबजामचा महाराष्ट्रीय जेवणातला प्रवेश फार जुना नसावा.कारण शतकापूर्वीच्या मराठी साहित्यात गुलाबजामचा उल्लेख सहसा आढळत नाही.
सहमत.. नारायणरावांच्या काळात जिलबी आणि बुंदी लाडू हीच पक्वान्ने बहुत करून खाल्ली जात होती असे जुने जाणकार (उदा -माझी आई) सांगतात.. तात्या.

In reply to by नितिन थत्ते

(जिलबी ही पक्वान्नांमध्ये सर्वात स्वस्त असते असे वाटते. रसिकता म्हणून दररोज गुलाबजाम असायला हवे होते.) त्याकाळात महाराष्ट्रात गुलाबजाम होत होते का? ह्याची माहिती न घेता जर तसेच दाखवले असते तर येथील विद्वतजनांनी 'त्यां काळात गुलबजाम होते का असे विचारून फाडुन खाल्ले असतेच.

सुरेख परिक्षण.. जियो..! (बालगंधर्व प्रेमी) तात्या.

वरील काही प्रतिक्रिया वाचून अचानक जाणवले की 'देवाने मला आणि माझ्यासारख्या अनेकांना, जो गाण्याचा 'स्पेशल' कान दिला आहे त्याबद्दल त्या परमेश्वराचे साश्रु नयनांनी सहस्र आभार!

बालगंधर्व पाहीला पण आवडला कि नाही हे अजूनही सांगता नाही येणार निर्मिती मूल्य झकासच फारच उच्च , पण अक्खा पिक्चर तुटक तुटक वाटला प्रत्येक घटना दाखवण्याचा अट्टाहास समजला नाही अभिनयाच्या बाबतीत, सुबोध भावे सोडला तर कोणालाच फारशी कामे नाहीत.. एवढे खंडीभर स्टार्स घेतलेच कशाला मग ? बर्याच घटना अर्धवट सोडल्या आहेत बरेच प्रसंग सुद्धा पिक्चर मध्ये प्रेक्षक गुंतत नाही, धावता आढावा घेतल्यासारखा वाटतो शेवट पण विचित्रच गाणी श्रवणीय असूनही कव्वाली सोडल्यास , पूर्ण गाण सबंध चित्रपटात नाही त्या पातळीवरही निराशाच, बालगंधर्वांची बायको एवढी वयस्कर कशी काय , त्याकाळी तर मुलींचं वय फार फार तर १८-२० असायचं (विभावरी देशपांडे- निवड चुकेश ) हाही प्रश्न मनास चाटून गेला आकडे पण चुकल्यासारखे वाटतात २५००० ची अत्तर? वी शांताराम ने फक्त ३ चित्रपटांसाठी दिलेली ६ लाख (?) रुपयांची ऑफर

प्रतिसादांबद्दल आपणा सगळ्यांचे मनापासून आभार! चित्रपटाला मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद बघता बहुतेक सगळ्यांनाच हा चित्रपट आवडल्याचे निदर्शनास येते. मला स्वतःला हा चित्रपट खूप आवडला. चित्रपटाची निर्मितीमुल्ये खूपच सरस आहेत. बाकी २५००० ची अत्तरे, महागड्या साड्या, चांदीच्या ताटातून जिलेबीचे जेवण इत्यादी गोष्टी पटण्यासारख्या आहेत. जुन्या-जाणत्या लोकांकडून ही वर्णने ऐकली आहेत. त्याकाळी वैभव उपभोगण्याच्या पद्धती निश्चितच वेगळ्या होत्या. बालगंधर्वच कशाला, गावागावात श्रीमंत लोकांकडे रोजच्या रोज चांदीच्या ताट-वाट्यांतून पक्वानांचे जेवण जेऊन तृप्त होणार्‍या पंगती झडत असत. माझ्या आईने त्यांच्या गावातल्या अनेक श्रीमंत लोकांच्या घरचा हा थाट स्वत: पहिलेला आहे. या सवयींमुळे या एकेकाळच्या श्रीमंत घराण्यांवर नंतर उपासमारीची वेळ येणे ही त्याकाळी नित्याची गोष्ट होती. मी स्वतः आमच्या गावात अशी बडेजाव असणारी आणि नंतर कारकुनाची नोकरी करून कसाबसा संसार चालवणारी कुटुंबे पाहिलेली आहेत. त्यामुळे चित्रपटातील हा तपशील चुकलेला नसावा असे वाटते. सिनेमात भारत भूषण, मास्टर भगवान इत्यादी कलाकारांनी अशी ऐट मिरवल्याचे सर्वश्रुत आहेच. पंडित नेहरूंचे कपडे धुण्यासाठी पॅरीसला जात असत; अजूनही कुठल्यातरी हॉटेल कंपनीच्या (बहुधा बिकी ओबेरॉय) चेअरमनचे कपडे लंडनहून शिवून येतात असे खुद्द त्यांनी टाईम्स च्या मुलाखतीत सांगीतले होते. त्याकाळी अमाप खर्च करणे आणि आपला मोठेपणा मिरवणे ही सवय सगळ्या श्रीमंतांमध्ये होती. त्यामुळे हे तपशील मला अजिबात खटकले नाहीत. माझ्या आईच्या मामांकडे रोजचे जेवण चांदीच्या ताटात होत असे आणि धुणी-भांडी करणार्‍या बायका ही चांदीची भांडी रोजच्या रोज धुवत असत. ही गोष्ट आहे साधारण पन्नास वर्षांपूर्वीची. आई अजून सांगते, त्यांच्याकडे मोठमोठाले चांदीचे जिन्नस भेट म्हणून देण्याची प्रथा होती. श्रीमंती थाट इतका होता की सगळ्या गडी-माणसांना, मोलकरणींना रोज जेवण दिले जाई. अजूनही जळगावकडे केळीच्या सुपीक भागात सालदारांना वर्षभर पोसण्यची पद्धत आहे. माझ्या एका मित्राच्या मामाकडे (रावेर) सालदारांना रोज मटण-चिकन-बीअर-दारुचे जेवण दिले जाई आणि स्वतः मामा त्यांच्यासोबत निरनिराळ्या ढाब्यांवर जाऊन ऐश करीत असे. घरी ६०-७० एकर केळीची बाग असणार्‍यांना हा खर्च काही फार नव्हे. त्या मामींना खर्चाची चिंता नव्हती तर मामांचे पिण्याचे प्रमाण वाढले होते याची चिंता होती. मी आणि माझा मित्र २-३ दिवस तिथे राहिलो होतो. असला अफाट खर्च बघून मला चक्कर यायचे बाकी राहिले होते. ही गोष्ट २००० सालातली आहे. अजूनही पुण्याच्या आसपासचे गुंठामंत्री किती खर्च करतात हे बघितले तर आपल्यासारख्यांना भोवळ येईल. स्कॉर्पिओच्या पेट्रोलच्या टाकीत अत्तर टाकून गाड्या उडवणारी ही मंडळी पाहिली तर बालगंधर्वांनी २५००० रुपये अत्तरासाठी खर्च केले असतील आणि ते ही मायबाप रसिक प्रेक्षकांच्या आनंदासाठी, ही गोष्ट सहज पटते. दुसरा मुद्दा सिनेमॅटीक लिबर्टीचा आहे. सिनेमा उत्तम वठावा म्हणून सिनेमॅटीक लिबर्टी घेणे ही काही नवीन गोष्ट नाही. बालगंधर्वांचा खर्चिकपणा ठळकपणे समोर यावा, तो प्रेक्षकांच्या मनात रजिस्टर व्हावा म्हणून थोडी सिनेमॅटीक लिबर्टी घेणे यात काहीच चूक नाही. किंबहुना चित्रपट माध्यमासाठी ते आवश्यकच असते. त्यांनी केलेला खर्च हा मुद्दा संपूर्ण चित्रपटाच्या दर्जाच्या आणि आवाक्याच्या पार्श्वभूमीवर अगदीच नगण्य आणि क्षुल्लक ठरतो. 'बालगंधर्व' एक चित्रपट म्हणून सरस आहे हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा. बाकी मग 'दबंग' सारख्या चित्रपटातले काय खरे वाटते? किंवा 'तुक्या तुकविला नाग्या नाचविला' किंवा 'टाटा, बिर्ला आणि लैला' सारखे तद्दन फालतू चित्रपट बनविण्यापेक्षा एक 'बालगंधर्व' केव्हाही सरस नव्हे काय? आज उभ्या महाराष्ट्राला एक चांगली कलाकृती बघण्याचे समाधान मिळत असेल आणि तरुणांना बालगंधर्वांविषयी माहिती मिळत असेल, त्यांच्या उज्वल परंपरेची महती कळत असेल तर काही क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करता येऊ शकेल असे मला वाटते. मी मात्र सगळ्यांनी हा चित्रपट त्याच्या दर्जासाठी, अभिनयासाठी, गाण्यांसाठी, छायाचित्रणासाठी, उच्च निर्मितीमुल्यांसाठी अवश्य बघावा असे आवर्जून सांगेल. आपल्या घरातल्या संगीताची आवड असणार्‍या ज्येष्ठांना हा चित्रपट अवश्य दाखवा. त्यांनही हा चित्रपट १००% आवडेल यात कुठलीच शंका नाही. एक उत्तम चित्रपट पाहिल्याचे समाधान हा चित्रपट नक्कीच देतो. माझी आई तर हा चित्रपट पुन्हा बघायचाय म्हणून हट्ट धरून बसलीये. :-) बाकी रसिक प्रेक्षक सुज्ञ आहेतच! --समीर

In reply to by समीरसूर

आज उभ्या महाराष्ट्राला एक चांगली कलाकृती बघण्याचे समाधान मिळत असेल आणि तरुणांना बालगंधर्वांविषयी माहिती मिळत असेल, त्यांच्या उज्वल परंपरेची महती कळत असेल तर काही क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करता येऊ शकेल असे मला वाटते.
+१००
हा चित्रपट त्याच्या दर्जासाठी, अभिनयासाठी, गाण्यांसाठी, छायाचित्रणासाठी, उच्च निर्मितीमुल्यांसाठी अवश्य बघावा असे आवर्जून सांगेल.
+१०० ज्यांनी कधीच संगीतनाटके ऐकली नाहीत त्याना तर हा नवीन अनुभव सुरेख आहे. तेवढी दर्जेदार कलाक्रुती नक्किच आहे.

In reply to by समीरसूर

समृद्धीबाबत तुम्ही इथं जे वर्णन केलं आहे, ते खरं आहे. पूर्वी ही स्थिती होतीच. आजही आहे, थोडी वेगळ्या स्वरूपात. ते पाहता, बालगंधर्वाच्या नाटकांना पहिल्या रांगेत बसणारी मंडळी अशांपैकी असण्याची शक्यता अधिक आहेच. अर्थात, हे वाक्य वेगळ्या लेखावरील प्रतिसादासंदर्भात आहे. :)

माणसं चित्रपट कशासाठी बघतात? दोनतीन तास चांगले मनोरंजन व्हावे म्हणून? त्यातून काही नवी माहिती मिळावी म्हणून? मनोरंजन झाले नाही तरी वेळ जावा म्हणून की दात कोरल्याप्रमाणे कोरून कोरून चित्रपटाचे समीक्षण करावे म्हणून? मला वाटतं प्रत्येकाचा चित्रपट बघण्याचा उद्देश वेगवेगळा असतो. मी दबंग पाहिला आहे, मी दोस्ताना पाहिला आहे, थ्री इडिअट्सही पाहिला आहे. मी बघायला मिळाल्यास बालगंधर्वही बघेनच. मुद्दाम न बघावा असे त्यात काही आहे असे इथली बक्कळ परीक्षणे वाचून वाटले नाही. मराठी चित्रपट नवे काही करू पाहतो आहे यात आनंद आहे. ही वाट सुरू राहिली तर सुधारणेलाही वाव आहेच.

In reply to by प्रियाली

मराठी चित्रपट नवे काही करू पाहतो आहे यात आनंद आहे. ही वाट सुरू राहिली तर सुधारणेलाही वाव आहेच.
+१ ... यालाच मिष्टर मोडक 'दुकान चांगलं चालू लागलं आहे, आतला माल चांगला असेलच असे नाही.' असं म्हणतात. ;)

समीरसूर नेहमीप्रमाणे सुंदर परिक्षण ... मनापासुन आवडले त्यातही तुमचे हे वाक्य जास्त भावले "सुगंधाचं वर्णन शब्दात करता येत नाही; तो अनुभवावा लागतो" व.पु काळेंची आठवण आली.. अआणि सुगंधावरुन त्यांनी लिहिलेली वाक्य लगेच मनात तरळुन गेली छान वाटले ( पुस्तक बहुतेक : "तु भ्रमत आहासी वाया") ७ तारखेला 'बालगंधर्व' पहायचा असा विचार केला होता.. टाईम फिट न बसल्यामुळे आणि अचानक ठरल्यामुळे , " गजर" पाहिला.. अतिशय आवडला हा ही पिक्चर .. मस्त एकदम .. थोदासा आनखिन सुधारीत हवा होता पण दुसरा पार्ट तर खुपच सही वाटला.. मस्त एकदम ,. मुद्दाम येथे वर्णन करतोय कारण तार्यांचे बेट आणि नंतर बालगंधर्व यांमध्ये हा पिक्चर दूर्लक्षीत राहिला.. पण छान प्रयत्न होता. (परिक्षण असे छान लिहिता येत नाही, नाहितर मी लिहिले असते.. पाहिला असेन तर लिहा तुम्ही) असो मुद्द्यावर येतो.. तुम्ही कालच्या ८ ला पाहिला का पिक्चर ... मी ३:०० गेलो होतो सिटीप्राईड ला.. हाउस फुल असल्याने निराशा झाली. ८ ची तिकीटे मिळत होती .. पण नाही घेतली ... आता पुढच्या रविवारी नक्कीच पाहिन .. तुमच्या परिक्षणामुळे अजुनच छान वाटते आहे..

In reply to by गणेशा

नक्कीच बघेन. आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-) 'बालगंधर्व' नक्की बघा. खूप दिवसांनी एक बघण्यासारखा चित्रपट आलेला आहे. समीर

संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, रामदास स्वामी, बहिणाबाई, शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, टिळक, सावरकर, पं. हॄदयनाथ मंगेशकर, कर्वे, फुले, पठ्ठे बापूराव, होनाजी बाळा, आगरकर वरील यादीत "हॄदयनाथ मंगेशकर" हे नाव वाचून करमणूक झाली. असो... ज्याचा त्याचा प्रश्न. (आम्हाला वेगळाच प्रश्न पडलाय. "पं. भीमसेन जोशी" म्हटलं की "पंडीत" ही उपाधी सार्थ वाटते. पण हॄदयनाथ मंगेशकरांना ही उपाधी कुणी दिली? कुणाला माहीत आहे काय? अर्थात तेवढं त्यांचं कर्तुत्व नाही हे आमचं व्यक्तिगत मत आहेच...)

In reply to by रामपुरी

ही पदवी त्यांना त्यांच्या संगीत क्षेत्रातील कामाच्या दर्जामुळेच मिळाली. ती अधिकृत पंडित पदवी नव्हे पण म्हणून तिचे महत्व कमी होत नाही. तसं पाहिलं तर मग कुणीच कुणाला दिलेल्या पदव्यांना (बालगंधर्व, महात्मा, आचार्य, इ.) अर्थ नाही असे म्हणावे लागेल. पं. हृदयनाथ मंगेशकरांचे कार्य माझ्या मते तरी खूप जबरदस्त आहे. अगदी शिवाजी महराजांच्या पंक्तीत बसवण्यासारखे नसले (ते कुणाचेच नाही) तरी त्यांची गाणी, त्यांची गायकी आणि शास्त्रीय गाण्यातली समज ही काही मोजक्या जाणकार लोकांनाच आहे. संत ज्ञानेश्वरांच्या ओव्यांना त्यानी दिलेल्या चाली, भावगीते, शिवकल्याणराजा, इत्यादी गाणी केवळ अविस्मरणीय आहेत. 'भावसरगम' बघतांना ही मजा अनुभवता येते. सुरेश भटांच्या कवितांना अजोड चाली लावू शकणारा तो एकमात्र संगीतकार आहे. 'जैत रे जैत', 'निवडुंग' ची गाणी तर अप्रतिमच! अर्थात हा वैयक्तिक आवडीचा प्रश्न आहे पण पं. हृदयनाथ मंगेशकरांच्या संगितिक प्रतिभेची जादू अवघ्या महाराष्ट्राने कधीच मान्य केलेली आहे हे खरे. --समीर

चित्रपटाबद्दल आधीच खुप असलेली उत्सुकता आणि तात्यांचे उत्तम परीक्षण पाहून कालच्या शनिवारी हा चित्रपट पहिला.... आणि खरचचं वरील काही प्रतिसादामद्धे सांगितल्याप्रमाणे या चित्रपटात पटकथेवर मेहनत घेतलेली अजिबात दिसून येत नाही....हि एकच गोष्ट सोडली तर बाकी बालगंधर्व पहावा तो फ़क़्त सुबोध भावेच्या अप्रतिम अभिनयासाठी.....महेश लिमयेच्या उत्तम सिनेमॅटोग्राफिसाठी.....बालगंधर्वासाठी अगदी योग्य आवाज देणाऱ्या आनंद भाटेसाठी.