Skip to main content

आपल्या प्रथा आपण कशासाठी विसरायच्या?

लेखक योगप्रभू यांनी सोमवार, 21/03/2011 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
परवा होळी झाली आणि काल धुळवड. रस्त्यावर सगळेजण रंग खेळत होते. दिवसभर प्रसारमाध्यमांनी 'होली है' टाईप बातम्यांचा आणि नाचगाण्यांचा मारा चालवला होता. आम्ही राहतो तिथेही शेजारच्या इमारतीमधील मराठी लोक मस्त रंग खेळत होते. एकाने विचारले, 'काय रंग नाही खेळायचा का?' त्यावर मी म्हटले, ' मराठी समाजात त्यासाठी रंगपंचमीचा दिवस राखून ठेवला आहे. आम्ही होळीला रंग खेळत नाही. ती प्रथा उत्तरेकडची आहे. त्यांना करु देत त्यांच्या पद्धतीप्रमाणे. ' त्यावर त्याने माझ्याकडे 'काय मूर्ख आहे?' अशा नजरेने पाहिले आणि विचारले, 'रंगपंचमीला काही सुटी नाही. कोण येणार तुमच्याशी रंग खेळायला?' मीपण लगेच उत्तरलो, ' मुलांच्या शाळेला सुटी आहे. कुणी नाही आले तर आम्ही वेळ मिळाल्यावर घरातच खेळू, पण मराठी प्रथा मोडणार नाही.' मला खरंच नवल वाटते. एकीकडे आपणच आपल्या प्रथा मोडायच्या आणि पुन्हा मराठी संस्कृती कशी आक्रमणाच्या विळख्यात सापडलीय त्याचे गळे काढायचे. होळीलाच रंग खेळण्याची उत्तरेची प्रथा आपण स्वीकारलीय, पण होळी पेटवल्यावर संध्याकाळी त्यात पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्याची, होळीभोवती तांब्याभर पाण्याचे रिंगण घालत प्रदक्षिणा घालण्याची आणि होलिका राक्षशिणीच्या नावाने बोंब मारण्याची प्रथा अन्य समाजांतील लोकांनी स्वीकारलीय का? असल्यास माझ्या पाहण्यात नाही. मग प्रत्येक समाज आपल्या प्रथा जतन करत असताना आपणच का आपल्या प्रथा मोडतोय? आणखी एका अनुभवामुळे मी विचारमग्न झालोय. नुकत्याच दहावीच्या परीक्षा सुरु झाल्या. आम्ही काय करतो, की आसपासच्या/नात्यातील परीक्षार्थींना घरी जाऊन शुभेच्छा आणि एक पेनसेट देतो. मुलांच्या पाठीवर आश्वासक हात ठेवणे, एवढाच हेतू. तर या खेपेस जवळच राहणार्‍या दोन कन्यांना शुभेच्छा द्यायला गेलो. पहिले घर मराठी. मुलगी हाय-फाय शाळेत शिकणारी. तिने 'थँक्स' म्हटले. आई-वडिलांनी ती कसा जोरात अभ्यास करतीय सांगितले. नंतर दुसर्‍या घरी गेलो. हे कुटूंब परराज्यातून येथे स्थाईक झाले आहे. त्यांच्या मुलीने मला आणि पत्नीला पायावर डोके ठेऊन नमस्कार केला. मी फार ओशाळलो. तिला म्हटले, 'ताई! असा नमस्कार आमच्यात आजी-आजोबांना करतात. इतर मोठ्या लोकांना वाकून नमस्कार करायचा असतो.' त्यावर तिचे आई-वडील म्हणाले, 'अहो करु द्या तिला. आमच्या समाजात अशीच प्रथा आहे.' येताना मी पत्नीला म्हटले, 'बघ. आपला समाज कसा लवकर प्रथा विसरतोय ते.' त्यावर ती म्हणाली, 'अरे आताच्या तरुण मुलामुलींना वाकून पाया पडणे, विवाहाआधी दाखवण्याचा कार्यक्रम या गोष्टी रुचत नाहीत. तो काळ मागे पडलाय.' खरंच तो काळ मागे पडलाय? की मराठी समाज नको इतका पुढे गेलाय?
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 22435
प्रतिक्रिया 147

प्रतिक्रिया

त्यावर तिचे आई-वडील म्हणाले, 'अहो करु द्या तिला. आमच्या समाजात अशीच प्रथा आहे.' हुंडा घेणे, खालच्या जातीच्या माणसाला हाड्तुड करणे, एकाच स्त्रीचा अनेक पुरुषांनी (यापैकी अनेक जण एकमेकांचे भाऊ, बाप असतात. संदर्भ - मातॄभूमी, आक्रोश इत्यादी चित्रपट) उपभोग घेणे अशा असंख्य प्रथा उत्तर भारतीय समाजात अतिशय बलवान आहेत. जर तुलनाच करायची झाली तर मराठी समाज त्यांच्यापेक्षा नक्कीच जास्त पुरोगामी आहे असे म्हणावे लागेल. या लवचिक मानसिकतेमुळेच आपण आपल्या प्रथा हट्टाने चालवण्यापेक्षा त्यांना मुरड घातली तर ते चांगलेच आहे. कोणताही समाज आधुनिक होत असताना जुन्या प्रथा, परंपरा उध्वस्त करत करतच पुढे सरकत असतो. यात वावगे ते काय आहे? पण हेही खरे की कारण नसताना अनाठायी खर्च करत गरज नसलेल्या वस्तूंची खरेदी करत सुटणे, जे चालत जाण्याजोगे अंतर आहे तिथे उगाचच दुचाकी पळवत जाणे, ताटामध्ये भरमसाट अन्न घेउन ते वाया घालवणे, उठल्या सुठल्या हॉतेलात जेवण्यासाठी धावत सुटणे, रस्त्यात भेटल्यावर उगाचच किंचाळ्या मारत हाय-हेल्लो करणे अशा अनेक आचरट अमेरिकन प्रथा हल्ली रुढ होत चालल्या आहेत. मराठी संस्थळांवरील धाग्यांवर इंग्रजी भाषेतील मोठ मोठे उतारे कॉपी-पेस्ट करणे हीसुद्धा एक प्रथा आहे. हां आणि नमस्कार करण्याच्या बाबतीत म्हणाल तर आम्ही गाडगेबाबांचा सल्ला मानतो. कोणालाच नमस्कार करत नाही. गाडगेबाबा हे मराठीच असल्यामुळे नमस्कार न करणे ही मराठीच प्रथा आहे नाही का ?

या धाग्यापासून स्फूर्ती घेउन मी उद्यापासून पैरण्,पैजमा आणि गांधी टोपी अशा वेशात ऑफिसला जायच्या बेतात आहे. आमच्या भैय्या साहेबाने विचारलं तर सरळ श्री. योगप्रभू यांच्या लेखाची प्रिंट देणार त्याला.

In reply to by अप्पा जोगळेकर

मी उद्यापासून पैरण्,पैजमा आणि गांधी टोपी अशा वेशात ऑफिसला जायच्या बेतात आहे. पण गांधी टोपी मराठी कशी?

In reply to by विकास

पण गांधी टोपी मराठी कशी?
वर्धा महाराष्ट्रात आहे असा बादरायण डोमिसाईल संबंध लावून! ;-)

In reply to by विकास

गांधी टोपी त्यांना कदाचित दाको (दादा कोंडके)टोपी म्हणायचे असेल पण त्वेषाच्या भरात त्यांना आठवले नसावे....

आमच्या कडे सुद्धा रंगपंचमीलाच रंग खेळण्याची पद्धत आहे. ( मुंबई ची होळी म्हणजे भैय्ये आणि मराठी भैय्ये यांची) . मी होळी आणि असे आपले महत्वाचे सण गावाला जाऊन साजरे करण्यात आनंद मानतो --------- आमच्याकडे होळी लागली कि पुढील षष्ठी पर्यंत ग्रामदेवतेचा शिमगा होतो. पंचमी पर्यंत देव गावच्या चारी सीमांना जाऊन सर्व गावकर्यांची गार्हाणी ऐकतो. पंचमीला देवाचा पुजारी सकाळी देवास रंग लावतो आणि मग गावातून दुपारी रंगपंचमी सुरु होते . आणि सर्व गावकरी खेळी मेळी ने रंगपंचमी खेळतात. मुंबई सारखे १५व्या मजल्यावर राहून पिशवीत घाणेरडे पाणी भरून मुलीना तसेच येणाऱ्या जाणार्या लोकांना फेकून मारणे ( तेही होळीच्या १-२ दिवस आधीपासूनच) हि पद्धत नाही. आमच्या गावाकडे जर असा कोण फालतूपणा करताना मिळाला तर त्याला पोकळ आणि भरीव बांबूने पार्श्व भागावर फटके मारून हाकलून देण्याची पद्धत आहे. पंचमी नंतर षष्ठीला चव्हाटा (येथे देवाला गावच्या रक्षणा बद्दल गावकर्यान कडून गार्हाणी घातली जातात ) भरला कि देव परत देवळात परत येतो . आणि मग शिमगा संपतो . ----------------------------- जाच्या मनात कपट, त्याला ब्वा भैरी ब्वा धोपट .