Skip to main content

माफ करा सर!

लेखक कांदा लिंबू यांनी गुरुवार, 24/09/2026 12:51 या दिवशी प्रकाशित केले.

माफ करा सर! 

 

केवळ प्रामाणिकपणे

आपले कर्तव्य बजावले म्हणून

तुमच्यावर किती भीषण आरोप झाले,

तुम्हाला किती अपमानास्पद लेबलं लावली गेली!

 

“मी प्राध्यापक सूर्यनारायण आहे”

ही ओळख तुम्ही अभिमानाने सांगायचात;

आज त्या ओळखीभोवतीच

अवमानाची राख पसरली आहे.

 

एक शिस्तप्रिय परीक्षक म्हणून,

एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून

तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे सोडा 

तुम्हाला समजून घेणेही सोडा 

किमान माणूस म्हणून

तुमच्या वेदनेशी सहानुभूत होणे सुद्धा

या समाजाला जमले नाही.

 

उलट,

तुमच्यावर झालेल्या अन्यायाचे

पाशवी समर्थनच

सगळीकडे होत राहिले.

तुम्ही न केलेल्या गुन्ह्याची

शिक्षा ही व्यवस्था तुम्हाला देत राहिली.

 

काय वाटत असेल तुम्हाला?

काय वाटत असेल तुमच्या कुटुंबीयांना?

तुमच्या विद्यार्थ्यांना,

तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला? 

 

तुम्ही निर्दोष आहातच.

 

पण समाजाचे एक सोपे समीकरण असते ‌

धूर दिसतोय, म्हणजे आग असणारच!

पण कधी कुणी थांबून विचार करेल का,

ही आग तुम्ही लावली होती,

की तुम्हालाच

या आगीत ढकलले गेले होते? 

 

दोष सिद्ध होण्याआधीच

दोषी ठरवणाऱ्या या गर्दीत

एखाद्याचा आवाज कोण ऐकणार? 

 

असंख्य आयुष्ये

अशाच अन्यायाच्या अंधाऱ्या कोठडीत 

खितपत पडली आहेत.

त्यांना कधी न्याय मिळणार? 

 

आणि तुमच्यासारख्या

उद्या अशाच एखाद्या व्यवस्थेच्या कचाट्यात सापडणाऱ्यांना

किमान माणूस म्हणून जगण्याचा,

किमान आपली बाजू मांडण्याचा,

किमान मानवी प्रतिष्ठेने वागवले जाण्याचा

हक्क तरी मिळेल का?

 

की प्रत्येक वेळी

धुराकडे पाहून

आग कुणी लावली हे न तपासताच

आपण कुणालातरी जाळत राहणार?

 

माफ करा सर!

तुमच्या वेदनेच्या वेळी

तुमच्या पाठीशी उभे राहण्याचे

माणूसपण आम्ही जपू शकलो नाही.

 

- कांदा लिंबू 


वाचने 58
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

चांगलं लिहिलंय. विद्यार्थ्याने स्वतःचा बळी घेतला, पण राजकारण्यांनी प्राध्यापकांचा बळी घेतला. नुकसान विद्यार्थ्यांचेच झाले.


एका बाजूला विद्यार्थांनी राजकारणीला राजीनामा द्यायला लावला तर एका बाजूला विद्यार्थांनी शिक्षकाला राजीनामा द्यायला लावला. दोन टोके.


राजकारण्याने परिक्षेतील फसवणूक रोखली नाही म्हणून पदमुक्त व्हायला लावले, तर प्राध्यापकांनी परिक्षेतील फसवणूक रोखली म्हणून पदमुक्त व्हायला लावले.