माफ करा सर!
केवळ प्रामाणिकपणे
आपले कर्तव्य बजावले म्हणून
तुमच्यावर किती भीषण आरोप झाले,
तुम्हाला किती अपमानास्पद लेबलं लावली गेली!
“मी प्राध्यापक सूर्यनारायण आहे”
ही ओळख तुम्ही अभिमानाने सांगायचात;
आज त्या ओळखीभोवतीच
अवमानाची राख पसरली आहे.
एक शिस्तप्रिय परीक्षक म्हणून,
एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून
तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे सोडा
तुम्हाला समजून घेणेही सोडा
किमान माणूस म्हणून
तुमच्या वेदनेशी सहानुभूत होणे सुद्धा
या समाजाला जमले नाही.
उलट,
तुमच्यावर झालेल्या अन्यायाचे
पाशवी समर्थनच
सगळीकडे होत राहिले.
तुम्ही न केलेल्या गुन्ह्याची
शिक्षा ही व्यवस्था तुम्हाला देत राहिली.
काय वाटत असेल तुम्हाला?
काय वाटत असेल तुमच्या कुटुंबीयांना?
तुमच्या विद्यार्थ्यांना,
तुमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला?
तुम्ही निर्दोष आहातच.
पण समाजाचे एक सोपे समीकरण असते
धूर दिसतोय, म्हणजे आग असणारच!
पण कधी कुणी थांबून विचार करेल का,
ही आग तुम्ही लावली होती,
की तुम्हालाच
या आगीत ढकलले गेले होते?
दोष सिद्ध होण्याआधीच
दोषी ठरवणाऱ्या या गर्दीत
एखाद्याचा आवाज कोण ऐकणार?
असंख्य आयुष्ये
अशाच अन्यायाच्या अंधाऱ्या कोठडीत
खितपत पडली आहेत.
त्यांना कधी न्याय मिळणार?
आणि तुमच्यासारख्या
उद्या अशाच एखाद्या व्यवस्थेच्या कचाट्यात सापडणाऱ्यांना
किमान माणूस म्हणून जगण्याचा,
किमान आपली बाजू मांडण्याचा,
किमान मानवी प्रतिष्ठेने वागवले जाण्याचा
हक्क तरी मिळेल का?
की प्रत्येक वेळी
धुराकडे पाहून
आग कुणी लावली हे न तपासताच
आपण कुणालातरी जाळत राहणार?
माफ करा सर!
तुमच्या वेदनेच्या वेळी
तुमच्या पाठीशी उभे राहण्याचे
माणूसपण आम्ही जपू शकलो नाही.
- कांदा लिंबू
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगलं लिहिलंय…
चांगलं लिहिलंय. विद्यार्थ्याने स्वतःचा बळी घेतला, पण राजकारण्यांनी प्राध्यापकांचा बळी घेतला. नुकसान विद्यार्थ्यांचेच झाले.
आता विद्यार्थ्यांनीच…
In reply to चांगलं लिहिलंय… by श्रीगुरुजी
आता विद्यार्थ्यांनीच राजकारण्यांचा बळी घ्यावा.
हं
In reply to आता विद्यार्थ्यांनीच… by राज जोशी
ते आवडत नाही पण गुरुजींना बहुतेक !
तशा गुरुजींना न आवडणा-या…
In reply to हं by वृषभ खोंडे
तशा गुरुजींना न आवडणा-या गोष्टी अनेक आहेत...
एका बाजूला विद्यार्थांनी…
एका बाजूला विद्यार्थांनी राजकारणीला राजीनामा द्यायला लावला तर एका बाजूला विद्यार्थांनी शिक्षकाला राजीनामा द्यायला लावला. दोन टोके.
राजकारण्याने परिक्षेतील…
राजकारण्याने परिक्षेतील फसवणूक रोखली नाही म्हणून पदमुक्त व्हायला लावले, तर प्राध्यापकांनी परिक्षेतील फसवणूक रोखली म्हणून पदमुक्त व्हायला लावले.
काही तरी घडामोडी घडल्या ना?…
In reply to राजकारण्याने परिक्षेतील… by श्रीगुरुजी
काही तरी घडामोडी घडल्या ना? तेवढेच नीरस बातम्यांमधे चैतन्य...
सरांच्या निमित्ताने
सरांच्या निमित्ताने सवर्ण आणि आरक्षणाच्या लाभार्थी अशा समाजातील दुभंग अजूनच रुंदावला आहे आणि कालानुरुपे ती दरी सांधली जायची शक्यता अजिबात नाही.
तो दुभंग आधीच होता.... खूप…
In reply to सरांच्या निमित्ताने by धर्मराजमुटके
तो दुभंग आधीच होता.... खूप पूर्वीपासून... काय कारण असावे हे नेमके इतिहासाने दडवून ठेवले आहे.
आता तर मिटणारच नाही.. कधीच.
सर्व व्यक्त-अव्यक्त…
सर्व व्यक्त-अव्यक्त मिपाखरांचे आभार!
पायलटांविरोधात अनुसूचित जातीजमाती कायद्यांतर्गत FIR
एक्सवर ही पोस्ट पाहण्यात आली. पण शोधाशोध केल्यावर बातमी जुनी आहे असे दिसते आहे.
प्रशिक्षणात उत्तीर्ण करण्यास नकार दिल्यानंतर एका प्रशिक्षणार्थी पायलटने इंडिगोच्या तीन वरिष्ठ पायलटांविरोधात अनुसूचित जातीजमाती कायद्यांतर्गत FIR दाखल केला आहे.
मला बळी हवाय ....
मला बळी हवाय तो अट्रोसिटी कायद्याचा. हा कायदा नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचं उल्लंघन म्हणून झोडपला गेला पाहिजे.
-गा.पै.
कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक…
In reply to मला बळी हवाय .... by गामा पैलवान
कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा, UAPAअसे असंख्य कायदे आहेत ज्यांना मग काढून टाकूया.