मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जुना वाडा

मनोज · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
एक जुना वाडा भंगलेले तुळशी वृंदावन विरलेली स्वप्नं अन् उदास माझं मन परसातल्या चाफ्याला आता येत नाहीत फुलं अंगणात कधीच खेळत नाहीत मुलं ओसरीवरचा चौफाळा वाऱ्यासोबत रडणारा दारातील पिंपळ दिवसभर झडणारा गंजलेले तावदान कुजलेली खिडकी धुळीने माखलेली उतरंडीची मडकी माळवदातील घरटं चिमणीने सोडलंय दारावरचं आडनाव केंव्हाच मोडलंय

वाचने 5974 वाचनखूण प्रतिक्रिया 11

गणेशा Fri, 06/12/2020 - 16:39
कविता भारी.. माझं गावाकडचं पडलेलं माळवदाचं घर समोर आले.. त्याच्या बाजूला अजूनही पिंपळ तसाच आहे.. त्या घरात गेल्यावर आज्जी ने जिथे मला एकदा नको म्हणालो तरी पुरणपोळी केली होती त्याची आठवण आली.. आत्ताच मागे गेले होतो.. फोटो पण असेल बहुतेक..

In reply to by गणेशा

मनोज Fri, 06/12/2020 - 18:37
धन्यवाद! माळवद शब्द फार लोकांना माहित नसे असे मला वाटते. बहुदा मराठवाड्या मध्ये जास्त वापरला जातो !

मन्या ऽ Fri, 06/12/2020 - 19:16
चित्रदर्शी कविता! माळवद म्हणजे माळावरच घर. असा काही अर्थ आहे का शब्दाचा? माझ्या वाचनात पहिल्यांदाच आलाय हा शब्द.. :)

In reply to by मन्या ऽ

मनोज Fri, 06/12/2020 - 21:08
मन्या ऽ धन्यवाद !! मराठवाड्या मध्ये माळवद हा शब्द छत या अर्थाने वापरला जातो. लाकडाची फ्रेम करून त्यावर चिखल अंथरला जातो.