जुना वाडा

मनोज's picture
मनोज in जे न देखे रवी...
12 Jun 2020 - 11:34 am

एक जुना वाडा
भंगलेले तुळशी वृंदावन
विरलेली स्वप्नं
अन् उदास माझं मन

परसातल्या चाफ्याला
आता येत नाहीत फुलं
अंगणात कधीच
खेळत नाहीत मुलं

ओसरीवरचा चौफाळा
वाऱ्यासोबत रडणारा
दारातील पिंपळ
दिवसभर झडणारा

गंजलेले तावदान
कुजलेली खिडकी
धुळीने माखलेली
उतरंडीची मडकी

माळवदातील घरटं
चिमणीने सोडलंय
दारावरचं आडनाव
केंव्हाच मोडलंय

आठवणीकविता

प्रतिक्रिया

गणेशा's picture

12 Jun 2020 - 4:39 pm | गणेशा

कविता भारी..

माझं गावाकडचं पडलेलं माळवदाचं घर समोर आले..
त्याच्या बाजूला अजूनही पिंपळ तसाच आहे..
त्या घरात गेल्यावर आज्जी ने जिथे मला एकदा नको म्हणालो तरी पुरणपोळी केली होती त्याची आठवण आली..

आत्ताच मागे गेले होतो.. फोटो पण असेल बहुतेक..

मनोज's picture

12 Jun 2020 - 6:37 pm | मनोज

धन्यवाद! माळवद शब्द फार लोकांना माहित नसे असे मला वाटते. बहुदा मराठवाड्या मध्ये जास्त वापरला जातो !

आमच्या पश्चिम महाराष्ट्रात पण वापरायचे की सगळे हा शब्द... माझ्या मामाचे तर अलीकडे पर्यंत मालवदाचेच घर होते...

प्रमोद देर्देकर's picture

12 Jun 2020 - 5:47 pm | प्रमोद देर्देकर

मस्त. मीही एक कविता जुन्या वाड्यावर केली होती.

ती आठवली जाहिरात करतो थांबा

http://www.misalpav.com/node/30317

गणेशा's picture

12 Jun 2020 - 5:55 pm | गणेशा

वा मस्त आहे कविता..
आता हि लिहीत रहा..

मनोज's picture

12 Jun 2020 - 6:40 pm | मनोज

वैभवशाली अस्तित्वाच्या उध्वस्त खुणा - खूप सुन्दर !!! आवडली !!

मन्या ऽ's picture

12 Jun 2020 - 7:16 pm | मन्या ऽ

चित्रदर्शी कविता!

माळवद म्हणजे माळावरच घर. असा काही अर्थ आहे का शब्दाचा? माझ्या वाचनात पहिल्यांदाच आलाय हा शब्द.. :)

मनोज's picture

12 Jun 2020 - 9:08 pm | मनोज

मन्या ऽ धन्यवाद !! मराठवाड्या मध्ये माळवद हा शब्द छत या अर्थाने वापरला जातो. लाकडाची फ्रेम करून त्यावर चिखल अंथरला जातो.

मन्या ऽ's picture

12 Jun 2020 - 10:46 pm | मन्या ऽ

अच्छा! हे माहिती नव्हते.. मी गावाकडची फक्त कौलारु घरे बघितली आहेत.. त्यामुळे हा शब्द माझ्यासाठी नवीनच..

वीणा३'s picture

12 Jun 2020 - 9:27 pm | वीणा३

कविता छान आहे, पण आवडली म्हणवत नाही, एकेकाळी गोकुळ असलेली अशी पडकी घरं बघून वाईट वाटतं, काळाचा महिमा, दुसरं काय :(

मनोज's picture

12 Jun 2020 - 10:15 pm | मनोज

धन्यवाद वीणा ..खरं आहे आमचा पण असा जुना वाडा होता... आता कोणी राहत नाही पडला आहे :(