खंत वेड्या मनाची (गझल)
लेखनविषय:
काव्यरस
मुकी जाहली आज सारीच झाडे, जणु जाहल्या सुन्न या रानवेली
जिथे भेटलो बोललो रोज होतो, रया तेथली आज सारीच गेली
कधी पाखरे गायली रोज होती, तुझ्या स्वागताची किती गोड गाणी
आता पाखरांचा कुठे न सुगावा, कशाने अशी पाखरे पांगलेली
असे साचली या जगतात साऱ्या, तुझी आठवण अती रम्य वेडी
हवी वाटते जी मनाला तरीही, उगा अंतरी या कुठे बोचलेली
कधी झेलुनी चांदणे ओंजळीत, सडा शिंपला तू इथे काळजात
जणु जाहलो मी छटा अंबराची, तुझ्या चांदण्यांनी जी तेजाळलेली
मला सापडेना मुळी तोच धागा, सुटे काळजाची जिथे प्रश्नमाला
कसा श्रावणाचा उन्हाळाच झाला, किती घालमेल मनी चाललेली
आता सोबती त्या रिकाम्याच वाटा, जिथे ना निवारा नसे गारवाही
दिलासा मनाला असे एक मात्र, स्मृती आपुली ती तिथे दाटलेली
उडे आसमंती उगा धुळमाती, ऋतु कोणता हा मनाला कळेणा
किती आज ओढ आकाशी ढगांना, कुठे जावयाची असे लागलेली
कसा हा अवेळी असा ग्रीष्म आला, मनी अंगणी ऊन तापुन गेले
तुझी आणि माझी किती रम्य स्वप्ने, कुठे आज शोधु कुठे लोपलेली
अजुनी या वेड्या मनी खंत माझ्या, तुझी शेवटी भेट झालीच नाही
तुझ्या पावलांचे ठसे शोधताना, कडा लोचनांची ही पाणावलेली
-शार्दुल हातोळकर
वाचने
3660
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
वाह!!!!!!!
__/\__ क्या बात है, आज मिपावर मेघदूत वाचण्याचा योग आला.
रातराणीच्या अघळपघळ मध्ये
ओंजळभरून चंद्र आज अंगणात बरसून गेला
हे रुपक
कधी झेलुनी चांदणे ओंजळीत, सडा शिंपला तू इथे काळजात
जणु जाहलो मी छटा अंबराची, तुझ्या चांदण्यांनी जी तेजाळलेली
या ओळीतून नव्या उंचीवर पोहोचल्यासारखे वाटले. ...वाह क्या बात है!
अजून येऊ द्यात
In reply to __/\__ क्या बात है, आज मिपावर by माहितगार
असा दिलखुलास प्रतिसाद असल्यावर आम्हालाही लिहायला हुरुप येतो !! ☺
मस्तच! आवडली गजल!
जरा चालीत म्हणायला गेलो तर आपल्या मराठी "माउली-माउली" या गाण्याच्या चालीशी जवळीक वाटली! बघा, अजून कुणाला तसे वाटतेय का?
Sandy
In reply to मस्तच! by चांदणे संदीप
मी या गझलला एक वेगळी चाल लावली आहे....
छान केलीय गझल
अतिशय उत्कृष्ट आशय. या गझलेचा भावार्थ खरा रसिकच जाणु शकतो!!
माहितगार यांच्या प्रतिसादाशी प्रचंड सहमत.
तुमच्या इतरही कविता वाचल्या, खुप छान लिहिताय!!
In reply to सर्वांगसुंदर गझल!!! by देशप्रेमी
__/\__
माझ्या सर्व गझलांपैकी ही गझल सर्वाधिक आवडती आहे.
काल दिवस भर सुरेश भटांच्या या ओळी मनात घर करुन बसल्या होत्या
मजला दिलेस कां तू वरदान विस्तवाचे?
दुनिये, अता रडाया मजला उसंत नाही
आता आजचा दिवस या ओळींचा
कसा हा अवेळी असा ग्रीष्म आला, मनी अंगणी ऊन तापुन गेले
तुझी आणि माझी किती रम्य स्वप्ने, कुठे आज शोधु कुठे लोपलेली
पैजारबुवा,
In reply to सुरेख... by ज्ञानोबाचे पैजार
या सर्व ओळींनी मनात कायमस्वरुपी घर केले आहे. शांत निवांत क्षणी या ओळी मनाच्या अंगणात हळुवार पावलांनी चालत येतात.
ह्रदयाला भिडणारी भावस्पर्शी गझल...! खुप छान लयीमध्ये शब्दबद्ध केली आहे !!
सुरेख... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अम्बरसरिया..मुंडयावे कचिया कलियाँ ना तोड़, तेरे माँ ने बोले हैं मुझे तीखे से बोल... :- Fukreyछानच झालीय ही गझल!
धन्यवाद गौरी, मदनबाण, प्रसाद. __/\__
वाह!!!!!!!