"माझ्या सोलापुरी मातीत..."
लेखनविषय:
काव्यरस
कविवर्य बोरकरांची मनापासून क्षमा मागून...
आ. बाकिबाबांची मुळ कविता : माझ्या गोव्याच्या भूमीत
माझ्या सोलापुरी मातीत
गड्या आभाळ कोरडे
वेशी-पेठांच्या मधुन
मराठी कन्नड़ चौघडे !!
माझ्या सोलापुरी मातीत
भाषा विविधेची रास
ओठी शिव्यांचे पाझर
मनी माणुसकीचा वास !!
माझ्या सोलापुरी मातीत
'रामपुरें'ची कारागिरी
पाना-फ़ुलांची कुसर
जगीं प्रसिद्ध चादरी !!
माझ्या सोलापुरी मातीत
सदा उन्हाळ्याचा वारा
अंगोपांगी खेळती रे
उष्ण घामाच्या या धारा !!
माझ्या सोलापुरी मातीत
येते लावणी माहेराला
कविवरांच्या वचनांनी
भेटे लावण्य कवितेला !!
माझ्या सोलापुरी मातीत
शिव्या शब्दांचीच फ़ुले
असे राकट रांगडा
जीव मनापासून बोले !!
माझ्या सोलापुरी मातीत
(पद्म)साळ्यांचा रे 'माग'
येते कबिराच्या दोह्यांनी
साखरपेठेला रे जाग !!
माझ्या सोलापुरी मातीत
'मना-मना'चे रे सोने
आतिथ्याचे, अगत्याचे
आम्हां लाभले हे 'देणे' !!
– विकुबाब सोलापूरकर
वाचन
5837
प्रतिक्रिया
0