स्वातंत्र्यदिनाची ही कविता लवकरात लवकर शिळी होवो...
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मिपाकरांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. स्वातंत्र्याला पन्नास वर्षे झाली तेव्हा मी 'स्वातंत्र्य पन्नाशीचा अभंग' नावाची कविता लिहिली.
स्वातंत्र्यास वर्षे| जाहली पन्नास
केला सत्यानास| भामट्यांनी
अशी तिची सुरवात होती. स्वातंत्र्याची साठी पूर्ण झाली तेव्हा पहिल्या दोन ओळी बदलल्या. अन्य काही किरकोळ बदल केले. आशयाच्या दृष्टीने दहा वर्षात फारसा फरक पडला नव्हता. ती कविता खाली देत आहे.
आज स्वातंत्र्याला एकसष्ट वर्षे पूर्ण होत आहेत. परिस्थितीत काहीच फरक नाही. म्हणून पहिल्या दोन ओळी अशा बदलत आहे...
स्वातंत्र्यास वर्षे | झाली एकसष्ट
सरेनात कष्ट| सामान्यांचे
ही कविता फक्त वर्षाचा आकडा बदलून स्वातंत्र्याला अडुसष्ट वर्षे पूर्ण होईपर्यत चालू शकेल.
परमेश्वरा, परिस्थिती बदलो आणि ही कविता लवकरात लवकर शिळी होवो हीच प्रार्थना...
स्वातंत्र्य-साठीचा अभंग
स्वातंत्र्याची वर्षे। उलटली साठ
होईना रे पाठ। राष्ट्रगीत
पापाची पताका। फडकते नभी
पुण्यदेवी उभी। कोपर्यात
पुढार्यांच्या खाती। लाख आणि कोटी
रिकामी नरोटी। पामराची
सत्य, निष्ठा शब्द। झाले वांझ वाया
तोंड लपवाया। जागा नाही
किती बॉम्बस्फोट। किती या दंगली
देशाची भंगली। एकात्मता
ओर्बाडून खाती। स्वातंत्र्याच्या झाडा
उन्नतीचा गाडा। चिखलात
सत्तेला झोंबते। आधाशांची टोळी
महात्म्याच्या डोळी। पाणी दाटे
हजारे, आमटे। मेधा नि कलाम
घ्यावा जी सलाम। सज्जनांचा
तुम्हासारख्यांनी। सांभाळली आज
स्वातंत्र्याची लाज। थोडकीशी
-अविनाश ओगले
वाचने
3960
वाचनखूण
प्रतिक्रिया
13
अप्रतिम
ह्म्म!!
बापरे..
वास्तववादी रचना
कविता छान, पण चित्र विदारक!
In reply to कविता छान, पण चित्र विदारक! by अजिंक्य
नरोटी म्हणजे...
फारच भेदक ओव्या!
कस सुचतं
लै भारी
जबरा कविता
सुंदर आणि समर्पक अभंग
एकदम
फारच