मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऋण

यशोधरा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
भांबावतो कल्लोळ. माझ्या उरात दडू पाहतो. पाहता पाहता नभही अलगद झाकोळून येतं. आपसूक दूरस्थ होणारे किनारे पाहताना, भरतीचा ठाव सुटतो... तुझा माझा मांडलेला पसारा पाहते. त्यातून स्वत:ला निर्लेपपणे बाजूला काढायचं ठरवते. हळूच एक प्रश्न डोकं वर काढतो, विचारतो, कधी चुकतं करशील तुमच्या नात्याचं देणं? परतीच्या वाटेवर थांबलेली पावलं, ऋणात गुंतून राहिलेलं हे मन...

वाचने 5995 वाचनखूण प्रतिक्रिया 33

सखी Fri, 02/07/2014 - 19:32
सुरेख जमलयं आणि बिटविन द लाईन्स खूप काही सांगतात असे वाटते.

इन्दुसुता Fri, 02/07/2014 - 21:07
आपसूक दूरस्थ होणारे किनारे पाहताना, भरतीचा ठाव सुटतो... कोण सुटलय यातून? तरीही ठाव सुटायचा राहत नाही. गुंतून राहिलेलं हे मन... आणि हे तरी कुणाला सुटलय? रचना आतपर्यंत पोचली... आवडली.

उपास Fri, 02/07/2014 - 21:22
तरल.. सुंदर मांडलेयस! >>परतीच्या वाटेवर थांबलेली पावलं, ऋणात गुंतून राहिलेलं हे मन...>> आणि 'गुंत्यात गुंतूनिया, पाय माझा मोकळा..' म्हणणारा (स्वच्छंद) तो...

तिमा Sat, 02/08/2014 - 12:29
कविता आवडली असे म्हणण्यापेक्षा भिडली असे म्हणेन. अशा कवितांतूनच माणूस स्वतःचे अनुभव चाचपून पहातो.

राघव Mon, 02/10/2014 - 14:14
हे कसे? - ऋण कोणाचे कोण स्तवे अन् प्रेम कुणाचे श्रेष्ठ ठरे? सतजन्माचे नाते अपुले, तुझ्या[च] व्रताचे बंध खरे.. या जन्मातिल साथ तुझी मज मिळती कैसी सांग बरे.. तूच मनांतिल अमृतधारा.. तव प्रेमाने विश्व तरे! राघव

In reply to by राघव

यशोधरा Mon, 02/10/2014 - 16:10
मस्त :) मज मिळती कैसी? - मिळती? की मज मिळेल कैसी - असे चालेल?

इन्दुसुता Mon, 02/10/2014 - 18:48
@राघव, तुमची रचनाही आवडली. मूळ रचनेपेक्षा तुमच्या रचनेचा आशय काहीसा वेगळा वाटला. @यशो, मला येथे " मिळती'च योग्य वाटते आहे ( तुझ्या व्रतबंधाशिवाय आपल्याला सातजन्मीचे नाते / या जन्मीची साथ कशी मिळाली असती, असे बहुतेक राघव यांना म्हणायचे आहे)