Skip to main content

ऋण

लेखक यशोधरा यांनी शुक्रवार, 07/02/2014 04:46 या दिवशी प्रकाशित केले.
भांबावतो कल्लोळ. माझ्या उरात दडू पाहतो. पाहता पाहता नभही अलगद झाकोळून येतं. आपसूक दूरस्थ होणारे किनारे पाहताना, भरतीचा ठाव सुटतो... तुझा माझा मांडलेला पसारा पाहते. त्यातून स्वत:ला निर्लेपपणे बाजूला काढायचं ठरवते. हळूच एक प्रश्न डोकं वर काढतो, विचारतो, कधी चुकतं करशील तुमच्या नात्याचं देणं? परतीच्या वाटेवर थांबलेली पावलं, ऋणात गुंतून राहिलेलं हे मन...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 6021
प्रतिक्रिया 33

प्रतिक्रिया

आपसूक दूरस्थ होणारे किनारे पाहताना, भरतीचा ठाव सुटतो... कोण सुटलय यातून? तरीही ठाव सुटायचा राहत नाही. गुंतून राहिलेलं हे मन... आणि हे तरी कुणाला सुटलय? रचना आतपर्यंत पोचली... आवडली.

तरल.. सुंदर मांडलेयस! >>परतीच्या वाटेवर थांबलेली पावलं, ऋणात गुंतून राहिलेलं हे मन...>> आणि 'गुंत्यात गुंतूनिया, पाय माझा मोकळा..' म्हणणारा (स्वच्छंद) तो...

कविता आवडली असे म्हणण्यापेक्षा भिडली असे म्हणेन. अशा कवितांतूनच माणूस स्वतःचे अनुभव चाचपून पहातो.

छान लिहिल आहेस. >>त्यातून स्वत:ला निर्लेपपणे बाजूला काढायचं ठरवते. हे आवडलं . (खूप कठीण आहे हे जमणं.)

हे कसे? - ऋण कोणाचे कोण स्तवे अन् प्रेम कुणाचे श्रेष्ठ ठरे? सतजन्माचे नाते अपुले, तुझ्या[च] व्रताचे बंध खरे.. या जन्मातिल साथ तुझी मज मिळती कैसी सांग बरे.. तूच मनांतिल अमृतधारा.. तव प्रेमाने विश्व तरे! राघव

In reply to by राघव

मस्त :) मज मिळती कैसी? - मिळती? की मज मिळेल कैसी - असे चालेल?

In reply to by यशोधरा

प्रतिसाद द्यायचा राहून गेला.. नाही इथं मिळती हाच शब्द बरोबर आहे. कारण साथ आत्ता मिळालेली आहे.

@राघव, तुमची रचनाही आवडली. मूळ रचनेपेक्षा तुमच्या रचनेचा आशय काहीसा वेगळा वाटला. @यशो, मला येथे " मिळती'च योग्य वाटते आहे ( तुझ्या व्रतबंधाशिवाय आपल्याला सातजन्मीचे नाते / या जन्मीची साथ कशी मिळाली असती, असे बहुतेक राघव यांना म्हणायचे आहे)

In reply to by इन्दुसुता

ओह, आले लक्षात! :) बरोबर. धन्यवाद इन्दुसुता. > मूळ रचनेपेक्षा तुमच्या रचनेचा आशय काहीसा वेगळा>> सहमत.