मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घाबरगुंडी

ऋषिकेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
साले सगळे घाबरतात! साले सगळे घाबरवतात! समोरून नेता आला तावातावात बोलू लागला हा आपला तो तुपला ऐकलं नाहीस तर तू धुपला तुमची भाषा धोक्यात आहे तुमचा धर्म धोक्यात आहे माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो त्यांना मत देऊन आलो उगाच कशाला? माझा धर्म, माझी भाषा संपली तर! समोरून दुसरा आला तावातावात बोलू लागला अमुक पॅटर्न तमुक फॉर्मॅट आमचंच आतून सारं ग्याटमॅट आमच्याविना आहे काय? करियर धोक्यात आलं हाय माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो त्या क्लासमध्ये दाखल झालो उगाच कशाला? माझं करियर, माझे मार्क हरवले तर! समोरून 'प.पू.' आले तावातावात बोलू लागले अमुक विद्या, तमुक मंत्र वक्री ग्रह, चक्री तंत्र मला आहे शक्ती फार क्षणात तुजला बसेल मार माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो मठात पाकीट टेकवून आलो उगाच कशाला? त्यांच्या शापाने शांतता हरवली तर! समोरून बुवा आले तावातावात बोलू लागले बाबा-भोंदू थापा फार प.पू. नुसता फुसका बार देवात आहे ताकद खरी त्याच्याशी सलगी बरी माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो देवळात पावती फाडून आलो उगाच कशाला? देवाचा कोप झाला तर! समोरून तज्ज्ञ आले तावातावात बोलू लागले आली मंदी बुडेल धंदा अर्थव्यवस्थेचा वांदा येईल साठी जवळ जेव्हा वणवण करत राहशील तेव्हा माझी उडाली घाबरगुंडी मी मग तडक गेलो 'स्कीम'चा चेक फाडून आलो उगाच कशाला? म्हातारपणी पैसे संपले तर! समोर निवांत मित्र आला मला मग ताव चढला धर्म भाषा शिक्षण पैसा सारे काही धोक्यात आहे हे कर ते कर सारे काही नाहीतर काही खरे नाही त्याची उडाली घाबरगुंडी तो मग तडक गेला मनात भिती भरून बसला मग मी शांत झालो.. मोकळं कोकरू कळपात आलं! साले सगळे घाबरतात! साले सगळे घाबरवतात!

वाचने 2536 वाचनखूण प्रतिक्रिया 13

मदनबाण 08/08/2013 - 16:15
समोरुन पाकडे आले आपल्या सैनिकांना ठार केले संसद, चॅनल , वर्तमानपत्र सर्वत्र फक्त चर्चाच आहे ह्यांचा हात म्हणे त्यांच्या बरोबर आहे लष्कराचे निवेदन अन् मंत्राचे निविदेत यात तफावत कशी काय आहे ? हा नक्क्की कसला विरोधाभास ? मी उद्विग्न झालो...पाकड्यांच्या नावाने बोटे मोडु लागलो. सगळेच म्हणतात त्यांना आपण बघुन घेउ,हे तर दरवेळच ठराविक उत्तर आहे !

कविता भयंकर आवडली.
मग मी शांत झालो.. मोकळं कोकरू कळपात आलं
ऐवजी "मोकळं कोकरू कळपात आलं.... मग मी नवे कोकरु शोधु लागलो" हे वस्तुस्थिती धरुन झाले असते. ड्रॅकुलाला घाबरणार्‍या माणसाचा जेव्हा ड्रॅकुला होतो तेव्हा इतरांना ड्रॅकुला बनवण्यासाठी तो धडपडु लागतो

ऋषिकेश 14/08/2013 - 09:04
सर्व वाचकांचे आणि प्रतिसादकांचे, प्रोत्साहकांचे आभार! गेले काही दिवस हाफिसातून मिपा अ‍ॅक्सेस होत नसल्याने प्रतिसाद देणे राहत होते. उशीरा प्रतिसादाबद्दल क्षमस्व!