साले सगळे घाबरतात! साले सगळे घाबरवतात!
समोरून नेता आला
तावातावात बोलू लागला
हा आपला तो तुपला
ऐकलं नाहीस तर तू धुपला
तुमची भाषा धोक्यात आहे
तुमचा धर्म धोक्यात आहे
माझी उडाली घाबरगुंडी
मी मग तडक गेलो
त्यांना मत देऊन आलो
उगाच कशाला? माझा धर्म, माझी भाषा संपली तर!
समोरून दुसरा आला
तावातावात बोलू लागला
अमुक पॅटर्न तमुक फॉर्मॅट
आमचंच आतून सारं ग्याटमॅट
आमच्याविना आहे काय?
करियर धोक्यात आलं हाय
माझी उडाली घाबरगुंडी
मी मग तडक गेलो
त्या क्लासमध्ये दाखल झालो
उगाच कशाला? माझं करियर, माझे मार्क हरवले तर!
समोरून 'प.पू.' आले
तावातावात बोलू लागले
अमुक विद्या, तमुक मंत्र
वक्री ग्रह, चक्री तंत्र
मला आहे शक्ती फार
क्षणात तुजला बसेल मार
माझी उडाली घाबरगुंडी
मी मग तडक गेलो
मठात पाकीट टेकवून आलो
उगाच कशाला? त्यांच्या शापाने शांतता हरवली तर!
समोरून बुवा आले
तावातावात बोलू लागले
बाबा-भोंदू थापा फार
प.पू. नुसता फुसका बार
देवात आहे ताकद खरी
त्याच्याशी सलगी बरी
माझी उडाली घाबरगुंडी
मी मग तडक गेलो
देवळात पावती फाडून आलो
उगाच कशाला? देवाचा कोप झाला तर!
समोरून तज्ज्ञ आले
तावातावात बोलू लागले
आली मंदी बुडेल धंदा
अर्थव्यवस्थेचा वांदा
येईल साठी जवळ जेव्हा
वणवण करत राहशील तेव्हा
माझी उडाली घाबरगुंडी
मी मग तडक गेलो
'स्कीम'चा चेक फाडून आलो
उगाच कशाला? म्हातारपणी पैसे संपले तर!
समोर निवांत मित्र आला
मला मग ताव चढला
धर्म भाषा शिक्षण पैसा
सारे काही धोक्यात आहे
हे कर ते कर सारे काही
नाहीतर काही खरे नाही
त्याची उडाली घाबरगुंडी
तो मग तडक गेला
मनात भिती भरून बसला
मग मी शांत झालो.. मोकळं कोकरू कळपात आलं!
साले सगळे घाबरतात! साले सगळे घाबरवतात!
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2542
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
फक्त शाब्दिक झोंबा झोंबी
छान
आवडली
साले सगळे घाबरतात! साले सगळे घाबरवतात!
कविता आवडली.
मस्त मस्त मस्त
मस्त!
राईट्ट्ट एकदम. मस्तच
In reply to मस्त! by पैसा
वाहवा...
आभार!
कविता छानच आहे, पण आत्मस्थिती
मस्तच...
सलाम!