Skip to main content

श्रावणाच्या चिंब धारा

लेखक सांजसंध्या यांनी शुक्रवार, 10/08/2012 19:06 या दिवशी प्रकाशित केले.

एका गाण्याची पहिली ओळ सकाळी गुणगुणली आणि आता कामात असताना कविता स्फुरली. इथे द्यायचा मोह आवरता आला नाही. श्रेय त्या ओळीला ( मिपाकर लगेच ओळखतील :) )

श्रावणाच्या चिंब धारा

अवचिता भेटीत या तू,
चांदण्यांचे गीत गावे
आणि गाताना हळूसे,
ऐकू माझे नांव यावे

मन्मनींच्या उंच लाटा
वादळाने वादळाव्या
सागरा रे चंद्रवेड्या
तू मला लिपटून घ्यावे

श्रावणाच्या चिंब धारा
आठवांशी दंग व्हावे
त्या खुणांनी, ओळखीच्या
अंग अंगी मोहरावे

धुंद वारा, बोचरासा
चेतवावा, देह सारा
झिलमिल्या या पावसाने
तव मिठीशी, चिंबवावे

बावरूनी सांज यावी
तू जरासे बावरावे
रात्र गेली रे सरूनी
हे तिला ना आठवावे

- संध्या

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2096
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

छान जमलीये,,,पण अजुन थोडं फिनिशिंग हवं आहे.म्हणजे त्यातली गेयता पण उत्तम प्रकट होइल.

@एका गाण्याची पहिली ओळ सकाळी गुणगुणली >>> या काव्याचे/गीताचे मूळ अंतरंग- मलमली तारुण्य माझे.... हेच ना ?


कवितेत योग्य शब्दांची योजना आता होत चालली आहेसे दिसतेय ! तरीही वल्ल्ली शी सहमत !
श्रावणाच्या चिंब धारा यात धारेचे विशेषण चिंब हे अर्थवाही वाटले नाही. धारा ज्याला ओले करते तो चिंब . उदा परिसर चिंब परिसर. जसे आर्द्र पाणी असे कसे म्हणता येईल ? आर्द्र घन असे म्हणता येईल.
बाकी कविता फार नेटकी व मस्त ! सर्वात आवडलेली ओळ
अवचिता भेटीत या तू,
चांदण्यांचे गीत गावे
आणि गाताना हळूसे,
ऐकू माझे नांव यावे