पर्जन्याष्टक
१.
खूप पाऊस आला आणि गारा पडायला लागल्या
तसा मी खिडकी बंद करायला धावलो...
तू दार उघडून थेट अंगणात गारा वेचायला!
दोन चार हळव्या गारा माझ्यासाठी ओंजळीत घेऊन तू आलीस.
पावसात भिजलेली तू
तुझी आर्जवी ओंजळ
ओंजळीत विरघळणार्या गारा...
मी पहातच राहिलो-
पावसात भिजल्यावर कविता कशी दिसते ते!
२.
मी एकदाच तुला विचारलं_
“पावसाचं आणि तुझं नातं काय?”
तू माझ्या मिठीत शिरत म्हणालीस,
“बघ ना माझ्या डोळ्यात!”
तेव्हा तुझ्या डोळ्यात बेभान पाऊस
आणि श्वासात मृदगंध...
३.
बाहेर खूप पाऊस कोसळत होता रात्री
आणि मी आपला तुला पावसाच्या कविता वाचून दाखवत होतो.
अचानक दिवे गेले, अंधार झाला.
एक वीज लखलखत मोठ्यानं कडाडली
तू उगीच घाबरल्यासारखं दाखवत माझ्या मिठीत शिरलीस.
दिवे आल्यावर मी आपला ती अर्धी राहिलेली कविता पुढं वाचू लागलो
तेव्हा तू म्हणालीस_
“ही कविता पूर्ण झालीय...आता पुढची वाच!”
४.
पाऊस आला की मी खिडकी लावायला धावायचो
आणि तू मला नेहमी हसायचीस.
एकदा म्हणालीस,
`कसला रे कवी तू?
काचेआडून पाऊस बघतोस आणि पावसाच्या कविता लिहितोस.
एकदा तरी पावसात मनमुराद, चिंब भिजून कविता लिही ना!’
तसा मी तुझ्या कुशीत शिरलो...
...
...
मग तूच म्हणालीस_
`आता लिही ना एक पावसाची कविता'
५.
बाहेर पाऊस आणि मी आत पावसाची गझल लिहित बसलेला.
माझा भलताच विचारमग्न चेहरा पाहून तू विचारलंस, 'काय प्रॉब्लेम?'
मी मात्रा मोजत म्हणालो,
`या शेवटच्या ओळीत तीन मात्रा कमी पडताहेत गं!'
तशी तू धो धो हसलीस आणि म्हणालीस_
`वेडाच आहेस..'
वेधशाळेतली लोकं पाऊस मोजतात.
कवींनी कशाला मोजायचा पाऊस
त्यात भिजायचं सोडून?'
त्यानंतर मी कधीच पावसावर गझल लिहिली नाही.
६.
अंगणात मोर यावेत असं तुला नेहमीच वाटायचं.
मोर येत नाहीत म्हणून तू नेहमीच उदास असायचीस.
एकदा मात्र पावसाळ्यात तू हातातलं मोरपीस मिरवत मला म्हणालीस_
`बघ हे अंगणात सापडलं!
नक्कीच मोर आले होते.
तुझ्या कवितेच्या वहीत एक मोरपीस आहे ना, तिथंच हे दुसरं ठेवूया!'
तुझा विलक्षण आनंद मी डोळे भरुन पहात होतो...
तू मात्र वहीत ते मोरपीस शोधत होतीस
कधीच न सापडणारं...
७.
एकदा मी अवेळीच लिहिलेली पावसाची कविता
तुला खूप उत्साहाने वाचून दाखवली.
कविता संपवून मी तुझाकडं पाहिलं
तर तू छत्री उघडून बसलेली, माझ्याकडे खट्याळपणानं पहात.
तेव्हा मला समजलं...
पाऊस नसतानाही कविता कशा वाहून जातात ते.
८.
'कविता खूप लोकांपर्यंत पोचण्यासाठी काय करावं?'
मी तुला गंभीरपणानं विचारलं.
तू ही तितक्याच गंभीरपणानं म्हणालीस...
'सोप्पं आहे!
कवितेच्या कागदांच्या नावा कराव्यात
आणि पावसाच्या पाण्यात सोडून द्याव्यात!'
-अविनाश ओगले
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
11408
प्रतिक्रिया
0
मिसळपाव
प्रतिक्रिया