Skip to main content

घे बाबाच्या कुशीत सोन्या..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 22/12/2011 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी कविता समुहाच्या 'लिहा प्रसंगावर गीत' या उपक्रमासाठी मझा सहभाग... बाबाची अंगाई पापण्यांवर नीज येऊन जडावले डोळे घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे धावधावतो बाबा जणू की पायाला भिंगरी शिणतो, धडपड करतो येण्या लवकर माघारी व्याकुळते मन बाल्य स्मरुनी होते बघना खुळे घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे बाबालाही आस सतावे तुझ्याच बोलांची चिऊ-काऊची गोष्ट बोबडी लाख मोलांची समजुत काढू कशी तुझी मी मलाच हे ना कळे घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे घरट्यामध्ये पक्षी निजले रात खूप झाली चांदोमामा झोपी गेला त्याच्या मेघ महाली नीज माझ्या राजा आता थांबव ना चाळे घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे आई भवती तुझे छोटुले विश्व गुंफ़लेले कर्तव्याने बाबाचे बघ हात बांधलेले इवले इवले स्मरशील ना रे अपुले क्षण आगळे घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे -प्राजु
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5075
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

दमलेल्या बाबाची कहाणी आठवली. खरंच अप्रतिम १ नंबर झाली आहे. :)

अगदि हृदयस्पर्शी का काय म्हणतात तशी वाटली.

छान कविता प्राजुतै. खुप आवडली.
बाबालाही आस सतावे तुझ्याच बोलांची चिऊ-काऊची गोष्ट बोबडी लाख मोलांची समजुत काढू कशी तुझी मी मलाच हे ना कळे घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे

'दमलेल्या बाबांच्या कविते'वरून प्रेरणा घेतलेली जाणवते आहे. ती मुळ सशक्त कविता मनातून दूर करता येत नसल्याने मनातल्यामनात तुलना होत राहिली आणि 'घे बाबाच्या कुशीत सोन्या..'ने म्हणावे तितुके बाळसे धरले नाही असे जाणवले. कदाचित असे म्हणणे म्हणजे कवियित्री वर अन्याय होईल पण तो दोष माझ्या दुबळ्या रसिकतेचाही असू शकतो. प्रयत्न चांगला आहे, अभिनंदन.

कविता अतिशय सुंदर आहे हे प्रथमच म्हणतो.. अतिशय टचिंग.. पण कविता या सदरात.. अंगाई नव्हे. हे म्हणतानाच माझ्या मनात फार लहानपणापासून असलेली एक शंका इथे विचारतो. अंगाईगीत असं नाव दिलंय म्हणून हे म्हणतोयः मुलांना झोपवायला करुण आणि आवंढा दाटणारी गाणी का गातात? तशी गाऊ नयेत असं माझं स्पष्ट मत आहे.. एकवार पंखांवरुनि फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात, ही अंगाई नसली तरी माझ्या लहानपणी कधीकधी संथ चालीचं गाणं म्हणून झोपवताना म्हटली जायची. मी आईला स्पष्ट सांगितलं की रडवणारी गाणी गाऊ नको.. अरे लहान पोरांना काही समजत नाही असं वाटतं का? बरं दु:खी शब्द नसलेली गाणी असली तरी चाली अशा काही करुण असतात की ज्याचे नाव ते.. अरे मजेत हसत हसत झोपूदेत ना पोरांना.. शांत पण आनंदी चाली नसतात का? ही कविता पोराला / पोरीला जागेपणी ऐकवावी असं माझं मत आहे.. तुमच्या गिल्टस पोराला झोपण्याच्या क्षणी कशाला ऐकवायच्या..??

In reply to by मिसळलेला काव्यप्रेमी

असं काहीसं: .......... झोप आता माझ्या बाळा वाजले रे बारा.. दुधासाठी पिशवी लावून येतो दारा.. पाहू नको शिनचॅन, फार वांड झालाय.. झोपवण्या तुला बघ डोरेमॉन आलाय.. बाबाच्या ढेरीवर टाक तुझे पाय.. बापाचाच माल तुझ्या, पर्वा तुला काय? गळा माझ्या मिठी मारुन झोप ढाराढूर.. उद्या मला सुट्टी, उद्या जाऊ दोघे भूर.. लपवून ठेवू उद्या आजोबांची सिगरेट कोणालाच ठावे नाही, तुझं माझं सिक्रेट..

In reply to by गवि

बाबाच्या ढेरीवर टाक तुझे पाय.. बापाचाच माल तुझ्या, पर्वा तुला काय? गळा माझ्या मिठी मारुन झोप ढाराढूर.. उद्या मला सुट्टी, उद्या जाऊ दोघे भूर..
हे लई लई आवडले! बाबाची आठवण झाली! :) त्याने अगदी असेच म्हटले असते. धन्यवाद गवि.

In reply to by गवि

बाबाच्या ढेरीवर टाक तुझे पाय.. बापाचाच माल तुझ्या, पर्वा तुला काय? गळा माझ्या मिठी मारुन झोप ढाराढूर.. उद्या मला सुट्टी, उद्या जाऊ दोघे भूर..
अगदी अगदी.... :)

प्राजु, तुमची कविता निर्विवाद छान आहे पण वरती पेठकर म्हणतात तशी मूळ दमलेल्या बाबाची सावट काही दूर करता येत नाही. कदाचित त्या कवितेच्या प्रसिद्धीचा परिणाम असावा. बाकी. गविंनी मांडलेला मुद्दा विचार करण्यासारखा आहे. त्याबद्दल मी माझं अनुमोदनाचं मत नोंदवतो. त्यांनी लिहिलेली अंगाईची कविता आवडली तरी ती म्हंटल्यानंतर मूल झोपेल याबद्दलही शंकाच आहे.

In reply to by हरिकथा

हा हा हा.. खरंय. झोपेल की नाही शंकाच आहे.. अर्थात चाल कशी लावतो त्यावर अवलंबून आहे. बाकी करुण उदास कडू भावना गाऊनही पोरं निवांत कशी झोपू शकतील ही शंका आहेच.

दोन्ही कविता एकदम मस्त, आणि गवि ज्या समस्यांशी झगडत आहेत पोराच्या बाबतीत त्याच परिस्थितितुन मी जात असल्यानं १०००००००% अनुमोदन..