मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ते दिवस आता कुठे

अरूण म्हात्रे · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
ते दिवस आता कुठे जेव्हा फुले बोलायची दूर ती गेली तरी ही सावली भेटायची... त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी हात देताना तिला माझीच फांदी व्हायची पावसाला पेच होता,ह्या सरी वळवू कुठे चिंबताना त्या पुलाखाली नदी थांबायची वर निळी कौले नभाची,डोंगराची भिंत ती ते नदीकाठी भटकणे,हीच शाळा व्हायची कैक वाटा चाललो,पण विसरलो पोचायचे नेमक्या वळणातूनी ही पावले परतायची गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची.

वाचने 7066 वाचनखूण प्रतिक्रिया 18

शुचि Wed, 08/03/2011 - 05:07
फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची. ह्या ओळी कोणाच्या तरी सहीमध्ये आधी वाचल्या होत्या. फिदा झाले होते (आहे) त्या ओळींवर.

मनिष Wed, 08/03/2011 - 10:06
खूप दिवसांपासून (पुपे च्या सहीत वाचल्यापासून) ही कविता कुठे मिळेल का बघत होतो. पुर्ण कविता वाचल्यावर खूपच आवडली.
त्या तिच्या वाटेवरी ती झिंगती झाडे जुनी हात देताना तिला माझीच फांदी व्हायची
आणि
गवत ही भोळे असे की साप खेळू द्यायचे सोडताना गाव त्यांची कात हिरवी व्हायची फाटके होते खिसे अन् नोटही नव्हती खरी पण उगवत्या चांदण्यावर मालकी वाटायची.
हे अफलातून आहे. तुमच्या अजून कविता वाचायला आवडतील.

गणेशा Wed, 08/03/2011 - 14:17
आपली माझी आवडती कविता येथे वाचायला दिल्यामुळे खुप छान वाटले. गेल्याच वेळेस ही कविअत द्या असे बोलणार होतोच.. पुन्हा पुन्हा वाचावी असी मस्त कविता ...

पल्लवी गुरुवार, 08/04/2011 - 15:12
मस्तं शब्द ! मस्तं कल्पना ! मस्स्स्स्तं नादमय कविता ! :)

नमस्ते, तुम्हाला आठवत नसेल पण नक्की साल आठवत नाही बहुतेक २००२ असावे, पुणे फेस्टीवलमधे मराठी कवी संमेलनात आपण भेटलो होतो. तिथे तुम्ही हि कविता गायली होती. मी हि कविता लिहुन काढली होती आणि त्यावर आपण स्वाक्षरीही दिली होती. माझ्या जवळ ती अजुनही आहे. बर्‍याच दिवसांनी सर्व आठवणी ताज्या झाल्या. कविता मिसळपाववर टाकल्याबद्द्ल खुप खुप आभार. मला तुमची अजुन एक कविता आवडते "तुला पाहिले मी फुले वेचताना...".

गणा मास्तर Sun, 08/07/2011 - 21:27
फार फार वर्षांपुर्वी मी दूरदर्शनवर एका मुलाखतीत ही कविता ऐकलेली. पुर्ण कविता वाचुन आनंद झाला. वर निळी कौले नभाची,डोंगराची भिंत ती ते नदीकाठी भटकणे,हीच शाळा व्हायची ह्या ओळी खरडवहीत जाउन बसल्या आहेत.