रात्रीचे १२ वाजायला आले असतील, बाहेर पावसाची रिपरिप चालू होतीच. आज बाहेर पाऊस असून देखील मला खिन्न खिन्न वाटत होते. खरेतर पावसाळा म्हणजे माझा आवडता ऋतू. आज नेहमीप्रमाणे कॅफे बंद झाल्यावर कावेरी मातेचे यथासांग दर्शन देखील झाले होते, त्यामुळे हा पाऊस आणि अंगावर येणारी मस्त हवा आवडायला काहीच हरकत नव्हती. पण का कोणास ठावुक आज मन लागत नव्हते येवढे खरे. अचानक रात्री १२ च्या सुमारास फोन वाजला. येवढ्या रात्री मला सहसा कोणाचा फोन येणे अशक्यच. त्यात जागा असल्याने दुसर्या रिंगलाच फोन उचलला. पलीकडून काही क्षण फक्त श्वासोच्छ्वासांचे आवाज ऐकू येत होते.