शब्दात अर्ध-होकार
ओठात लाजूनी आला
स्वप्नाच्या हिंदोळ्यावर
जीव घाबरा झाला
मज सांग आई, तू सांग
हा खेळ असे कि नाते
ज्या वाटेवर मी फुलले
ती वाट पोरकी होते
गांव आता बदलेलं
मिळतील नवी मज नाती
काळीज मात्र व्याकुळ
तुटतुटेल तुमच्यासाठी
अडखळेल पाऊल हळवे
मी सोडून जाता, जाता
राहील उभा नि:शब्द
मग वाटेवरती दादा
मज स्मरेल जेव्हा घर हे
श्रमसरत्या शांत दुपारी
मी बघेन देव्हार्यात
पितळेचा कृष्णमुरारी
बांधीली गाठ शेल्याशी
हातात हात मी घेते
पाण्यास अर्पिले दिप
ती नदी कुठे गं नेते ?