खास माझ्या लेकींसाठी लिहिलेली कविता.
वय तुझे फुलण्याचे, वार्यासंगे बोलण्याचे
इवल्याशा पंखांवर आसमंत पेलण्याचे
आपल्याच सुरांमध्ये गात आपलीच गाणी
आपल्याच रचनेच्या सौंदर्याला भाळण्याचे
कधी खुळ्या वसंताचे, कधी दाहक ग्रीष्माचे
आग पिऊन सूर्याची, चंद्रबिंब माळण्याचे
वय तुझे भुलण्याचे, अधांतरी चालण्याचे
मनाच्या धुंदीत नव्या तालावर डोलण्याचे
तुझ्या वयासाठी नाही वाट जुनी रुळलेली,
तुझे वय नव्या वाटा धुंडाळून चालण्याचे
तुझी स्वप्ने जपताना ज्यांचे वय ओसरले,
त्यांनी भाग्य दिले तुला हिरेमोती तोलण्याचे