न्यायदर्शन आणि बिग बॅंग
न्याय दर्शनात अणुवादाचा (दार्शनिक विवेचनाचा) उगम दिसतो. प्रत्येक प्राकृत पदार्थ हा अणूंचा बनलेला असतो, हा सिद्धांत. " अंत्यावयवत्वम् अणुत्वम् " (ज्या पदार्थाचे पुढे आणखी अवयव पाडता येत नाहीत),त्याला अणु म्हणावे अशी अणूची व्याख्या आहे. सृष्टीच्या आरंभी चार प्रकारचे अणु असतात. परमेश्वराच्या इच्छेने त्यांच्यात हालचाल उत्पन्न होते व मग दोन अणूंच्या एकत्रीकरणाने द्व्यणुक, मग त्यणुक व नंतर चतुर्णुक उत्पन्न होतात. अशा रीतीने स्थूल पृथ्वी, स्थूल जल, स्थूल तेज व स्थूल वायू ही द्रव्ये अस्तित्वात येतात.