या संकेतस्थळावर लोक मोठ्या मनाने, उघड्या विचारसरणीने "रौशनी" वाचत आहेत म्हणून हा चर्चाप्रस्ताव टाकतो आहे. तितक्याच उघड्या विचारसरणीने हा काथ्या कुटावा, अशी विनंती.
समाजात वेश्याव्यवसायास सामान्यपणे अनैतिक मानतात, असे आपण ऐकतो, वाचतो. तो अनैतिक का हा विचार फारसा करत नाही. पण तुम्ही म्हणाल की दरोडे, खून, फसवणूक या सर्व गोष्टीही समाजात अनैतिक मानतात, त्यांच्याबद्दलही आपण फारसा "का?" असा विचार करत नाही. मग वेश्याव्यवसायात, आणि या अन्य "अनैतिक आचारांत" काही फरक असावा असे मला का वाटावे?
कारण अन्य अनैतिक कृतींच्या अनुषंगाने जे काही येते त्या सर्वालाच आपण अयोग्य मानतो.