निद्रादेवी साधारणपणे मला प्रसन्न असली तरी क्वचित तिची अशीही एक वेगळीच तऱ्हा दिसते..
त्या दिवशी सगळं नेहमीप्रमाणे घडलं होतंं. रात्री माझं जेवण वेळेवर झालं होतं. मुलाशी,सुनेशी,नातवाशी गप्पा झाल्या होत्या. टीव्हीवरच्या माझ्या आवडत्या मालिका बघून झाल्या होत्या. मी नेहमीप्रमाणे माझ्या गादीवर आडवी झाले होते. एफ एम गोल्ड वरची लता,रफीची जुनी गाणी ऐकून झाली होती.
आता झोपावं असा विचार करुन मी रेडिओ बंद केला. अंगावर पांघरुण घेत एसी सुरु केला. आता झोप येणं स्वाभाविकपणे अपेक्षितच होतं.
अर्धा तास झाला, झोप नाही. मग एक तास झाला, पण झोप काही येईना. का बरं झोप येत नाहीये?