part 1
part 2
part 3
part 4
part 5
part ६
तीन
इन्स्पेक्टर देशमुख पन्नाशीच्या आसपासचा, जाडजूड माणूस होता. बोलताना तो अर्धे डोळे मिटून घेई. एका हातात पावसानं भिजलेली छत्री होती आणि बुटांना चिखल लागला होता. त्याच्या मागे योगेश चव्हाणचे वकील ॲड. प्रधान उभे होते. उंच, चष्मेवाले. मुकुलकडे बघताना त्यांच्या नजरेत जुना हिशेब चुकता करायचा असल्यासारखा भाव होता. ईशिता तोपर्यंत आतल्या लॉ लायब्ररीत जाऊन दार ओढून बसली होती.
‘योगेश चव्हाण म्हणतात की काल रात्री ते एका बाईबरोबर होते,’ देशमुख म्हणाला. ‘ती कोण ते मात्र सांगायला तयार नाहीत. आम्ही तिचा शोध घेतोय. तुमच्याकडे अशी कुणी आली होती का?’
‘माझ्याकडे रोज दहा-बारा माणसं येतात, इन्स्पेक्टर,’ मुकुल शांतपणे म्हणाला. ‘कोण आलं, काय सांगितलं, ते मी कुणालाच सांगत नाही. कायदेशीर नोटीस घेऊन या.’
देशमुखनं दात दाबले. ‘उद्या सकाळी अकराला ठाण्यात या. समन्स आहे.’ त्यानं कागद टेबलावर टाकला आणि तो निघाला. पण दारात थांबून मागे वळला. ‘एक सांगतो, मुकुलसाहेब. मी तुमचा आदर करतो, म्हणून सांगतोय. या भानगडीत पडू नका.’
‘मी पडलोय असं तुम्हाला कुणी सांगितलं?’
देशमुखनं उत्तर दिलं नाही. तो जिना उतरून निघून गेला.
दुपारी मुकुलनं आपला जुना मित्र सावंतला फोन लावला. सावंत एका दैनिकात गुन्हेगारीच्या बातम्या बघायचा. हवालदारापासून डी.सी.पी.पर्यंत सगळ्यांशी त्याची ओळख होती.
‘सावंत, काल दरबार-ए-हिंदमध्ये जो दरोडा पडला, त्याबद्दल मला एक गोष्ट हवीय. पोलीस कंट्रोल रूमला पहिला फोन किती वाजता आला, आणि कुठून?’
‘तू या केसमध्ये आहेस का?’ सावंतनं विचारलं.
‘तू नेहमी मलाच प्रश्न विचारतोस. सांगशील का?’
अर्ध्या तासानं सावंतचा फोन आला. त्याचा आवाज खाली गेला होता. ‘रात्री आठ बावन्न. हॉटेलच्या स्वतःच्या लँडलाइनवरून. दरोडेखोर आत यायच्या अठरा मिनिटं आधी, मुकुल.’
मुकुलनं रिसिव्हर खाली ठेवला. तो बराच वेळ खिडकीतून पावसाकडे बघत बसला. म्हणजे दरोडा पडणार आहे, हे हॉटेलमधल्या कुणाला तरी आधीपासून माहीत होतं.
संध्याकाळी ऑफिस रिकामं झालं. आर्या घरी निघाली, जाता जाता दोनदा मागे वळून बघत. बाहेर पाऊस आता जोरात कोसळत होता, काचेवर आपटत होता. ईशिताला आत्ता घरी पाठवणं धोक्याचं होतं. पर्स तिच्या हातात कुणी ठेवली, हे कळेपर्यंत ती सुरक्षित नव्हती. मुकुलचा फ्लॅट ऑफिसच्या वरच्याच मजल्यावर होता. त्यानं तिला तिथे चलायला सांगितलं. ती काही बोलली नाही, मागोमाग आली.
जिना चढताना तिची साडी भिजली होती. मुकुलनं दार उघडलं, दिवा लावला आणि मागे वळून पाहिलं. ती उंबरठ्यावर उभी होती. केस ओले, गालाला चिकटलेले. काजळ थोडं पसरलेलं. थंडीमुळे दोन्ही हातांनी तिनं स्वतःला घट्ट धरून ठेवलं होतं.
सकाळपासून तो तिच्याकडे वकिलाच्या नजरेनंच बघत होता. हा माणूस खरं बोलतोय का, ही बाई काय लपवतेय. आत्ता पहिल्यांदा त्याला ती एक तरुण बाई म्हणून दिसली. भिजलेली, कुडकुडणारी, आणि खूप एकटी. त्याला स्वतःचाच राग आला.
‘आत या,’ तो म्हणाला. त्याचा आवाज नेहमीपेक्षा कोरडा आला.
ती आत आली. ‘मी तुम्हाला त्रास देतेय.’
तो आतल्या खोलीतून एक जाड शाल घेऊन आला आणि तिच्या खांद्यावर पांघरली. त्याची बोटं तिच्या ओल्या खांद्याला लागली. दोघं क्षणभर तसेच थांबले. कुणीच हात मागे घेतला नाही.
‘तुम्ही मला का वाचवताय?’ ती हळू आवाजात म्हणाली. ‘तुम्ही मला ओळखतही नाही. मी तर तुमच्याकडे खोटं नाव सांगून आले.’
‘खरी अडचण असली की माणसाला कधीकधी खोटं नाव घ्यावं लागतं,’ मुकुल म्हणाला. ‘तुम्ही निर्दोष आहात की नाही, ते मला अजून माहीत नाही. पण तुम्ही घाबरलेल्या आहात, हे मात्र खरं आहे.’
ती त्याच्याकडे बघत राहिली. मग तिच्या ओठांवर एक थकलेलं हसू आलं. ‘गेल्या दोन वर्षांत माझ्या घरी कुणी मला असं म्हटलं नाही, की मी घाबरलेली आहे. सगळ्यांना वाटतं, मला घाबरायचं काही कारणच नाही.’
तिचा आवाज थोडा बसला. तिनं पटकन तोंड फिरवलं, पण मुकुलला तिच्या डोळ्यांतलं पाणी दिसलं. तो जवळ गेला. काहीही न बोलता त्यानं तिच्या गालाला चिकटलेली ओली बट मागे सारली. तिनं डोळे मिटून घेतले.
‘हे बरोबर नाही,’ तो म्हणाला. ‘तुम्ही माझ्या अशील आहात.’
‘अजून नाही,’ ती डोळे न उघडता म्हणाली. ‘तुम्ही माझी केस घेतलेली नाही.’
त्यानं नकळत तिला जवळ ओढलं. ती थरथरत होती, आणि त्याच्या मिठीत हळूहळू शांत झाली. साडी ओली आणि गार होती, पण तिचा श्वास त्याच्या मानेला उबदार लागत होता. बाहेर पाऊस पडतच होता. आत पिवळ्या दिव्याच्या उजेडात भिंतीवर दोघांच्या सावल्या एक झाल्या होत्या.
मग त्यानं दिवा मालवला.
मिसळपाव
प्रतिक्रिया
शेठजी, क्रमशः असे टाकत चला.
शेठजी, क्रमशः असे टाकत चला.