Skip to main content

शब्द झाले मोती : ३

लेखक गणेशा यांनी सोमवार, 21/09/2026 00:41 या दिवशी प्रकाशित केले.

शब्द झाले मोती : ३

जवळजवळ १०-११ वर्षे झाली, “शब्द झाले मोती” लिहायला घेतलेलं ते...

आता मागे वळून पाहताना वाटतं,
माणूस ३० मधून चाळिशीकडे येताना किती स्थित्यंतरांतून जातो...

या भागात मात्र मला चाळिशीतल्या माझ्या मनाला उमटणारे भाव शब्दांत उतरवायचे आहेत. जसं वाटेल, तसं लिहिणार आहे...

आधी वाटलं होतं, FIRE, Finance, Health, चाळीशी, अशा माझ्या आत्ताच्या विचारांवर लिहावं.
पण इतक्या वर्षांनी पुन्हा लिहायला घेतलं आणि आठवणींचे दरवाजे आपोआप उघडू लागले...

मग म्हटलं, 
“शब्द झाले मोती” म्हणजे मनात येईल ते.

त्याला कसला बांध नाही...कसल्या मर्यादा नाहीत... ते म्हणजे माझं मुक्त... स्वैर... स्वच्छंदी जीवन.

म्हणून विषयाला वर दिले तसे बांधणार नाही..जे वाट्टेल ते लिहिणार.. बरेच से माझे खरे जीवन.. खरी कहानी..

खरे तर 12-15 तास कामात busy असल्याने कसलाच वेळ मिळत नाही.. पण आता ठरवले आहे बस रोज 15 मिनिटे तरी लिहिणार मी माझ्याच साठी फक्त.

या धाग्यात मुद्दाम मागच्या भागांच्या लिंक देत नाहीये.
कारण हा कदाचित या वरील माझा शेवटचा थ्रेड असू शकतो.

म्हणून मागचं जे काही चांगलं आहे, तेही या धाग्यात पुन्हा रिपीट करेन...

कारण काही आठवणी पुन्हा जगाव्याशा वाटतात,
आणि काही शब्द...पुन्हा एकदा मोती व्हावेत असं वाटतं.

आणि शेवटी एक विनंती...

कृपया रिप्लायमध्ये
“छान... सुंदर...” असले रिप्लाय नकोच, मला प्रतिसाद संख्या वाढवायची नाही.

तुम्ही लिहा हा आग्रह अजिबात नाही...कारण यावेळेस हि माझी डायरी आहे.. आणि हे लिखान माझ्याचसाठी असणार 

कारण यावेळेस
मलाच माझं लिहायचं आहे...
जे वाटेल तसं.

- शब्दमेघ.. मुक्त... स्वैर... स्वच्छंदी जीवन (गणेशा)

 

 


वाचने 17
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

प्रिय वसुंधरे,

तू म्हणशील,
“हे ‘प्रिय’ काय रे बेफिकीर, टुकार ढगा?
एकतर तुझा स्वभावच मुळात कुठेही भरकटणारा… तुला पाहिजे तसा… स्वैर!”

पण असूदे… मी असाच.

आज मला तुझी आठवण आली.
का नाही येणार?

आषाढ सुरू होऊन दोन-तीन दिवस होऊन गेलेत…
आषाढ माझा आवडता महिना.
तू नाही का म्हणत असतेस मला—
“काळा काळा कापूस पिंजला रे…”

मी असाच अवखळ… भारदस्त…
आणि तू - हळवी.

मी कोसळलो की तू माझ्याकडे स्तब्ध होऊन पाहत राहतेस… मनापासून.
आणि मग तुझा तो अबोल मृद्गंध सगळीकडे पसरतो
हवा हवासा… मनात भिनणारा.

तूही नटतेस, हिरवा शालू परिधान करून…
आणि पुन्हा असा वेंधळा मी दिसलो,
की माझ्यावरती तू डोळे वटारून पाहतेस.

मग मीच ओशाळतो…

माझा काळा रंग तुझ्या हिरव्या शालूला शोभत नाही, असं समजून मी पांढऱ्या शुभ्र रंगाची दुलई घेऊन येतो तुझ्याकडे.

तेव्हा मात्र माझी एकच इच्छा असते, 
मी सोडून तुला कोणीच पाहू नये…
तू फक्त माझीच असावी.

आपलं हे असंच असतं…

मग एखादा उनाड वारा मध्येच घोंगावतो,
विजेच्या तारा तुटतात…
तू चिंब ओली…
आणि मी धूसर, अस्पष्टसा…

मी मग दूर जाताना,
तुझ्या पानाफुलांत माझे श्वास अडकतात - अध्ये-मध्ये.

मला भास होतो…
तू आवाज देते आहेस असा.
मागे वळून पाहतो…
तर दिसते फक्त क्षितिजरेघ.
तुझ्या-माझ्यामधली…

कदाचित तुझ्याही हातात
ही क्षितिजरेघच सापडते…
माझ्या ऐवजी.

तुझाच मेघ…

-शब्दमेघ.. एक मुक्त स्वैर स्वछंदी जीवन.. (गणेशा)


प्रिय वसुंधरे,

आज वाटतंय… तुझ्यापाशी यावं… मनमोकळं.

तुझा हात घट्ट पकडावा,
तुझ्या मिठीत शिरावं…
शेवटच्या श्वासापर्यंत.
अस्तित्वच संपवून घ्यावं… तुझ्या मिठीत.

तुला जाणवतील माझ्या हृदयाची अनियमित स्पंदने…
मध्येच तुला तिथे चिमण्यांची किलबिल ऐकू येईल,
काही रंगीत रंगांच्या छटा मध्येच दिसतीलही…

मी मात्र डोळे बंद करून घेतलेले असतील.

बंद डोळ्यांत पाणी लगेचच साठत जातं…
आणि त्या डबडबलेल्या डोळ्यांत
किती आठवणी तरंगत असतात…
काय सांगू?

शाप आहे माझ्या डोळ्यांना…
ते उघडले की पाणी उडून जातं.

म्हणूनच कदाचित
तू हवेचं कुंपण घातलं आहेस माझ्याभोवती…माझ्याचसाठी.

पण आवडीच्या गोष्टींना
अशी कुंपणं का घालावी लागतात गं?

माहीत नाही…

पण तुझ्या वाऱ्याचे हात
तू माझ्याभोवती गुंफून ठेवलेले असतात…
मी मात्र तरीही पाझरतो…
आणि निघून जातो.

मागे उरतात फक्त
तुझ्या हिरव्याकंच गवताच्या भाळी माझ्या पाऊलखुणा…
कधी कधी…
दवबिंदू ल्यालेल्या.

तुझाच मेघ…

-शब्दमेघ.. एक मुक्त.. स्वैर.. स्वच्छंदी जीवन (गणेशा)