सर्व मिपकराना गणैशोत्स्वाच्या हार्दिक शुभेछा
https-://www.misalpav.com/tourism/53715 -१
https://www.misalpav.com/tourism/53727 -२
https://www.misalpav.com/tourism/53743 -३
https://www.misalpav.com/tourism/53761-४
https://www.misalpav.com/tourism/53780 -५
https://www.misalpav.com/tourism/53790-६
महर्षी वसिष्ठ मंदिर बघीतले व रोहतांग पास कडे जाण्यासाठी निघालो. पुढे ......
रोहतांग खिंड (खिंडीला...ला,दर्रा असे पर्यायी शब्द) धाडशी तरूण, हौशी बायका,वृद्ध मंडळीं वेगवेगळ्या कारणांनी आकर्षित करते. हि. प्र. मधले प्रसिद्ध पर्यटन स्थळ.
मिपावरचे भटकंतीचे धागे खंगाळताना असे दिसले की बरेच मिपाकर इकडे भटकून आले आहेत आणी त्यांनी त्यांचे अनुभव मिपावर डकवले आहेत. हे धागे भटक्यांना मार्गदर्शक ठरतील.
मिपाकर राजकुमार१२३४५६ यांनी मित्रांसवे सायकलवर रोहतांग खिंड सर केली. त्यांचे सर्व लेखन थरारक आणी अप्रतिम प्रचिनी भरलेले आहे. वाचले नसेल तर जरूर वाचा. जिगरबाज मिपाकरांना कडक सॅल्युट. मिपाकर गणेशा, पाटिलभाऊ ,आजी यांचे लेख सुद्धा रसभरित वर्णन आणी सुंदर प्रचिनीं भरलेले आहेत.
मी प्लेझर ट्रिपवर गेलो असल्याने सर्व काही चान चान.अडिअडचणीला प्रवासी कंपनीचा "जिनी", हजर होता.गाडी कुठे बंद पडली नाही,हाॅटेल बुकिंगचे टेन्शन नव्हते.कुठे रहायचे, कुठे जायचे हे सर्व पूर्वनिर्धारित आणी "जिनी",च्या हातात होते, अगदी प्रारब्धा सारखे. आपोआप घडणार होते. कुणाशी हुज्जत घालावी लागली नाही.खरेदी नाही, रिक्षा, टॅक्सी चालकांनी लुटले नाही,कुठे अर्थिक फसवणूक झाली नाही.त्यामुळे हिरिरीने सांगावे असे थरारक, रोमांचक काहीच नाही.म्हणजे,"ती आली,मी पाहीले आणी ती निघून गेली",पुढे काहीच नाही झालं. तरीही औपचारिकता पुर्ण केलीच पाहिजे......
प्रवासी कंपनीने गरम कपडे,छत्री बरोबर घ्या, अशा सुचना आगोदर देऊनही आम्हीं थंड हवेच्या ठिकाणी जाताना गरम कपडे घेतले नाहीत (मुर्खपणा की थरार?).वेगवेगळे कपडे सकाळ,दुपार,संध्याकाळ,रात्रीचे,काही चांगले विशेष प्रसंगासाठी,ट्रॅडीशनल,पार्टीवेअर,अंडर गारमेंट,एक ना दोन.महिलावर्ग कपड्याच्या बाबतीत खुप समृद्ध आहेत.नावे आणी प्रकार लिहायचे म्हणले तर "सातशे",हुन अधीक ओवी माफ करा ओळी भरतील. अनेक प्रकारच्या कापडांनी आगोदरच गर्दी केली होती.त्यात माझे दोन लेंगे व दोन पॅट शर्टांना कशीबशी जागा मिळाली. सुटकेशीने तेवीस किलो झाले आता बास म्हणून तीने सुस्कारा सोडला. "गरम कपड्यांचे नंतर बघता येईल.मे महिन्यात कुठे एव्हढी थंडी असते?", इती घरमालक.ब्ला,ब्ला ब्ला,ब्ला,ब्ला... ...........आपण आपलं फक्त "ममं", म्हणायच.
शिमल्याला गेल्यावर थंडीने हिसका दाखवला. पुढे मनालीला गेल्यावर मुसक्या आवळल्या.
पंढरीनाथा झडकरी आता, रखमाई विनवीते विठ्ठला'
अशी काहीशी अवस्था झाली.काहीतरी करा, तुम्हीच निर्वाणीचा पांडुरंग म्हणून रखमाई विनवू लागली.
मरता क्या न करता,दिवसभराच्या प्रवासानंतर मनालीच्या माॅलरोडवर रात्री साडेनऊ, दहा वाजता उपाशीपोटी खरेदीसाठी झालेली पायपीट एव्हढाच काय तो थरार. तो थरारही क्षणभंगुरच ठरला.पुन्हा एकदा मुर्खपणा केला का काय असे वाटले. (अर्थिक नुकसान झाले ते वेगळेच.आता केरळला जाताना सुद्धा एखादा स्वेटर बरोबर असू द्यावा की काय हा विचार डोक्यात आला...) रोहतांग शिखरावर मस्त गुलाबी उन,विस डिग्री तापमानात सर्व गरम कपडे काढून फेकावे लागले. अचानक मौसम ने "अंगडाई"न घेतल्याने छत्रीची गरजच पडली नाही.
"आजा शाम होने आई,
मौसम ने ली अंगड़ाई
तो किस बात की है लड़ाई",
असे काहीच नव्हते.उलट....
लख्ख प्रकाश,निरभ्र आकाश पण हवा भरपूर असल्याने......
छतरी ना खोल ,उड जायेगी,
हवा तेज है.....
अगदी,असून अडचण नसून खोळांबा ही म्हण पुरेपूर प्रत्ययास आली.
जिन्स आणी टी शर्टमधे पुण्याच्या एम जी रोडवर फिरण्यासारखाच अनुभव आला. फक्त फरक एवढाच की एम जी रोडवर बर्फाचे थर कधीच दिसले/दिसणार नाहीत. आसो.
नागमोडी घाट,कोवळ्या उन्हात नहालेली हिमशिखरे,पाण्याचे धबधबे,खोल दर्रे आणी खाली दिसणार्या वाहनांच्या मोठ्या रांगा. मधून मधून येणारे पावसाचे शिपकारे आणी काही बंद पडलेली वाहाने.या सर्वांबरोबर मधेच खिंडीतून अचानक पुढे येणारे बकऱ्याचे झुंड,त्यांच्या मागे पुढे काठी टेकत बकऱ्यां सारखे रमतगमत चालणारे बकरवाल. स्थानिक महिला डोक्यावर ओझी घेऊन आडवाटांनी लीलया शिखरावर चढत होत्या. या सर्वांना आमचे काहीच अप्रूप वाटत नव्हते. मात्र काही हौशी प्रवासी आठवणीने सगळ्यांचे फोटो काढत होते व कायप्पावर, इन्स्टावर त्वरित ढकलत होते. आम्हीं शिखरावर पोहोचलो. मनाली रोहतांग अंतर फक्त पन्नास कि.मी.आहे.प्रवासी वाहनां ची गर्दी आणी दुर्गम घाटरस्ता यामुळे साडेतीन तास वेळ लागला.वारे वहात होते पण स्वच्छ सुर्य प्रकाश,आणी अप्रत्याशीत उन यामुळे गुलाबी थंडी,नशिबाने सर्व काही बैजवार होतं.
गाडीतून उतरताना प्रवाशांचे चेहरे बघण्या सारखे होते.पुण्या मुंबई कडचे प्रवासी,फक्त फ्रिज मधले बर्फाचे डोंगर किवां संध्याकाळी बसल्यानंतर ग्लास मधले खडे, एव्हढाच काय तो बर्फाशी संबध.डोळ्यासमोर खरेखुरे बर्फाचे डोंगर बघून "अजी म्या ब्रह्म पाहिले",असे झाले महिला वर्गाच्या तोंडून "अय्या किती भारी,ओ माय माय, कांन्ट बिलिव्ह दिस,सिम्पल्ली ग्रेट" अशा सुमधूर किंकाळ्या कानावर पडल्या. मी स्थितप्रज्ञा सारखा शांत,धीर गंभीर मुद्रेने खाली उतरलो. सौंच्या प्रवासी मैत्रिणीने विचारले, "काकांना काही होतयं का?". नाही,ते पुर्वी असल्या ठिकाणी राहिले आहेत, तसेही ते..................!!!!!!! इती सौ.".
प्रवासी,खुराड्यातून बाहेर पडलेल्या कोंबड्यां प्रमाणे पांगले.आमचा "जिनी", थोड्या सूचना देऊन "फिर मिलेंगे आका", म्हणत गायबला. छायाचित्रकार, स्नो स्कुटर,याक प्राण्यांचे मालक दगड मारून उठवलेल्या मधमाशां सारखे प्रवाशांना चिकटले.रस्त्याच्या कडेला मॅगी,अंडाभुर्जी पाव,चहा काॅफीच्या हातगाड्या आणी प्रवासी गाड्या एकमेकीला सांभाळून दाटीवाटीने कशाबशा उभ्या होत्या,एका बाजुला सतत वहाणारा रस्ता आणी दुसर्या बाजूला डोंगराचा खोल उतार.वहानतळ असा नव्हताच.रस्यावर वर गाड्या जाण्याच्या दिशेने उभ्या होत्या.इथे एकल वहातूक व्यवस्था आहे. (रोहतांगला डोंगर म्हणणे दरिद्रीपणाचे लक्षण म्हणावे लागेल).
एवढ्यात एक जोरदार शिट्टी वाजली आणी बुलंद आवाज आला."ऐं यहां गाडी मत खडी करो,आगे जाव,आगे ".मागे वळून बघीतले तर भारतीय सैन्याचा जवान वहातूक नियंत्रित/निरिक्षण करत होता.युनिफॉर्म मुळे तो कोण, हुद्दा काय, नोकरी किती झाली, असेल कुठली रेजिमेंट अशी सर्व कुंडली उलगडली." ओ, पाटील साहेब,नमस्कार",नावाने हाक मारल्या मुळे तो चमकलाच.नावाने कोण हाक मारतोय म्हणून इकडे तीकडे बघू लागला.मी इशाऱ्याने बोलावले.मी माझी ओळख दिली.सवयीनुसार एकदम"जयहिंद साब",म्हणत अभिवादन केले कोण,कुठले वगैरे चौकशी झाली. इतक्या लांब कोणी आपली भाषा बोलणारे , समजणारे ते ही आपल्यासारखेच माणूस भेटल्याने आम्हां दोघांनाही आनंद झाला. ड्युटीवर होता,"मी निघतो साहेब नाहीतर ट्रॅफिक जाम होईल.",मी पण त्याचा निरोप घेतला.परदेशात गावाकडचं माणूस भेटणं एक पर्वणीच असते.
"वर्दीचे", नाते वेगळेच असते.....
वयोवृद्ध, मॅगी स्टाॅलवर खुर्च्या पकडून बसले. महिला,बाळ आणी त्यांचे गोपाळ फोटो, याक, स्नो स्कूटरवर सवारी,एकमेकांच्या अंगावर बर्फ फेकून मारणे यात मग्न झाले.(आता बर्फ फेकून मारणे आणी समोरच्याने चुकवणे यात काय मजा येत असेल याचे मला नेहमीच कोडे पडते. कधी कधी तो बर्फाचा गोळा शेजारीच अशीच मजा घेणाऱ्याला लागला की साॅरी, साॅरी म्हणत मनात मात्र ,"अरे मूर्खा कशाला मधे कडमडलास ",असेच विचार असतात. जाऊ द्या, या जन्मी हे कोडे कोडेच रहाणार. लहानपणी काप चेंडूने आपाधापीचा खेळ खेळायचो त्याचीच आठवण झाली.
प्रवाशांना वेडीवाकडी तोंडे, अंगविक्षेप,कधी गळ्यात गळे घालयला सांगून छायाचित्रकार आपला बॅक बॅलन्स वाढवायचा प्रयत्न करत होते.(मनात म्हणत असतील चांगला बकरा मिळाला.असले फोटो एकदा काढल्या नंतर पुन्हा पहातात किंवा नाही, हे ही एक कोडेच आहे.)मी आपला शांत नजरेने चौफेर नजर टाकून मिपावर लेख कसा लिहायचा म्हणजे जास्त लाईक्स कसे येतील याचा विचार करत बसलो होतो.मी मॅगी हा प्रकार कधी खात नाही. का? ते विचारू नका, तुम्ही खात असाल तर सोडून द्याल. कंपनीचे नुकसान होईल.उगाच कुणाच्या पोटावर पाय दिलेले मला आवडत नाही.
एक गलेलठ्ठ सहप्रवासीणी म्हणाली"काका तुम्ही मॅगी खात नाही तर तुमच्या ऐवजी मी खावू? मी चहा पीत नाही. तुम्ही माझा चहा घेऊ शकता",मला ही "बार्टर",ऑफर आवडली. माझ्या बापाचे काय जात होते!प्रवासी कंपनी पैशे देणार होती.मला त्या मस्त गुलाबी थंडीत एक चहा,एक काॅफी मिळणार होती.
एक बया तीथेच गाडीवाल्याशी हुज्जत घालत होती."हम शाकाहारी है, हमे सिर्फ पाव शेक के दे दो.अंडा नही चाहीये".गाडीवाला तयार होत नव्हता.मला एक प्रश्न पडला, गाडीवाला अंडा भुर्जी,आम्लेट आणी पाव एकाच तव्यावर शेकत असताना या शाकाहारी बाईला अंडा चालत नाही आणी पाव चालतो. गौडबंगालच. असो,जास्त खोलात नाही गेलो. सौ.नी हाक मारली,"चला एक फोटो तरी काढू, आठवण म्हणून".छायाचित्रकार कमरेत वाकून मला बोलवत होता. या वयात कोणी इतके सौजन्य दाखवते म्हणल्यावर जीवाला बरे वाटते.असो,खुप मजा आली.वरिष्ठ म्हणून आगाऊ पणाने न मागितलेला सल्ला दिला नाही तर लेखाची सांगता करणे हा वरिष्ठ म्हणून मीच माझ्यावर केलेला अन्याय ठरेल.
काही अनुभव आणी अनाहूत सल्ला....
शिखरावर गेल्यावर एका वरिष्ठाला श्वसनाचा त्रास होऊ लागला.उपाययोजने नंतर थोड्याच वेळात परिस्थिती सामान्य झाली.सुदैवाने काही अघटित घडले नाही.माझी सात आठ महिन्यापूर्वीच एंन्जोप्लास्टी झाली होती.माझ्या कुटुंबाचे टेन्शन वाढायला सुरुवात झाले.मी त्यांना अश्वस्त केले. माझी दररोजची रपेट कामाला आली. मला काहीच त्रास झाला नाही.सवय जरी नसली तरी मला अशा वातावरणाचा पूर्वानुभव होता त्यामुळे बर्फाचे अप्रूप नव्हते.उगाच मस्ती करत बसलो नाही.निसर्गाबरोबर "पंगा नही लेने का",मनात पक्के बिंबलेले.पळापळी करणे,रुळलेली पाय वाट सोडून इकडे तिकडे जाणे असे काही केले नाही.
निश्चितच,अशा ठिकाणी वरिष्ठ नागरीकांनी वैद्यकीय सल्ला घेऊन जावे.
वाटाड्याच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून एक अतीउत्साही प्रवासी पायवाट सोडून बाजूला गेली.बर्फाखाली असलेल्या खड्ड्यात पडली. बाहेर काढेपर्यंत थंडगार पाण्यात कमरेपर्यंत भिजली .भितीने अर्धमेली झाली. "विपाशा",नदीचे उगम स्थान अवघे पन्नास फुटावर, हिमनदीचा प्रवाह बर्फाखालून जात असावा. सतत वहाणारा पाण्याचा प्रवाह (Undercurrent), उन्हामुळे बर्फाचा थर कमकुवत झाल्याने ही दुर्घटना घडली असावी.
आशा ठिकाणी उगाच आघाव पणा करू नये. जीवावर बेतण्याची शक्यता असते.मार्गदर्शक अनुभवी असतात.त्यांच्या सल्ल्यानुसार वागणे हिताचे ठरते.
या भागातील दुसरा त्रास,"मांऊटन सिकनेस ", डोके दुखणे,चक्कर येणे,उलट्या, डिहायड्रेशन इत्यादी.
आशा ठिकाणी भटकंतीपूर्वी वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा.जरूरी औषधे बरोबर ठेवावीत. दोन तीन प्लास्टिक बॅग्ज, पाण्याची बाटली जवळ ठेवावी.प्रवासापुर्वी शक्यतो हल्का नाष्टा घ्यावा.
तिसरा त्रास,"स्नो ब्लाईंडनेस",बर्फाच्छादित जमिनीवरून परावर्तित सुर्य किरणे डोळ्यात गेल्यास अंधत्व येण्याची शक्यता असते. या भागात येताना स्नो ग्लासेस अवश्य आणावेत.
चौथा त्रास,"सन बर्न".रोहतांग शिखर समुद्र सपाटीपासून खुप उंचीवर, सुर्य किरणे तीव्र असल्याने उघडी त्वचा जळू शकते.शक्यतो पुर्ण बाह्याचे शर्ट,कुडते घालावेत. बर्फात हात पाय थंड होऊ नये म्हणून लोकरीचे हातमोजे पायमोजे घालावेत.
ठरलेल्या कार्यक्रमानुसार सोलाॅग व्हॅली कडे निघालो.दुपारचे जेवण केल्यानंतर रोप वे मधून हिमशिखरांचे अद्भुत दर्शन घेतले. झिप लाईन ने बियास नदी (स्थानीक भाषेत सोलांग नाल्ला) पार केली.काही पर्यटकांनी पॅराग्लाईड चा आनंद घेतला.पुढे "अटल टनल"ला,भेट दिली. दिवस छान गेला .सायंकाळी हाॅटेलवर परत आलो.
आपल्या पाऊलखुणा सोडायचा लोकान्चा का ह्ट्ट असतो हे च कळत नाही. वीरू लव सोहेल खान. प्रचि मधे बघा एका दगडाने दूसर्या दगडावर लिहीले आहे.
पॅगोडा आणि व्यास नदीचे उगमस्थान रोहतांग शिखर
|
दुसर्या दिवशीचा कार्यक्रम हिडींबामाता मंदिर, माॅल रोड खरेदी. असा होता.
मिपावर मनालीतील हिडींबा मंदिराबद्दल लेख सापडले नाहीत.म्हणून हा प्रपंच.
हिडींबा कुल्लू राज घराण्याची 'दादी',कुलदेवी. मनाली व आसपासच्या भागातल्या कुळांचे कुलदैवत. कुल्लू खोर्यातल्या प्रसिद्ध दसरा महोत्सवात मातेची पालखी अग्रस्थानी असते पालखी जर काही कारणास्तव उशीरा आली तर इतर देवी देवतांच्या पालख्या खोळंबून रहातात. एकदा तर म्हणे पालखी काही महीने उशीरा आली. पालखी आल्यानंतर उत्सवाची सांगता झाली.
हिडींबा राक्षसकुळात जन्मलेली तरीही तीने केलेल्या तपस्येमुळे ती पूजनीय झाली.
राक्षसोऽपि हि धर्मात्मा यस्य देवो हृदि स्थितः।
न कुलेन न जात्या च, कर्मणैव हि पूज्यते॥
-आदिपर्व,महाभारत
अर्थ: राक्षस कुळात जन्म झाल्यानंतरही जर कुणाच्या हृदयात दया,धर्म सहिष्णुतेचा वास आहे तो नक्कीच पूजनीय आहे. केवळ श्रेष्ठ कर्म ही वंदनीय बनवतात न की धर्म,कुळ,जात वर्ण इत्यादी.
लाक्षागृहातून पांडव सुखरूप निसटले आणि हिमालयाच्या घनदाट जंगलात, काम्यक वनात पोहोचले.तत्कालिन प्रचलित नाव काम्यक वन जे आजचे मनाली शहर आहे. काम्यकवनात हिडिंबासुराचा वध,हिडिबा आणी भीमाचा विवाह,घटोत्कचाचा जन्म, बार्बरीक आणी महाभारता मधील गोष्टी वाचकांनी वाचल्या आहेत.प्रचेतस सारखे मिपाकर तर स्पेशालिस्ट आहेत. त्यामुळेच या गोष्टी पुन्हा इथे टंकाळणे नक्कीच कंटाळावाणे मला आणी वाचकांनाही होणार यात शंका नाही. महाभारतातील संदर्भ न देता किंवां मर्यादित ठेवून, स्थानीक उत्सव, मान्यता यावर भर देत लेखन करत आहे.
काम्यक वनात हिडींबासूरचे राज्य होते.याला माणसांचा वास आल्याने त्याने आपली बहिण हिडिंबाला त्यांच्या शोधार्थ पाठवले.वनात एके ठिकाणी कुंती आणी पांडव विश्राम करत होते,भीम पहारा देत होता. बलदंड भिमावर हिडिंबा अनुरक्त झाली.आदिपर्वातील हिडींबासूर वध उपपर्वात हिडींबा,कुंती,धर्म भीम यांचा संवाद आहे.
हिडिम्बोवाच
अहं ते दर्शनादेव मन्मथस्य वशं गता ।
क्रूरं भ्रातृवचो हित्वा सा त्वामेवानुरुन्धती ॥
(महाभारत, आदि पर्व, अध्याय 153/154)
पुढे कुंती,युद्धिष्ठिर यांच्या सल्ल्यानुसार हिडीबा व भीमाचे लग्न झाले.भैरप्पांनी "पर्व" कादंबरीत यावर विस्तृत लेखन केले आहे. हिडींबाचे नाव 'सालकंटकटी',होते हे प्रथमच मला समजले.
हिडींबामाता दर्शना साठी मंदिरात आठ्ठाविस मे ला सकाळी आठ वाजता गेलो.मंदिरात गर्दी नसल्याने दर्शन व्यवस्थित,शांतचित्ताने झाले.मंदिराच्या गर्भगृहात कुठल्याच प्रकारची जसे काष्ट,प्रस्तर,धातूची मानवनिर्मित मुर्ती नाही. गर्भगृहाचे दार अतीशय ठेंगणे असून एखाद्या गुहेत गेल्यासारखे वाटते. खाली उतरल्यावर एक मोठ्या खडकावर मातेच्या कोरलेल्या चरणपादूका आहेत.हेच मातेचे मूळ स्वरूप मानले जाते.त्याची पुजा होते.मातेच्या पुजेला "घोर पुजा",म्हणतात.नवसपुर्ती साठी भविक प्राण्यांची शिंगे अर्पण करण्याचा प्रघात आहे. गर्भगृहात महिषासुर मर्दिनीची एक छोटी मूर्ती आहे.गरभगृहात छायाचित्रण करण्याची परवानगी नाही.खडकाच्या खाली गुहा आहे असे म्हणतात.
पुत्र घटोत्कच योग्य वयात आल्यावर राज्य त्याच्यावर सोपवून मातेने श्रीकृष्णाच्या सल्ल्यानुसार इथेच कठिणतम तपस्या केली. दैत्य कुळात जन्मलेल्या हिडींबा मातेला देवत्व प्राप्त झाले.हिमाचल आणी उत्तराखंडमधे अनेक लोकांची माता कुलदेवता आहे. उत्तराखंड मधील चम्पावत इथे सुद्धा मातेचे मंदिर आहे.
हिडीबां मंदिर मनाली जवळ 'ढुंगरी', घनदाट उंच देवदार वृक्षांच्या वनात आहे.वृक्ष अती पुरातन आहेत.वृक्षांच्या वयाचा अंदाज बांधण्याची पद्धत अद्भूत आहे.एकमेकाचे हात पकडून खोडाचा घेर मोजतात. जीतक्या माणसांच्या घेरावात खोड बसेल तितक्या शे वर्ष जुना वृक्ष.
देवदार व्रुक्ष---काम्यक वन-----------------------------------------------------------------------ढुंगरी म्हणजे मोठे मोठे दगड
हिडींबा देवीचे मंदिर हे हिमालयातील प्राचीन, उत्कृष्ट लाकडी,"काठकुणी",स्थापत्य कलेचे अद्वितीय उदाहरण आहे.मंदिराचा पाया दगड आणि मातीने बनवलेला आहे.या शैलीमध्ये भूकंपरोधक रचना करण्यासाठी सिमेंट किंवा लोखंडी खिळे न वापरता,लाकडाचे मोठे ओंडके आणि दगड एकावर एक रचून जोडले आहेत.मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि भिंतींवर अतिशय बारीक सुंदर लाकडी कोरीव काम पाहायला मिळते.यामध्ये दुर्गा माता, नवग्रह, नर्तक, प्राण्यांच्या आकृत्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या जीवनप्रसंगांची चित्रे कोरलेली आहेत. ठिकठिकाणी मृत प्राण्यांचे शिंगासह अस्थीमय चेहरे टांगलेले दिसतात.इसवी सन १५५३ मध्ये कुल्लूचे राजा बहादूर सिंह यांनी या मंदिराचे पुनरूज्जीवन केले. चार मजली, पॅगोडा शैलीतले मंदिर सुमारे २४ मीटर उंच आहे. खालचे तीन मजले हे चौकोनी, त्यावर लाकडी फळ्यांचे छप्पर,तर सर्वात वरचा चौथा मजला हा पितळेचा शंकूच्या आकाराचा आहे.
मातेच्या मंदिरा पासून दोनशे मिटर अंतरावर डाव्या बाजूस पुत्र घटोत्कचाचे वृक्षमंदिर आहे. मातेच्या आज्ञेनुसार पुत्र घटोत्कच मंदिरावर कुठल्याच प्रकारचे अच्छादन घालण्याची सख्त मनाई आहे असे माहितीपटावर नमूद आहे. असे का असावे?अशी चर्चा करताना एक भावीक म्हणाला,घटोत्कच आपला आकार हवा तेव्हढा वाढवू शकत होता. त्याला मर्यादा येवू नये",या साठीच अशी आज्ञा दिली असावी.अर्थातच याला कुठला आधार नाही. माहितीपटवर संपर्कासाठी भ्रमणध्वनी क्रमांक दिले आहेत.इच्छुक याबद्दल विचारू शकतात.हिडिंबा मातेच्या आदेशानुसार पुत्र घटोत्कचा च्या पिंडीला स्पर्श करणे वर्ज्य असून, केवळ दूरूनच दर्शन घ्यावे लागते. शेवटी माताच ती, आपल्या बाळाला इतरांना का हात लावू देईल. नवस पुर्ण करण्यासाठी चांदी, लोखंडाची चिमणी अर्पण करण्याची प्रथा आहे.रंगीत कपडाचे तुकडे सुद्धा बांधलेले दिसले.मात्र, येथे लोखंडी त्रिशूल, सुरी किंवा इतर वस्तू चढवण्यास सक्त मनाई आहे.काही लोकांच्या मते इथे तंत्रसाधना होते.ख.खो.दे.जा.
घटोत्कच मंदिराच्या जवळ प्रपौत्र बार्बरीक (खाटू श्याम) यांचे मंदिर आहे.मंदिराच्या बांधकामात अधुनिक सिमेंट ब्लाॅक्स आणी देवदार लाकडाचा वापर केला आहे. स्थानीक भक्तांनी वर्गणी करून हे मंदिर बांधले आहे.
घटोत्कच मंदिराच्या आवारात मोठा मंडप घातलेला दिसला.स्थानिक लोकांशी चर्चा करताना कळाले की चौदा मे ते सोळा मे दरवर्षी ढुंगरी मेळा भरतो. स्थानिक भाषेत ढुंगरी म्हणजे मोठे मोठे दगड.या परीसरात पुरूषभर उंची पेक्षा अधीक उंचीचे दगड पडलेले आहेत.
"ढुंगरी मेळा"
चौदा मे मातेचा जन्मोत्सव.या निमित्ताने ढुंगरी मेळा साजरा केला जातो.मेळा तीन दिवस असतो. उत्सवात आसपासच्या देवीदेवतांच्या पालख्या येतात. मंडी जिल्ह्य़ातील सिराज खोर्यातून पुत्र घटोत्कच खास रथातून आईला भेटायला येतो.माता पुत्राची भेट खुप भावनिक असते.
सारोहोनी मेळा / बहादूर सिंह री जातर
हि.प्र च्या डोंगराळ भागात स्टेप ॲग्रिकल्चर अनिवार्य आहे.पाणी भरपूर.भाताची शेती होते.कुल्लूचे महाराजा बहादूर सिंह यांच्या यांच्या स्मरणार्थ आणि भाताच्या लावणीचे काम पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करण्या साठी श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी हा मेळा भरतो.
तीसरा मोठा उत्सव म्हणजे कुल्लू खोर्यातील दसरा महोत्सव. जगभर प्रसिद्ध आहेच.कुल्लू मधे मोठा दसरा मेळावा मैदान आहे.शहर ब्यास नदीवरच्या भुतनाथ पुलाने महामार्गाशी जोडले आहे. चालत्या गाडीतून पुलाचा फोटो खुप छान आला आहे.
भुतनाथ पुल,कुल्लू चालत्या गाडीतून घेतलेला फोटो
आज भटकंतीचा शेवटचा दिवस होता. उद्या मनाली चंदिगढ प्रवास व तिसर्या दिवशी चंदिगढ-दिल्ली-पुणे असा परतीचा प्रवास. सहप्रवासी सात दिवसांचा साथ सुटणार म्हणून भावूक होऊ लागले होते.
कुलकर्णी नावाचे मराठी उद्योजक इथेच आम्हांला भेटले.त्यांचे मोठे दुकान माॅल रोडवर आहे.स्थानिक सुखे मेवे, गरम लोकरीचे कपडे, शाल, रुद्राक्ष आणी बरेच काही इथे पर्यटकांनी विकत घेतले.परदेशात यशस्वी मराठीउद्योजक बघून खुप चांगले वाटले.
हिमाचली लोक कलाकरा बरोबर
दररोजची धावपळ,ताणतणावा मधून सात दिवस पुर्णपणे दूर होतो.चांगला बदल झाला. भटकंती मुळे जणू भ्रमणध्वनीची बॅटरी रिचार्ज झाली.
मालिका समाप्त.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
मिसळपाव
प्रतिक्रिया