Skip to main content

जर्मन वर्मन

लेखक अभ्या.. यांनी शनिवार, 11/07/2026 19:24 या दिवशी प्रकाशित केले.

अकरावी बारावी झाली तसा रुढार्थाने ज्याला अभ्यास म्हणतात त्या गोष्टींशी संबंध सुटलाच. पानेच पाने भरवून वह्यांच्या खरेदीला निमित्त करायचे पण थांबले. बारावीपर्यंतच्या पेपरांच्या वेळी "सर पुरवणी" (काही हुच्चभ्रु गाबडे सब्लिमेंट असे म्हणायचे पण त्या शब्दाचा योग्य उच्चार वा अर्थ हुडकायचेही कष्ट आम्ही कधी घेतले नाहीत.) असे पुकारा करत पेपर संपेपर्यंत कागदाच्या ढिगांना दोऱ्यात ओवायचे. आम्हाला फार आदर असल्या स्कॉलरांचा. लांबच ठेवायचो आदरापोटी त्यांना... असो. 

त्यानंतर लिहायची सक्तमजुरी संपली. म्हण्जे अस्मादिकांनी चित्रकला महाविद्यालयात प्रवेश घेतला ना..एखादा थिअरीचा पेपर असायचा पण तोही तीट लावण्यापुरता. बाकी आपला आवडता धंदा चित्रे काढणे. पाच सहा वर्षे सलग असे लिहिण्याचा रेकॉर्ड एखाद्या परिच्छेदाच्या वर नाही. आयुष्यातली घोकंपट्टी नावाचा प्रकारही संपलेला म्हणून रुढार्थाने ज्याला अभ्यास म्हणतात त्या गोष्टीशी संबध तुटला. हे तुटलेपण चालू राहिले महाविद्यालयीन जीवनापर्यंत. नंतर बाहेर पडलो तर काय कॉम्प्युटरे होती, सॉफ्टवेरं होती मग कशाला लागतेत रेघोळी कागद आणि ढिगभर पेनं. कुठतरी सह्या ठोकायला, फॉर्म भरायला तेवढा पेन लागायचा. वर्षे गेली तशी सलग काही कागदावर लिहायची स्वय होती ती विसरल्यात जमा झाली. श्रीलिपी वगैरे गोष्टींनी मराठीचा संपर्क होता पण व्यवसायापुरता. नंतर युनिकोड अन मोबाईल आयुष्यात आले तेव्हाही काहिहि लिहायचे म्हणले की नोटपॅड आपसूक ओपन व्हायचे. मराठी साईटसनी तेवढा विरंगुळा मिळवून दिला पण कागद पेन हे द्वैत सुटले ते सुटलेच. आयुष्यात शेवटी कधीतर मृत्यु्पत्रावर सही ठोकेन तेच आपले शेवटचे "करवियले" होणार ही खात्री होती.

पण नाही.

पेन, वह्यापुस्तके, कागदेफाइली, मास्तर मास्तरणी, वर्ग, अभ्यास अन खर्डेघाशी पुन्हा आयुष्यात येणार होती अन आलीच.

झाले असे की....

जर्मनीत आले की जर्मन शिकणे हाच पर्याय. तोही ऑनलाइन वगैरे बघितले, ड्युओलिंगोसारखे ॲप इन्स्टल करुन बघितले, युट्युबावर कित्येक व्हिडिओ पालथे घातले पण अंहं... नाही म्हणजे नाही. झेपेचना... स्पष्ट भाषेत सगळे वरनंच चाललेले. नुसते उगी फाटर म्हणजे फादर आणि मुटर म्हणजे आई, वासर म्हण्जे वॉटर आणि मिल्श म्हणजे मिल्क इतके सिंपल नाही जर्मन. थोडीफार व्होकॅब्युलरी वाढवून काहीही फरक पडेना मेंदूत. समोरचा जर्मन कायतरी बडबडत असायचा आणि आमची मजल डांकं बिट्टं च्या पुढे नाहीच. साधं फोनवर कॉल न लागल्यावर ती टेलिकोमवाली बाई काय म्हणते ते कळेना. परत सरकार म्हणतंय कायबी करा पण चार वर्षात इंटिग्रेशन तेवढं पूर्ण करा.

मग म्हणलं ओक्के. सरकार वर म्हणलं निम्मी फिसुद्दा परत करु इज्जतीत कोर्स केला तर. मग म्हणले अगदी परप्रांतीय रिक्षावाल्यांचा माज दाखवण्यात अर्थ नाही. त्यांना शिव्या द्याव्यात असे वाटत असले तर इथल्या राज ठाकरेचं ऐकायलाच पायजे.

सुरुवात सरकारमान्य भाषाकेंद्र हुडकण्यापासून झाली.

घरापासून जवळ चालत जाणेबल, संध्याकाळ तिथंच खपली तर बरं, एका दिवसात चार चार तास व्हावेत जेणेकरुन लवकर संपावी सजा असा विचार करुन अल्पमोली, बहुगुणी, अर्धी पेंडी खाऊन बावीस लिटर दूध आणि १५ किलो गोमय देणारी गोमाता हुडकण्यात आली. गोमातेचे नाव इनलिंग्वा. 

मोक्याचे ठिकाण हो एकदम. स्टेशनाच्या अलिकडेच, तळ्यासमोर, पोस्टाच्या वर इतका सिंपल पत्ता. 

पहिल्याच दिवशी रजिस्ट्रेशन वगैरे करताना फार काही येणाऱ्या संकटांची चाहूल लागली नाही, फार काही लिहावेही लागले नाही. चार सह्या ठोकल्या आणि चार महिन्यानी ह्या ह्या दिवशी येवा असा प्रेमळ निरोप घेऊन आम्ही परतलो. थंडीत एकावर एक दोन जॅकेटं चढवून प्रवेश घेतलेला पण प्रत्यक्षात शाळा सुरु झाली तेंव्हा उन्हाळ्याची चाहूल लागलेली होती. साध्या कपड्यावर एक जास्तीचे अस्तर घेऊन पोहोचलो तेंव्हा आठ नंबरच्या खोलीत जावा असा स्पष्ट इंग्लिशमधे (शेवटची इंग्लिश हं, त्यानंतर ती बाई कधी त्या भाषेत बोलली नाही.) मिळाला. सोबत गृहमंत्रालयाने आदिदासची सॅक, दोन पेनं,दोन वह्या, पाण्याची बाटली, एक्स्ट्रा रुमाल आणि इनलिंग्वाने दिलेली दोन जाडजूड पुस्तके असा संरजाम मोठ्या प्रेमाने दिलेला होता, सेफ्टीपिनने एक रुमाल छातीवर टोचणे फक्त बाकी होते.

शाळा सुरेख, सुबक. वर्ग तितकेच सुबक आणी आधुनिक. मोट्ठी स्क्रीन आणि मॅकबुक घेऊन बसलेली रुपेरी केसाची फ्राऊ अन समोर सगळी वेगवेगळ्या वयोगटातली मल्टीनॅशनल जनता बघून आपली शशी गोडबोले झालेली आहे आणि आता आपला 'जर्मन वर्मन' चा पिक्चर सुरु होणार आहे ह्याची खात्री पटली.

......

क्रमश:

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 72
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

जर्मनच काय पण इतर भाषा शिकण्यात हात दिला तो गटे इन्स्टिट्यूटच्या 50languages.com यानेच नावाप्रमाणे पन्नास भाषेचे शंभर धडे. कोणत्याही भाषेतून कोणतीही शिका.  

आणखी एक छान पुस्तक ( हातात मावणारे) जर्मनीत जाणाऱ्या प्रवाशांसाठीही आणले. ग्रामरबिमर नाही थेट कामाची वाक्येच. फोटो नंतर टाकतो.


छान सुरुवात, मीही तीनेक महिने जर्मन शिकलो डुओलिंगो वरून, माईने बृडा ऊंड मेन श्विस्टर, ईश बिन xxx, डू बिस्ट? वगैरे!


ह्याच्यासोबतच पुढे थोडं थोडं जर्मन लोकजीवन अन् संस्कृतीबद्दल पण येऊ दे म्हणजे उगाच आपलं चवीपुरतं मीठ असतं तसं येऊ दे भले पण येऊ दे. एरवी सिग्फ्रीड अन् ब्रूमहिल्डा किंवा ती वाघाच्या पाठीवर रपेट मारणारी पोरगी किंवा गेलाबाजार ऑक्टोबरफेस्ट मधील "ये तो बावा ऐसे हो गया की मु खोला और बीयर की बरसात" असणारे म्युनिक इतकीच काय ती माहिती ! इथल्या समाजात आदेश मानण्याची वृत्ती इतकी जास्त कशी काय भिनली आहे इथे ? जर्मन लोकांना विनोदबुद्धी (सेन्स ऑफ ह्युमर) कमीच असतो एकंदरीत असे म्हणले जाते ते खरे की खोटे ? जर्मनी मधे निर्वासित प्रॉब्लेम किती आहे ? कुठल्या निर्वासित समूहाला सगळ्यात सकारात्मक आणि कुठल्याला नकारात्मक बघितले जाते ? एएफडी मोठी व्हायला त्यांचे अँटी मुस्लिम रेटोरीक कारणीभूत आहे म्हणतात ते खरे आहे का ? अशा कैक अनुत्तरित प्रश्नांना तुमच्या लेखनातून उत्तर मिळेल अशी अपेक्षा करून शुभेच्छा देतो.