Skip to main content

हिमाचल प्रदेश भटकंती - महर्षी वसिष्ठ मंदिर

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 07/07/2026 19:58 या दिवशी प्रकाशित केले.
 

 

 

https://www.misalpav.com/tourism/53715 -१

https://www.misalpav.com/tourism/53727 -२

https://www.misalpav.com/tourism/53743 -३

https://www.misalpav.com/tourism/53761-४

https://www.misalpav.com/tourism/53780 -५

सकाळी तीन वाजताच  निघायचे असल्याने लगेच बिस्तर पकडला.......

आता पुढे...

यात्रा कंपनीने,यात्रेकरूंना मनाली मधे वसिष्ठ मंदिर,हिडिंबा,घटोत्कच,बार्बरीक मंदिर,ब्यास नदीचा उगम,महर्षी वसिष्ठ,वेद व्यास यांची तपोभूमी ही महाभारत कालीन प्रसिद्ध स्थळे पहायला मिळतील असे कळवले होते.जाण्या आगोदर हिमाचल प्रदेशा बद्दल अधिक जाणून घ्यावे या उद्देशाने अंतर जालवर फेर फटका मारला.ऐतिहासिक व पौराणिक अनेक संदर्भ मिळाले,ते सत्ययुगा आगोदर झालेल्या प्रलया पर्यंत आहेत असे वाचले.पृथ्वीवर झालेल्या जल प्रलयात मनूची नौका जिथे थांबली ते मनू +आलय म्हणजे मनूचे घर असे नाव पडले पुढे अपभ्रंश होऊन मनाली झाले अशी अख्याईका वाचण्यात आली.

या प्रदेशाचे नाव 'देवभूमी,व हिमालयाचे नाव'हिमावत,म्हणून ऋगवेदात उल्लेख मिळतो.कुलंत(कुल्लू),त्रिगर्त(कांगडा) औदुंबर सारखी शक्तीशाली गणराज्ये महाभारत काळात होती.त्रिगर्तचा राजा सुशर्मा कुरुक्षेत्रा वरील युद्धात कौरवांच्या बाजूने होता.चक्रव्यूह भेदणाऱ्या  अभिमन्यूला राजा सुशर्माने प्रताडित केल्याचा उल्लेख महाभारतावरील पुस्तकात सापडतो.

वनवासात असताना भिमाने हिडींब राक्षसाचा वध केला ते हिडींब वन,भृगू तलाव,देव टिब्बा,अर्जुनाने घोर तपस्या करून महादेवाला प्रसन्न करून पशुपतास्त्र प्राप्त केले तीअर्जुन गुहा,हडिंबा माता,घटोत्कच,बार्बरीक असे अनेक पौराणीक संदर्भ अढळतात. त्यामुळे मनाली शहराला पाचहजार वर्षाहून अधीक पौराणिक वारसा असल्याचे कळते इतीहासपुर्व काळात,कोइलिय,डोग्री,दास,किन्नर,हालिय आणी किरत जनजाती इथे रहात होत्या.

ऐतिहासिक काळात रजपूत,मुघल व शिख राजांनी राज्य केले.नंतर ब्रिटिशांनी आपले राज्य  प्रस्थापित केले.१९७१ मधे तत्कालिन हिमाचल प्रदेश अस्तित्वात आला.

अवांतर.

पौराणिक व ऐतिहासिक संदर्भात मुलभूत फरक काय आहे असा विचार मनात आला. 


दस्तावेज,पाऊलखुणा,किल्ले,लेण्या,ताम्रपट, पुरातत्व विभागाला सापडलेले अवशेष प्रत्यक्ष इतिहासाचे दाखले म्हणून दाखवता येतात.पौराणिक संदर्भ प्रतीकात्मक आणि नैतिक मूल्यांवर भर देणाऱ्या कथा,महाकाव्यावर आधारित असून जनमानसात खोलवर रूजलेल्या,प्रथा,परंपरां द्वारेच कळतात त्यांचे प्रत्यक्ष पुरावे,दाखले देता येत नाहीत.यांचे पिढी दर पिढी सश्रद्ध मौखीक हस्तांतरण हजारो वर्षानंतर आजही स्मरणात व दैनंदिन जीवनात दिसते.

देशातील विविध भागात रहाण्याचे तेथील संस्कृती,लोक कलेचे अनुभव,साहित्य वाचण्याची संधी मिळाल्याने पौराणिक संदर्भात एकसंधता (Continuity)आहे असे वाटते.अतिरंजित, न पटणार्‍या गोष्टीं समावीष्ट झाल्या.काही गोष्टी कालबाह्य सुद्धा झाल्या परंतू मूळ गोष्टी आजही तशाच आहेत.यामुळे या गोष्टी घडून गेल्या असव्यात यावर विश्वास ठेवावा वाटतो.असो...

रात्रीचे अकरा वाजले होते.सौ,मुलांचे मत होते तीन वाजताच निघायचे आहे.झोप पुर्ण होणार नाही. त्यापेक्षा आपण झोपायलाच नको. मी म्हणालो उद्या दिवसभर झोप मिळणार नाही. रोहतांग सारख्या उंच शिखर चढायचे आहे. आजचा दिवसही हेक्टिक होता,उद्याही तसाच असणार.त्यामुळे मोबाईल सारखे स्वताला जेव्हढे करता येईल तेव्हढे रीचार्ज करून घेवू, तीस टक्के तर तीस टक्के. माझी झोप हुकमी असल्याने दोन मिनिटात झोप लागली आणी बरोबर अडिच वाजता उठलो.झोपताना गिझर लावला होता.पाणी कडकडीत तापले होते. मस्त पैकी आंघोळ केली आणी तयार झालो. नाष्टा पाकीटे,पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या घेतल्या.सहयात्री अंगणात जमा झाले होते. साडेतीन वाजता काफिला वसिष्ठ  मंदिराकडे निघाला.....

वसिष्ठ मंदिर.

वसिष्ठ मंदिर चार कि.मी.अंतरावर असलेल्या वसिष्ठ गावात आहे.महर्षीचीं तपोभूमी हेमकुट (हमटा दर्रा) साठी या गावातूनच रस्ता जातो. साधारण एक किलोमीटर अंतरावर वाहन तळावर गाडी सोडून मंदिराकडे पायी जावे लागले.रस्ता साठ डिग्री चढणीचा,तंग गल्ली, दोन्ही बाजूस उतरत्या छपराची मजली, दोन मजली घरे,एका घरा समोर चक्क "मराठी खानावळ" अशी मराठी पाटी दिसली.आम्हीं पहाटे चार वाजता मंदिराकडे निघालो. काही वयोवृद्ध गाडीतच बसले. काही हळूहळू चढू लागले. मुले, तरूण मंडळी उड्या मारत  दिसेनासी झाली.गुफ्फ अंधार, स्ट्रीट लाईट नावाची गोष्ट नव्हती,घरांच्या झरोक्यातून येणारा प्रकाश आमचा मार्गदर्शक,पायर्‍यांच्या दोन्ही बाजूला छोटा सिमेंटचा रस्ता पण त्यावर छोटी वहाने उभी होती.साडेचार ते पाच वाजे पर्यंत मंदिर बघीतले.

इथे एक गरम पाण्याचे कुंड आहे. स्थानीक भाविकाने सांगीतले की रामायण काळात, महर्षी प्रात:स्नाना साठी दररोज दूर विपाशा नदीवर जाताना बघून लक्ष्मणाने बाण मारून गरम पाण्याचा झरा निर्माण केला.हे गरम पाणी इथल्या हाडे गोठवणार्या थंडीत वरदान आहे.भावीकांनी हातात पाणी घेऊन अंगावर  शिंपडले. इथे महिला व पुरुष यांच्यासाठी स्वतंत्र न्हाणीघर आहे. भू-औष्णिक क्रियेमुळे (geothermal activity)कुंडातले पाणी सदैव उबदार राहते. भाविक आणि पर्यटक मंदिरात जाण्यापूर्वी या नैसर्गिक गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये स्नान करतात. या पाण्यात गंधकाचे (sulphur) प्रमाण असल्याने, ते त्वचेचे विकार आणि सांधेदुखीवर गुणकारी मानले जाते.

इतीहास

महर्षी वसिष्ठ ऋषी ब्रह्माचे मानस पुत्र होते.  ब्रह्मलोकी सृष्टीच्या प्रारंभी यांचा जन्म झाला. सप्त ऋषीं मधे यांचे विशेष स्थान होते. त्यांनी ब्यास नदीतीरावर उग्र तप केले. नंतर  पत्नी अरुंधती आणी शंभर पुत्रांसह अर्वुदा (मांऊट आबू) पर्वतावर आश्रम बनवून राहीले. त्यांच्या शंभर पुत्रांना किल्मिषपाद राक्षसाने ठार मारले या राक्षसावर ऋषी विश्वामित्रांचा वरदहस्त होता. महर्षी व्यथित झाले,पुन्हा मनाली स्थित आर्जिकीया नदीतीरावर आले. स्वतःभोवती पाश बांधून त्या भयंकर नदीमधे उडी घेतली. नदीच्या मध्यावर गेल्यानंतर ते पुत्र मोहपाशातून मुक्त झाले तेंव्हा या नदीचे नाव "विपाशा" , झाले. महर्षीनीं पुन्हा घोर तपस्या केली.

महर्षींनी नियंत्रित राज्यसभा स्थापन केली, सुर्यवंश निर्माण केला.श्रीराम, लक्ष्मण यांना शिक्षण दिले.या सर्व गोष्टी ब्रह्मांड पुराणा मधे महर्षी नारद संवाद रूपाने कुलान्त पिठ पर्वा मधे नमूद आहेत.अशा अशयाचा माहितीपट मंदिरात लावलेला आहे. यात नमूद केलेले जालंधर,हेमकुट (हमटा दर्रा),महादेव पर्वत इत्यादी हिमाचल प्रदेशाच्या नकाशावरआजही दिसतात.ही घटना पाच हजारांहून अधिक वर्ष जुनी आहे. सध्याचे मंदिर आठराशे वर्षापुर्वी तत्कालीन राजा तक्षपाल यांनी बांधले.मंदिर देवदार वृक्षाच्या लाकडाचे,भरिव कोरीव नक्षीदार  काम असलेले एक सुंदर वास्तू कलेचा नमूना आहे.प्रत्येक चारशे वर्षानंतर या मंदिराचे पुनरूज्जीवन करतात.तो एक मोठाच उत्सव असतो. सर्वात प्रथम  एक उंच देवदार वृक्ष तोडून त्याची विधीवत पूजा करतात व खांब मंदिरा समोर प्रतिष्ठापित करतात. मंदिरात भोवती असे चार खांब वाचकांना दिसतील. शेवटचे पुनरूज्जीवन १९८० मधे झाले होते. 
 

मन्दीर


ब्रह्मर्षी वसिष्ठ आणि भगवान श्रीराम यांना समर्पित असलेल्या या मंदिराची 'काठ-कुनी' (Kath-Kuni) शैलीतील वास्तुकला अतिशय विलोभनीय आहे. काठ-कुनी हे एक स्थानिक तंत्र आहे, जे प्रामुख्याने हिमालयीन प्रदेशात, विशेषतः हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मधे प्रचलित आहे.बांधकाम कोणत्याही मिश्रणाचा वापर न करता,कोरड्या दगडांनी व लाकडी ओंडक्यांनी केले जाते.विशेषतः देवदार वृक्षांचे साचे आणी लाकडावरील गुंतागुंतीचे कोरीव काम हे काठकुनी स्थापत्यशैलीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.स्थानिक  एखादा भावीक येत जात होता.पुर्ण मंदिर रिकामे होते. स्वच्छता वाखाणण्याजोगी होती.अवर्णनीय निरव शांतता आणी प्रसन्नता अनुभवास येत होती. हे स्थान सोडून जाऊच नये असाही एक विचार मनात डोकावून गेला.

मंदिराची विभागणी,मुख्य प्रवेशद्वार,आत दुसरे प्रवेशद्वार,प्रांगण,गर्भगृह ,भावीकांसाठी धर्मशाळा अशी आहे. गर्भगृहातली महर्षी वसिष्ठांची मुर्ती काळ्या पाषाणातली आहे. दाक्षिणात्य पद्धती प्रमाणे मुर्तीला वस्त्र, दागिन्यांनी सुशोभित केले होते.माहितीपटा नुसार कलियुगाचा प्रारंभी जेव्हा देवता आणि ऋषी-मुनीं सामान्य मानवी दृष्टीस दिसेनासे झाले  तेव्हा या प्रतिमेला ऋषींच्या पूर्वजांनी ती येथे स्थापित केली.

 

मन्दीर१

 

गते२

 

गते३

 

गते४

 

ग१

 

ग२

माहितीपटवर नदीसूक्तातील श्र्लोक व ब्रह्मांड पुराणातील,कुलान्त पिठा मधील -ब्रह्मां- नारद संवादातून महर्षी वसिष्ठ,स्थानमहात्म्य याबद्दल माहीती नमुद आहे.संस्कृत श्र्लोक आणी हिंदी भाषांतरातून भाविकांना सविस्तर माहीती मिळते.

ब१

मनाली मधे हिडींबा,घटोत्कच आणी बार्बरीक यांच्या मंदिरा सोबत मनुचे मंदिर सुद्धा आहे. हिडींबा मंदिर समुहा बद्दल वेगळा लेख लिहीत आहे.थोडी माहिती मनु मंदिराबद्दल.

मनु मंदिर.

 

म१

स्थानदेवता मनुचे प्राचीन मंदिर जुन्या मनाली मधे,माॅलरोड पासून विस मिनीटाच्या अंतरावर आहे,देशातील एकमेव मंदिर.मनाली शहरात मुक्काम तीन दिवसाचा होता.तिसऱ्या दिवशी खरेदी साठी माॅलरोड वर जायचेच होते तेंव्हाच मंदिर बघू असे मनात होते.विसरून गेलो. स्थानिकां कडून मिळालेल्या माहिती नुसार मंदिर पारंपरिक हिमाचली वास्तुकलेचा सुंदर नमुना असून, यात नक्षीकाम केलेले लाकडी दरवाजे आणि पॅगोडा-शैलीतील छप्पर आहे. देवदार वृक्षांची दाट वनराई आणि जवळच ब्यास नदीचा प्रवाह आहे. मनालीच्या गजबजलेल्या रस्त्यां पासून दूर,शांत आणि प्रसन्न प्रेक्षणीय स्थळ आहे. माझ्या विसरभोळे पणा मुळे आणखीन एक प्रेक्षणीय स्थळ बघायचे राहून गेले.

व

महर्षी वसिष्ठ मंदिर बघीतले व रोहतांग पास  कडे जाण्यास  निघालो. याबद्दल सविस्तर माहिती पुढील भागात......
 


वाचने 138
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

In reply to by कंजूस

नाही. याचे उत्तर पुढच्या लेखात मिळेल.

 

बाकी, लॅपटॉप वर चित्रे सेंटरीग किवां दोन एका शेजारी 

कशी फाॅर्मॅट करायची तेव्हढे व्यनि करा.

आणी फाॅन्ट कसा वाढवायचा ते ही.....


वसिष्ठ मंदिरे सुंदरच आहे ... तुमच्या फोटोवरून त्याची उत्तम प्रचिती येते .... रात्री गेल्यामुळे गर्दी कमी असावी .....


उत्तम फोटो आणि माहिती .. असेच लेख येऊ देत 


In reply to by अमर विश्वास

सकाळी साडेचार वाजता गेलो होतो. तसा बर्‍यापैकी उजेड होता. आजुबाजूला पांढरीशुभ्र हिमशिखरे होती. कदाचित त्यामुळेच.....

धन्यवाद.