Skip to main content

हवामान खात्याचे अंदाज: पावसाळ्यापूर्वीचे ‘सस्पेन्स थ्रिलर’!

लेखक अनिशासूत यांनी सोमवार, 08/06/2026 14:16 या दिवशी प्रकाशित केले.

 

मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला, की महाराष्ट्रातील वातावरणात दोन गोष्टींची उष्णता प्रचंड वाढते. एक म्हणजे दुपारचं कडक ऊन, आणि दुसरी म्हणजे हवामान खात्याचे (IMD) 'मान्सूनचे अंदाज'. वास्तविक पाहता, मान्सून हा आपल्यासाठी केवळ एक ऋतू नाही, तर तो आपल्या अर्थव्यवस्थेचा, शेतीचा आणि आपल्या जगण्याचा कणा आहे. पण गेल्या काही वर्षांत हवामान खात्याचे हे अंदाज म्हणजे एखाद्या साऊथच्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमासारखे वाटू लागले आहेत; जिथे शेवटच्या मिनिटाला काय 'ट्विस्ट' येईल, हे खुद्द दिग्दर्शकालाही ठाऊक नसतं. या मान्सून थ्रिलरचे काही रंजक टप्पे आणि त्यातला मानवी स्वभाव पाहण्यासारखा असतो.

सिनेमा रिलीज होण्यापूर्वी जसा टीझर येतो, तसा मे महिन्याच्या सुरुवातीला हवामान खात्याचा पहिला अंदाज येतो, "यंदा मान्सून सरासरी गाठणार!" हे ऐकून सर्वसामान्यांच्या आणि विशेषतः बळीराजाच्या जिवात जीव येतो. मग सुरू होतो खरा सस्पेन्स. मे महिन्याच्या २० ते २५ तारखेच्या आसपास मुख्य 'ट्रेलर' येतो, "अंदमानात मान्सून दाखल! पुढील ४८ तासांत केरळच्या देशाने कूच करणार!" ही बातमी न्यूज चॅनेल्सवर अशा पार्श्वसंगीतासह वाजवली जाते, जणू काही वरुणराजा स्वतः बुलेटवरून निघाला आहे आणि महामार्गावर त्याचे लाइव्ह ट्रॅकिंग सुरू आहे. चॅनेल्सवर नकाशावर लाल-निळे बाण दाखवून पावसाची गती मोजली जाते. सामान्य माणूसही मग टीव्हीसमोर बसून इस्रोच्या शास्त्रज्ञासारखा नकाशाचा अभ्यास करू लागतो. तांत्रिक भाषेचा हा मारा एवढा असतो की, ज्याला 'क्युम्युलोनिम्बस ढग' आणि 'अल्निनोचा प्रभाव' यातला फरक गल्लीतल्या कुत्र्यालाही माहीत नसतो, तो माणूस संध्याकाळी कट्ट्यावर बसून थेट पॅसिफिक महासागरातील पाण्याच्या तापमानावर चर्चा करू लागतो. टीव्ही स्क्रीनवर दिसणारे ते रडारचे फिरणारे चक्र पाहून लोकांना वाटतं की आता पुढच्या पाच मिनिटांत आपल्याच घराच्या पत्र्यावर थेट ढगफुटी होणार आहे.

"केरळात पाऊस दाखल, महाराष्ट्रात लवकरच झोडपणार!" ही हेडलाईन दिसली, की घरातलं गृहमंत्रालय सज्ज होतं. कपाटाच्या वरच्या कप्प्यातून, वर्षभर धूळ खात पडलेल्या छत्र्या आणि रेनकोट बाहेर काढले जातात. ज्या छत्रीची काडी गेल्या वर्षी तुटली होती, तिला दुरुस्त करण्यासाठी बाजारात गर्दी होते. गल्लीबोळातले छत्रीवाले आणि सायकलचे दुकानवाले अचानक 'मान्सून स्पेशल' कारागीर बनतात. शेतकरी बांधव तर हवामान खात्याच्या या अंदाजावर डोळे लावून पेरणीची पूर्वतयारी, खतं-बियाण्यांची जुळवाजुळव वेगाने करू लागतात. बाजारात प्लास्टिक ताडपत्री खरेदी करण्यासाठी झुंबड उडते. दुकानाबाहेर लागलेल्या ताडपत्रीच्या ढिगाऱ्याकडे बघून जणू काही पूर्ण गावाला एका मोठ्या प्लास्टिकच्या आवरणाखाली झाकून टाकायचे आहे, असा माहौल तयार होतो. प्रत्येक जण आपापल्या घराचे छप्पर, खिडक्या आणि साचलेला कचरा साफ करण्यात गुंतलेला असतो. थोडक्यात, संपूर्ण महाराष्ट्र 'हाय अलर्ट'वर असतो की आता दोन दिवसांत आभाळ फाटणार आणि आपण थेट जलमय जगात प्रवेश करणार!

आणि मग येतो सिनेमाचा मुख्य ट्विस्ट. हवामान खात्याने दिलेल्या तारखेला सकाळी माणूस घरातून निघताना पूर्ण तयारीनिशी निघतो, अंगात जाड रेनकोट, हातात मोठी काळी छत्री, पायात वॉटरप्रूफ चपला आणि मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी प्लास्टिकची पिशवी. पण दुपारी दोन वाजता निसर्ग असा काही फिरतो की सूर्यदेव पूर्ण ताकदीने तळपू लागतात. बाहेर तापमान ४२ अंश असतं, आणि आपला माणूस हातात काळी छत्री घेऊन, घामाने डबडबलेल्या अवस्थेत बस स्टॉपवर उभा असतो. आजूबाजूचे लोक त्याच्याकडे अशा नजरेने बघतात, जणू हा माणूस थेट सहारा वाळवंटातून चुकून इथे आला आहे किंवा त्याची मानसिक स्थिती थोडी डळमळीत झाली आहे. स्वेटर घालून उन्हाळ्यात फिरणाऱ्या माणसासारखी त्याची फजिती होते. तिकडे हवामान खात्याचे सॅटेलाइट्स रात्री अचानक नवीन डेटा देतात, "अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे मान्सूनचा वेग मंदावला असून, वो सध्या गोव्याच्या वेशीवर थांबला आहे!" म्हणजे, वरुणराजाने गोव्यात रिसॉर्ट बुक करून सुट्टी घालवायचं ठरवलंय की काय, अशी शंका यायला लागते! या हुलकावणीमुळे लोकांचा संयम सुटतो आणि मग सोशल मीडियावर हवामान खात्याच्या नावाने मीम्सचा पाऊस सुरू होतो. "आमच्याकडे विहीर खणायची आहे, हवामान खात्याने फक्त सांगावं की उद्या कडक ऊन पडेल, म्हणजे परवा हमखास पाऊस येईल!" अशा प्रकारच्या टोमण्यांनी फेसबुक आणि व्हॉट्सॲपचे ग्रुप्स भरून जातात.

हवामान खात्याच्या शब्दांचा शब्दकोश हा मराठी साहित्याला पडलेलं एक सुंदर कोडं आहे. त्यांचे अंदाज कधीच सरळ नसतात. ते "काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अंशतः ढगाळ वातावरण राहील" अशा परिभाषेत बोलतात; ज्याचा व्यावहारिक अर्थ 'तुमच्या गल्लीत पाऊस पडेल, पण शेजारच्या गल्लीत ऊन असेल' असा निघतो. त्यांचे "पुढील २४ ते ४८ तास महत्त्वाचे" हे वाक्य ऐकून तर आयसीयूच्या बाहेर उभं असल्यासारखा ताण येतो. रात्रीच्या वेळी खिडकीबाहेर नजर टाकली तर तारे चमकत असतात, पण मनात हवामान खात्याचा तो 'ऑरेंज अलर्ट' रेंगाळत असतो. सर्वात मोठी गंमत म्हणजे, ज्या दिवशी हवामान खाते अधिकृतपणे 'येलो अलर्ट' किंवा 'रेड अलर्ट' जारी करते, त्या दिवशी मुंबई-पुण्यात हमखास कडक ऊन पडतं. लोक सुट्टी जाहीर होण्याची वाट बघत राहतात आणि शेवटी पदरी निराशा पडते. आणि ज्या दिवशी ते म्हणतात, "आज आकाश निरभ्र राहील", त्याच दिवशी अचानक दुपारी ऑफिस सुटायच्या वेळेस असा काही ढगफुटीसारखा पाऊस येतो की लोकांची कपडे वाळत घालण्याचीही घाई उडते आणि रस्त्यावर गाड्या तुंबतात.

निसर्गाला एका चौकटीत किंवा सुपरकॉम्प्युटरच्या कोडिंगमध्ये बांधणे मानवाला अजूनही पूर्णपणे जमलेले नाही, हेच यातून सिद्ध होते. कोट्यवधी रुपयांचे सॅटेलाइट्स, रडार यंत्रणा आणि हवामान मॉडेल्स एका बाजूला आणि निसर्गाची अथांग, लहरी चाल दुसऱ्या बाजूला. हवामान खात्याचे शास्त्रज्ञ बिचारे अहोरात्र डेटा गोळा करत असतात, पण आपला भारतीय मान्सून हा एखाद्या लहरी राजासारखा आहे, त्याला वाटेल तेव्हाच तो दरबारीत हजेरी लावणार! तो कोणत्याही तांत्रिक अंदाजाला किंवा सरकारी परिपत्रकाला बांधील नसतो. जरी त्यांचे अंदाज कधी चुकले, कधी बरोबर आले, तरी या 'सस्पेन्स थ्रिलर'ची मजा काही वेगळीच असते. हा काळच असा असतो की निसर्गाच्या या लहरीपणावर रागवावं की त्याच्या अथांगतेसमोर नतमस्तक व्हावं, हेच समजत नाही. आता तर मे महिना संपत आलाय, छत्र्या बाहेर निघाल्या आहेत आणि कट्ट्यावरच्या गप्पांना धार आली आहे. पुढे काय होणार? मान्सून वेळेवर येणार की पुन्हा हुलकावणी देणार? चला तर मग, डोक्यावरचे ऊन आणि हवामान खात्याचा अंदाज, दोन्ही सोबतीला घेऊन वाट पाहूया त्या पहिल्या सुगंधी पावसाच्या थेंबाची; कारण शेवटी अंदाज काहीही असो, पहिल्या पावसाचा तो मातीचा सुगंध मात्र कधीच चुकत नाही!

- अनिशासूत ✍🏻


वाचने 188
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

हवामान खात्यामधील शेवटचा कर्मचारी संध्याकाळी कार्यालयातून घराकडे निघताना शिपायास....
"खिडक्या सगळ्या नीट लावून घे रे ... या पावसाचा काही भरवसा नाही कधी पडेल...."


आणि जरा पाऊस पडायला लागला की लगेच पावसाची तुफान बॅटिंग, मुंबईची तुंबई, महानगरपालिकेचे नालेसफाईचे दावे पोकळ, चाकरमान्यांची तारांबळ, कुचंबणा, अतोनात हाल.... अशा हेडलाईन्स .. यावर पूर्वी एक धागाही आला होता. खूप पूर्वी. :-) हाल खरेच होतात पण बातम्यांत वर्णन तेच तेच शब्द वापरून.