Skip to main content

रिपुदमन कुमारध्वज

लेखक साहना यांनी बुधवार, 29/04/2026 13:21 या दिवशी प्रकाशित केले.

आर्यावर्तातील चार सम्राटांच्या युद्धाचा अंत आता जवळ आला होता. हिमालयाच्या पायथ्याशी, गंगा नदीच्या तीरावर, इंद्रप्रस्थाचे सम्राट वज्रकेतू आणि वैशाली राज्याचे बावीस वर्षीय सेनापती कुमारध्वज यांची सैन्ये आमनेसामने उभी होती. या भीषण युद्धाने संपूर्ण आर्यावर्तात जो संहार घडवून आणला होता, तो अभूतपूर्व होता.

वैशाली हे प्रामुख्याने व्यापारी राज्य होते. साहजिकच, त्यांच्याकडे मोठी सेना नव्हती आणि त्यांचा पराभव निश्चित मानला जात होता. सम्राट अधोक्षज वृद्धापकाळाने खंगले होते; दोन राजपुत्र युद्धात धारातीर्थी पडले होते आणि तिसरा राजपुत्र अवघा १४ वर्षांचा होता. अशातच, त्यांचे अमात्य अचानक गायब झाले आणि सोबत एका १८ वर्षांच्या तरुणाला घेऊन आले. चामड्याच्या चिलखतात आणि हातात भली मोठी तलवार घेऊन आलेला तो पोरसवदा सैनिक काय करणार, असा प्रश्न त्या वेळच्या सेनापतींना पडला होता. पण वैशालीच्या वेशीबाहेर आलेल्या शत्रू सैन्याला कुमारध्वज एकटाच सामोरे गेला. साक्षात कालभैरवाचा अवतार वाटावा असा नरसंहार या एकट्या मुलाने केला. त्याचे चापल्य, तलवारबाजीची कला, शारीरिक सामर्थ्य आणि प्रचंड सामरिक ज्ञान पाहून शत्रू सैनिकांना वाटले की, हा माणूस नसून एखादी दैवी शक्ती आहे.

पुढील चार वर्षांत कुमारध्वजाने वैशाली साम्राज्याचे सरसेनापतीपद मिळवले. केवळ रणकौशल्यच नव्हे, तर व्यूहरचना, सामरिक नियोजन आणि नेतृत्वक्षमता त्याच्याकडे इतक्या विपुल प्रमाणात होती की, जुन्या आणि अनुभवी योद्ध्यांनीही त्याच्या नेतृत्वाचा विरोध केला नाही. दोन सम्राटांचा नायनाट करून आता कुमारध्वज हिमालयाच्या कुशीत, पर्वतीय भागात वज्रकेतूच्या सैन्याला सामोरे जात होता.

पाच वर्षे चाललेल्या युद्धामुळे वज्रकेतूचे सैन्यही थकले होते. हिवाळा सुरू झाला होता आणि हिमपातही वाढला होता. कुमारध्वजाला आपले घोडदळ घेऊन गंगा नदी पार करणे कठीण जात होते. त्याच्या विजयाच्या अश्वमेधात हे शेवटचे युद्ध होते.

इंद्रप्रस्थ हे आर्यावर्ताच्या उत्तरेकडील साम्राज्य होते. पश्चिमेकडून होणारी म्लेच्छ आक्रमणे थोपवण्यात त्यांचा मोठा वाटा असे. त्यामुळे त्यांच्याकडे प्रशिक्षित सेना आणि घोडदळ नेहमीच सज्ज असे. राजघराण्यातील सर्व पुरुषांना युद्धात हिरीरीने भाग घेणे अनिवार्य होते, त्यामुळे इंद्रप्रस्थाचे राजे सुखलोलुप नव्हते. वज्रकेतू स्वतः अश्वविद्येत प्रवीण होते. तलवारबाजीत त्यांचा हात धरणारा कोणीही नव्हता. त्यांनी असंख्य योद्ध्यांना चीत केले होते. त्यांना बऱ्याच वर्षांनंतर अपत्यप्राप्ती झाली होती आणि युद्धाच्या सुरुवातीलाच त्यांच्या महाराणीने एका राजकन्येला जन्म दिला होता, जी आता ५ वर्षांची झाली होती.

युद्ध संध्याकाळच्या वेळी सुरू झाले. इंद्रप्रस्थच्या सैनिकांना भूगोलाचे ज्ञान अधिक असल्याने त्यांची बाजू वरचढ होती, पण कुमारध्वज स्वतः साक्षात काळ बनून आला होता. भीषण युद्धात त्याने शत्रू सैन्याचा धुव्वा उडवला. वज्रकेतूनेही पराक्रम गाजवला; त्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या, पण रात्र होऊ लागली तशी माघार घेणे त्यांना योग्य वाटले. आपल्या खास अंगरक्षकांना घेऊन त्यांनी जंगलात पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण कुमारध्वजाला कदाचित हे अपेक्षित होते, म्हणूनच मुख्य युद्धभूमी सोडून त्याने वज्रकेतूचा पाठलाग केला.

बिगुल वाजवून वज्रकेतूने आपल्या सैन्याला माघार घेण्याची सूचना केली आणि त्याचे घोडदळ अचानक जंगलात गडप होऊ लागले. पण कुमारध्वज फक्त वज्रकेतूच्या मागावर होता. वाटेत जो कोणी येईल, त्याला त्याने कापून काढले. त्याचा तो भयंकर नरसंहार पाहून वज्रकेतूही चकित झाले होते. वज्रकेतूच्या कुठल्याही सैनिकात कुमारध्वजाला थोपवण्याची कुवत नव्हती.

रात्रीच्या अंधारात दोन्ही सैन्यांना जंगलात मार्गक्रमण करणे कठीण होते. पण कुमारध्वज आणि त्याचे निवडक सैनिक अत्यंत शिताफीने फक्त सम्राट वज्रकेतूच्या मागावर होते. शेवटी बराच पाठलाग केल्यावर त्यांचा आमनासामना एका हिमाच्छादित पठारावर झाला. वज्रकेतू एकाकी पडले होते. कुमारध्वजासोबत ५-६ सैनिक होते, इतर लोक बरेच मागे पडले होते. कुमारध्वजाच्या सैनिकांनी सम्राटाचा वध करण्याची संधी मिळते म्हणून मागे-पुढे न पाहता त्यांच्यावर हल्ला केला. वज्रकेतू तरुण नव्हते, त्यांचे वय ५० च्या आसपास असावे, पण त्या सर्व सैनिकांना त्यांनी अत्यंत सहजपणे यमसदनाला धाडले. कुमारध्वज दुरूनच हे पाहत होता. मागील ४ वर्षे तो ज्या युद्धांत लढला, त्यात कुणीही त्याच्या शरीरावर आघात करू शकले नव्हते. त्यामुळे वज्रकेतूचे कौशल्य पाहून त्याला मनात थोडा आनंद झालाच.

कुमारध्वजाने आपली तलवार घेऊन संथ गतीने वज्रकेतूच्या दिशेने चाल केली. बराच वेळ दोन्ही योद्ध्यांनी एकमेकांच्या डोळ्यांत पाहत एकमेकांची चाचणी घेतली. त्यानंतर अचानक अत्यंत चपळतेने त्यांनी एकमेकांवर वार केले. वज्रकेतू नक्कीच कुमारध्वजापेक्षा संथ होते आणि कुमारध्वजाच्या पायांत वेग जास्त होता, पण त्याच वेळी हिमाच्छादित जमिनीवर वेगाने हालचाल करण्यासारखी पादत्राणे त्याच्याकडे नव्हती. वज्रकेतूची पादत्राणे विशेष पद्धतीची बनवलेली असल्याने त्यांच्याकडे अनुकूलता होती.

कुमारध्वजाला हे लक्षात यायला थोडा वेळ लागला, पण जेव्हा त्याने हे जाणले, तेव्हा त्याने आपले तंत्र बदलले. एखाद्या माकडाप्रमाणे त्याने उडी मारून आजूबाजूच्या वृक्षांच्या बुंध्यांचा आधार घेतला आणि अत्यंत चाणाक्षपणे वज्रकेतूच्या उजव्या हातावर वेगाने हल्ला केला. त्यांचे चामड्याचे चिलखत कापत तलवार थेट हाताच्या हाडावर अडकली. वार भक्कम होता, रक्ताची धार उडाली आणि तलवार हातातून खाली पडली. वज्रकेतू खाली कोसळले. घाव इतका खोल होता आणि रक्तस्त्राव इतका प्रचंड होता की, त्यांच्या पायातील त्राणच गेले. सर्व काही संपले होते.

कुमारध्वजाने स्वतःला सावरले आणि तलवार झटकली. अचानक सर्पदंश व्हावा अशी एक कळ त्याच्या शरीरात निर्माण झाली. त्याने आश्चर्याने पाहिले तर त्याच्या मांडीत वज्रकेतूने आपला छोटा खंजीर खुपसला होता. कुमारध्वजाची चाल त्यांनी ओळखली होती आणि स्वतःच्या उजव्या हाताची आहुती देत, डाव्या हाताने त्यांनी कुमारध्वजाचा वेध घेतला होता. जखम जीवघेणी नव्हती, पण या संपूर्ण युद्धाच्या काळात त्याला झालेली ही पहिलीच जखम होती.

त्याच्या मनात या जखमेमुळे रागापेक्षा आदराची भावना निर्माण झाली.

"ह्या जखमेने मृत्यू निश्चित आहे, पण तो लवकर येणार नाही," त्याने सहानुभूतीने वज्रकेतू यांना म्हटले.

वज्रकेतूने डोळ्यांनीच त्याला होकार दिला आणि त्यांच्या डोळ्यांतून एक अश्रू ओघळला.

कुमारध्वजाने वज्रकेतू यांना त्वरित मरण देण्यासाठी आपली तलवार वर उचलली. "काही शेवटची इच्छा?" त्याने विचारले. वज्रकेतू हे एक सम्राट होते आणि त्यांनी कुमारध्वजाला तोडीस तोड स्पर्धा दिली होती, म्हणून त्याने हा प्रश्न विचारला होता.

"नाही. माझी छोटी मुलगी, तिची आठवण येतेय. तुला मुले नाहीत, कदाचित स्त्रीचा स्पर्श काय असतो हेही तुला ठाऊक नसेल. पण मला माझ्या मुलीची आठवण येते. प्रेमामुळे नाही, तर प्रत्येक वेळी तिला काही समस्या आली की ती माझ्याकडे धावत यायची. बाबा नेहमीच सर्व समस्या सोडवतात, अशी तिची गोड समजूत होती. आमच्या दरबारात माझ्या सर्व पूर्वजांच्या तसबिरी होत्या, त्यांच्या प्रत्येकाच्या कथा ती मला विचारायची. मी तिला वारंवार सांगायचो. मलाही वाटायचे की कधी माझी तसबीर तिथे असेल, माझ्या पूर्वजांशी जेव्हा स्वर्गात भेट होईल तेव्हा कदाचित मलाही त्यांच्यासोबत स्थान असेल. पण कदाचित मी कमी पडलो. बाप म्हणून, एक मुलगा म्हणून. फक्त दुःख वाटते की उद्या जेव्हा तिला एखादी समस्या येईल, तिला माझी आठवण येईल, पण मी नसेन. आमचा इतिहास, माझे अनुभव काहीही मी तिला देऊ शकणार नाही."

कुमारध्वज हे सर्व ऐकत होता. रक्तस्त्रावाने माणसाच्या मनावर परिणाम होतो, भ्रम होतात किंवा मृत्यू समोर दिसला की लोक लाचार होतात किंवा कटू होतात. पण एका सम्राटाला आपल्या शेवटच्या क्षणात आपला पराक्रम, आपले राज्य, आपले वैभव आठवले नाही; आपल्या मारेकऱ्याबद्दल कटुता वाटली नाही, तर आपल्या मुलीची आठवण आली! हे त्याला थोडे विचित्र वाटले. पण त्याने त्वरित तलवार चालवून सम्राट वज्रकेतूच्या यातनांचा अंत केला.


उत्तरार्ध

वैशाली नगरात कुमारध्वजाचे अत्यंत भव्य, अभूतपूर्व स्वागत झाले. युद्धात असंख्य लोक मारले गेले असले तरी, युद्ध शेवटी संपले होते. याचे संपूर्ण श्रेय निःसंशयपणे तरुण सेनापती कुमारध्वज याचे होते. महाराजांनी म्हणूनच त्याला "रिपुदमन कुमारध्वज" अशी पदवी दिली होती. महाराजांचे छोटे चुलतभाऊ अमोघ यांनी आपल्या किशोरवयीन मुलाला, अनिरुद्धला, कुमारध्वजाकडे शिष्य म्हणून घेण्याची विनंती केली होती.

वैशाली नगराची एक जुनी परंपरा होती. युद्धात विजय मिळवला की, महाराज नगरापासून दूर एका पहाडी प्रदेशातील महाकाल मंदिरात जात. अत्यंत दुर्गम आणि उंचीवर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी दहा हजार पायऱ्या होत्या. पालखीत बसून महाराज वर जात आणि युद्धात सर्वांत जास्त पराक्रम गाजवलेल्या योद्ध्याला या मिरवणुकीचे नेतृत्व करण्याची संधी मिळत असे. ही यात्रा पूर्ण झाल्यावर त्या योद्ध्याला युद्धसंबंधित जबाबदाऱ्यांतून महाराज निवृत्त करत आणि त्यांना अमात्यपद देत. प्रचंड मोठे सदन, जहागिरी, नोकर-चाकर, वार्षिक वेतन इत्यादी असंख्य सन्मान त्याला मिळत. त्यामुळे या यात्रेनंतर कुमारध्वज निवृत्त होतील अशी अपेक्षा होती. युद्ध संपल्याने आता त्याच्यासारख्या योद्ध्याची गरजही नव्हती.

ही यात्रा मोठी होती, प्रचंड प्रमाणात जनता या भागात लोटली होती. रस्ता साफ करून दुतर्फा फेरीवाल्यांची लगबग सुरू झाली होती. फुलांचा सडा पडला होता, नृत्यांगना नृत्य करत होत्या, हलवायांनी मिठाईची दुकाने उघडली होती.

या सर्व उत्साहात, महाराजांची पालखी आली आणि पूर्ण दिवस चालत अनेक भोयांनी ती वर नेली. त्यांच्यापुढे कुमारध्वजही पायी वर चालत गेला. संपूर्ण रात्रभर देवळात उत्सव साजरा झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आरती करून महाराजांची स्वारी खाली आली. सर्व लोक दुतर्फा रांगा लावून तरुण योद्धा कुमारध्वज आणि महाराजांच्या लवाजम्याकडे अत्यंत गर्वाने आणि कुतूहलाने पाहत होते.

लोक खाली पोहोचले तेव्हाच अचानक एक कोलाहल ऐकू आला. अंगरक्षकांनी अचानक सुरक्षा कवच निर्माण केले आणि काही सैनिकांनी एका धिप्पाड चांडाळ माणसाला ओढत आणले. त्याच्या हातात एक साधारण ४-५ वर्षांची लहान मुलगी होती, जी त्याची वाटत नव्हती. त्याच्या मागे एक गरीब शेतकरी हात जोडून ओरडत आला. किंबहुना, त्याला सुद्धा सैनिकांनी धरून आणले होते.

या सर्व गोंधळाने कुमारध्वज आणि त्यांच्या मागे असलेल्या महाराजांच्या लवाजम्याला थांबावे लागले. हे पाहताच सैनिकांचा प्रमुख घाबरला आणि त्याने हात जोडून कुमारध्वजाची माफी मागितली. "माफ करा, सेनापती महोदय. मी आत्ताच या लोकांना हाकलतो."

पण कुमारध्वजाला कुतूहल वाटले. त्याने इशारे करूनच सैनिकांना मागे होण्यास सांगितले. "काय आरडाओरडा चालला आहे?" त्याने दरडावून विचारले. आता बघ्यांची गर्दी जास्तच जमली होती. नगराध्यक्ष, प्रतिष्ठित लोक, सामान्य माणूस, शेतकरी, सैनिक - सर्वच आता हा देखावा पाहत होते.

शेतकरी वाटणारा तो गरीब माणूस धावत येऊन कुमारध्वजाच्या पाया पडला. "वाचवा, सेनापती महोदय. माझ्या छकुलीला वाचवा. हा चांडाळ तिला उचलून नेतोय."

"काय?" कुमारध्वजाने चांडाळाकडे पाहिले. तो काळ्याशार शरीराचा धिप्पाड माणूस होता. त्याच्या कमरेला एक लंगोट होती आणि एक अतिशय छोटीशी कुऱ्हाड लटकत होती. केस विस्कटलेले आणि मातकट होते. दाढी होती. वयाचा अंदाज येत नव्हता.

"महाराज," तो हात जोडून म्हणाला, "मी कुणालाच जबरदस्तीने नेत नाही. काल मी इथे मृगजीन (हरणाचे कातडे) विकत होतो, तेव्हा हाच माणूस माझ्याकडे आला. एक मृगजीन घ्यावे म्हणून याच्या मुलीने हट्ट केला, तेव्हा याच माणसाने म्हटले की, 'काळ्या हरणाचे मृगजीन दे आणि या पोरीलाच घेऊन जा'. म्हणून मी आज काळ्या हरणाचे जीन घेऊन आलो आणि या पोरीला घेतले. आणि ती सुद्धा माझ्यासोबत यायला तयार झाली आहे."

"महाराज, हा चांडाळ आहे. याचे काय ऐकायचे? ही पोरगी छोटी आहे. तिला काही समजत नाही. मी हे सर्व थट्टेने म्हटले होते. काळ्या हरणाचे जीन अत्यंत दुर्मिळ आहे. हा माझ्या छकुलीला नेऊन तिचे काय करणार?" शेतकऱ्याने विनवण्या करत म्हटले.

"चांडाळा, तू या लहान मुलीला घेऊन काय करणार? ती या माणसाची मुलगी आहे. तू तिला परत कर आणि मी तुला सुवर्णमुद्रा देतो. पाहिजे तर एक घोडा सुद्धा देतो," कुमारध्वजाने म्हटले.

"महाराज, तुम्ही कुणीतरी मोठे योद्धे आहात. मी साधा चांडाळ. मी सुवर्णमुद्रा घेऊन करणार काय? आणि या कड्याकपारीत घोडे काय कामाचे? मी या मुलीला घरी नेईन, राणीसारखी ठेवीन. तिला माझ्याप्रमाणेच चांडाळ बनवीन. तिला मी शिकार करण्यास शिकवेन, कातडे काढण्यास शिकवेन." तो हे बोलत होता तेव्हा ती लहान मुलगी स्मितहास्याने त्याच्याकडे पाहत होती. जणू काही तिला सुद्धा हेच हवे होते.

"सेनापती महोदय, तुम्ही फक्त आज्ञा करा, याला आत्ताच इथेच देहदंडाची शिक्षा करतो," तिथे असलेल्या एका अंगरक्षकाने म्हटले.

"पण या चांडाळाच्या रक्ताने जमीन अपवित्र होईल ना," कुणीतरी मागून म्हटले. एव्हाना महाराज सुद्धा आपल्या पालखीतून हे सर्व पाहत होते.

"चांडाळा, मी पुन्हा तुला विनंती करतो. या मुलीला या माणसाच्या स्वाधीन कर आणि आपल्या वाटेने जा. खूप मेहनतीने माझी तलवार आता म्यान झाली आहे. तिला म्यान राहू दे. पण मी तुला तिला घेऊन जायला देणार नाही."

"महाराज, मी ठरलो अशिक्षित चांडाळ. मला जास्त ठाऊक नाही, पण आमच्यात जे आपले आहे, ते असे धमकीने आम्ही कधी देत नाही. मग माझे अपवित्र रक्त इथे सांडले तरी चालेल. माझे लोक मला पुन्हा आपल्या कबिल्यांत घेणार नाहीत. मला जास्त ठाऊक नाही, पण आपल्यासारख्या क्षत्रियाने तलवारीच्या जोरावर माझा हक्क माझ्याकडून हिरावून घ्यावा, हा धर्म ठरतो का?"

एका चांडाळाने साक्षात रिपुदमन कुमारध्वजाच्यासमोर धर्मप्रश्न निर्माण करावा, हे पाहून सर्व जनता स्तब्ध झाली. कुमारध्वज काय करतील, याचे कुतूहल सर्वांनाच होते. काहींना तर हा सर्व एक मोठा अपशकुन वाटत होता.

"धर्मपरायण वाटण्यापेक्षा, धर्मपरायण असणे महत्त्वाचे आहे. त्या लहान मुलीच्या सुरक्षेसाठी मी कदाचित लोकांना अधार्मिक वाटलो तरी चालेल. पण मी तुला त्या मुलीला घेऊन जायला देणार नाही," कुमारध्वजाने अत्यंत शांतपणे म्हटले.

"ठीक आहे तर, तुम्हाला माझे रक्त सांडूनच हे करावे लागेल."

कुमारध्वजाने आपली तलवार बाहेर काढली. "तुला कोणते शस्त्र पाहिजे?" त्याने विचारले.

"माझ्याकडे आहे की ही कुऱ्हाड," त्याने आपल्या कमरेची कुऱ्हाड काढली.

कुमारध्वजाने पहिला वार केला, आणि तो चांडाळ लटपटत बाजूला झाला. त्याच्या एकूण हालचालींवरून तो युद्धकलेत प्रवीण वाटत नव्हता, पण कुमारध्वजाचा वार त्याने चुकवलाच. कुमारध्वजाने पुन्हा अत्यंत त्वेषाने त्याच्यावर वार केले. पण पुन्हा पुन्हा त्या सामान्य चांडाळाने अत्यंत सहजपणे त्याचे सर्व वार वाया घालवले. त्याने आपली कुऱ्हाड वापरली सुद्धा नाही. सर्व सैनिक, कुमारध्वजाचा शिष्य अनिरुद्ध आणि महाराज सुद्धा अत्यंत अचंबित होऊन हे पाहत होते. कुमारध्वजाचे वार, पदलालित्य सर्वच त्या चांडाळाच्या हालचालींपुढे अत्यंत सुमार वाटत होते. प्रत्यक्षात कुमारध्वज अत्यंत वेगवान होता, पण त्या वेगाचा काहीच परिणाम त्या चांडाळावर होत नव्हता. कुमारध्वजचा एक वार मात्र चांडाळाच्या कंठाच्या अत्यंत जवळ आला. इतका जवळ की, कदाचित केसाएवढी जखम त्याच्या कंठावर झाली असावी, पण त्याच वेळी त्या चांडाळाने एक लाथ कुमारध्वजाच्या छातीवर मारली. लाथ इतकी प्रखर होती की, क्षणभर त्याचा जीव त्याच्या शरीरातून बाहेर आला असे वाटले. सर्व काही स्तब्ध झाले आहे आणि आपला प्राण शरीर सोडून जात आहे असे त्याला वाटले, आणि क्षणार्धात तो प्राण पुन्हा त्याच्या शरीरात गेला. त्याच्या हातातून तलवार गळून पडली. पायातील त्राण गायब झाले आणि कुमारध्वज खाली कोसळला. लोकांत हाहाकार माजला. महाराजांच्या अंगरक्षकांनी चांडाळाला पकडायचा प्रयत्न केला, पण महाराज अधोक्षज यांनी त्यांना दरडावून मागे होण्यास सांगितले.

अनिरुद्ध आणि इतर लोकांनी कुमारध्वजाला उठायला मदत केली.

"महाराज, मी तुम्हाला आता हरवले आहे. ही मुलगी घेऊन मी आता जात आहे," असे म्हणून तो चांडाळ त्या गर्दीत त्या मुलीला घेऊन गायब झाला.

कुमारध्वजाने संपूर्ण आयुष्यात कधी पराभव पाहिला नव्हता. या पराभवाने तो खचला असावा असे सर्वांना वाटले. महाराज स्वतः चिंतेत होते. या पराभवानंतर कुमारध्वजाला अमात्यपद किंवा सरसेनापती पद, दोन्ही ठेवणे आता शक्य नव्हते. नगरात ही बातमी वणव्याप्रमाणे पसरली. काहींच्या मते चेटूक संपले होते आणि कुमारध्वजाची शक्ती त्याला सोडून गेली होती. काहींच्या मते महाराजांच्या अमात्यांनीच काहीतरी जादूटोणा केला होता. अनिरुद्धच्या वडिलांनी सुद्धा त्याला कुमारध्वजाला सोडून परत येण्यास सांगितले, पण त्याने आपल्या गुरुची साथ सोडली नाही. कुमारध्वजाने स्वतःला आपल्या सदनात कोंडून घेतले. अनिरुद्ध सोडून आणखी कोणीही त्याच्याजवळ जात नव्हते.

महाराज अधोक्षज ह्यांनी त्याला बोलावणे पाठविले. या मोठ्या युद्धांत जो पराक्रम त्याने गाजवला तो या एका घटनेने कमी होत नाही. त्यामुळे वैफल्यग्रस्त होण्यापेक्षा कुमारध्वजाने अमात्यपद स्वीकारावे आणि नवीन पिढीला युद्धकलेत प्राविण्य मिळविण्यासाठी शिक्षण द्यावे अशी विनंती त्यांनी केली.

कुमारध्वजाने अतिशय शांतपणे महाराजांचे म्हणणे ऐकले.

"महाराज, आपल्या ह्या अत्यंत उदार प्रस्तावाचा मी सन्मान करतो. पण त्या चांडाळाच्या हातून झालेल्या माझ्या अपमानाला मी अपमान समजत नाही. मी वैफल्यग्रस्त सुद्धा नाही. त्या मुलीला स्वतंत्र करण्याचे मी वचन दिले होते आणि ते पूर्ण करण्याचा माझा निर्धार आहे. त्या चांडाळाने माझा फक्त पराभव नाही केला, तर मला पुनर्जन्म दिला आहे. या सर्व घटनेत काही दैवी इच्छा आहे आणि ती मला पूर्ण करायची आहे," कुमारध्वजाने शांतपणे म्हटले.

महाराज अधोक्षज हे ऐकून कदाचित आश्चर्यचकित होतील असे त्याला वाटले होते, पण त्याच्या चर्येवरून त्यांना असे उत्तर अपेक्षित असावे असे कुमारध्वजाला वाटले.

"ठीक आहे रिपुदमन कुमारध्वज. मी तुला माझ्या राज्याच्या सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त करतो. तुला जे काही साहित्य आणि साधन पाहिजे ते तू घेऊन तुझ्या नवीन मार्गावर जा. वैशाली राज्याकडून तुला नेहमीच मदत मिळेल." महाराजांनी आपल्या जवळ असलेली एक जुनाट अशी चावी काढली आणि त्याला दिली. कुमारध्वजाला काही समजले नाही.

"ह्याची तुला कधी तरी गरज भासेल." महाराजांनी त्याला ती चावी दिली.

कुमारध्वजाने आपला आवडता घोडा घेतला, पण तलवार नाही घेतली आणि तो जंगलाच्या दिशेने जाऊ लागला. काही दूर जाताच त्याला त्याच्या मागे टापांचा आवाज आला. त्याने पाहिले तर त्याच्या मागे अनिरुद्ध अत्यंत वेगाने घोडा दौडवत आला होता.

"अरे तू कुठे येतोस? तू मागे जा. तुझ्या वडिलांना तुझी गरज असेल," कुमारध्वजाने म्हटले.

"नाही. मला त्या नगरात काहीच करायचे नाही. तुम्ही मला बरोबर न्या. तुम्ही गुरु आहात."

कुमारध्वजाने स्मितहास्य केले आणि होकार दर्शवला; दोघेजण जंगलात दूरवर निघून गेले.


 

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 54
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया