अनंत चतुर्दशी

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
9 Sep 2022 - 11:32 pm

आज अनंत चतुर्दशी.दूरदर्शनवर गणपती विसर्जन व मिरवणुकीची दृश्ये दाखवत होते.लालबागचा राजा,कसबा गणपती, नागपूरचा राजा,कधी नाशिक कधी नागपूर शहरातली दृश्ये ,जणू दूरदर्शन संजय आणी मी धृतराष्ट्र.

जसे वय वाढते तसे येणारा प्रत्येक दिवस भूतकाळात जरूर घेऊन जातो. तसाच आजचा दिवस सुद्धा....

एक दोन तीन चार ....
माणिक मोती बडे हुशार....

आमच्या लहानपणीच्या गणेशोत्सवाची दृश्ये डोळ्यासमोर तरळून गेली. तेव्हा ना दूरदर्शन होते ना विज. ना ही पुण्या मुंबईचे आकर्षण होते.छोटेसेच गाव.आळी,गल्ली आणी पेठेत विखुरलेले.शिंपी आळी,मोमीन आळी , कुंभार गल्ली अशीच नावे पण कोणालाही त्याचे सोयरसुतक सुतक नसे.

आमची ब्राह्मणआळी,मोती चौक,चौकात
लाकडी गणेशमूर्ती स्वतः लोकमान्यांनी दिलेली. मानाचा गणपती मिरवणुकीत सर्वात पुढे. त्याच्या मागे माणीक चौक, खेडकर आळीतला गणपती. आझाद चौक, नेहरूचौक,होळी चौक, माळावरचा, जुन्या स्टॅन्ड वरचा अशा प्रत्येक गणेशोत्सव मंडळांचे सर्वमान्य मिरवणुकीतले स्थान पक्के व त्याचा प्रत्येकाला अभिमान होता. परंपरागत चालत आलेले.

प्रत्येक चौक आपापली विषेशता जपून होता. मोतीचौकातली मुर्ती पारंपारिक, टिळकांनी दिलेली म्हणून दरवर्षी तीच मंडपात विराजमान असायची,शेजारीच छोटीशीच पूजेची मुर्ती. अनंत चतुर्दशीला विसर्जन करण्यासाठी. बाकी तीनशे पंचावन्न दिवस लाकडी मुर्ती चौकातल्या ग्रंथालयात ठेवून देत. चौकात फारसे कार्यक्रम नसत परंतू व्याख्यानमाला जरूर आयोजित करण्यात येत असे. सिनेमा वगैरेचे वावडे असे.

जुन्या स्टॅन्ड वरची भव्यदिव्य मुर्ती, आकर्षक हालते देखावे,जनरेटर वरची लाईट मुख्य आकर्षण असे.आझाद,होळी,नेहरू चौकातल्या मुर्त्या ना मोठ्या ना खुप छोट्या पण तेथील मुख्य आकर्षण सीनेमा. दररोज गाजलेले चित्रपट आळी पाळीने प्रत्येक चौकात दाखवायचे. भरपूर जाहीरात व्हायची, बसकर घेऊन जागा पकडून ठेवण्यासाठी लहान थोरांची हुळ सीनेमा सुरू व्हायच्या आगोदर पासून ताटकळत बसायची. सीनेमा दाखवणारे पुण्यावरून येत असल्यामुळे केव्हा येतील याचा नेम नाही. साधारण रात्री आकाराच्या सुमारास चित्रपट सुरू व्हायचा तोपर्यंत चिल्लर पार्टी तीथेच बहुधा मातीतच झोपलेली असायची.

गावात,बाजारपेठेत जी एस पाटील यांचे पेन्टिंग चे दुकान,इतर वेळेस कुणाचे लक्ष वेधून घेत नसे पण महिनाभर आगोदर दुकानावरचा पाढंर्‍या मळकट धोतराचा पडदा येणाऱ्या जाणाऱ्याचे कुतूहल वाढवीत असे.मोठ्या गणेश मूर्त्या व इतर देवदेवता, राक्षस,मान्यवर व्यक्तींच्या शाडूच्या मूर्त्या, हालते देखावे या पडद्याआड आकार घेत असत. शाळेतून जाता येता पडदा बाजूला करून आत डोकावून पहाण्यास तासंतास मुले उभी रहात. गणेश चतुर्थीच्या तीन चार दिवस आगोदर ठरावीक चारपाच दुकानात गणेश मुर्ती मांडल्या जायच्या व आमचे कडे पेणच्या शाडूच्या, सर्वांगसुंदर मुर्ती मीळतील असे बोर्ड झळकायचे.काही मुर्त्यांच्या सोडें
मधे कागदाची सुरळी खोचलेली दिसायची. प्रत्येक दुकानाचे ठराविक ग्राहक, दरवर्षीचे ठरलेले.

फुले,शमी,दुर्वा,पत्र्या कधीच विकायला नव्हत्या. मुलांना माहीत असे कुठून आणायच्या ते. नदीतच दुरवर कुठेतरी कमळाची फुले व कुठेतरी माळरानात घायपताच्या झुडपात केतकीचे बन. एक दिवस आगोदर मित्रांबरोबर जाऊन घेऊन येत असू. उपकार केल्यासारखे शेजारच्या काका काकूंना पण देत.दहा दिवस पुजा, आरत्या व एका सुरात अथर्वशीर्ष, देवे म्हणण्यात संध्याकाळ तर रात्र चित्रपट, म्युझिकल नाईट बघण्यात कधी संपायचे कळत नसे.

बैलगाडीत विराजमान गणेश मुर्ती, पुढे खिल्लारी बैलं, डौलात कासरा धरून बसलेला,पाढंरा फेटा, राकट, झुपकेदार मीशा वाला गाडीवान. ढोल ताशा,झांझ आणी लेझीम पार्टी. त्याच्या पुढे नुकत्याच बघितलेल्या चित्रपटातील नृत्या प्रमाणे अंगविक्षेप करणारी चिल्लीपिल्ली व दोन्ही बाजूस धीरगंभीर चेहरे घेऊन, "मोरया रे बाप्पा मोरया रे",बुदबुदत हलकेच चालणारी वानप्रस्थाश्रमातली पिढी.संध्याकाळ झाली की गावातले हमाल,शेतमजुर डोक्यावर गॅसबत्ती घेऊन बैलगाडी बरोबर चालत असे. एखाद्याच मालदार गणेश मंडळा बरोबर डिझेल जनरेटर असे. मिरवणूकीत लहान थोर झाडून सारे गाव हजेरी लावत असे. एखाद दुसराच पोलीस गणवेशात बिना गुलाल नाहीतर सर्व वातावरण गुलालाने रंगलेले असायचे.

भीमा नदी, नावघाटावर रात्री साडेदहा आकराला मुर्ती विसर्जन नंतर वडाच्या झाडा खाली भरणारी संघाची शाखा. त्यानंतर मिळणार्‍या मोती चौकाची खोबऱ्याची खीरापत व माणीक चौकाची वाटली डाळ याची चव आजही जीभेवर रेगांळत आहे. एरवी साती चिचांवरच्या भुत, हडळींना घाबरणारी आम्ही मुले त्या दिवशी मात्र बिनधास्त तीथे वावरत असो. स्वतःच्या चौकातल्या बाप्पाला निरोप दिल्यावर इतर मिरवणूक बघण्यासाठी कट्ट्यावरील दाटीवाटीत आम्ही हजेरी लावत असू.

कुठे तेव्हांचा तो निसर्गातला मुक्त, स्वच्छंद गणेशोत्सव ......
आणी आजचा,घरातल्या बादलीत किंवा जवळच्या मुन्शीपाल्टीच्या पर्यावरण मुक्त योजनेंतर्गत बांधलेल्या टाक्यातील गणेश विसर्जन. ते सुद्धा स्वतः नाही. कुणीतरी कळकट कर्मचारी आपला बाप्पा जवळ जवळ हिसकावून घेतो. दोन वेळा पाण्यात बुडवल्या सारखा करतो व कुठेतरी नेऊन ठेवतो. वरती दात विचकत पैसे सुद्धा मागतो.

धत् तेरेकी.......

मुक्तकसमाजजीवनमानप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

काका, तुमचे स्मरण रंजन आवडले आणि भावना देखील समजली.
तुमच्या भावनेशी मी सहमत आहे, माझी देखील हीच भावना आहे.

कुठे तेव्हांचा तो निसर्गातला मुक्त, स्वच्छंद गणेशोत्सव ......
आणी आजचा,घरातल्या बादलीत किंवा जवळच्या मुन्शीपाल्टीच्या पर्यावरण मुक्त योजनेंतर्गत बांधलेल्या टाक्यातील गणेश विसर्जन. ते सुद्धा स्वतः नाही. कुणीतरी कळकट कर्मचारी आपला बाप्पा जवळ जवळ हिसकावून घेतो. दोन वेळा पाण्यात बुडवल्या सारखा करतो व कुठेतरी नेऊन ठेवतो. वरती दात विचकत पैसे सुद्धा मागतो.

हिंदूंनी बाप्पाचा बाजार मांडला आहे ! कुठल्याही आकाराच्या मूर्ती बनवतात्,यावेळी तर चक्क पुष्पराज या पुष्पा चित्रपटातील व्यक्तिरेखेच्या आकारात गणपती पाहुन वाईट वाटले. :(
P1
कर्कश्य डिजे,अचकट-विचकट हाव-भाव करुन हिडिस नाच, काही ठिकाणी तर दारू पिऊन नाच कम धिंगाणा, काही ठिकाणी गणपतीच्या मिरवणुकीत अश्लील गाणी /लावण्या देखील लावल्या जातात.
मी काही वर्ष मुंबईच्या / गिरगाव मधील सर्व गणपतींना जाऊन दर्शन घ्यायचो, सोसायटी मधली लोकांच्या घरातील, कॉलनीतील विविध मंडळातील दर्शन घ्यायचो आणि मिपावर त्या गणपतींचे फोटो टाकायचो... अगदी एका वर्षी लालबागच्या गणपती चे दर्शन देखील घेऊन आलो.
लालबागचा गणपती हा सगळ्यात मोठा बाजार झालाय असे वाटायला लागले आहे ! एका वर्षी मिडियाने देखील या मंडळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचे स्मरते ! सेलिब्रेटी बाप्पाच्या दर्शनाला कमी आणि बाप्पा समोर स्वत:चे फोटोशूट करायला येतात किंवा त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करायला, नावापुरते नाव बाप्पाचे घ्यायचे आणि करायची स्वतःची प्रसिद्धी आणि व्यापार. सामान्य जनतेला पुढे ढकलणारे कार्यकर्ते या सेलिबेटिंनी विशेष वागणुक देताना दिसतात, यामुळे मंडळाची प्रसिद्धी आणि त्यामुळे लोकांचा अधिकचा ओढा वाढुन दानपेटीची भर !
मी समजत होतो की हिंदूंना तिथी चे / दिवसाचे महत्व फार असते आणि वाटते पण अनेक मोठे गणपती अनंत चतुर्दशीला विसर्जितच होत नाहीत, मग त्या दिवसाचे काय महत्व ? आत्ता टिव्हीवर लालबागच्या राजाच्या अजुन चालणारा विसर्जन सोहळा ? बघत होतो... एक कार्यकर्ता बाप्पाच्या मूर्तीच्या डाव्या हाताला बराच वेळ धरुन मागे-पुढे करत होता, एक कार्यकर्ता मागे सरळ उभा राहुन मुकुटात काही तरी करत होता... त्याचे पाय मुर्तीला लागले नसावेत असे समजुन घेतो. पण आता हा सगळा बाजार बघवत नाही !

माझे बाप्पाचे धागे :-
वेध गणेश उत्सवाचे...
सार्वजनिक गणेश उत्सव २०१०
गणेश उत्सव २०११ भाग १
गणेश उत्सव २०११ भाग २
गणेश उत्सव २०११ भाग ३
गणेश उत्सव २०१२
गणेश उत्सव २०१२ भाग -२
श्री गणेश उत्सव २०१३ { भाग १ }
गणेश उत्सव २०१४ भाग १
गणेश उत्सव २०१४ भाग २
गणेश उत्सव २०१६

जाता जाता :- जर श्रीगणेश चतुर्थीलाच बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करुन बसवला जात असेल तर मग अनंत चतुर्दशीलाच विसर्जन का करता येत नाही ? हा मला पडलेला गहन प्रश्न आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong."LeBron James

सौन्दर्य's picture

15 Sep 2022 - 11:13 pm | सौन्दर्य

मला तर इतर रुपातले गणपती बघायला देखील आवडत नाहीत जसे साईबाबा, शंकर, कृष्ण वगैरे. ते संत, ते देव वेगळे आहेत त्यांना वेगळेच राहू द्या. आमचा गणोबा आम्हाला त्याच्या रुपामुळेच प्रिय आहे त्याला तसाच राहू द्या.

कर्नलतपस्वी's picture

10 Sep 2022 - 9:41 am | कर्नलतपस्वी

आपल्या मताशी १००% सहमत.

काहीही म्हणा पारंपारिक, सुखासनावर बसलेल्या मुर्तीच आवडतात. मुर्तींचे विडंबन अजीबात पटत नाही. खेडकर,खटावकर यांच्या मुर्तीचा मनावर पगडा आहे.

दगडूशेठ गणेश मंडळ पुण्यातील मोठे प्रस्थ ते सुद्धा सेलिब्रिटी बोलावतात पण आचरटपणा नसतो. भक्तानी बाप्पास भक्तिभावाने वाहिलेल्या फुल ना फुलाच्या पाकळीचा भक्व्यतासाठीच व्यवस्थित विनियोग होतो.

पर्यावरण ही काळाची गरज आहे पटते पण यावरही आपणच मात करायला हवे.

लहानपणी पुण्यातील गणपती बघायला येत असू. मुली,आया,बाया सुद्धा बरोबर असायच्या पण कुठलेच अश्लील, अभद्र प्रकार दिसून येत नव्हते.

दोनहजार सात मधे बायको आणी तरूण मुलींना घेऊन उत्साहात गणपती पहायला निघालो पण सर्व प्रकार पाहून पुन्हा गणपती पहायला येणार नाही अशी शपत घेतली.

आपले लेखन जरूर वाचायला आवडेल ,वाचल्यावर प्रतिसाद नक्कीच देईन.
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

कंजूस's picture

10 Sep 2022 - 9:42 am | कंजूस

आमच्या लहानपणी खेळ आणि स्पर्धा घेतल्या जात. ती एक संधी असे.
परवा एका मुलाखतीत नेहा राजपालने चार गाणी गायली सहज. आणि " गणपती उत्सवातूनच लहान कलाकार पुढे येऊ शकले" म्हणाली.

आमच्याकडे काल नगरसेवकाने डीजे लावला होता.मिरवणूक होती.त्याचेच गुणगान, बाप्पा कुठेच नव्हता.दोन‌ वर्ष छान शांतता होती.

मुक्त विहारि's picture

10 Sep 2022 - 9:58 am | मुक्त विहारि

हे आता पटायला लागले आहे ...

लहानपणी, डाॅन, कुर्बानी, हरे रामा हरे कृष्णा, मधील गाणी असायची आणि आता झिंगाट ....

गणपतीला काय काय भोगावे लागत आहे ....

टर्मीनेटर's picture

10 Sep 2022 - 10:09 am | टर्मीनेटर

स्मरणरंजन आवडले 👍

कर्नलतपस्वी's picture

10 Sep 2022 - 10:36 am | कर्नलतपस्वी

मुवी,भक्ती,कंजुस प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

आता विसाव्याचे क्षण
माझे सोनियाचे मणी
सुखे ओवीत ओवीत
त्याची ओढतो स्मरणी

आयुष्याची आता
झाली उजवण
येतो तो क्षण अमृताचा"
-कवी बाकीबाब

या प्रमाणे संथ आयुष्य चालू आहे. त्यामुळे आराम खुर्चीवर बसतो,काहीतरी वाचतो,लिहीतो. मुली ,भाचरे डुल्या मारूती म्हणतात. दुपारच्या डुलक्या इथेच घेतो.
आपण सर्व प्रतिसाद देता मस्त वाटते.
कधी भीतीही वाटते की मिपाकर म्हणतील या म्हातार्‍याला काही काम नाही कैच्याकै खरडतो व इथे डकवतो.
क लो आ

ता क -म्हातारा न इतका

मुक्त विहारि's picture

10 Sep 2022 - 11:06 am | मुक्त विहारि

तुम्ही मनापासून लिहीता ...

:)
म्हातार्‍याला काही काम नाही कैच्याकै खरडतो
तुमच्यासारख आनंदी म्हातारपण मला लाभो!

अनुस्वार's picture

10 Sep 2022 - 12:43 pm | अनुस्वार

एकदम बरोबर‌.

अनुस्वार's picture

10 Sep 2022 - 12:43 pm | अनुस्वार

या लेखाची गंमत म्हणजे दर एक ओळ वाचली की आमच्या लहानपणातला (सुमारे १५ वर्षे आधीचा) गणेशोत्सव आठवायचा. त्यामुळे एकूण दोन गणेशोत्सवांची सैर घडली. मान्य करायला कितीही त्रासदायक वाटत असलं तरी या उत्सवाचं मांगल्य हरवलंय हे मान्य करण्यावाचून गत्यंतर नाही.

रंगीला रतन's picture

10 Sep 2022 - 2:19 pm | रंगीला रतन

छान!

चौथा कोनाडा's picture

10 Sep 2022 - 8:48 pm | चौथा कोनाडा

सुंदर आठवण!
ते दिवसच वेगळे होते.

माझी आई तिच्या बालपणीची आठवण सांगायची, आमच्या गावातल्या बाल मेळ्यांची.. काळ १९५५ ते १९६० च्या दरम्यान च्या, ऐकून हरकायला व्हायचे. आईचे बोलणे ऑडियो रेकॉर्डिंग करायचे राहिले याचे अजूनही वाईट वाटतं.

जुने ते सोने... शेवटी ... कालाय तस्मै नमः !

स्वराजित's picture

15 Sep 2022 - 2:07 pm | स्वराजित

काका असेच छान लिहित राहा.

कर्नलतपस्वी's picture

15 Sep 2022 - 3:39 pm | कर्नलतपस्वी

चौको,रंर,स्वराजित,अनुस्वार प्रतीसादाबद्दल धन्यवाद.

Nitin Palkar's picture

15 Sep 2022 - 6:45 pm | Nitin Palkar

खूपच सुंदर स्मरणरंजन. कर्नल साहेब हे साताऱ्यातील वर्णन आहे का? तुम्ही लेखात गावाचं नाव नमूद केलं नाही म्हणून विचारलं....

सतिश गावडे's picture

15 Sep 2022 - 8:42 pm | सतिश गावडे

मात्र शेवटपर्यंत गावाचे नाव खुबीने लपवलेत:)
सुरुवातीला कोकणातील गाव वाटले मात्र भीमा नदीचा काठ वाचून तो कयास चुकीचा ठरला :)

कर्नलतपस्वी's picture

15 Sep 2022 - 9:48 pm | कर्नलतपस्वी

आमचं गाव राजगुरुनगर, हुतात्मा शिवराम हरी राजगुरु यांचे जन्मस्थान.

एक आठवण, लहानपणी वरच्या आळीतील मुलांशी भांडण झाले म्हणून आपला खालच्या आळीचा वेगळा गणपती बसवायचा ठरवले. वर्गणी लोकांनी आगोदरच मुख्य गणपतीला दिल्याने आम्हाला आंगठा दाखवला.

मग शेतातली काळी माती आणली. फुकटची म्हणून हवरटा सारखी भरपूर आणली चार फुट उंच मुर्ती बनवली. पन्नास किलोची, ओली,मग घरात चुली पाशी वाळायला ठेवली. शाळेकरता रंगपेटी घेतलेली सर्व मित्रांनी आणून रंग द्यायचा प्रयत्न केला. जड मुर्ती कशीबशी बसवली पण विसर्जन करताना मात्र सगळ्यांच्या चड्डया ढुंगणावर फाटल्या.
पण जिद्द पुर्ण झाली.

आमचं गावपण कोकणातल्या गावासारखचं निसर्गाच्या कुशीत बसलेलं पण आता सिमेंट च जंगल झालयं.

सतीश, नितीन प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

सौन्दर्य's picture

15 Sep 2022 - 11:17 pm | सौन्दर्य

तुमचा लेख अतिशय आवडला, त्या निमित्ताने १९७६ साली आम्ही आमच्या बोरिवलीतल्या सोसायटीत पहिल्यांदा बसवलेल्या गणपतीचे स्मरण झाले. त्यात अनेक गमतीजमती घडल्या, अवघड प्रसंग ओढवले पण बाप्पाने सर्व काही सांभाळून नेलं. आजही त्या आठवणींनी हुरहुरायला होतं. खूप दिवसांनी त्या अनुभवांवर लिहू म्हणतो. प्रेरणा स्त्रोत्र बनल्याबद्दल कर्नल साहेब आभार.

कर्नलतपस्वी's picture

16 Sep 2022 - 6:32 am | कर्नलतपस्वी

सौदंर्या,धन्यवाद. स्मरणरंजन एक मस्त विरंगुळा आहे.जरूर लिहा वाट बघतोय.

विवेकपटाईत's picture

16 Sep 2022 - 8:46 am | विवेकपटाईत

जुने दिवस सर्वत्र सारखेच होते. गेलेला काळ परत येत नाही. आपल्या सर्व सणांत विकृती आपणच आणली आहे. उत्सवांचा बाजार केला. दोष आपलाच.

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Sep 2022 - 10:37 am | ज्ञानोबाचे पैजार

स्मरणरंजन आवडले,
गणेशोत्सवाचे सध्याचे स्वरुप बदलले पाहिजे हे नक्कीच,
पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

16 Sep 2022 - 1:29 pm | कर्नलतपस्वी

विवेक पटाईत,माऊली मनापासून आभार.

कर्नलसाहेब, भूतकाळातील आठवणी छान जागवल्यात.
त्या काळात सेलिब्रिटी बोलतात/सान्गतात्/पढवतात त्याप्रमाणेच करावे हे बन्धनही नव्हते आणि सेलिब्रिटीसुद्धा (जसे खुद्द लोकमान्य टिळक) - इतरान्कडून "हे तुम्ही लोकाना पढवा" असे सान्गितलेले - वाटेल ते पढवत नव्हते , म्हणजेच Brand Ambassador वगैरे बनून कमाई करून घेण्याची सन्धी साधत नव्हते.
दगडूशेठ गणेश मंडळ भले कितीही चान्गले असो, अनेक प्रकारे अनेक गणपतीन्बद्दल हे पढवले जाते की "तो(च) गणपती पावतो आणि म्हणून त्याचे दर्शन घेतलेच पाहिजे". जर सगळ्याच गणपतीन्ची व्यवस्थित प्राणप्रतिष्ठा केली जाते, तर अमुक एका गणपतीचे दर्शन घेतलेच पाहिजे हा अट्टाहास देखील का असावा?

कर्नलतपस्वी's picture

18 Sep 2022 - 8:58 am | कर्नलतपस्वी

आहो मोघे साहेब ही प्रत्येकाची श्रद्धा आहे. कुणी लालबागचा राजा,कुणी दगडूशेठ, कुणी साईबाबा कुणी बालाजी अशी अनेक श्रद्धास्थान आहेत. भक्त आणी व्यवस्थापक याचा प्रचार करतात. आता प्रत्येक गोष्टीत बाजार झालाय. गणपतीची मुर्ती आणताना सुद्धा ही कसबा ही दगडूशेठ अशीच विकली व खरेदी केली जाते.

आमच्या सारखे घरीच टाळ्या वाजवत बसतात.

तरीसुद्धा ही मंडळे जे काही विधायक कार्य करता आहेत त्याचे समर्थन केलेच पाहीजे. असे माझे मत आहे.

प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

कर्नलतपस्वी's picture

18 Sep 2022 - 9:06 am | कर्नलतपस्वी

गणपतीन्बद्दल हे पढवले जाते की "तो(च) गणपती पावतो आणि म्हणून त्याचे दर्शन घेतलेच पाहिजे"

एकदम सहमत. हे प्रत्येकाच्या सदसद्विवेकबुद्धीवर अवलंबून आहे यातून काय घ्यावे अन् काय नाही.

देव पावणे ही संकल्पनाच मुळात बाजारीकरणा कडे नेणारी,एक व्यवहार वाटतो.अर्थात हा एक वेगळाच मोठा विषय आहे यावर सांगोपांग विचार जरी झाला तरी मतमतांतरे परस्पर विरोधीच दिसतील.

नागनिका's picture

20 Sep 2022 - 1:34 pm | नागनिका

सुंदर आठवणी..!!
प्रत्येक पिढी अशा आठवणींवर जगत असते..