अगदी साधं गाव होतं ते. लोकसंख्या कशीबशी २०००. गावात कुणी जास्त शिकलेलं नव्हतं, साहजिकच पन्नासेक पोरं तेव्हढी जवळच्या शहरात कामगार म्हणून राहायची. बाकी बराचसा गाव मळ्यांमध्ये राहायला गेलेला. मळ्यात प्यायला विहीरीचं पाणी होतं अन् आकडे टाकायला लायटीची तार पण. गावात शंभरेक घरं अजूनही होती. झेड. पी. च्या शाळेच्या पाच खोल्या (बालवाडी + चौथी) पोरांच्या शिक्षणासाठी कमी आणि लग्नाची बुंदी ठेवायला जास्त कामी येत. पाच वर्षांपूर्वी शिक्षण विभागाने एक नवीन खोली बांधून दिली - संगणक प्रशिक्षणासाठी. त्यात एक भारी टी.व्ही. पण आहे असं काहीजण सांगायचे. विजेची जोडणी नाही म्हणून त्या खोलीला टाळं आहे. पण गावातल्या लहानग्यांना लपंडावात लपायला एक नवीन जागा मात्र झाली.
गावात खास बसायला म्हणून पार नाही. पण त्याची उणीव कधी गावकऱ्यांना भासली नाही. कारण रामदास स्वामींच्या काळातले मारूतीचे मंदिर. खो-खो आणि कबड्डीचं निदान एक मैदान सहज मावेल इतकं भव्य बांधकाम होतं देवळाचं. त्यात देवाचा गाभारा १०×१० फुटाचा फक्त. बाकी सगळी पडवी, छतासहित. बाहेरच्या दोन प्रशस्त ओट्यांवर दोन चिंचांचे गर्द आच्छादन होते. पाऊस सुद्धा ते आच्छादन कधीतरीच पार करू शकत असे. गावात एक पिठाची गिरणी आणि एक किराणा दुकान होतं. गावात तसं म्हणायला गेलं तर गोकुळ नांदत होतं. सारा गाव दिवसभर शेतात राबायचा आणि दिवस मावळतीनंतर तासाभरात अंथरूणात पडायचा. गावात मराठा, वंजारी, महार असे सगळे मिळून राहायचे. जाती त्यांच्या मनात होत्याच पण ती जात कधी जगण्यात उतरली नाही. गावाबाहेरच्या माणसाला कुणाची जात कळूच नये इतकं त्यांचं जगणं समरुप झालेलं होतं. महारांच्या घरात बाबासाहेबांच्या तसबीरी नव्हत्या आणि मराठ्यांच्या घरात शिवरायांच्या. त्या दिखाऊपणाची गावाला कधी गरजच भासली नाही. संन्यास न घेताही सारा गाव सफल योग्याचं जीवन जगत होता. शांती आणि समाधान पैशांपेक्षा कैक जास्त होतं तिथे. चांगल्या गोष्टींना दृष्ट लागते म्हणतात. तसंच काही झालं की काय कुणास ठाऊक. पण गावाचं चित्र लवकरच पालटणार होतं.
---
शाळेच्या भिंतीला खेटून उभ्या राहिलेल्या त्या कामचलाऊ टपरीजवळ सदाशिवाने मंदिरात बसलेल्या सगळ्या बुजुर्ग मंडळींना गोळा केले. एक आरोळी पटांगणात दिसणाऱ्यांसाठी ठोकली. "आवरून घ्या बाबांनो लवकर. लायटीचा टायमिंग आज सहा वाजोस्तवरच हाये", कुणीतरी सुचवलं. 'बजरंग बली की जय' म्हणत सदाशिवाने नारळ फोडला आणि गावात आणखी एका नव्या व्यवसायाची भर पडली - राजे पान शाॅप.
या नव्या व्यवसायाला आता गरज होती ती ग्राहकांची. कदाचित नशा हा एकच व्यवसाय असा असावा जिथे अर्थशास्त्रातलं 'मागणी तसा पुरवठा' हे तत्व उलटं चालतं. नशेचा पुरवठा बिनदिक्कत होत असेल तर मागणी वाढतेच वाढते. गावातली मंडळी मात्र आता कुणी नसलं तर टपरीवाला सदाशिव आहे गप्पा मारायला यातच समाधानी होती. जिथं पूर्वी सुपारी, प्रक्रिया न केलेल्या तंबाखूचा पाला आणि चार-पाच जण लावायचे ती तपकीर यांव्यतिरिक्त बाकी सगळ्या फक्त चांगल्या गोष्टी उपलब्ध होत्या तिथं आता सुगंधित सुपारी, गायछाप जर्दा सहज मिळू लागली. शाळेत जाणाऱ्या पोरांच्या हातात कधी रूपया पडला तर आता त्याला खायच्या गोड चाक्लेट पेक्षा थुंकायच्या वासाच्या सुपारीचं जास्त आकर्षण वाटू लागलं.
एमआयडीसीत काम करणारी पोरं गावात आली अन् गावातली ही नवी 'सोय' पाहून त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. खाडखाड आवाज करणाऱ्या मशनींच्या गर्दीत रात्रपाळी करताना या तरुणांना कसल्या व्यसनाने गाठलं नाही तर नवलच. भाड्याची खोली, तिथे दाटीवाटीने राहणारे दोन जास्तीचे मित्र, ढोर मेहनत करून हातात येणारा मोजकाच पैसा आणि जगण्यासाठी परिस्थिती कशी नसावी याची यादी केली तर स्वत:ची रोजनिशी तयार व्हावी, असं आयुष्य जगताना या पोरांना दहा रुपयांच्या पुडीत मेंदूला तंद्रीत ठेवणारं काहीतरी सापडलं. गुटखाबंदीच्या नाकावर टिच्चून मावा आपलं साम्राज्य पसरवत होता. १२०×३००, ३६५×४५० अशा विविध नावांनी ही कीड तरूणांत शिरकाव करत होती. पण गावाकडे आलं की मग मात्र ही पोरं 'कोरडी' रहायची. शहरातून मावा विकत आणता आला असता पण तरूणांना अजूनही गावातल्या मोठ्यांचा धाक होता. मात्र आता खास गावचीच एक पानटपरी झालीये म्हटल्यावर सगळ्या अडचणी एका झटक्यात मिटल्या. या शहारातून आलेल्या पोरांची आणि सदाशिवाची गाठ पडल्यापासूनच्या चौथ्या दिवशी गावात मावा उपलब्ध झाला. गावाला पहिली वाळवी लागली होती.
---
सांजवेळी माणसं छान गप्पा मारायची ओसरीवर बसून. घरातल्या आयाबाया चुलीवर भाकरी भाजताभाजता या गप्पांमध्ये भाग घ्यायच्या. स्त्री-पुरुष समानतेसारख्या पुस्तकी संज्ञा अजून गावात आल्या नव्हत्या पण गावात सगळ्या माणसांना सारखाच मान मिळायचा. तिकडे देशात एक क्रांती जन्म घेत होती. 'तिकड'चा देश अशासाठी की शाळेत म्हटलं जाणारं राष्ट्रगीत सोडलं तर इतर कुठल्याही राष्ट्रीय गोष्टींशी गावचा अर्थाअर्थी काहीही संबंध यायचा नाही. तर देशात आता दूरसंचार क्रांतीचे वारे वाहू लागले होते.
'करलो दुनिया मुठ्ठी में' म्हणत दुनियेऐवजी एक छोटं यंत्र लोकांच्या हातात आलं - मोबाईल. नेहमीप्रमाणे शहरात रुळल्यानंतर हे यांत्रिक खोकं गावाकडे तुरळक दिसू लागलं. पण पुढे हा मोबाईल केवळ संवाद सुकर करणारा बदल राहणार नव्हता. मागच्या सहा-सात वर्षांत गावात मोजून दोन-चार बदल झालेत: माणसांची वयं वाढली, पटांगणातले दोन विशाल कडुलिंब वाळवीने पोखरले आणि मोबाईलची नवनवीन, स्वस्त पण प्रगत माॅडेलं गावात आली. फेसबुक, व्हाॅटस् ॲप म्हणजे गावचे नवे पार झाले. अगदी गावकुसालगतच्या शेतात राबणारी माणसं गावात होणाऱ्या गप्पांमध्ये सहभागी होऊ लागली.
गावातले जुन्या वळणाचे बुजुर्ग सोडले तर जवळपास सर्वच पुरूष आणि तरूणींच्या हातात मोबाईल आणि त्यातलं मुठभर जग आलं. तिकडच्या भारतात काय होतंय हे गावाला 'लाईव' दिसू लागलं. गावातल्या मारूतीच्या देवळात माथा टेकवण्यापेक्षा हनुमानाचा फोटो शेअर करणे हीच खरी भक्ती हा नवा अध्यात्म मार्ग गावाला सापडला होता. बरं यावर शंका घ्यावी तर तो फोटो अगोदरच लाखभर जणांनी शेअर केलेला, मग आपण कोण संशय घेणारे? गावचा मारूती गावकऱ्यांना पारखा झाला. मंदीर जवळपास 'ऑफलाईन' गेल्यात जमा झालं. वाढदिवसानिमित्त जवळच्या शहरातून केक आणून भावाच्या वाढदिवसाला होणारा गावाचा जल्लोश फेसबुकच्या वाॅलवरुन गावातल्या जमिनीवर आलाच नाही.
कुणी 'शिवबाचा कट्टर मावळा' झाला तर कुणी 'भीमाचा सच्चा सैनिक' तर कुणी इतर काही. माणूस या नामाला आता अशा विशेषनामां शिवाय काही अर्थच उरला नाही. स्वत:चे अतिसंपादित (over edited) बटबटीत फोटो आणि त्यासोबत आपल्या सात पिढ्यांची कारकीर्द एकत्र केली तरी जी अतिशयोक्तीच भासेल असा मजकूर यांचं गावात स्तोम माजू लागलं. अर्थात नेहमीप्रमाणे हे सगळं वारं शहरातून गावाकडे वाहत आलं होतं. या वाऱ्याने गावातलं काय-काय भुईसपाट होणार याचा आत्ताच अंदाज लावणं कठीण आहे. पण गाव संपत चाललंय हे नक्की.
वाचने
16930
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्तच लिहिलय प्रखर वास्तव,
धन्यवाद.
In reply to मस्तच लिहिलय प्रखर वास्तव, by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
छान लिहिलंय
सकारात्मक कमीच आहेत पण.
In reply to छान लिहिलंय by तर्कवादी
हूरहूर छान व्यक्त केली आहे.
यावरून असं वाटलं की,
In reply to हूरहूर छान व्यक्त केली आहे. by श्रीगणेशा
पहिला भाग वाचताना छान वाटत
नेतृत्व आणि गाव
In reply to पहिला भाग वाचताना छान वाटत by Bhakti
बहुतेक गांवात सध्या संडास
असं कसं
In reply to बहुतेक गांवात सध्या संडास by साहना
साहनाजी आणि सुबोधजी
In reply to असं कसं by सुबोध खरे
अनुस्वार,
In reply to साहनाजी आणि सुबोधजी by अनुस्वार
शहरातील समाज मुळातच विखुरलेला
In reply to साहनाजी आणि सुबोधजी by अनुस्वार
शिक्षण ह्या विषयावर तुम्ही
In reply to साहनाजी आणि सुबोधजी by अनुस्वार
ह्यातील हुशार मंडळी एका दोन
In reply to शिक्षण ह्या विषयावर तुम्ही by साहना
सुलभीकरण नको.
In reply to शिक्षण ह्या विषयावर तुम्ही by साहना
त्याचे दुसरे एक कारण म्हणजे
In reply to शिक्षण ह्या विषयावर तुम्ही by साहना
दिव्य विचार
In reply to शिक्षण ह्या विषयावर तुम्ही by साहना
नेमकं
सहमत आहे .....
सही लिहिलंय ! +१
'देउळ' सारखंच बघा.
In reply to सही लिहिलंय ! +१ by चौथा कोनाडा
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
लेख आवडला अनुस्वार
हे सगळंच बाकी आहे. :-)
In reply to लेख आवडला अनुस्वार by जेम्स वांड
कीर्तन ते कार्टुन......
सगळं गाव फिरवून आणलं तुम्ही.
In reply to कीर्तन ते कार्टुन...... by कर्नलतपस्वी
गड्या आपुला गाव बरा?
अगदी अगदी. पोरे बीए, बारावी
In reply to गड्या आपुला गाव बरा? by अनन्त्_यात्री
मुक्त विहारिंनी बरोबर म्हटले आहे किंवा
In reply to अगदी अगदी. पोरे बीए, बारावी by Trump
अजुन तरी भारतात Q आला नाही.
In reply to मुक्त विहारिंनी बरोबर म्हटले आहे किंवा by अनुस्वार
आणखी लिहावे
नक्कीच.
In reply to आणखी लिहावे by तर्कवादी