मराठी दिन 2021

मराठी दिन 2021

 

देवीला बळी

Primary tabs

पॉइंट ब्लँक's picture
पॉइंट ब्लँक in जनातलं, मनातलं
30 Dec 2020 - 9:24 pm

महाबलीपुरम येथील पल्लवाकालीन गुहेमध्ये कोट्रावै ह्या देवीचं एक शिल्प आहे. हे दुर्गेचं तमिळ रुप मानलं जातं. कधी ती विष्णुदुर्गा स्वरुपात दिसते , म्हणजे ती विष्णुची बहिण म्हणुन विष्णूची आयुधे तिच्याकडे असतात आणि ह्या स्वरुपात ती रेड्याच्या डोक्यावर ती उभी असते. तर कधी तीच्या सोबत सिंह असतो तर कधी काळवीट.

Kotravai

महाबलीपूरमच्या शिल्पात आपण तिच्याभोवती वरच्या बाजुला सिंह आणि काळवीट पहातो. आणि मग लक्ष जातं तिच्या पायशी असलेल्या दोन व्यक्तींकडे. ते दोघे जे विधी पार पाडत आहेत त्यांची नावे आहेत अरिकंडम आणि नवकंडम. (कंडम पेक्षा खंडंम जास्त सोयिस्कर वाटते मला पण तमिळ उच्चारण जसा आहे तसच लिहिलं आहे). अरीकंडम म्हणजे स्वतःचं मस्तक कापून देवीला अर्पण करायचं आणि नवकंडम म्हणजे म्हणजे आपल्या शरीराचे नऊ अवयव कापून देवीला अर्पण करयाचे.
कोट्रावै ही युद्धाची देवता आहे. युद्धाला जाण्यापूर्वी जेंव्हा देवीची पूजा केली जाई तेव्हा युध्दाच्या उन्मादात आपल्या राज्याला विजय मिळावा म्हणुन सैनिक स्वत:चा बळी देत देवीला. लक्षात घ्यायची महत्वाची गोष्ट ही की हा विधी स्वेच्छेनच केला जाई आणि स्वत:च करावा लागे म्हणजे स्वतःच आपलं मस्तक कापायचं किंवा नऊ अवयव कापयाचे. असे आत्मसमर्पण करनार्‍या सैनिकांच्या कुटुंबाची जबाबदारी राज्य घेत असे. हा पर्याय सैनिकांशिवाय कैदी किंवा मृत्युदंडाची शिक्षा झालेले गुन्हेगार ह्यांनाही प्रायश्चित्त करण्यासाठि उपलब्ध असे.
इतर बळींच्या तुलनेत हा दोन कारणांसाठी श्रेष्ठ वाटतो. सर्वात विषेश म्हणजे इथे स्वतःच्या इच्छापूर्ती किंवा स्वार्थेसाठी बळी दिला जातं नाही आणि दुसरी म्हणजे बळी म्हणुन निष्पाप मुक्या प्राण्याचा किंवा दुसर्या व्यक्तीचा जीव घेतला जात नाही.
प्राचीन मंदिरांमध्ये आपणास जवळ्पास सर्व प्रकारच्या परंपरां दर्शवनारी शिल्पे दिसतात. पशुबळीचं द्रुश्य असलेलं शिल्प माझ्या तरी पहाण्यात आलं नाही. कुणाकडे तसा फोटो असेल तर जरूर प्रतीसादामध्ये टाका. पशुबळीची परंपरा कुठे वा कशी सुरु झाली ह्याची काहि माहिती असेल तर जरुन कळवा. खुप वर्षापूर्वी तुळजापुरला भेट दिली होती तेव्हा तिथे पूजार्यांनी सांगितलेलं पुसटस आठवतय कि तिथे जो बळी दिला जातो तो देवीसाठी नसतो, तो महिषासुरासाठी असतो.
असो आपण आत कोट्रावैची इतर शिल्पे पाहु. तशी ही देवता प्रामुख्याने पल्लवा आणि चोला मंदिरांमध्ये दिसते.

तंजावरच्या बृहदेश्वर मंदिरातील शिल्प.
DSC_0621

इथे ती विष्णुदुर्गा स्वरुपात दिसते.

गंगैकोंडाचोळापुरम
DSC_1016_02

इथे ती अष्टभुजा स्वरुपात सिंहासोबत आहे.

दारसुरम येथिल नितांत सुंदर मुर्ती
DSC_1241

एक क्लोज अप
DSC_1306

चंदन आणि कुंकु वापरुन किती साधा पन सुंदर शृगार केलाय ना? तिच्या डोळ्यातली करुणा पाहुन वाटत नाही कि स्वतःच्या स्वार्थासाठी दिलेल्या एखाद्या निष्पाप मुक्या प्राण्याच्या बळीने ती प्रसन्न होत असेल.

कोट्रावै संबधीत जास्ती माहिती जाणुन घेण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ पाहु शकता
https://www.youtube.com/watch?v=gaPOsaIN6J8&feature=youtu.be

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

नीलस्वप्निल's picture

30 Dec 2020 - 10:12 pm | नीलस्वप्निल

आणी सुन्दर फोटो

पॉइंट ब्लँक's picture

31 Dec 2020 - 9:34 am | पॉइंट ब्लँक

धन्यवाद -_/\_

श्रीगुरुजी's picture

30 Dec 2020 - 10:39 pm | श्रीगुरुजी

कोणताही देव, देवता कधीच प्राणीपक्षांचा बळी मागत नाही, बळी दिल्याने प्रसन्न होत नाही व बळी न दिल्याने कोपत नाही. माणसाने आपल्या जिव्हालौल्यासाठी प्राणीपक्षांची हत्या करताना स्वत:हून देवीदेवतांना भागीदार बनविले आहे. कदाचित हत्या करताना मनात निर्माण झालेली अपराधी भावना कमी करण्यासाठी असावे.

पॉइंट ब्लँक's picture

31 Dec 2020 - 9:38 am | पॉइंट ब्लँक

कदाचित हत्या करताना मनात निर्माण झालेली अपराधी भावना कमी करण्यासाठी असावे.

हा षटकार आहे. भारी आपल्या पापात देवाला भागिदार बनवलं की आपल्याला दंड नाही :)

गामा पैलवान's picture

30 Dec 2020 - 11:03 pm | गामा पैलवान

पॉइंट ब्लँक,

बळी देवीला नसून तिच्याखालच्या राक्षसाला दिलेला असतो हे मी ही ऐकलंय. बळीसंबंधी एक स्वानुभव विदित करावासा वाटतोय.

आमच्या घरच्यांचं कुलदैवतास जाणंयेणं नुकतंच सुरू झालं होतं. त्याचे कुलाचार वगैरे फारसे माहित नव्हते. एके दिवशी आम्ही जरा घाईतच दर्शन केलं. नंतर गुरवाला कोंबड्याच्या बळीसाठी म्हणून पैसे दिले. बळी दिल्यावर फोन करून कळवायला सांगितलं. निघतांना कुलदैवतास मनोमन प्रार्थना केली की तुला बळी हवा असेल तर गुरवाला सद्बुद्धी दे. आणि बळी नको असेल तर गुरवाकडे पैसे राहूदेत. गुरवाचा फोन काही आला नाही. आम्हांस आमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. परत कधी बळी द्यावासा वाटला नाही, दिला नाही, गावातलेही कोणी बळी देत नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

प्रकाश घाटपांडे's picture

31 Dec 2020 - 9:24 am | प्रकाश घाटपांडे

चला गुरवाला सुबुद्धी जशी दिली तशी तुम्हा आम्हा सर्वांना देवो

पॉइंट ब्लँक's picture

31 Dec 2020 - 1:06 pm | पॉइंट ब्लँक

चला गुरवाला सुबुद्धी जशी दिली तशी तुम्हा आम्हा सर्वांना देवो

+१

पॉइंट ब्लँक's picture

31 Dec 2020 - 9:52 am | पॉइंट ब्लँक

तुमचा अनुभव ऐकुन आनंद झाला.

बळी देवीला नसून तिच्याखालच्या राक्षसाला दिलेला असतो हे मी ही ऐकलंय.

माझं ह्या बाबतीत असं मत आहे ( त्याला कुठलाही पौराणिक संदर्भ नाही त्यामुळे ते फक्त वैयक्तिक मत आहे) राक्षसासाठी बळी देण्याच्या विधिचा दुहेरी उपयोग केला आहे. पहिला सहिष्णुता- तो राक्षस जरी असला आणि त्याच्या असुरी प्रवृत्ती जरी निंदनिय असल्या तरी वर्षातून एक दिवस का होईना त्याला त्याचं जेवण दिलं जाईल. आणि दुसरं असा बळी देण हे राक्षसी प्रवृत्तीचं द्योतक आहे हे ही सुचवायचं असेल. आणि इथे बहुतेक संपूर्ण वर्षातुन एकाच प्राण्याचा बळी दिला जात असेल. त्यात येणारा प्रत्येक भक्त बळी देतोय अस नसावं कदाचित.
एक मुका प्राणी मारण्याऐवजी त्याला खाउपिऊ घालुन त्याचा मायेनं आयुष्यभर सांभाळ जर केला तर देवी नक्कीच जास्त प्रसन्न होईल.

श्रीगुरुजी's picture

31 Dec 2020 - 11:43 am | श्रीगुरुजी

>>> एक मुका प्राणी मारण्याऐवजी त्याला खाउपिऊ घालुन त्याचा मायेनं आयुष्यभर सांभाळ जर केला तर देवी नक्कीच जास्त प्रसन्न होईल.

+ १

सुरेख लेखन आणि उत्तम माहिती.
काही वीरगळांवर आत्मबलिदानाचे (स्वतःचे मस्तक स्वतःच्या हाताने कापण्याचे) प्रसंग कोरलेले आहेत. मला वाटतं असा वीरगळ मंगळवेढ्यात आहे. कर्णाटकात तर विपुल आहेत.
बाकी थेट पशुबळींची अशी नाही मात्र शिकारीची दृश्यं बर्‍याच ठिकाणी कोरलेली आहेत. शिकार करताना, पशुला आडव्या बांबूवर बांधून आणताना हे पुष्कळ ठिकाणी आहेत.

पुण्यात बाणेरला बाणेश्वर लेणीत बलिवेदी आहे. चौकोनी आकाराच्या दगडावर चारही बाजूंना बकर्‍याची मस्तके कोरलेली आहेत. त्या दगडावर प्राचीन काळी अजबली करत असत.
a

पॉइंट ब्लँक's picture

31 Dec 2020 - 9:54 am | पॉइंट ब्लँक

धन्यवाद, खुप सुंदर माहिती दिलित.

त्या दगडावर प्राचीन काळी अजबली करत असत.

हा वर्षातुन किती वेळेस केला जाई आणि कोण करत ह्याबद्दल काही माहिती आहे का?

प्रचेतस's picture

31 Dec 2020 - 10:09 am | प्रचेतस

हा वर्षातुन किती वेळेस केला जाई आणि कोण करत ह्याबद्दल काही माहिती आहे का?

ह्याबाबत निश्चित अशी माहिती नाही पण यज्ञाच्या वेळेस, किंवा खंडेनवमी, प्रत्येक महिन्याची पौर्णिमा, अमावास्या असे काही खास दिवस असत बळीप्रथेचे.

पॉइंट ब्लँक's picture

31 Dec 2020 - 10:25 am | पॉइंट ब्लँक

माहितीबद्दल खुप धन्यवाद. :)

अजय देशपांडे's picture

1 Jan 2021 - 3:21 pm | अजय देशपांडे

मी मंगळवेढ्यात राहतो तो विरगळ कुठे आहे सध्या ?

त्याचं स्थान नक्की माहीत मला, ऐकले मात्र होते.

अश्वं नैव गजं नैव व्याघ्रं नैव च नैव च
अजापुत्रं बलिं दद्द्यात देवो दुर्बलघातकः

पॉइंट ब्लँक's picture

31 Dec 2020 - 10:04 am | पॉइंट ब्लँक

ह्या सुभाषिताची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद. ह्या सुभाषित कुठल्या धर्मग्रंथ किंवा पुराण/उपनिषद ह्यामधुन आला आहे ह्याची माहिती आहे का? आणि हा नक्की किती पुरातन आहे? ह्यात दुर्बल प्राण्याचा बळी दिला जातो असं म्हंटल आहे, बळी द्या असं सुचवलं नाही. तसच बळी जेंव्हा दिला जातो तेंव्हा वर्षातुन फक्त एकच प्राणी बळी दिला जातो की येणार्या प्रत्येक भक्ताला पशुचा बळी चढवायाची परवानगी आहे हा सुद्धा एक मुद्दा आहे.

हा श्लोक जास्त पुरातन नसावा. निश्चितच वैदिक धर्माच्या अस्तानंतर असावाच.
अश्वं नैव- अश्व नाही. पण अश्वाचे हवन अश्वमेध यज्ञात होत होते. सातवाहन, गुप्तांनी पण अश्वमेध केले होते.

पॉइंट ब्लँक's picture

31 Dec 2020 - 10:27 am | पॉइंट ब्लँक

अश्वं नैव- अश्व नाही. पण अश्वाचे हवन अश्वमेध यज्ञात होत होते. सातवाहन, गुप्तांनी पण अश्वमेध केले होते.

एकदम बरोबर. अश्वमेधाच्या काही प्रथा इतक्या विचित्र आहेत की ग्रिफित ने त्या आपल्या भाषांतरातुन वगळल्या होत्या अस कुठतरी वाचल्याचं आठवतयं

प्रचेतस's picture

31 Dec 2020 - 10:43 am | प्रचेतस

राजाची पत्नी व मृत घोडा ह्यांचा मैथुनप्रसंग यात विहित असे. मात्र तो केवळ मिथ्या संभोग (mimic copulation) असे.

बाप्पू's picture

31 Dec 2020 - 9:59 am | बाप्पू

मस्त माहिती आणि फोटो.

पॉइंट ब्लँक's picture

31 Dec 2020 - 10:05 am | पॉइंट ब्लँक

धन्यवाद __/\__

प्रचेतस's picture

31 Dec 2020 - 10:40 am | प्रचेतस

पशुबळीची परंपरा कुठे वा कशी सुरु झाली ह्याची काहि माहिती असेल तर जरुन कळवा

पशुबळीच्या परंपरेचे मूळ वैदिक धर्मात आहे. विविध यज्ञात होणार्‍या पशूंच्या हवनाचे सविस्तर वर्णन महाभारतात आहे तर ते यजुर्वेदात विस्ताराने आलेले आहे.

काही यज्ञांची यजुर्वेदातील वर्णने अशी:

पंचशारदीय- हे याग शरद ऋतूंत करावयाचे असतात. पहिल्या वर्षाच्या शरद ऋतूंत एकेक वर्षाच्या १७ कालवडी व १७ खोंड देवतांना बळी देतात असे हे याग सलग ५ वर्षे करतात. त्यात खोंड मोकळे सोडतात व हवन फक्त कालवडींचे, शेवटच्या पाचव्या वर्षी ओळीने पाच दिवस अग्नीष्टोम, उक्थ्य, उक्थ्य, उक्थ्य अणि अतिरात्र हे सोमयाग त्यातही पहिल्या चार उपयागात ओळीने ३/३ कालवडी ओ पाचव्या अतिरात्रात ५ कालवडी मारायच्या (एकूण १७) व १७ खोंडे सोडून द्यायची.

इंद्रस्तुत- ह्याचा विधीही काहीश्या पंचशारदीय पद्धतीनेच होत असे. इंद्राची स्तुती हे मुख्य कारण

अश्वमेध - चौघे ऋत्विज अश्वमेध्याच्या विजयी घोड्याला उत्कृष्ट रितीने पाणी शिंपून धुवून काढतात. घोड्याबरोबर एक कुत्रे पाण्यात सोडण्यात येई व त्याचा मुसळांनी चोपून वध करण्यात येई. पशूंना बांधण्यासाठी एकवीस यूप तयार करण्यात येत. ह्यात वीस यूपांना प्रत्येकी ९ असे १८० पशू बांढण्यात येत व शेवटच्या मुख्य युपास अश्व बांधण्यात येई. या १८० पशूंना मारण्यात येई. पशूवधातील प्राण्यांमध्येही आरण्यक आणि ग्राम्य असे दोन गट असत. आरण्यक (रानटी- हिंस्त्र पशू)वर्गातील प्राण्यांना काही विशिष्ट संस्कार करुन सोडून देण्यात येई. तर ग्राम्य (गावातले गाय, बैल, रेडा, म्हैस, मेष) इत्यादी प्राणी मारण्यात येत.
घोड्याला मारावयास नेताना एक घोडी पुढे चाललेली असते. बळी देताना एका लोकरीच्या वस्त्रावर एक कातडे अंथरावयाचे व त्यावर रुप्याचा पत्रा ठोकावयाचा व घोड्यास त्यावर आडवा पाडूनमारावयाचा. घोड्यासोबत एक गायही मारण्यात येत असे.

राजसूय - ह्यातही कित्येक पशूंचे हवन करण्यात येत असे. काही राजे तर इतर राजांना जिंकून त्यांचे हवनही करत असत.

महाभारतात षोडशराजकीय आख्यानात रंतीदेव राजाकडे होत असलेल्या यज्ञाचे वर्णन कसे आले आहे ते पाहा

उपस्थिताश्च पशवः स्वयं यं शंसितव्रतम्|
बहवः स्वर्गमिच्छन्तो विधिवत्सत्रयाजिनम|

नदी महानसाद्यस्य प्रवृतक्ता चर्मराशितः|
तस्माच्चर्मण्वती नाम ख्याता पुण्या सरिद्वरा॥

व्रताचा अंगिकार केलेल्या आणि यज्ञसत्र योग्य पध्दतीने करणाऱ्या त्या राजाकडे स्वर्गाची प्राप्ती करून घेऊन इच्छिणारे अनेक पशु आपण होऊन येत. त्याच्या पाकगृहात साठलेल्या पशूंच्या कातड्याच्या ढिगापासून एक नदीच निर्माण झाली आणि म्हणून त्याच्या अग्निहोत्रात हीच चर्मण्वती नदी वाहत होती.

व्यक्तं वस्वोकसारेयमित्युचुस्तत्र विस्मिताः।
साङ्कृते रन्तिदेवस्य यां रात्रिमतिथिर्वसेत्॥

आलभ्यन्त तदा गावः सहस्राण्येकविंशतिः।
तत्र स्म सूदाः क्रोशन्ति सुमृष्टमणिकुण्डलाः॥

सूपं भूयिष्ठमश्नीध्वं नाद्य मांसं यथा पुरा।
रन्तिदेवस्य यत्किञ्चित्सौवर्णमभवत्तदा॥

सांकृती रंतिदेवाच्या घरी ज्या रात्री अतिथी वास्तव्य करत असे, त्याच रात्री एक सहस्त्र एकवीस गायी मारल्या जात असत. रत्नजडित कुंडले धारण केलेले तेथील आचारी मोठ्याने ओरडत की 'आज पूर्वीइतके मांस शिल्लक नाही तेव्हा शाकाहारच करा'. त्यावेळी वापरलेल्या रंतीदेवाच्या सर्व वस्तू सुवर्णाच्याच होत्या.

बौद्ध आणि जैन धर्माच्या उदयानंतर यज्ञसंस्थेचा हळूहळू र्‍हास होत गेला. मात्र पशुबळीची ही प्रथा शिल्लक राहिलीच जी आजही अस्तिवात आहेच.

पॉइंट ब्लँक's picture

31 Dec 2020 - 11:15 am | पॉइंट ब्लँक

सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद.

मात्र पशुबळीची ही प्रथा शिल्लक राहिलीच जी आजही अस्तिवात आहेच.

कधीतरी ती संपावी अशी मनापसुन ईच्छा आहे!

श्रीगुरुजी's picture

31 Dec 2020 - 11:43 am | श्रीगुरुजी

>>> कधीतरी ती संपावी अशी मनापसुन ईच्छा आहे!

+१

कानडाऊ योगेशु's picture

31 Dec 2020 - 2:00 pm | कानडाऊ योगेशु

माझ्यामते ह्या श्लोकांचा अर्थ तरी चुकीचा लावण्यात आला असावा. (जसे कोटी चे करोड..वानगीचे वांगी इ.) अथवा हे सारी बळी वगैरे प्रतिकात्मक असावे जसे नारळ फोडणे. कारण गाईला माता मानणारे सुसंकृत आर्य चक्क गायींचाच बळी देतात हे पटत नाही.

प्रचेतस's picture

31 Dec 2020 - 2:21 pm | प्रचेतस

नाही तत्कालीन वैदिक धर्मप्रथांत ह्या गोष्टी प्रचलित होत्याच. तेव्हाच्या बळीप्रथा उलट आत्ता प्रतिकात्मक रुपाने अस्तित्वात आहेत. उदा. बळी देण्याची प्रथा नारळ फोडण्याने घेतली, श्राद्धाच्या मांसाचा नैवेद्य वड्याच्या रुपाने आला.

अनुशासनपर्वात भीष्माने श्राद्धाचे सविस्तर वर्णन केले आहे.
मासे दिल्याने पितरांची २ महिन्यांची तृप्ती होते तर मेंढ्याच्या मांसाने ३, सशाच्या मांसाने ४, बकर्‍याच्या मांसाने ५, रानडुकराच्या मांसाने ६, पक्ष्यांच्या मांसाने ७, हरिणाच्या मांसाने ८, काळविटाच्या मांसाने ९, गव्याच्या मांसाने १०, रेड्याच्या मांसाने ११ तर गाईच्या मांसाने पितर १२ महिने तृप्त राहतात.

वाल्मिकी रामायणात सीता वनवासास जाताना गंगेची प्रार्थना करते
सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च ।
यक्ष्ये त्वां प्रियतां देवि पुरीं पुनरुपागता||

मी (वनवासाहून) अयोध्यापुरीस परत आल्यावर हे देवी तुझी सहस्त्र मद्याचे घट आणि मांसाचा नैवेद्य दाखवून तुझे प्रिय (पूजा) करेन.

तुषार काळभोर's picture

31 Dec 2020 - 1:30 pm | तुषार काळभोर

बृहदेश्वर मंदिरातील फोटो स्तंभाचं विभाजन होऊन देवीने दर्शन दिल्यासारखा आहे.
आणि दारसुरम ची मूर्ती. अगदी ' आई नेक्स्ट डोर ' अशी मूर्ती आहे. आपल्या घरातील आई - काकू- मावशी- आत्या असावी अशी साधी सुंदर सोज्वळ.

पॉइंट ब्लँक's picture

31 Dec 2020 - 7:08 pm | पॉइंट ब्लँक

धन्यवाद __/\__

वामन देशमुख's picture

31 Dec 2020 - 3:09 pm | वामन देशमुख

लेखाचा शेवटचा परिच्छेद आणि लेखाखालील काही प्रतिसाद वगळता, छोटेखानी, माहितीप्रद लेख आणि एकूणच धागा आवडला.

बाकी,

हिंदू धर्माच्या (किंवा ज्याला हिंदू धर्म म्हणतात त्याच्या) ऱ्हासाचे, मांसाहारी लोक व मांसाहारी पदार्थ यांचा दांभिक निषेध आणि त्याबद्धल अकारण अपराधगंड बाळगण्याची वृत्ती हे एक प्रमुख कारण आहे.

माझ्या घरात शाकाहारी आहारपरंपरा असली तरीही मी मांसाहाराचा दुःस्वास करत नाही. माझ्या गावात कोंबडया, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी, ससे, मांजर, कुत्रे, डुकरे, खेकडे... आदी प्राणी खाणारे वेगवेगळे हिंदू लोक माझ्या परिचयाचे आहेत. मी जर त्यांच्या खाद्य संस्कृतीला तुच्छ समजू लागलो तर त्यांना माझ्याबद्धल (एक हिंदू) म्हणून आपुलकी वाटेल की मांसाहार करणाऱ्या इतर धर्मीयांबद्धल?

पापात / पुण्यात देवीदेवतांना भागीदार बनवण्याबद्धल -

बकऱ्याचे (किंवा कोणत्याही मानवेतर प्राण्याचे) ताजे रक्त देवीला अर्पण करणे आणि जास्वदांचे (किंवा इतर कोणतेही) ताजे फूल देवीला अर्पण करणे हे जैविक दृष्टीने एकसारखेच आहे. त्यात जर स्वार्थ असेल तर दोन्हीत आहे, हिंसा असेल तर दोन्हीत आहे, ते नैसर्गिक असेल तर दोन्ही आहेत.

पॉइंट ब्लँक's picture

31 Dec 2020 - 6:16 pm | पॉइंट ब्लँक

लेखाचा शेवटचा परिच्छेद आणि लेखाखालील काही प्रतिसाद वगळता, छोटेखानी, माहितीप्रद लेख आणि एकूणच धागा आवडला.

धन्यवाद

हिंदू धर्माच्या (किंवा ज्याला हिंदू धर्म म्हणतात त्याच्या) ऱ्हासाचे, मांसाहारी लोक व मांसाहारी पदार्थ यांचा दांभिक निषेध आणि त्याबद्धल अकारण अपराधगंड बाळगण्याची वृत्ती हे एक प्रमुख कारण आहे.

तसा मांसाहार हा विषय नव्हता लेखाचा. हिंदू धर्माचा र्‍हास अजुन तरी झालेला नाही, त्याला बराच काळ पारतंत्र्याखाली रहावा लागलं असं म्हणता येइल फार तर. आणि आहार हे धर्माच्या र्‍हासाचं प्रंमुख कारण असु शकत नाही. जर सर्व हिंदू मांसाहार करत असते तर परकिय आक्रमणे झाली नसती? हिंदू धर्माचं जे अधःपतन झालं त्याला बरीच कारणं आहे - धर्माच्या नावावर माजलेलं अवडंबर, धर्म शिकवणारे आणि त्याचे ऱक्षणकर्ते ह्या दोन्हींही भ्रष्ट झालेली मानसिकता , आंतर्गत विवाद इत्यादी. आणि इतकं सगळं होऊनही १३०० वर्षांच्या अखंड आक्रमने होउनही हा धर्म अजुनही जिवंत आहे. सावरतो आहे इतकच नाही फुलतो ही आहे. , जगाच्या पाठीवर अशी दुसरी कुठली जागा उरली नसेल आता की जिथे तिथले मुळ धर्म अजुन ही जिवंत आहेत.

गामा पैलवान's picture

31 Dec 2020 - 7:37 pm | गामा पैलवान

वामन देशमुख,

माझ्या मते फूल वा अन्न यासारखे वनस्पतीजन्य पदार्थ अर्पण करणे हिंसा नव्हे. याचं कारण असं की आयुर्वेदात रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र हे सात धातु सांगितले आहेत त्यापैकी केवळ रस हा धातू वनस्पतींत असतो. रसाखेरीज इतर धातु धारण केलेला जीव अचेत करणे ही हिंसा मानली आहे (संदर्भ ठाऊक नाही). हा हिंसेचा नियम वनस्पतींना लागू नाही.

आ.न.,
-गा.पै.

पॉइंट ब्लँक's picture

2 Jan 2021 - 6:15 pm | पॉइंट ब्लँक

ह्या माहितीबद्दल धन्यवाद __/\__

गोरगावलेकर's picture

2 Jan 2021 - 9:12 am | गोरगावलेकर

नवीन माहिती कळली. फोटो सुंदरच

पॉइंट ब्लँक's picture

2 Jan 2021 - 6:15 pm | पॉइंट ब्लँक

धन्यवाद__/\__