जमिनीखालची धरणे (Underground Dams) आणि पाण्याचे कारखाने
तिवरे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील धरण दोन जुलैला रात्री साडेनऊ वाजता फुटले आणि धरणाच्या खालच्या बाजूला वसलेल्या गावांमध्ये हाहाकार उडाला. धरण बांधताना वापरलेल्या सिमेंट, लोखंड, दगड, माती इत्यादी दृश्य घटकांबरोबरच त्यामध्ये मिसळलेल्या शासकीय आणि प्रशासकीय अनास्था, निष्काळजीपणा आणि बेफिकिरी ह्या अदृश्य घटकांचे दर्शनदेखील सर्वांना झाले. पाठोपाठ तिवरे धरणाच्या पावलावर पाऊल टाकून आणखी किती धरणांची वाटचाल चालू आहे त्याची यादीदेखील प्रसिध्द झाली. काही प्रतिक्षिप्त घोषणादेखील ताबडतोब झाल्या. प्रसारमाध्यमांनी अमावस्या, खग्रास सूर्यग्रहण इत्यादी गूढ धाग्यांनी विणलेला पातळसर का होईना पण एक संरक्षित पडदा संबंधित दोषींच्या सभोवताली गुंडाळला आणि वाहून गेलेल्यांच्या मागे उरलेल्यांचे दुःख कमी करण्याचे पुण्यकर्म पार पाडले. जलसंधारण मंत्र्यांनीदेखील त्यांच्यापरीने त्याचा कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकांना तो त्यांच्या ठायी असलेल्या काळ्या विनोदबुद्धीचा (ब्लॅक ह्युमर) आविष्कार वाटला. पण म्हणून धरणे बांधणे अयोग्य आहे, असे म्हणणे योग्य ठरेल काय ? तर निश्चितच नाही.
परंतु अशी छोटी छोटी धरणं म्हणजे - जमिनीची उपलब्धता, त्यांचा बांधकामाचा खर्च, त्यामध्ये राहणारे तांत्रिक दोष, बांधकाम पूर्ण झाल्यावर निकाली निघणारी सदोष धरणं, बांधकामासाठीचा कालावधी, त्यांची मर्यादित उपयुक्तता, त्यामधील पाणी वापरात आणण्यासाठी राबवावी लागणारी खर्चिक यंत्रणा आणि मोठ्या प्रमाणावर खर्च होणारी वीजऊर्जा, ती यंत्रणा आणि धरण यांच्या निगराणीसाठीचा खर्च, त्यासाठी पोसावी लागणारी यंत्रणा आणि होणारा प्रचंड निष्फळ खर्च, उध्वस्त झालेले विस्थापित, त्यांचे कथित पुनर्वसन आणि त्यासाठी होणारा खर्च आणि सर्वात शेवटी एव्हढे सर्व करूनही पदरात पडणारं तिवरे धरणासारखं एखादं अपयश आणि मनामध्ये भीती बसवणारी त्याच्यापुढेच रांगेत असणारी इतर गळकी आणि उपेक्षित धरणांची यादी, हे सगळं म्हणजे आंधळं दळतंय आणि ....... ह्या म्हणीचा प्रत्यय देणारी वस्तुस्थिती. पाण्याची उपलब्धता ह्या मानवी गरजेतून निर्माण झालेली. ह्या सर्व पार्श्वभूमीवर पाण्याची उपलब्धता कोणत्या मार्गाने व्हायला हवी याचा पुनर्विचार किंवा पुनरावलोकन होणे गरजेचे आहे. आपण सर्वांनीच त्यासाठी पर्यायी विचारांचा शोध घ्यायला हवा.
महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत असंख्य धरणे बांधली गेली आणि त्यावर प्रचंड पैसा खर्च केला गेला. काही धरणे मोठ्या प्रमाणावर खर्च होऊनही अर्धवटच राहिली, आणि काही पूर्ण होऊनही त्यांच्या संलग्न व्यवस्था (कालवे इ.) अपूर्ण किंवा सदोष राहिल्याने त्या धरणांची कार्यक्षमता कायमच प्रश्नांकित राहिली. ह्या धरणांनी राज्यात काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला असला तरी ती बांधण्याचा दुसरा मुख्य सिंचनाचा उद्देश आजच्या घडीला तरी बहुतांशी असफल झालेला दिसत आहे. ह्या धरणांमुळे सिंचनाखाली आलेल्या एकूण क्षेत्राची आकडेवारी देण्यास ह्या प्रश्नावर गोंधळ घालणाऱ्या आणि गोंधळात पडणाऱ्या अशा दोन्ही सरकारांना संधी मिळूनही पूर्णपणे अपयश आले आहे.
शेतीसिंचनासाठी आजच्या घडीला राज्यातला शेतकरी हा पूर्णपणे पावसावर आणि कुपनलिकांवर अवलंबून आहे हे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. शेतीसाठी अधिकाधिक खोल जाणाऱ्या कुपनलिकांमधून अमर्याद पाण्याचा उपसा होत आहे, हे आजचे चित्र आहे. त्याचाच परिणाम म्हणून एकूणच जमिनीतील पाण्याची पातळी चिंताजनक पातळीवर पोहोचली आहे. "चिंताजनक पातळी" असे म्हणणे म्हणजे अद्यापही स्वतःला फसवत राहण्यासारखेच आहे. पृथ्वीच्या पोटातले पाणी संपले आहे ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी आपण ह्या हजार हजार फूट खोल जाऊन जमिनीच्या पोटातील पाणी अमर्याद उपसणाऱ्या कुपनलिकांना जबाबदार ठरवत आहोत. पाण्याच्या दुर्भिक्षाची जबाबदारी जेव्हा एकीकडे आपण ह्या कुपनलिकांवर टाकतो तेव्हा दुसरीकडे नकळतपणे आपण धरणांच्या अपयशावर शिक्कामोर्तब करत असतो. जर आपण आपल्या पिण्याच्या पाण्याच्या आणि सिंचनाच्या दोन्ही गरजा जर बहुतांशी जमिनीच्या पोटातील पाण्याने भागवत असू तर जमिनीच्या वर धरणे बांधण्याचा खर्चिक मार्ग सर्रासपणे अवलंबणे योग्य आहे का, याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. पाणी वापरायचं जमिनीच्या पोटातलं आणि ते अनाठायी खर्च करून साठवायचं मात्र जमिनीच्या वर हा अव्यापारेशु व्यापार तर ठरत नाही ना, याचे पुनरावलोकन होणे गरजेचे आहे. 'जिथलं पाणी वापरायचं तिथंच साठवायचं ' ह्या पर्यायाचा विचार सामान्य माणसांसह सर्वांनीच गांभीर्याने करणे आवश्यक आहे. भूगर्भातील हे पाण्याचे साठे म्हणजे "जमिनीखालची धरणेच" आहेत, जी आपण वर्षानुवर्षे अमानुषपणे केवळ उपसतच आलो आहोत. ही "जमिनीखालची धरणे" निसर्गदत्त आहेत. आजतागायत एकही पैसा खर्च न होता त्यांनी आपल्याला सेवा दिली आहे आणि मानवी हस्तक्षेपविरहित सर्वोच्चतम दर्जाची कार्यक्षमता दाखवली आहे. शिवाय ह्या "जमिनीखालच्या धरणांनी" सर्वसामान्य लोकांसाठी नेहमीच एक सहजसाध्य, सर्वसमावेशक, सक्षम आणि स्वावलंबी मार्ग दाखवला आहे.
आता ही "जमिनीखालची धरणे" भरण्यासाठी प्राधान्यक्रम देण्याची वेळ आली आहे. आपण सर्वांनीच ही धरणे पुन्हा प्रयत्नपूर्वक भरण्यावर आपले लक्ष केंद्रित करण्याची गरज निर्माण झाली आहे. ह्या जमिनीखालच्या धरणांनी आपल्याला हजारो वर्षे जगवलं आहे. परंतु काळाप्रमाणे बदलत गेलेल्या आपल्या "निसर्गपरास्त" (निसर्गविरोधी) जीवनशैलीने ती धरणं पुन्हा भरण्याची साधनं कमी कमी होत गेली आहेत आणि त्यांना ओरबडण्याचे प्रमाण मात्र प्रचंड वाढलं आहे. आपल्या ह्या स्वार्थी, अविचारी आणि अदूरदर्शी प्रवृत्तीचे परिणाम म्हणून आजच्या घडीला जमिनीवरची आणि जमिनीखालची अशी दोन्ही प्रकारची धरणं कोरडी पडल्याचे आपल्याला आढळतं. ती ह्या क्षणापासून प्रयत्नपूर्वक भरायला सुरवात केली पाहिजे. अन्यथा पाण्याशिवायच्या आपल्या भवितव्याचे चित्र आपल्या सगळ्यांनाच स्पष्ट आहे.
जमिनीच्या वर असलेल्या धरणांचा विषय आपल्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. परंतु वारसाहक्काने आपल्याला मिळालेली ही निसर्गदत्त जमिनीखालची धरणे पुन्हा एकदा पाण्याने समृद्ध करणे हे केवळ आणि केवळ आपल्यासारख्या सामान्य माणसांच्याच हातात आहे. तेसुद्धा कुणाचीही मदत न घेता आणि अगदीच अल्पशा खर्चात. छोट्या छोट्या गोष्टींमधून अविश्वसनीय अशा भव्य दिव्य गोष्टी निर्माण करणे हीच तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाची ताकद आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने जर एक छोटीशी, सहजसाध्य आणि अल्पखर्चीक अशी गोष्ट सजगपणे आणि जाणीवपूर्वक केली तर आपण सर्वजण ही रिकामी झालेली जमिनीखालची धरणं पूर्वीसारखीच पाण्याने समृध्द करू शकतो आणि आपले पाण्याचे दुर्भिक्ष कायमसाठी संपवू शकतो.
"पाण्याचे कारखाने"
ही जमिनीखालची धरणं जर आपल्याला पुन्हा पाण्याने समृद्ध करायची असतील तर त्यासाठी "जमिनीचे पुनर्भरण" हाच एक कुणालाही सहजपणे करता येईल असा सर्वोत्तम आणि सोपा मार्ग उपलब्ध आहे. शेती करण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे जमिनीमध्ये नैसर्गिकपणे जिरण्याचे पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बंद पडलेली शेती, जंगलतोड, होणारी विकासकामे इत्यादी गोष्टींमुळे पावसाळ्यात आकाशातून जमिनीवर पडलेल्या पाण्याचा वाहून जाण्याचा वेग खूपच वाढला आहे. पाण्याला आपण जीवन म्हणतो. पाण्याचे हे जीवनस्वरूप आकाशातील पाणी जमिनीवर पडून ते समुद्राला मिळेपर्यंतच्या कालावधीपूरतेच मर्यादित असते. हा कालावधी हेच "पाण्याचे आयुष्य" असते. सध्याच्या काळात ह्या कालावधीमध्ये पाण्याला अडवून ते जमिनीमध्ये जीरवणाऱ्या घटकांची (शेती, झाडं, जंगलं, पाळे, मूळे इत्यादी) संख्या कमी झाल्यामुळे जे पाणी थांबत थांबत ( जिरत जिरत ) वहायचे ते जलदगतीने वाहू लागले आहे. साहजिकच वाहत जाऊन समुद्राला मिळण्यापर्यंतचा त्याचा कालावधी कमी झाला आहे. पर्यायाने "पाण्याचे आयुष्य" कमी झाले आहे. ज्याला आपण जीवन म्हणतो त्या जीवनाचेच जीवनमान कमी झाले आहे. पाण्याचे आयुष्य जर आपल्याला वाढवायचे असेल तर पाण्याचा समुद्रापर्यंतचा हा प्रवास थांबवला पाहिजे किंवा किमान लांबवला पाहिजे. पावलापावलावर जमीन पुनर्भरणाची साधने उभी राहिली, आपण ती निश्चयपूर्वक निर्माण केली तर ते अजिबात अशक्य नाही.
आपल्यापैकी प्रत्येकाचे घर किंवा आजूबाजूची प्रत्येक इमारत म्हणजे लहान मोठ्या आकाराचा आणि कमी अधिक क्षमतेचा "पाण्याचा कारखाना" आहे याची जाणीव प्रत्येकाने स्वतःला करून द्यायला हवी. कोकणात वर्षभरात सरासरी ३५०० मिमी (३५० सें. मी) पाऊस पडतो. १००० चौ. फू. क्षेत्रामध्ये ३५० सें. मी. पाऊस पडला तर साडेतीन लाख लिटर पाणी जमिनीवर पडून वाहून जाते. १००० चौ. फू. च्या घरामध्ये राहणाऱ्या पाच माणसांच्या कुटुंबाला वर्षभरात सुमारे एक लाख लिटर पाणी लागते, जे निसर्गाकडून आपण घेतो. कोकणातले तेच घर वर्षभरात छपरावर पडणारे साडेतीन लाख लिटर पाणी जमिनीवर पडून वाहू देते. निसर्गाकडून घेतलेले पाणी ते घर अडीचपटीने निसर्गाला परत करू शकते. आपल्या घराची पागोळी वाचवून फक्त घराशेजारी तयार केलेल्या खड्ड्यात सोडण्याएव्हढी ही सोपी गोष्ट आहे. इतर कोणत्याही बाबतीत परतफेडीची अशी संधी निसर्ग आपल्याला देत नाही. तेव्हा निसर्गाचे अंशतःतरी उतराई होण्याची ही संधी आपण साधायला हवी.
नमुनादाखल माझ्या गिम्हवणे ( ता. दापोली, जि. रत्नागिरी ) गावाचे उदाहरण घेऊ. म्हणजे आपण नेमकं काय करतो आहोत ते लक्षात येईल.
गावाची लोकसंख्या ५०२५ इतकी आहे. दरवर्षी माणशी २०००० लिटर ह्या हिशोबाने गावाची पाण्याची गरज दहा कोटी पाच लाख लिटर आहे. गावाचे क्षेत्रफळ ८.०६ चौ. कि. मीटर म्हणजे ऐंशी लाख चौरस मीटर आहे. ३५० सें. मी. च्या हिशोबाने माझ्या गावावर निसर्ग वर्षभरात एकूण तीन हजार बारा कोटी ऐंशी लाख लिटर पाण्याचा वर्षाव करतो. गावात पडणाऱ्या पावसाच्या एकूण पाण्याच्या केवळ अर्धा टक्का पाणी ही माझ्या गावाची गरज आहे. तरीदेखील माझ्या गावात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. तुम्हीदेखील तुमच्या घराचे, आवाराचे आणि एकूणच गावाचे गणित मांडा आणि निसर्ग आपल्याला किती पाणी उपलब्ध करून देतो ते पहा, आणि तरीदेखील तुमच्या गावामध्ये जर पाण्याचे दुर्भिक्ष असेल तर त्याचे तुम्हाला मिळालेले उत्तर एकच असेल, "केवळ पाणी न जिरवल्यामुळे !"
सुनील प्रसादे.
दापोली.
दि. १० जुलै २०१९.
( चुकभुल द्यावी घ्यावी)
----------------------------------------
आम्ही सुरू केलेल्या "पागोळी वाचवा अभियानाला" राज्यभरातील वाचकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. पाणी ह्या विषयाबाबत लोकांची मने आत्यंतिक संवेदनशील असल्याचीच ती ग्वाही आहे. अनेकांनी अशाप्रकारचे काम पूर्वीच केले असल्याचे सांगितले, तर अनेकांनी ते करण्याबाबत क्रियाशील उत्सुकता दाखवली. सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या अभियानाने लोकांच्या मनातील तळमळीला वाट दाखवली आणि कृती करण्यासाठी उद्युक्त केले. तुम्हीदेखील तुमच्या मनाची संवेदना हरवू देऊ नका. "पागोळी वाचवा अभियान" बद्दलची माहिती आणि व्हिडीओ कुणाला मिळाला नसेल किंवा अधिक माहिती कुणा इच्छुकाला हवी असल्यास ८५५४८८३२७२ ह्या व्हाट्सअप्प नंबरवर स्वतःचे संपूर्ण नाव, गाव, आणि जिल्हा ही माहिती पाठवली तर सदर माहिती निश्चितपणे पाठवली जाईल.
"आज जे पाणी पेराल ते पुढच्या उन्हाळ्यात निश्चितपणे उगवलेलं दिसेल."
सुनील प्रसादे.
प्रतिक्रिया
इतरांनीही कृतीत आणावे असे
धन्यवाद डॉक्टर !
चांगला लेख. ह्या लेखातच
अधिक माहिती-
छान आहे उपक्रम.खूप खूप
धन्यवाद !
अतिशय अभ्यासपूर्ण महत्वपूर्ण
धन्यवाद साहेब !
चांगला उपक्रम.
हो! त्याविषयीच काहीतरी !
ऊत्तम अभियान
धन्यवाद !
वा !
धन्यवाद ! परंतु आपल्या परीने,
यासंदर्भातील ही बातमी आढळली.
मस्त ...
अभ्यासपूर्ण (?) वाटणारा एकांगी लेख!
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
करायलाच हवे.
धन्यवाद !
नवा चांगला विचार .....
म्हणजे जमीनीतील पाणी म्हणत
भूगर्भातील हे पाण्याचे साठे म्हणजे "जमिनीखालची धरणेच" आहेत, जी आपण वर्षानुवर्षे अमानुषपणे केवळ उपसतच आलो आहोत. ही "जमिनीखालची धरणे" निसर्गदत्त आहेत.लेख आवडला. यावर शक्य तितक्या लवकर विचार नाही केला तर भयावह परिस्थितीला तोंड देण्याची वेळ यायला उशीर नाहीये.विषय आपण खणलेल्या विहिरी आणि
सुंदर लेख.
+१
या विषयावर आणखी लेखन वाचन चर्चा व्हावी.सहमत. बीड जिल्ह्यात अतिशय भयंकर परिस्थिती पाहिली. मागील दोन वर्षात नाम फाऊंडेशन कि अजून कोणी काही काम केलीत. खूप फायद्याचं ठरलंय ते. प्रत्येक ओढा, नाल्यात दर दहा फूट अंतरावर ओढा, नाल्याची जेवढी रुंदी आहे त्या रुंदीच्या चौरस फुटाचे खड्डे केलेले आहेत. आजूबाजूच्या लोकांना विचारल्यावर कळलं कि पहिल्याच पावसाळ्यानंतर विहिरीचे पाणी दीर्घकाळ टिकले. असे काम खूप मोठ्या प्रमाणात झाले तरच काही होणार आहे. करणार कोण? त्यासाठी बरेच मार्ग काढता येतात. सगळ्यात आधी भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे हि भाबडी आशा. शासन, अमुकतमुक मित्र मंडळ, अमक्याढमक्या समाजसेवी संस्था(ज्या ढोंग घेण्यापलीकडे क्वचितच काही करतात) आणि हो शेतकऱ्यांनी सुद्धा हातभार लावला पाहिजे. या कामासाठी सगळ्यात महत्वाचे JCB. इतर शासकीय कामांचे कंत्राट देतानाच काही अटी घालून कंत्राटदाराला या कामांची सक्ती केल्यास शक्य होईल. अर्थात हे माझे वै.म.पर्यायांची व्यवहार्यता
पाणी हे जीवन आहे
समतोल प्रतिसाद.
गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य
निश्चितच! जमिनीचे पुनर्भरण
आणि महत्त्वाचे
विषय खूप अवघड आहे
विषयाला हात घालायचा म्हटलं तर
एक
सरकार तर्फे काम झाले आहे
स्पृहणीय उपक्रम!! अभिनंदन!!
छान लेख
भात आणि ऊस
छान लेख आणि पागोळी वाचवा अभियानही प्रशंसनीय.