✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

शिवजयंती

म
मकरंद घोडके यांनी
Wed, 03/06/2019 - 15:42  ·  लेख
लेख
गाडी निघाली..चायनीज ची दुकाने आणि त्याच्या बाजूला मंडई त्यात वेगवेगळ्या भाजीपाल्याने आणि फळांनी बहरलेला माहोल.तिथेच बाजूला एक पूजा साहित्याचं दुकान आणि त्यात सिजनल वस्तूंची रेलचेल. समोर सिग्नल आणि प्रचंड गर्दी! १९ फेब्रुवारी.आज शिवजयंती. महाराजांना दोन क्षण घट्ट डोळे मिटून आठवून पाहिलं.मग ते चौथीच्या पुस्तकात घोड्यावर बसून मोहिमांना जाताना दिसले,काय ते रूप काय ते तेज अगदी अवर्णनीयच! सगळा इतिहासच प्रेरणादायक तो. पिप sssssss पिप ssssss एकदम वर्तमानातच आदळलो! डोळ्यातून ते तेज हटेना!! पण समोरचं चित्रही पाहवेना- हे चायनीज गाडीवाले का बरं फोफावले असतील? नंतर जुने इकडचे तिकडचे संदर्भ जे व्हाट्सअप्प वर फिरत असतात ते आठवले-चायनीज हे पदार्थ आहेत (जे चायनात पण असे बनवत नाहीत आणि फक्त इंडिया मधेच असे असतात) आणि विकणारे इथलेच कुठले तरी आसामी बांधव आहेत.मग ते आसाम मध्ये का नाही राहत असा निरुपयोगी प्रश्न पडला आणि गाडीचा गियर नकळत उचलला. एकदम मेंढरं सुटावी तशी माझ्यासकट गाडी त्या झुंडीतून जाऊ लागली आणि एकदम टर टर ssss ट ssss टर अशी सुसाट एक गाडी पुढून निघून गेली. त्यावर तीन मावळे ट्रॅफिक रुल्स धाब्यावर बसवून स्वार आणि हेल्मेट पण नाही!(पुण्यात आणि हेल्मेट? ते काय असतं? काय बोलता राव) भगवा कुर्ता पांढरा पायजमा कानात बाळी हातात ब्रेसलेट कपाळाला चंद्रकोर! असे प्रसन्न चेहरे.. शिवाय डोक्याचे खालून भादरलेले वर डोंगर म्हणून ठेवलेले केस(स्टाईल असते ती!) पुन्हा चौथीच्या धड्यात महाराजांच्या स्वप्नरंजनाचा भाग आठवला. हेच ते आधुनिक मावळे आता जयंतीच्या निमित्ताने महाराजांचा इतिहास जागवत आहेत आणि काळानुरूप हा बदल झालाय असं सहज वाटून गेलं. आधुनिक काळात घोडे वापरणं तसं योग्य व्हायचं नाही कारण तेवढी बडदास्त ठेवायची तर या मावळ्यांकडे तेवढी दौलत नाही आणि शिवाय PETA वाले प्राण्यांचा अमानुष छळ म्हणून केस वगैरे करतील! नकोच ते.शिवाय गाडीला झेंडा होताच-क्षत्रिय कुलावतंस! अशा रयतेच्या राजाला कूळ भूषणाला अभिमानाने सगळीकडे झेंड्याच्या रूपाने मिरवणारे मावळे पाहिलं की वाटतं-हो गरज आहे सर्वांना सांगण्याची की,होता असाही एक राजा जो कित्तेक शतकानंतर ही आठवला जातो. गाडी निघाली आणि पुन्हा दुसरा चौक आणि पुन्हा तोच माहोल. त्यात भर फक्त साऊंड सिस्टीम च्या रॅक ची! दन दन वाजत होतं, गाणी होती का नव्हती नीट ऐकू येत नव्हतं पण तुताऱ्या आणि ढोल एकदम शंभर बाजूने वाजत होते त्यामुळे माहोल अगदी सळसळत होता. काही मंडळींना आज सरकारी सुट्टी असल्याने ती भाजी किंवा गृहोपयोगी वस्तू खरेदी करण्यात गुंग! तसं एवढ्या कोलाहलात कुणाला काही त्रास वगैरे होत नव्हता म्हणा. आता पूजा साहित्य आणि त्या बरोबरीने फेटे झेंडे भगवामय पाहायला छान वाटत होतं आणि एकदम साऊंड सिस्टीम ला कंठ फुटला! पोवाडे वाजू लागले..झालं एकदाचं जयंती साठी म्हणून आवश्यक जे आहे ते आलेलं आहे आणि वातावरणात तजेला आहे. अर्धाकृती पुतळ्याला हार घालून झाला..सुवासिक अगरबत्ती ,पेढे, गुलाल आणि एकमेकांच्या गळाभेटी.. गाडी अजून पुढे सरकली आणि काही मावळे टर ट ssss र करत सुसाट झेंडे घेऊन निघाले..नेमकं कुठे जाणार ते दरवर्षी वाटतं ते याही वर्षी वाटलं आणि मध्ये दाटीवाटीने बसलेला मावळा त्वेषाने ओरडू लागला- शिवाजी महाराज की.. बाकीचे जय म्हणे पर्यंत त्याने तोंडातून काहीतरी रस्त्यावर ओतलं-अगदी लालेलाल एकदम रक्तासारखं आणि पुन्हा ऊर्जेने ओरडला-शिवाजी महाराज की.. पुन्हा जय झालं. अजून पुढच्या महिन्यात अजून एकदा शिवजयंती आहे याचा विचार करत पुन्हा.. गाडी निघाली..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
लेख

प्रतिक्रिया द्या
27185 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

शिवाजी जन्माला यावा तो दुसर्‍या घरात

धर्मराजमुटके
Fri, 03/08/2019 - 13:54 नवीन
शिवाजी जन्माला यावा तो दुसर्‍या घरात असे उगाच म्हणत नाहीत. दुसरा कोणी बदल घडवील अशा भ्रमात राहिलो तर काहीच होत नाही. मग काय करायचे ? खालील पर्यायापैकी कोणता योग्य वाटतो ? १. बघताय काय सामील व्हा ! म्हणत आपण त्यातलेच एक होऊन जायचे मग द्वैत उरत नाही आणि त्रास ही होत नाही. २. चिडचीड करत रक्त आटवायचं ? जगाचे कसे भले होणार म्हनत रात्रंदिवस झुरत बसायचं आणि स्वतःला त्रास करुन घ्यायचा ? ३. ठार दुर्लक्ष करायचं ! दु...र्ल.... क्ष........... कोणीही कितीही ढ्याण्डटंड्याण करत असलं तरी त्या च्या बाजूने जाताना मोबाईल मधे विनाकारण बोटं घालतं स्वत:शीच हसत राहायचं.नाहीतर मस्त एखादं पुस्तक घेऊन लक्षपुर्वक वाचतोय अस नाटक करत तिथे थांबायचं ! कार्यकर्त्यांना भाव नाही दिला तर त्यांचा अर्धा आवेश कमी होतो. ४. नाहितर मिपाच्या एक्स मालककांच्या भाषेत सांगायचं तर चपला घालून चालू पडायचं !
  • Log in or register to post comments

Anek prarisad avadale.

nanaba
Sat, 03/09/2019 - 21:49 नवीन
Good discussion..
  • Log in or register to post comments

प्रतिसाद दिला त्या सर्वान्चे आभार

मकरंद घोडके
गुरुवार, 10/17/2019 - 16:51 नवीन
प्रतिसाद दिला त्या सर्वान्चे आभार
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा