फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ११

Primary tabs

रा.म.पाटील's picture
रा.म.पाटील in जनातलं, मनातलं
8 Nov 2018 - 11:01 pm

फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - ११
( Decorate Your Love )

दीपावली..
प्रेमाचा गोडवा..

'लाडू..' दिवाळीची गोड चव.. पण ती चव आता त्याच्यासाठी एक कडू आठवण झाली होती..

त्यामुळेच की काय त्याने लाडू खायचे सोडून दिले होते, त्याच्या आईला राहून राहून आश्चर्य वाटायचे की एकेकाळी ह्याच लाडूसाठी हट्ट धरायचा तो हाच का, मग आता इतका तिटकारा का आलाय त्याचा..? माझ्या हातच्या लाडूची चव बिघडली तर नाही ना.!

मागच्या दिवाळीत त्याच्या आईने त्याला ह्याबद्दल विचारून पाहिले होते.. पण त्यावेळी रागाने तो म्हणाला होता, ' नाही आवडत म्हणजे नाही, का माणसाची आवड बदलू शकत नाही का..?', पण त्याच्या चेहऱ्यावरचे ते संतप्त भाव पाहून त्याच्या आईने पुढे विषय वाढवला नाही..

तसा तो नॉर्मल वागत होता, कॉलेज संपून चांगला जॉब मिळाला होता आणि मित्राबरोबर फिरायलाही जात होता, मग काय झाले असेल, माणूस इतका बदलू शकतो की त्याची एकेकाळची आवडती गोष्ट त्याची इतकी नावडती बनू शकते, कशामुळे होऊ शकतो इतका बदल..? हा त्याच्या आईला पडलेला प्रश्न अजूनही अनुत्तरित होता..

आता मागच्या दिवाळीसारखे हयावेळी पण लाडू वाटावे लागणार बहुतेक, असे म्हणत आईने डबे भरण्यास सुरुवात केली.. एक डबा भरून आईने त्याला खालच्या मजल्यावरील नवीन शेजारांच्या घरी देऊन येण्यास सांगितले, नाही हो करत तो गेला..

पण जेव्हा माघारी आला तेव्हा तडक त्याच्या रूममध्ये गेला.. घरी आलेल्या पाहुण्याकडेही त्याचे लक्ष गेले नाही.. आई संभ्रमात पडली, पाहुणे जाईपर्यंत त्याला काही विचारता येणार नाही हेही खरे..

पण थोड्या वेळाने पाहुणे जाण्याआधी तोच घराबाहेर पडला, ह्यावेळी पाहुण्याकडे पाहून उसने हसला आणि येतो म्हणून निघून गेला, शेवटी काय झाले असेल हे विचारायचे राहूनच गेले..

तो बाहेर जात असताना त्याला ती येताना दिसली, त्याने तिला न पाहिल्यासारखे केले आणि पुढे निघून गेला, तिनेही त्याला पाहिले होते, त्याला पाहून तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटले होते.. पण त्याने न दाखवलेली ओळख पण तिला जाणवली होती..

त्याने बोलणे टाळले होते, पण त्याला समोर आठवणारा भूतकाळ टाळता येत नव्हता.. आणि भूतकाळात भेटलेल्या तिला..
ती तीच होती जी आता त्याच्या समोरून गेली..
ती तीच होती जिच्या घरी मघाशी तो दिवाळी फराळाचा डबा देऊन आला होता आणि तिथे तिचा फॅमिली फोटो पाहून बाहेर पडला होता..
ती तीच होती जिच्या आठवणीने ऐन दिवाळीत, आनंदोत्सवाच्या सणात त्याच्या डोळ्यात अश्रू आणले होते..

ती.. जेव्हा सुरुवातीला भेटली होती तेव्हा त्याला कळले की आपणही कोणाच्या प्रेमात पडू शकतो.. त्यावेळीही अशीच दिवाळी होती.. तो मित्रांबरोबर मंदिरात गेला होता.. पणत्यांची सजावट करायला.. तीही आली होती.. तेव्हाच त्यांची नजरानजर झाली..

त्या दिवांच्या रोषणाईत सारा परिसर प्रकाशमय झाला होता, अंधार दूर झाला होता..
एक दिवा त्याच्या हृदयातही पेटू लागला.. तिच्याबद्दलच्या प्रेमाच्या.. आता तो तेवत ठेवणे महत्वाचे होते..

तोच वाऱ्याने एक पणती फडफडत होती.. त्याने लगेच हाताचा आडोसा धरला.. ह्या गडबडीत ती कधी नजरेआड गेली त्याला कळलेच नाही..

पणती आणि प्रेम सारखे असते का.. दोन्हीना जपावे लागते.. विझू नये म्हणून..

आता तिच्याशी ओळख होणे महत्वाचे होते, पण ती होणार कशी? कारण तो ही मुलीच्या बाबतीत जरा लाजाळूच होता..

त्याला त्याच्या मित्रांकडून तिचे कॉलेज तरी कळले होते आणि तीची नेहमीची बस.. सध्या बस स्टॉप वर तरी तिला पाहता येईल..

त्याचेही त्या बसस्टॉपवर वर थांबणे वाढले, बराच वेळ तिच्यासाठी घुटमळणे होऊ लागले.. नेहमी नजरेत पडणाऱ्या अनोळखी माणसाबद्दल आपल्यालाही थोडेसे कुतूहल वाटतेच.. अशीच उत्सुकता त्याच्याबद्दल तिला वाटू लागली..

आणि ह्या कुतूहलामध्येच पुढील तीन चार महिने निघून गेले, बघता बघता परीक्षा झाल्या, आणि सुट्टी लागली..

म्हणूनच की काय मागचे दोन चार दिवस बसस्टॉप वर त्याला ती दिसलीच नाही..!
आता पुन्हा भेट कॉलेज सुरू झाल्यावरच..

ह्या सर्व प्रवासात त्याचे अभ्यासाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले होते, जेव्हा मार्क्स हातात आले तेव्हा त्याच्यासारख्या हुशार विद्यार्थी आणि एवढे कमी मार्क्स ह्याचेच सर्वाना आश्चर्य वाटत होते.. पण त्याला उलट कारण सापडले तिचे कॉलेज जॉईन करायला..

त्याच्या हृदयातील प्रेमाची पणती अजूनही तेवत होती..

दुसऱ्या वर्षी हट्टाने त्याने तिचे कॉलेज जॉईन केले.. आता काय तिचे दुर्मिळ असणारे दर्शन त्याला सहज होऊ लागले होते..

ती एक वर्ष त्याला ज्युनिअर होती, आता फक्त तिच्या जास्तीत जास्त जवळ येणे गरजेचे होते.. तीही संधी मिळाली, त्याने कॉलेजचे कल्चर डिपार्टमेंट जॉईन केले, तिच्याबरोबर थिएटर करू लागला, सुरुवातीला अडखळत होता पण मुळातच हुशार असल्याने नंतर अभिनय जमू लागला.. ती लिखाण करायची.. सुंदर कविता करायची.. तिने लिहलेले प्रेमाचे संवाद म्हणताना त्याला वाटायचे हेच संवाद आपल्याला तिला म्हणता आले तर..

खासकरून तो संवाद.. ' मला भेट देऊन तुझे प्रेम कशात तोलायचे नाही, पण त्या प्रेमाचा टवटवीतपणा जपण्यासाठी..'

आता त्यांच्या कल्चरच्या ग्रुपमुळे त्यांचे एकेमकांशी बोलणे होऊ लागले, तिलाही हळूहळू त्याचा स्वभाव कळला, न तिच्या कुतूहलाची जागा प्रेमाने घेतली..

मागच्या दिवाळीत पणती लावताना ती दिसली होती, आणि ह्या दिवाळीत ते दोघे एकत्र पणती लावणार होते, तो खूपच खुश होता..

दिवाळी आली.. सर्वजण मंदिरात जमले होते, ती व तिच्या मैत्रिणी रांगोळी काढत होत्या.. तो तिथे पोहोचला..

ती रांगोळी पाहत मित्राला म्हणाला, ' माणूस एवढी सजावट का करतो जर उद्या ती पुसली जर आहे तर..',
त्यावर ती त्याला ऐकू जाईल असे मैत्रिणीकडे पाहत म्हणाली, 'अल्पायुषी तर फुलपाखरू पण असते, तरिपण ते रंगीबेरंगी असते.. '
तो- ' पटतंय तुझं पण सजावट जेवढी नैसर्गिक तेवढी मनाला जास्त भावते..'
ती- ' हे मान्य, पण आजकाल नैसर्गिकच खूप दुर्मिळ झाले आहे आणि कृत्रिम खूप मुबलक.. तरीपण आपण प्रयत्न करतो आहेच की नैसर्गिकता जपण्याचा आणि म्हणूनच आपण इथे येऊन पणत्या लावतो..'

सर्व कामे उरकल्यावर, सर्वजण एकत्र जमतात, त्याच्या आईच्या हातचे लाडू खूप चविष्ट असतात हे सर्वांकडून त्याने ऐकले असल्यामुळे त्याने मुद्दामहून घरून आईच्या हातचे लाडू करून नेले होते.. ते त्यांच्या ग्रुप मध्ये सर्वाना आवडलेही..
आणि ती त्याला म्हणाली.. 'खूप छान झालेत लाडू, अप्रतिम, ही चव विसरुच शकत नाही मी.. अजून लाडू असते तर मीच एकटीने खाल्ले असते.. आणि नशीब दिवाळीचा फराळ अजून कृत्रिम नाही झाला ते..!',

पण त्याच्या हेच लक्षात राहिले होते की तिला अजून लाडू हवेत.. त्यालाही लाडू खूप आवडायचे पण आता त्याला ते जास्त आवडू लागले.. त्यांची गोड चव अजून गोड झाली होती..

मग ह्याने लगेच आईला सांगून तिच्यासाठी परत लाडू बनवून घेतले..

आणि एके दिवशी थिएटर हॉल मध्ये तिच्यापुढे गुडघ्यावर बसत हातातील लाडूचा डबा पुढे करत म्हणले, '' मला भेट देऊन तुझे प्रेम कशात तोलायचे नाही, पण त्या प्रेमाचा गोडवा जपण्यासाठी..'

सर्वांना तो नाटकातील संवाद वाटला पण तिला मात्र कळले की त्याने केलेल्या त्या संवादातील त्या बदलामुळे त्याला काय म्हणायचे आहे ते..! आणि तो गोडवा का म्हणाला हे तो डबा उघडल्यावर तिला कळले होते..

तिला खूप स्पेशल फील झाले.. लाडूमुळे गोडी वाढत होती प्रेमाची..

आता मात्र दोघांचे एकट्यानेच कॉलेजबाहेर, सुट्टीदिवशी भेटणे वाढू लागले, एकमेकांसोबत फिरणे होऊ लागले..
तोही तिचे संवाद, तिच्या कविता तिच्यासमोर वापरून.. तिला सुचवत होता.. हळूहळू प्रेमबंध जुळत होते..

आणि असेच वर्ष निघून गेले.. त्या वर्षाची परीक्षा झाली आणि त्याला पुन्हा कमी मार्क्स मिळाले..

पण तो खुश होता, कारण त्याला वाटत होते की प्रेमाची परीक्षा तो पास झाला आहे..

त्याच्या हृदयातील प्रेमाची पणती अजूनही तेवत होती..

सुट्टीनंतर कॉलेज सुरू झाले, पण सुट्टीतही ही दोघे भेटत होती.. फोनवर बोलत होती.. आणि आता तर दररोज भेटणे होणार होते..
पण त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होतच होते पण आता थिएटरकडेही दुर्लक्ष होऊ लागले,
संवाद पाठ होईनात, होणार कसे त्याचा बराच वेळ तिच्याशी बोलण्यात जाई आणि इतर वेळ तिच्या आठवणीत..
अभिनयात एकाग्रता येईना, येणार कशी ती समोर असल्यावर..
तिलाही हे जाणवत होते, तिने त्याला समजवण्याचा प्रयत्नही केला..
पण तो म्हणायचा... 'इतर गोष्टी मिळून काय फायदा, जर तुम्हाला तुमचे प्रेम मिळत नसेल तर..'
ती- 'पण कसे आहे ना, प्रेम सजवण्याच्या नादात आपण हे विसरता कामा नये की आपल्याला आपले आयुष्यही सजवायचे आहे..'
तो- 'अग तू फक्त साथ दे, मी तुझ्यासाठी काहीही करेन..'
ती- ' अरे काव्यात्मक दृष्ट्या हे ऐकायला छान आहे, पण वयाचा ऐन उमेदीचा काळ आहे हा, तुला आताच काहीतरी करायला पाहिजे..'
तो- ' हो करतोय की मग, हे थिएटर, अभिनय आणि कॉलेज सारे काही तुझ्याचसाठी..'
ती निरुत्तर व्हायची.. त्यांच्या ह्या विषयावर बऱ्याच वेळा चर्चा झाल्या.. पण तिचे समाधान झाले नाही आणि त्याचा हा विषय निघाला की चिडचिड वाढू लागली..

आणि बघता बघता दिवाळी आली..
आज पुन्हा सर्वजण मंदिरात पणती पेटवण्यासाठी जमणार होते.. तीही निघण्यासाठी आवरत होती तोच तिच्या घरी तिच्या क्लासचे जुने शिक्षक आले होते.. बोलता बोलता विषय निघत गेले आणि तिला कळले की तो सुद्धा त्यांच्याकडेच जात होता शिकण्यासाठी.. आता मात्र ती बारकाईने ऐकू लागली आणि तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले..

त्याने पुन्हा तिला आवडणारा लाडूचा डबा भरून घेतला.. कदाचित कडवट होत चाललेले त्याचे प्रेम पुन्हा ह्या लाडूच्या गोडीने गोड होईल ही त्याची अपेक्षा..

तो नेहमीप्रमाणे मंदिरात पोहचला, सर्वजण जमले होते, पण ती कुठे दिसली नाही, त्याने तिच्याबद्दल विचारले.. एकीने खुणेनेच सांगितले.. ती एकांतात उभी होती.. त्याने जाऊन गुडघ्यावर बसत तिला पुन्हा म्हटले.. '' मला भेट देऊन तुझे प्रेम कशात तोलायचे नाही, पण त्या प्रेमाचा गोडवा जपण्यासाठी..'

पण ती रागातच म्हणाली..
' तू मला फसवलंस, तू मला सांगितले की तुला कमी मार्क्स मिळाले म्हणून तू हे कॉलेज जॉईन केलेस.. '

तो- ' हो खरं आहे हे..'

ती- ' खोटं.. पण हे का नाही सांगितलंस की तुला कमी मार्क्स मिळाले ते माझ्यामुळेच.. माझ्यापायी तू त्या बस स्टॉप वर वेळ वाया घालवायचा त्यामुळे..'

तो- 'पण तुला हे कोणी..ss'

ती त्याला थांबवत- 'आणि हेही खोटे तुला थिएटर वगैरे आवडते, तू मुळातच स्कॉलर विद्यार्थी आहेस आणि नाटकात ह्याआधी तू कधीच काम केले नाहीस.. मला सगळे कळले आहे..'

तो भावनाविवश होत- ' पण हे सारे मी तुझ्यासाठी केले..'

ती त्याच रागात- 'माझ्यासाठी नाही हे सारे तुझ्यासाठी होते, तुला प्रेम हवे होते, तू जवळ आलास मी नाही, मला असे जोडून जुळवून केलेले प्रेम नकोय, तू जसा खरा आहेस तसा मला दिसू दे तरच खरं.. आणि अजून एक महत्वाचे, माझे प्रेम कोणाच्या तरी यशाचा पाया झालेला मला आवडेल, कोणाच्या अपयशाचा कर्ता करविता नको..'

आणि रागाने ती निघून गेली..

त्याच्या हातातला तो लाडूचा डबा जमिनीवर पडला..
ती लाडूची गोड आठवण आता कडू झाली होती..

त्याच्या हृदयातील प्रेमाची पणती विझली होती..

भूतकाळ पण आपल्याला हतबल करतो, आपल्याला हव्या त्या आठवणी निवडण्याचे स्वातंत्र्य तो देतच नाही.. तो विचार करत होता.. तोच घरून आईचा फोन आला तेव्हा तो भूतकाळातून वर्तमानकाळात आला.. नवीन नोकरी लागल्यावर त्याने त्याच शहरात नवीन फ्लॅट घेतला होता.. नवीन ठिकाणची आईला सवय होईपर्यंत आईची सोबत करणे त्याला भाग होते.. तो घरी निघाला..

संध्याकाळ झाली होती, शहरातील घरासमोरचे आकाश कंदील पेटले होते.. तो विचार करत होता.. आकाश कंदील.. म्हणजे कशाचे प्रतीक.. दिवाळीतील घराघरांत असणाऱ्या आनंदाचे असेल बहुतेक.. पण काही घरातील आनंद बहुतेक त्या कंदीलातच टांगलेला राहत असेल.. तोही आनंदी राहायचा प्रयत्न करू पाहत होता पण..

जाताना पुन्हा तिच्या घरावरूनच तो पुढे जाणार होता.. ती दारातच होती.. रांगोळी काढली होती.. ती फुलांची रांगोळी होती अगदी नैसर्गिक..त्याने पुन्हा दुर्लक्ष केले.. तोच तिने त्याला हाक मारली, तो पण तिच्याकडे पाठमोरा उभा राहिला..

ती- ' मला जरा तुझ्याशी बोलायचे होते, त्या दिवशी कदाचित मी चुकीचे वागलेही असेन, पण माझ्याकडे पर्याय नव्हता.. तुझ्यासारख्या हुशार मुलाचे नुकसान होताना पाहून मला वाईट वाटत होते.. म्हणूनच मी तेव्हा जे सुचेल ते बोलले.. शक्य असेल तर मला माफ कर..' तिचा स्वर गहिवरला होता..

पण त्याचे त्याला काहीच वाटले नाही, ती बोलायची थांबली आहे हे पाहून तो पुढे चालू लागला..

तो गेल्यावर तीला मात्र हुंदके आवरेनात.. ती तशीच घरात गेली..

तो घरात आला की लगेच रूममध्ये गेला, त्याच्या आईला पुन्हा आश्चर्य वाटले ह्याचे अचानक काय बिनसले आहे..

थोड्या वेळाने तो रूममधून बाहेर आला, गॅलरीत येऊन उभा राहिला, तोच आई बोलू लागली, ' अरे ते नवीन शेजारी, तू सकाळी फराळाचा डबा देऊन आलास ते, त्यांनी परत डबा भरून दिला आहे.. आणि त्यातही लाडूच जास्त.. त्यांच्याही मुलीने तुझ्यासारखेच गेले दोन तीन वर्ष लाडू खाणे सोडून दिले आहे असे त्या सांगत होत्या.. तीही बाहेरच्या शहरात आहे वाटते शिकायला, हिस्तेलवर राहते वाटते, आणि त्या अजून म्हणत होत्या कसे समजवायचे ह्या पिढीला, आताच लाडू खाऊन घ्या म्हणायचे, गोड खाता येईल तोपर्यंत..'

तिनेही तुझ्यासारखेच गेले दोन तीन वर्ष लाडू खाणे सोडून दिले आहे ह्या वाक्यावरच तो थबकला होता.. पुढचे त्याने ऐकलेच नाही.. लगेच आईजवळ येत म्हणाला, 'आई, तू केलेले लाडू आहेत का अजून..?'

आईने डब्याकडे बोट दाखवताच त्याने तो डबा उचलला.. धावत पळत घराबाहेर पडून गाडी सुरू केली.. तिला मघाशीच गाडीवर बाहेर पडताना बघितले होते त्याने गॅलरीतून..

तो तडक मंदिरात पोहचला.. ती तिथेच होती.. एक पणती पेटवत होती.. पण वाऱ्याने काडी पेटत नव्हती, त्याने हाताचा आडोसा दिला, तिने वर पाहिले, त्याला पाहताच ती उभी राहिली आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले..

तो लगेच गुडघ्यावर बसला आणि म्हणाला.. ' मला भेट देऊन तुझे प्रेम कशात तोलायचे नाही, पण त्या प्रेमाचा गोडवा जपण्यासाठी..' आणि लाडूचा डबा तिच्यापुढे केला..

तिने हसत हसत अश्रू आवरत हो म्हटले..
खालची पणती पेटली होती आणि त्याच्या हृदयातीलही प्रेमाची पणती पुन्हा पेटली होती..

तो तिला लाडू भरवत होता.. तो लाडू पुन्हा मिळवून देत होता.. हरवलेला त्यांच्या 'प्रेमाचा गोडवा..'

***
राही..©
***

सूचना - वरील लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. वरील लेख किंवा त्याचा कोणताही भाग लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रकाशित किंवा मुद्रित किंवा कोणत्याही स्वरूपात वापरता येणार नाही. तसेच परवानगी घेऊन वरील लेखाचा वापर करताना त्यात लेखकाच्या नावाचा आणि मोबाइल नंबरचा उल्लेख करावा.

संपर्क : ८३७८ ०४५१४५ (राही..)

8378 045145 (Rahi..)

कथालेख

प्रतिक्रिया

फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - १० ची लिंक

https://www.misalpav.com/node/43455