फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : १०

रा.म.पाटील's picture
रा.म.पाटील in जनातलं, मनातलं
18 Oct 2018 - 4:39 pm

फेस्टिव्हल डायरीज..!!
(Decorate your love..)

कथा - १०
नवरात्र.. प्रेमाचे रंग..

आज दुर्गादेवीचे आगमन झाले होते.. वातावरण भक्तिमय झाले होते.. देवीची पूजा म्हणजे स्त्रीची पूजा, स्त्रीत्वाची पूजा, पण सकाळचीच बातमी होती, स्त्रियांना मंदिरातील प्रवेश बंदीवरून.. एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीला भेटण्यास बंदी तेही पुरुषाकडून.. सगळेच विचित्र.. तरी सर्वत्र देवीची पूजा आजपासून सुरू होणार होती..

तो मित्राला समजावून सांगत होता, ' कसे आहे ना स्त्रियांनाही एक माणूस म्हणून सन्मान दिला पाहिजे, ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना चुकीचे वागण्यास मुभा असावी.. तर ज्या गोष्टी पुरुषांच्या चुकीच्या तिथे स्त्रीयाही चुकीच्या आणि जिथे पुरुष बरोबर तिथे स्त्रियाही बरोबर एवढी समानता हवी.. स्त्रीचाही देवी म्हणून आदर व्हावा आणि स्त्रियांनीही त्यांचे देवत्व जपले पाहिजे..'

आजपासून सुरू होणार होते ते नऊ दिवस, तो उपवास, ते नऊ रंग, आणि त्या नऊ रात्री..

रात्रीचा रंगणार होता दांडियाचा खेळ.. सारा युवा वर्ग नाचणार होता त्या संगीतमय वातावरणात.. आज टिपऱ्या एकमेकास भिडणार होत्या.. आणि काहींच्या नजरासुद्धा..

तो तर आज पहिल्यांदाच दांडिया खेळणार होता आणि पाहणार होता.. त्याचे काही मित्र मात्र तरबेज असल्यासारखे नाचत होते.. पण जोडीला काही शिकाऊ उमेदवार असल्याने तो पण मनमोकळेपणाने दांडिया शिकत होता..

तोच समोरून काही मुली येताना दिसल्या.. त्यात एकजण तर तिच्या निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये उठून दिसत होती.. सर्व मुले जागच्या जागी थबकले होते त्या मुलीला पाहताना.. अगदी तो सुद्धा..

ती मुलगी सगळ्याकडे पाहून हसली आणि नजर फिरवून पुढे चालू लागली.. सर्वजण त्या मुलीला पाठमोरी पाहतच होते..

आणि स्पीकरवर गाणे वाजत होते.. 'निले निले अंबर पर चांद जब आये, हमको तडपाये, हमको तरसाये..'

सर्वांची अवस्था अशीच झाली होती..

तिकडे त्या मुलीने व तिच्या मैत्रिणींनी घोळका करत दांडिया खेळण्यास सुरुवात केली.. हिकडेही मुले दांडिया खेळत होते पण सगळ्यांचे लक्ष त्या मुलीच्या घोळक्याकडे होते..

ती मुलगीही सारखी ह्या मुलांकडे पाहत होती..

आजचा दांडियाचा खेळ थांबला.. त्याच्या मित्राला गालातल्या गालात हसताना पाहत त्याने विचारले, ' काय झाले?'

त्याच्या मित्राने मोबाईल दाखवला, तिचाच फोटो होता, त्याने तिचे फेसबुक अकाऊंट शोधले होते आणि फ्रेंड रिक्वेस्ट पण पाठवली होती..

त्या फेसबुकच्या निळाशार समुद्रात लोक त्यांचे प्रेम शोधू पाहतात.. की गळाला लागणारा मासा.. कोणास ठाऊक..
त्याला प्रश्न पडला होता..

आणि नवरंगातला आजचा रंग निळा होता.. जितका उथळ तितकाच खोल.. अगदी प्रेमासारखे..

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो त्याच्या त्या मित्राला भेटला,

तो- 'अरे कुठे होता सकाळपासून, दिसला नाहीस..'
त्याच्या मित्राच्या चेहऱ्यावर काल उमटलेली ती हास्याची छटा अजूनही तशीच चमकत होती..

त्याचा मित्र- 'अरे तिला शोधायला गेलो होतो, कालच्या त्या निळ्या परीला..'

तो कुतूहलाने- ' सापडली का मग?'

त्याचा मित्र- ' हो ती एका आय टी कंपनीत जॉब ला आहे.. मूळची गावाकडची आहे, इथे हॉस्टेलवर राहते..'

तो- ' आय टी कंपनी म्हणजे खूप शिकलेली असेल..'
तो अप्रत्यक्षरित्या त्याच्या मित्राला त्याच्या कमी शिक्षणाची आठवण करून देत होता..

त्याचा मित्र- ' असू दे प्रयत्न करायला काय हरकत आहे..'
तोच त्यांचे इतर मित्र तिथे पोहचतात, मग सर्वजण दांडिया खेळण्यास जातात..

ती मुलगीही तिच्या मैत्रिणीबरोबर आलेली असते, आज ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये चमकत होती,

अजून खेळ सुरू होण्यास अवधी असतो, ती मुलगी सतत त्यांच्याकडे पाहत असते, आज कालच्या नजरेबरोबर तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच सुचक हास्य दिसत असते.. जे हास्य एखाद्या नव्या नवरीच्या चेहऱ्यावर तिला पिवळी हळद लावताना दिसते..

स्पीकरवर गाणे ऐकू येते.. ' हळद पिवळी पोर ही कवळी, जपून लावा गाली..' खरंतर ह्या गाण्यातील 'जपून' हा शब्द खूप महत्वाचा आहे.. तो खोलवर विचार करत होता..

आणि आजचा दुसरा रंग पिवळा होता.. जितका चमकदार तितकाच दाहक.. प्रेमाचेही वास्तव असेच आहे..

नवरात्र सुरू होऊन दोन दिवस झालेही होते.. त्याचा मित्र आज दिवसभर मोबाईलवर चॅट करत होता.. त्याला वाटले बहुतेक त्या मुलीने फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली असेल..

आज दांडिया खेळून झाल्यावर त्याला त्याचा मित्र कुठेच दिसेना.. नंतर तो त्या मुलीबरोबर बोलताना त्याला दिसला.. तिच्या इतर मैत्रिणी जरा बाजूलाच उभ्या होत्या.. त्यांना हवा तो एकांत देऊन..

त्याचा मित्र बोलतच होता आणि त्याच्या प्रत्येक वाक्यावर ती मुलगी हसत होती..

'हम पे ये किसने हरा रंग डाला, खुशी के खुमारीने हमे मार डाला..' स्पीकरवरचे ते गाणे आणि त्या दोघांच्या ड्रेसचा रंगही हिरवा.. खरंच रंग चढत होता, प्रेमाला हिरवी पालवी फुटत होती..

तो मात्र विचारात मग्न होता.. कसे आहे ना हिरव्या रंगाचे फुल नाही आणि ती हिरव्या रंगाच्या नाजूकपणाची कसूर निसर्गाने पालवीच्या रूपातून भरून काढली असेल..

आणि आजचा तिसरा रंग हिरवा.. जितका ताजेतवाने करणारा तितकाच कधी ना कधी गळून जाणारा.. प्रेमाचेही असेच असते ना..

आज चौथी संध्याकाळ, दांडिया खेळण्याची.. पण आभाळ आले होते, राखाडी रंगाचे ढग जमले होते.. आता विजेच्या टिपऱ्या वाजणार की खाली दांडियाच्या हे अजून ठरायचे होते..

तोच त्याचा मित्र आणि ती मुलगी एका गाडीवरून आलेली त्याला दिसली.. ती आमच्याकडे न पाहता गालातल्या गालात हसत तिच्या मैत्रिणींकडे गेली..

हिकडे त्याचे इतर मित्र त्याच्या मित्राला चिडवायला लागले, त्याचा मित्रही ही भाव खात उत्तर देत होता..

त्याला मात्र वाटत होते प्रेम हे पांढरे शुभ्र राहू शकते किंवा काळेकुट्ट होऊ शकते.. पण ते काळे पांढरे म्हणजेच राखाडी एकाच वेळी कसे होऊ शकेल.. त्याचा विचार चालू होता..

पण आजचा चौथा रंग राखाडी होता.. काळ्या पांढऱ्याचा समतोल साधणारा की बिघडवणारा.. प्रेमाच्याच दोन बाजूसारखा..

पाचव्या दिवशी दांडिया खेळायला मात्र त्याचा मित्र आला नाही .. पण ती मुलगी हजर होती.. पण ती मुलगीही नजर चुकवत होती.. तिचाही चेहरा पडला होता.. दोघांचे काहीतरी बिनसले होते हे नक्की..

तो दांडिया खेळत असताना त्याला त्या मित्राचा फोन आला.. त्याने त्याला बाहेर बोलावून घेतले.. तिथे गेल्यावर त्याच्या मित्राने ती हकीकत सांगायला सुरुवात केली..

तिचा कोणी जुना बॉयफ्रेंड आहे आणि तिने त्याला फसवले आहे म्हणून तिच्याबद्दल उलटसुलट बरेच काही बोलला.. त्याला ते काहीसे पटत नव्हते मात्र त्याने शांत राहणे पसंत केले.. त्याच्या मित्राचा राग अनावर झाला होता..

तो विचार करत होता, खरंतर त्याच्या मित्राला राग का यावा.. त्याने तेव्हाच ओळखायला हवे होते की जी व्यक्ती प्रेमात पडायला वेळ घेत नाही तेव्हा तिथे तितके शाश्वत प्रेम भेटणारच नाही ते फक्त आकर्षणच असेल.. आणि हा नियम त्याच्या मित्रालाही लागू होत होता..

तिला खुश करण्यासाठी तिच्यासारखाच आज त्यानेही केशरी रंग परिधान केला होता.. पण तो केशरी रंग आज त्याच्या संतापाच्या अग्नीच्या ज्वाळातूनही दिसत होत्या..

पण आजचा पाचवा रंग केशरी होता.. म्हटले तर प्राजक्तासारख्या नाजूक फुलाच्या देठाचा किंवा पेटलेल्या वणव्याच्या ज्वाळाचा..

कालच्या दिवशी त्याने त्याच्या मित्राला तेथून दूर नेले होते, त्याला बोलून दिले होते, शांत होऊन दिले होते.. आज सहाव्या दिवशीही त्याचा मित्र आला नाही दांडिया खेळायला.. पण तो गेला होता..

तो इतर मित्राबरोबर दांडिया खेळत होता.. तोच त्याला कोणीतरी हाक मारली.. त्याने वळून पाहिले तर तिथे एक मुलगी होती.. तिनेच हाक मारली होती.. ती त्या मुलीची म्हणजेच त्याच्या मित्राच्या प्रेयसीची मैत्रीण होती..

तिने बोलायला सुरुवात केली, तिने जे काही सांगितले ते ऐकून तो ही सुन्न झाला होता..

काल त्याचा मित्र आणि ती मुलगी एकत्र थिएटरमध्ये चित्रपट पाहण्यास गेले होते.. आणि त्याच्या मित्राला तिचा मोकळेपणा आवडला होता म्हणूनच की काय.. त्याने लक्ष्मणरेषा ओलंडायचा प्रयत्न केला..

ती- ' खरंतर तिनेही संयम बाळगायला हवा, कारण तुमचा मोकळेपणा गैरसमज वाढवू शकतो..'

तो- 'तुमचे म्हणणे योग्य आहे.. पण कसे आहे ना लक्ष्मणरेषा ओलांडल्यावरच कळते ना की पुढचा माणूस राक्षस आहे की नाही.. नाहीतर तोपर्यंत सर्वच देव बनून राहतात..'

ती- 'हो पण त्या राक्षसाला हरवता आले पाहिजे..'

तो- ' तुझेही बरोबर आहे प्रेमाचे सीमौल्लंघन होऊ दे, पण तेही लक्ष्मणरेषा सांभाळूनच..'

ती- 'हो ना मोहाचे क्षण टाळता आले पाहिजेत, तरच प्रेमाची शुभ्रता राहील..'

ती निघून गेली होती, खेळ थांबून देवीची पूजा सुरू झाली होती..

आणि त्या देवीच्या दरबारात त्याच्या मित्राच्या प्रेमाने काळा रंग निवडला होता.. पण त्या मुलीला प्रेमाचा पांढराच रंग अपेक्षित होता..

आणि आजचा सहावा रंग पांढरा होता.. त्या काळोख्या रात्रीतही स्वतःचे आस्तित्व दाखवणाऱ्या चंद्र आणि चांदणीसारखा.. प्रेमही असेच रहावे पांढरेशुभ्र...

आज सातवा दिवस, तो त्याच्या मित्राला समजावत होता, 'अरे, प्रेम हे हिसकावून नाही घेता येत, ते व्हावे लागते.. अरे प्रेम घडणे अपेक्षित आहे, पण तू ते घडवून आणायचे पाहतोयस, माझ्या मते जे सहजच मिळून जाते ते प्रेम नसते, ते फक्त आकर्षण असते.. खरंतर ज्यांना आयुष्यात काहीतरी करायचे असते अशा व्यक्ती वेगळ्याच असतात .. आणि अशा व्यक्तींना प्राप्त करणे म्हणजे खरी प्रेमाची परीक्षा असते.. नाहीतर तुला प्रेम करायला लाखो भेटतील ज्या तुझ्या व्याख्येतील प्रेम करायला तयारच असतात.. आणि तुही त्या लाखातलाच बनशील.. आणि जर तुम्ही खरंच प्रेम करत असाल तर तुम्ही तुमच्या प्रेमाची कधीही बदनामी नाही करणार जरी ते प्रेम तुमच्यापासून दूर गेले तरीही..'

त्याच्या मित्राला किती पटले ते त्याला माहीत नाही..

तो नेहमीप्रमाणे दांडिया खेळायला गेला होता.. ती मुलगीही आली होती.. आणि सोबत तिची 'ती' मैत्रिणीही..

दांडिया खेळण्यास सुरुवात झाली.. तोच त्याचा मित्रही आला.. आणि सरळ त्या मुलीसमोर गेला आणि खाली गुडघ्यावर बसून तिला म्हणाला.. 'सॉरी..'

त्या मुलीनेही हसत त्याला माफ केले आणि हात पुढे करत विचारले.. 'फ्रेंड्स..?'

त्याच्या मित्रानेही हात हातात घेत म्हटले, 'येस, फ्रेंड्स..!'

आज मात्र त्याच्या मित्रांनी आणि तिच्या मैत्रिणींनी एकत्र दांडिया खेळला.. त्याने आणि त्या मुलीच्या मैत्रिणीने एकमेकांना नजरेनेच थँक्स म्हटले..

आजचा खेळ थांबल्यावर त्याने तिला एकांतात विचारले की 'तुला त्यादिवशी ती गोष्ट मला का सांगावीशी वाटली..?'

ती- 'तुम्हाला त्यादिवशी कोणालातरी सांगताना ऐकले होते की.. स्त्रियांनाही एक माणूस म्हणून सन्मान दिला पाहिजे, स्त्रीचाही देवी म्हणून आदर व्हावा आणि स्त्रियांनीही त्यांचे देवत्व जपले पाहिजे..आणि उलट जो माणूस स्त्री समोर नसतानाही स्त्रीचा आदर करतो तो नकीच चांगला असेल.. असे मला वाटले.. पण मी माझ्या मैत्रिणीला तुझ्या मित्राबद्दल आधीच सावध केले होते.. पण म्हणतात ना काही परीक्षा स्वतःच देऊन पहायच्या असतात..'

तो विचार करू लागला, पण बऱ्याचदा प्रेमाच्या परीक्षेसाठी लाल रक्त का वाहिले जात आहे.. आणि त्या रक्ताने प्रेम जिंकता येते का की त्या प्रेमाचे अस्तित्व संपवले जाते..

आणि आजचा सातवा रंग लाल होता, लाल रक्त की लाल गुलाब की लाल कुंकू.. सर्व प्रेमाचीच प्रतीके..

आज आठव्या दिवशी आकाश निरभ्र होते आणि सर्वांचे मनही.. आज उलट सर्वजण आतुरतेने संध्याकाळची वाट पाहत होते.. एकत्र दांडिया खेळायला..

सर्वजण संध्याकाळी हजार होते, त्या मुलीने मात्र आज आकाशी रंगाचा ड्रेस घातला नव्हता आणि त्याच्या मित्रानेही.. दोघांच्या ड्रेसचा रंग वेगळा होता.. पण त्यांच्या मनात निखळ मैत्रिभाव होता.. त्याला ह्याच गोष्टीचे आश्चर्य वाटले, गेल्या सात दिवसात त्यांचे प्रेम झाले, ते तुटले आणि आता मैत्रीही झाली.. किती झपाट्याने बदलत आहेत हे नात्याचे रंग..

निसर्गही असाच बदलत होता, कालचे ढगाळ वातावरण जाऊन तिथे आकाशी रंग दाखल झाला होता..

आणि आजचा आठवा रंग आकाशी होता.. कसलाच थांग न लागणारा पण क्षितिजावर विसवणारा.. अथांग प्रेमही कुठेतरी विसावा शोधतेच..

आणि आज अखेरचा नववा दिवस, नववी संध्याकाळ, नववी रात्र.. शेवटचा दांडियाचा खेळ, शेवटची भेट, सर्वजण खूप उत्साहात खेळत होते.. अगदी रंगात आले होते.. नऊ दिवसापूर्वी काहीही न येणारा, तो अगदी तरबेज असल्यासारखा खेळत होता.. तीही त्याला तितकीच साथ देत होती.. एकेकजण दमून बाजूला जात होता.. आता उरले होते ते दोघेच.. तो आणि ती..

गाणे वाजत होते, 'गुलाबी आँखे जो तेरी देखी..' दोघांचीही नजर हटत नव्हती.. टिपरीला टिपरी भिडत होती.. आणि नजरेला नजर..

खेळ थांबल्यावर तो तिला एकांतात म्हणाला, 'मी आजची रात्र कधीच विसरणार नाही..'
ती ही लाजत म्हणाली, ' मीही नाही विसरणार.. ह्या नऊ रात्री..'

आज कधी नव्हे ते त्या दोघांच्या ड्रेसचा रंग जुळला होता.. गुलाबी रंग..

आणि आजचा नववा रंग गुलाबी होता.. जो आकर्षक असतो प्रेमासारखा.. पण तो शाश्वत कसा राहील हे ठरवतात तुमचे इतर 'प्रेमाचे रंग..'

***
राही..©
***
सूचना - वरील लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. वरील लेख किंवा त्याचा कोणताही भाग लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रकाशित किंवा मुद्रित किंवा कोणत्याही स्वरूपात वापरता येणार नाही. तसेच परवानगी घेऊन वरील लेखाचा वापर करताना त्यात लेखकाच्या नावाचा आणि मोबाइल नंबरचा उल्लेख करावा.

संपर्क : ८३७८ ०४५१४५ (राही..)

8378 045145 (Rahi..)

कथालेख

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

20 Oct 2018 - 7:18 am | विजुभाऊ

अरे बापरे.
सगळं डोक्यावरून गेलं

रा.म.पाटील's picture

8 Nov 2018 - 11:02 pm | रा.म.पाटील

धन्यवाद.. संपूर्ण कथा वाचण्याची तसदी घेतल्याबद्दल..!!