✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन

ह
हेमंतकुमार यांनी
गुरुवार, 07/12/2018 - 09:43  ·  लेख
लेख
‘ब’ गटातले हे जीवनसत्व वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामध्ये कोबाल्ट हे मूलद्रव्य असून अशा प्रकारचे ते आपल्या शरीरातील एकमेव संयुग आहे. त्याचा शोध १९४८ मध्ये लागला आणि त्यानंतर जीवनसत्वांच्या अधिकृत यादीत एकाचीही भर पडलेली नाही. निसर्गातील विशिष्ट जीवाणूच ते तयार करू शकतात. आपल्या मोठ्या आतड्यांत तसे काही उपयुक्त जीवाणू असतात आणि त्यांच्यामार्फत आपल्याला थोडे ब-१२ मिळते. अर्थात तेवढ्याने आपली गरज भागू शकत नसल्याने आपल्याला ते आहारातूनही घ्यावे लागते. ब-१२ चे आहारस्त्रोत, शरीरातील कार्य आणि त्याच्या अभावाची कारणे व परिणाम यांचा आढावा लेखात घेतला आहे. आहारस्त्रोत: ब-१२ चे बाबतीत एक मूलभूत गोष्ट म्हणजे कुठल्याही वनस्पतीत ते नसते. पण, जर पालेभाज्या सेंद्रिय शेतीतून निर्माण केल्या तर त्यांच्यात काही उपयुक्त जीवाणू राहतात आणि त्यांच्या माध्यमातून या भाज्यांत ब-१२ येते. तसेच शिळ्या अन्नातही जीवाणूंची वाढ होते आणि अशा अन्नसेवनातून ते आपल्याला मिळू शकते. प्राणिज पदार्थ मात्र भरपूर ब-१२ पुरवतात. यकृत, अंडे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे त्याचे महत्वाचे स्त्रोत. यीस्ट हाही एक त्याचा वैशिष्ट्यपूर्ण स्त्रोत. त्याचा वापर करून बनवलेले शाकाहारी पदार्थ हा अशा लोकांसाठी दिलासा असतो. ‘व्हेगन’ खाद्यशैलीतून मात्र ते मिळणे अवघड असते. अलीकडे ब-१२ ने ‘संपन्न’ केलेली काही खाद्यान्ने बाजारात मिळतात. ब-१२ चे पचनसंस्थेतून शोषण: हा एक गुंतागुंतीचा विषय आहे. अन्नातले ब-१२ प्रथिनांशी घट्ट संयोग झालेले असते. प्रथम ते जठरात येते. तिथल्या हायड्रोक्लोरिक आम्ल आणि एन्झाइमच्या मदतीने ते सुटे केले जाते. नंतर तिथले IF नावाचे एक प्रथिन त्याच्याशी संयुग पावते. ही एक आवश्यक क्रिया आहे. पुढे हे संयुग लहान आतड्यांतून मार्गक्रमण करीत आतड्याच्या शेवटच्या भागात पोचते. तिथे त्याचे विघटन होऊन ब-१२ शोषले जाते. पुढे ते रक्तप्रवाहातून यकृतात पोचते आणि तिथे त्याचा मोठ्या प्रमाणात साठा होतो. पुढे ते गरजेनुसार सर्व शरीराला पोचवले जाते. शरीरातील कार्य : अन्य ‘ब’ जीवनसत्वांप्रमाणेच तेही काही रासायनिक क्रियांमध्ये सह-एन्झाईमचे काम करते. याद्वारे ते पेशींतील DNA व RNA या मूलभूत रेणूंच्या उत्पादनात मदत करते. याकामी त्याला फोलिक अ‍ॅसिड या अन्य ‘ब’ जीवनसत्वाचीही मदत होते. मज्जातंतूंच्या कामातही त्याचे महत्वाचे योगदान आहे. अलीकडील संशोधनातून त्याचा हाडांच्या आरोग्यासाठीही संबंध असल्याचे दिसले आहे. ते अस्थिजनक पेशींच्या योग्य वाढीसाठी मदत करते. अभावाची कारणे: १. अतिशुद्ध शाकाहारी (व्हेगन) खाद्यशैली: गेल्या दोन दशकांत हा खूप कुतूहलाचा व चर्चेचा विषय झालेला आहे. येथे काही मुद्दे लक्षात घ्यावेत. सहसा जन्मल्यापासून कुणीच अशी शैली आचरत नाही. तेव्हा तथाकथित ‘शाकाहारी’ हे दूध वा दुग्धजन्य पदार्थ खात असतात आणि त्यातून ब-१२ मिळते. त्याची रोजची गरज काही मायक्रोग्रॅम इतकीच आहे. वर आपल्या यकृतात त्याचा भरपूर साठा होत असतो. साधारणपणे हा साठा आपल्या ५ वर्षांच्या गरजेइतका असतो. तेव्हा व्हेगन शैली आचरणात आणल्यानंतर काही वर्षांनी अभावाची लक्षणे दिसतील. २. जठरातील पेशींची वयानुरूप झीज होते आणि त्यामुळे वृद्धांमध्ये IF चे उत्पादन कमी होऊ लागते. तसेच अन्य काही आजारांमध्येही अशी झीज होते. ३. पचनसंस्थेचे काही आजार : यांत ब-१२ चे शोषण नीट होत नाही. ४. IF ची अनुवांशिक कमतरता : हा ऑटोइम्युन प्रकारातील आजार आहे. ५. अलीकडे लठ्ठपणा कमी करण्यासाठी पचनसंस्थेवर काही शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यात जठराचा काही भाग काढून टाकला जातो. त्यामुळे IF चे प्रमाण खूप कमी होते आणि त्याचा परिणाम ब-१२ चे शोषणावर होतो. अभावाचे परिणाम: शरीरातील सर्वच पेशींच्या वाढीवर परिणाम होतो परंतु, तो लालपेशी आणि मज्जासंस्थेवर प्रकर्षाने दिसून येतो. रुग्णात साधारण खालील लक्षणे दिसतात: १. रक्तक्षय आणि त्यामुळे येणारा अशक्तपणा: हा रक्तक्षय लोहाच्या कमतरेतून होणाऱ्यापेक्षा वेगळ्या प्रकाराचा असतो. यात लालपेशी मोठ्या आणि विचित्र आकाराच्या होतात. २. हातापायांना ‘मुंग्या’ येणे आणि चालताना अस्थिर वाटणे: मज्जारज्जू व मज्जातंतूवर दुष्परिणाम झाल्याने हे होते. ३. काही रुग्णांत मनस्वास्थ्य बिघडू शकते आणि विस्मरण होते. वृद्धावस्थेत हाडे ठिसूळ होणे. वृद्धावस्था आणि ब-१२ चा पुरवठा: या अवस्थेत जठराची पचनशक्ती बरीच कमी झालेली असते. त्यामुळे नैसर्गिक आहारातील ब-१२ शरीरात नीट शोषले जात नाही. याउलट ‘संपन्न’ खाद्यांतले अथवा गोळ्यांच्या रुपातले ब-१२चे व्यवस्थित शोषण होते. त्यामुळे अशा स्त्रोतांचा वापर वृद्धांमध्ये गरजेनुसार जरूर करावा. ब-१२ ची रक्तपातळी : अलीकडे ही पातळी चाळणी चाचणी म्हणून बरीच चर्चेत असते. पण या चाचणीचे निष्कर्ष बऱ्याचदा विश्वासार्ह नसतात. समजा पातळी ‘नॉर्मल’ पेक्षा कमी असेल तरीही त्या व्यक्तीत संबंधित आजाराची लक्षणे बिलकूल नसतात. म्हणून काही त्रास (रक्तक्षय वगैरे) नसेल तर उठसूठ याच्या फंदात पडू नये. कधीकधी अशी टूम निघते की सर्व शाकाहारीनी हे प्रमाण बघून घ्यावे. पण अशा सरसकटीकरणाला तसा अर्थ नाही. ***************************

Book traversal links for कोबालामिन (ब-१२) : एक अनोखे व्हिटॅमिन

  • ‹ ‘क’ जीवनसत्व : आंबट फळांची दणकट देणगी !
  • Up
  • ब-१ जीवनसत्व : ऊर्जानिर्मितीचे गतिवर्धक ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
आरोग्य

प्रतिक्रिया द्या
47467 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

मला हा प्रतिसाद आवडला

खिलजि
Tue, 07/17/2018 - 19:00 नवीन
मला हा प्रतिसाद आवडला सुधीरसाहेबांचा . मी स्वतः अस्पिरीनवर काम केलेले आहे . ते एका ठराविक तापमानावरच नियंत्रि राहते अन्यथा त्याचे त्वरित सॅलिसिलिक ऍसिडमध्ये रूपांतर होते . सुमारे २०१० मध्ये हा प्रोजेक्ट आला होता आणि मी स्वतः त्यावर काम करत होतो . जवळजवळ सहा महिने काम झाल्यावर आम्हाला असे आढळले कि एका नियंत्रित तापमानात आणि एका विशिष्ट सामूमध्येच ऍस्पिरिन राहू शकतो . आता सांगायची गोष्ट अशी कि आम्ही आमच्या परीने तो प्रोजेक्ट पूर्ण केला आणि सूपूर्दही केला आणि नंतर तो एफ दि ए ला मान्यही झाला . सांगायची मेख अशी कि ऍस्पिरिन जो घेत असेल त्याने जर ते व्यवस्थित शीतकपाटात ठेवले नाही तर सर्व गोंधळच आहे . तो नक्की काय खात असेल ऍस्पिरिन कि त्याचा मेटॅबोलाईट सॅलिसिलिक ऍसिड हा देखील संशोधनाचा मुद्दा आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुधीर कांदळकर

मुळात ऍस्पिरिन हे ऍसेटील

सुबोध खरे
Tue, 07/17/2018 - 20:39 नवीन
मुळात ऍस्पिरिन हे ऍसेटील सॅलिसिलिक ऍसिड आहे. ते तयार करतात ते सुद्धा सॅलिसिलिक ऍसिड आणि ऍसेटिक ऍनहायड्राइड याच्या संयोगाने. ते जठरात / आतड्यात/ यकृतात सॅलिसिलिक ऍसिड मध्ये आणि ऍसेटिक ऍसिड मध्ये विघटन पावते. सॅलिसिलिक ऍसिड हेच मुळात औषध आहे. त्यामुळे जरी ऍस्पिरिन विघटन पावलेले असले तरी मागे राहणाऱ्या सॅलिसिलिक ऍसिडमुळे रुग्णाला फायदा सुद्धा मिळतोच. फरक एवढाच आहे कि नुसत्या सॅलिसिलिक ऍसिडमुळे जठराचा दाह ऍस्पिरिनपेक्षा जास्त होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

Aspirin is used in the

सुबोध खरे
Tue, 07/17/2018 - 20:40 नवीन
Aspirin is used in the treatment of mild to moderate pain, inflammation, and fever. It is also used as an antiplatelet agent to prevent myocardial infarction, stroke and transient ischemic episodes. Aspirin is absorbed rapidly from the stomach and intestine by passive diffusion. Aspirin is a prodrug, which is transformed into salicylate in the stomach, in the intestinal mucosa, in the blood and mainly in the liver. Salicylate is the active metabolite responsible for most anti-inflammatory and analgesic effects (but acetylsalicylate is the active moiety for the antiplatelet-aggregating effect). Gastrointestinal intolerance to salicylate observed in some patients has prompted the development of formulations with enteric coating. Salicylate distributes rapidly into the body fluid compartments. It binds to albumin in the plasma. With increasing total plasma salicylate concentrations, the unbound fraction increases. Salicylate may cross the placental barrier and distributes into breast milk. https://sepia.unil.ch/pharmacology/index.php?id=83
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

एक विनंती…

हेमंतकुमार
Tue, 07/17/2018 - 21:06 नवीन
एक विनंती… चर्चेदरम्यान जालावरचे इंग्लिश परिच्छेद इथे जसेच्या तसे डकवणे टाळल्यास बरे होईल अपरिहार्य तांत्रिक शब्द वगळता मराठीतच लिहावे ही विनंती. आपल्या संस्थळाचे मराठीपण आपणच जपूयात. धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

सुधीर, उत्तम विवेचन.

हेमंतकुमार
Sun, 07/15/2018 - 08:10 नवीन
आपण कोणीच परिपूर्ण नाही. जे काही अनुभवाचे बोल असतात ते एकमेकास जरूर सांगायचे. काही विषय हे २-३ ज्ञानशाखांच्या सीमेवरील असतात. तिथे वाचकाच्या प्रत्येक शंकेला एकच तज्ञ उत्तर नाही देऊ शकत. दरवेळेस त्या ‘गुगलराजा’तून बोध होतोच असे नाही. तेव्हा एकमेकांची मदत घेण्यात आनंद वाटतो. धन्यवाद !
  • Log in or register to post comments

उपयुक्त चर्चा

हेमंतकुमार
Mon, 07/16/2018 - 11:25 नवीन
आणि पूरक माहितीबद्दल सर्वांचे आभार .
  • Log in or register to post comments

कुमारसाहेब आपले लेख फारच छान

खिलजि
Tue, 07/17/2018 - 18:50 नवीन
कुमारसाहेब आपले लेख फारच छान असतात . मला खरंच खूप खूप आवडतात . मुळात आपली लेखन शैली इतकी सहज आहे कि मी ते व्यवस्थितपणे माझ्या बायकोला देखील समजावून सांगू शकतो . मागे मी नमूद केल्याप्रमाणे हे आपले लिखाण म्हणजे एक उत्कृष्ट समाजसेवा आहे असे माझे पक्के मत बनत चाललेय . धन्यवाद कुमारसाहेब
  • Log in or register to post comments

खिलजी, अनेक आभार.

हेमंतकुमार
Tue, 07/17/2018 - 19:11 नवीन
तुमचे सातत्यपूर्ण प्रोत्साहन माझ्या भावी लेखनासाठी उर्जा पुरवते. तुमच्यासारख्या अभ्यासू वाचकांच्या सहभागानेच ही चर्चा परिपूर्ण होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खिलजि

फक्त फार्मास्यूटिकल एड .....

सुधीर कांदळकर
Wed, 07/18/2018 - 07:16 नवीन
यांच्या संदर्भातली माहिती जीमेलवर पाठविली आहे.
  • Log in or register to post comments

म क, माहितीबद्दल आभार

हेमंतकुमार
गुरुवार, 07/19/2018 - 18:26 नवीन
या मालिकेतील पुढचे जीवनसत्व इथे आहे: https://www.misalpav.com/node/43031
  • Log in or register to post comments

उपयुक्त धागा

ट्रेड मार्क
Fri, 07/20/2018 - 02:48 नवीन
आणि चांगली माहिती आहे. दुकानात मिळणाऱ्या गोळ्या किंवा द्रावण स्वरूपातील व्हिटॅमिन बी१२ मध्ये दोन वेगवेगळे मूलभूत घटक असतात. जे सर्वसाधारण सहज आणि कमी किमतीत उपलब्ध असते त्यात Cyanocobalamin असते. हे प्रयोगशाळेत तयार केलेले बी१२ आहे. तर दुसऱ्या प्रकारात Methylcobalamin असते जे प्राकृतिक स्वरूपात मिळवले जाते असे म्हणतात. त्यामुळे याची किंमत थोडी जास्त असते. या दोन्हीपैकी कुठलं चांगलं यावरून डॉक्टर मंडळींमध्ये मतभिन्नता आहे. डॉ. कुमार, डॉ. खरे किंवा मिपावर अजून कोणी औषधशास्त्रातले असतील त्यांनी कृपया यावर थोडी अधिक माहिती द्यावी.
  • Log in or register to post comments

सध्या उपलब्ध असलेल्या

सुबोध खरे
Fri, 07/20/2018 - 09:20 नवीन
सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार दोन्हीच्या कार्यक्षमते मध्ये फारसा फरक नाही. दोनातील कोणतेहि द्रव्य घ्या. काही फरक पडणार नाही. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5370327/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

कोणते ब १२ ?

हेमंतकुमार
Fri, 07/20/2018 - 08:01 नवीन
Methyl C हे प्रत्यक्ष पेशींत काम करणारे सह-एंझाइम आहे. त्यामुळे वरवर पाहता ते श्रेष्ठ असेल असे वाटते. तरी पण दोहोंची तुलना करण्यासाठी औषध शास्त्रातील व्यक्ती चे मत घ्यावे लागेल.
  • Log in or register to post comments

अतिरिक्त माहिती

Rajesh188
Sun, 04/28/2019 - 09:27 नवीन
वर्णनाच्या सुलभतेकरिता जीवनसत्त्वांचे विद्राव्यतेप्रमाणे वर्गीकरण सर्वसामान्य झालेले आहे. परंतु ते अगदी काटेकोर आहे असे नव्हे. कारण काहींची विद्राव्यता मेद व जल या दोन्हींतही आढळली आहे. ‘जलविद्राव्य ब’ हा एकच पदार्थ नसून आणखी काही विशिष्ट पदार्थांचा मिळून बनल्याचे समजल्यानंतर त्याला ‘जीवनसत्त्व ब समूह’ असे नाव मिळाले. या समूहास थायामीन (ब१ जीवनसत्त्व किंवा ॲन्युरीन), रिबोफ्लाविन (ब२ जीवनसत्त्व ), निॲसीन (निॲसीनामाइड किंवा निकोटिनिक अम्ल), ब६ जीवनसत्त्व, पँटोथेनिक अम्ल, बायोटीन, फॉलिक अम्ल, ब१२ जीवनसत्त्व, इनॉसिटॉल, कोलीन इ. पदार्थांचा समावेश होतो. या लेखात फक्त प्रचलित नावांचाच उल्लेख करण्यात आला आहे.
  • Log in or register to post comments

खुलासा

हेमंतकुमार
Sun, 04/28/2019 - 09:58 नवीन
जीवनसत्वांच्या ‘ब’ गटात एकूण ८ घटक आहेत : थायमिन, रिबोफ्लाविन, निअसीन, पायरीडोक्सीन, बायोटीन, pantothenic acid, फोलिक a व कोबालामीन. इनॉसिटॉल व कोलीन यांना जीवनसत्वांच्या अधिकृत यादीत स्थान दिलेले नाही. असे बरेच पदार्थ ‘जीवनसत्वासारखे’ (vitamin-like sub.) म्हणून ओळखले जातात. त्यांची यादी बरीच आहे. एकूण अधिकृत जीवनसत्वे १३ च आहेत. ( ‘ब’ गटाची ८, क आणि अ, ड, इ आणि K).
  • Log in or register to post comments

नवे संशोधन

हेमंतकुमार
Mon, 11/14/2022 - 12:33 नवीन
B12 च्या उपयुक्ततेसंबंधी नवे संशोधन सतत चालू असते. अलीकडच्या काही संशोधनानुसार या जीवनसत्त्वाचा खालील आजारांमध्ये उपयोग होऊ शकतो: विषाणू संसर्ग : पूरक उपचार पार्किन्सन आजार: प्रतिबंधात्मक उपचार
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा