चलत-चित्र पद्मावतीची (रड)कथा आणि वर"करणी" स्वातंत्र्य...!
तसे या विषयावर लिहिणारच नव्हतोत, परंतु मि पा वर चर्चा भीमा कोरेगाव वर लेख वाचले, मांदियाळीत चर्चा बहुत होते जाणवले, ततपश्चात "लिहून पाहू" ने झपाटले, आणि शेवटी टंकले...!
तसे ऐतिहासिक संदर्भ पाहता आमच्या भूतकाळात आम्ही सदर ईसमाचे चित्रपट पाहिलेले नाहीत. (किंबहुना थेटरात जाऊन पाहिलेले नाहीत म्हणणे जास्त उचित). बाजीराव मस्तानी वा रामलीला चा एकही प्रसंग आमुच्या डोळ्यांसमोरून गेल्याचे आम्हास स्मरत नाही. हे त्यांचे बहुचर्चित चित्रपट. (तेव्हा त्यांच्या इतर चित्रपटांची काय 'कथा वर्णावी').
पद्मावतीच्या मुहूर्तासच माश्या शिंकलेल्या, या संजयास तेव्हाच दिव्य दृष्टीने भविष्य समजावयास हवे होते, परंतु हा संजय 'तो' नव्हे - अन्यथा त्यास चित्रपटाचे पेटते पडदे दृष्टीस पडते ना! या सद्गृहस्थावरील जीवघेणा हल्ला, कलाकारांच्या जीवाची बोली, करोडोंच्या बाता, अन समाजमाध्यमांवरील लाथा. असा हा एकूणच रोमांचित करणारा ( विनाकारण ) प्रसिद्ध पावलेला हा या चित्रकृतीचा प्रवास मन थक्क करणारा आणि मती गुंग करणारा.
अजून चित्रपट तयार नव्हता, त्याची कथा माहित नव्हती, कोण्या माणसाने चित्रीकरण स्थळावर जाऊन पाठपुरावा करून ठोस पुरावा मिळविलेला नाही की चित्रपटात खरोखर पद्मावती राणीच्या चारित्र्याचे हनन झालेले आहे, तरीही चित्रकृतीस विरोध होत आहे. बरे केवळ शाब्दिक विरोध नव्हे तर हिंसात्मक भाषा आणि त्यास कृतीची जोड हे पाहता आम्हास येणाऱ्या भूतकाळाचीच चिंता वाटते आहे.
आम्हाला आमुच्या भारतीय संस्कृतीचा कोण अभिमान हे पटवून द्यायची हि स्पर्धा इतकी जीवघेणी कि ओठांतून उपरोधिक "वा.....!" नैसर्गिकपणे निघावा. पद्मावतीस सुरु असलेला विरोध म्हणजे अंधारात साप आहे असे समजून त्यास मारण्यासाठी काठ्या जमिनीवर आपटणे आणि एकमेकांची उरःफोड व शिर:फोड अशीच आहे. यातून पुढे अस्तित्वात असलेला साप तर मरणार नाहीच परंतु 'हाती काय?' या प्रश्नास (स्वतःच्याच) रक्ताने माखलेल्या काठ्या आणि डोकी हेच उत्तर असेन याबद्दल आमच्या मनात बिलकुल दुही नाही.
भारतात अजून लोकशाही आहे असा आमचा तरी समज आहे. यात व्यक्तीस्वातंत्र्य सर्वात महत्वाचे. व्यक्ती स्वातंत्र्याचे रक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी हि सर्वोच्च न्यायालयाची आणि हे हक्क त्यांस घटनेने दिलेले. सर्वोच्च न्यायालय हे वरपांगी विचार करून सुलतानशाहित चालणारे निर्णय देणारे ठिकाण नव्हे. समाजातील सर्व घटकांचा सांगोपांग विचार करून भविष्यकालीन परिणामांचा घटक लक्षात घेऊनच निर्णय देणारे आहे. सर्वोच्च न्यायालयाने तर या चित्रपटास कधीचाच हिरवा कंदील दर्शविला आहे. चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डाने देखील वर"करणी" परिणाम नसल्याचे दर्शवत कट्स सुचवून चित्रपट प्रदर्शनास सज्ज असल्याचे सांगितले आहे. तरीही या चित्रपटास होणारा विरोध हा आत्यंतिक क्लेशाचा आणि लोकशाहीस मारक असल्याचे प्रतीकच आहे. भारतात प्रत्येकास विचार प्रकट करण्याचे स्वातंत्र्य आहे. चित्रपट हा देखील विविधांगी विचारांचाच परिपाक असतो. हि एक कलाच आहे, आणि कलेस विरोध करणे ही मागास विचारांची लक्षणे. कलेची जपणूक हि कलाकारांची जबाबदारी नव्हे. कलेचा विकास हि त्यांची जबाबदारी परंतु जपणूक हा भाग समाजाचा. व्यक्तीस्वातंत्र्याचा हक्क हा जितका निकोप भावनेने स्वीकारला जातो तितका समाज हा प्रगतिशील आणि एकोप्याच्या मानसिकतेचे प्रतिनिधित्व करतो.
सध्या या चित्रपटास होणारा विरोध हा आपल्या समाजाच्या मानसिक वाटचालीचे प्रतिनिधित्व करतो आहे. जगाची भाविष्याकडून भविष्याकडे जाण्याची ओढ आहे पण आपल्याकडे मात्र भाविष्यातून भूतकाळात जाण्याची आत्मीयता दिसते. आमच्या भूतकाळात संस्कृतीत सगळ्याच गोष्टी चांगल्या असे छाती पिटुन सांगावयाचे आणि त्याचा डोळे झाकून अंगीकार करावयाचा हे मूर्खांच्या मांदियाळीत आल्याचेच सूचक उदाहरण आहे.
चित्रपटास काही ठराविक राज्यांत विरोध होतोच आहे आणि हि आपली दुभंगलेली मने दर्शवित आहे. ज्या ठिकाणी शतकानुशतके चालत आलेल्या जाती परंपरेची पाळामुळांसाकट नायनाट करण्याची संधी आपल्या सगळ्यांना आलेली तेथे आपण "आजही गडे मुरदे उखडण्यात" धन्यता मानतो आहोत. असल्या कोत्या मानसिकतेवर औषध आजतागायत कोणाला सापडलेले नाहीय.
चित्रकृती बनत रहायला हव्या, त्या समाजाचा आरसा असतात. जोवर हा आरसा सपाट काचांवर असेल तोवर सत्य समजत राहील. कारामणुकीकरिता तुम्हास जाड वा बारीक दिसणारे आरसेही बनविलेले असतात. त्यात तुम्हाला तुम्ही जसे पाहिजे तसे मनः शांतिकरिता दाखविले जाते. तुम्ही सुंदर दिसाल असा आरसा बनेलही पण सत्य सांगणारे आरसे हेच खरे. आभासी जग हे तकलादू असते, व त्याचे भविष्य हे अंधःकारमय असते.
उरला प्रश्न पद्मावतीच्या नामांतराचा आणि प्रदर्शनाचा, तर आमच्या मते तो चित्रपट आहे तसाच प्रदर्शित होऊ द्या. पटला तर पहा अन्यथा बहिष्कार टाका. आपणास कोणी बळजबरी थोडी ना करणार चित्रपट पहावयाची.
चित्रपटास आणि दीपिकाच्या उघड्या पोटास विरोध करून शंभर स्त्रियांचा जोहार करणेची भाषा करणे ऐवजी स्त्रियांची कमी होणारी संख्या, स्त्री भ्रूण हत्या, स्त्री पुरुष समानता, स्त्रियांवरील अत्याचार यावर लक्ष द्यावे असे आम्हास वर"करणी" तरी वाटते.
प्रतिक्रिया
खरे आहे.. पण संजयच्या
ठंडा करके खाओ.....
अहो हे सगळे घडवून आणले आहे
सहमत!!
+10
भन्साळीचा गोरखधंदा बंद होइल
याच अभिव्यक्ति स्वातंत्र्याचे
अद्दल घडली
आजच्या बातम्यांचा अपडेट वाचला नै ?
...असे आम्हास वर"करणी" तरी
आगे आगे देखिये होता है क्या.