एका सुंदर उपक्रमाची आणि जबरदस्त मोहीमेची दखल!
सर्व मिपाकरांना मन:पूर्वक नमस्कार.
एका जबरदस्त मोहीमेची आणि एका सुंदर उपक्रमाची माहिती आपण सर्वांसोबत शेअर करावीशी वाटली. एखादी व्यक्ती आपली आवड, पॅशन, छंद ह्यामधून किती सुंदर काम उभं करू शकतो आणि त्याही पलीकडे इतरांना किती मोठी प्रेरणा देऊ शकतो, ह्याचं हे एक उदाहरण आहे. आपल्यापैकी अनेकांना हर्षद पेंडसे हे नाव ओळखीचं असेल. हर्षदजी ९ सप्टेंबर रोजी लेह- खर्दुंगला येथे होणा-या खर्दुंगला चॅलेंज धावण्याच्या स्पर्धेत भाग घेत आहेत. खर्दुंग- खर्दुंगला- लेह ही ५००० मीटर्स पेक्षा जास्त उंचीवरची ७२ किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉन आहे आणि त्यात ते सहभाग घेत आहेत!!! आणि त्यासाठी तयारी म्हणून त्यांनी टप्प्या टप्प्याने १० किमी, १५- २०, २५- ३२ आणि मग ५० किमीपर्यंतही धाव घेतलेली आहे! आणि इतकेच नाही, तर ही तयारी करत असताना त्यांना लक्षात आलं की, मेळघाटामध्ये काम करणा-या मैत्री संस्थेला निधीची गरज आहे. म्हणून त्यांनी त्यांची ही साहसी मोहीम मैत्री संस्थेसाठी समर्पित केली आणि लोकांना मैत्रीसाठी निधी देण्याचं आवाहन केलं. त्यांनी हाती घेतलेलं खर्दुंगला चॅलेंज अल्ट्रा मॅरेथॉनचं आव्हान आणि त्याची तयारी इतकी जबरदस्त होती की, ते पाहून अनेकांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला! ७२ किमीची अल्ट्रा मॅरेथॉन म्हणून त्यातून ७२ दाते समोर यावेत, हा त्यांचा मानस बघत बघता पूर्ण होतोय! आजवर त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणारे अनेक हात मिळाले आहेत.
पुढील तपशील मिपाप्रमाणेच रसिकांचं लाडकं संस्थळ असलेल्या माबोवरच्या हर्षदजींच्या पोस्टमध्ये आहेत:
एका धावकाचे ‘मैत्री’ खातीर आवाहन
मी बराच काळ कामाच्या निमित्ताने एका गावी फार स्थिर असा राहू शकलो नव्हतो. त्यामुळे मला माझे छंद जोपासायला नीट सलग असा कालावधी मिळालाच नाही. त्याकारणाने माझे छंद एक ना धड भाराभर चिंध्या अशा प्रकारचे आहेत / होते. पण गेले काही वर्षे पुण्यात रहायला आल्यापासून जीवनाला जरा स्थिरता आली आणि मग साधारण एकाच सुमारास चालू झाले, मैत्री (नावाची एक संस्था जी मेळघाटात काम करते तिच्या) करता स्वयंसेवक म्हणून काम करणे आणि माझे धावणे.
माझ्या धावण्याच्या अगदी सुरुवातीच्या दिवसापासूनच्या प्रवासाला मायबोली साक्षी आहे. तसेच माझ्या मेळघाटातल्या अनुभव लिखाणाबरोबर ‘मैत्री’ ला मदत करा अशा केलेल्या आवाहनाला देखील अनेक मायबोलीकर कायमच प्रतिसाद देत आले आहेत. काही मायबोलीकरांनी तर मेळघाटात प्रत्यक्ष जावून स्वयंसेवक म्हणूनही काम केले.
आता ह्या दोन्हीचा इथे / परस्परांशी काय संबंध असे वाटणे स्वाभाविक आहे. तर तो संबंध असा.
मी आता यावर्षी ९ सप्टेंबर रोजी लदाख येथे होणाऱ्या खारदुंग ला चेलेंज मध्ये भाग घेण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा लेह पासून चालू होउन खारदुंग ला आणि परत लेह अशी एकूण ७२ किमी अंतराची आहे.
अधिक माहीती http://ladakhmarathon.com/races/khardung-la-challenge/
तसे पाहता मी आजवर चार वेळा मुंबई मॅरेथॉन, एकदा हैदराबाद आणि एक कच्छच्या रणातली अशा सहा पूर्ण मॅरेथॉन (४२.२ किमी) तसेच लोणार येथील ५० किमी ची अल्ट्रा अशा शर्यती पार पाडल्या आहेत. पण तरीही ही अल्ट्रा माझ्याकरता खरोखरच मोठे आव्हान आहे.
मी माझ्या परीने सगळ्याप्रकारची तयारी चालू केल्ये. रजा मिळवून झाल्ये, जाण्यायेण्याची तिकीटे काढून झालेली आहेत. वेळापत्रकानुसार धावणे सुरु केले आहे. ( मागच्या आठवड्या पर्यंत सरासरी ६० ते ७० किमी धावणे करत होतो ह्या आठवड्यातले ध्येय एकूण १०० किमी आहे)
इतक्यातच 'मैत्री' संस्थेला त्यांचे मेळघाटातील उपक्रम चालू ठेवण्याकरता निधी कमी पडतोय अशी बातमी कळली. त्यामुळे मी ही स्पर्धा मैत्री संस्थेच्या कार्याला समर्पित करायचे ठरवले आहे आणि माझी अशी आकांक्षा / संकल्प आहे की या तीन-चार महिन्यात ‘मैत्री’ च्या मेळघाटातील कामाकरता किमान १००० रुपये देणारे किमान ७२ दाते तयार करायचे.
मैत्री संस्थेचे मला भावलेले वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय पार्श्वभूमी असले ल्या नागरिकांचे एका चांगल्या कामाकरता एकत्र येणे आणि तब्बल वीस वर्षे ते काम चालू ठेवणे. फक्त अडीच माणसे सोडली तर बाकी सर्व जण मैत्रीकरता काम विनामुल्य / स्वयंसेवा म्हणून करतात. ओव्हरहेड जवळ जवळ नाहीच. मेळघाटातल्या लोकांना औषधे सोडली तर वैयक्तिक वापराच्या कुठल्याही वस्तू फुकट वाटत नाहीत. सामुहिक वापराकरता सोलर वर चालणारा पंप आणि पाण्याची टाकी बसवून दिली पण त्याची देखभाल स्थानिक रहिवाश्यांकडून वर्गणी काढून केली जाते. स्थानिक लोकांनी आत्मनिर्भर व्हावे म्हणून प्रयत्न केले जातात. शाळा चालाव्यात म्हणून शैक्षणिक साहित्य दिले जाते. सध्या चालू असलेल्या योजनांचा ही सगळा भर कौशल्ये विकास (skill buildng/ development), व्यवसाय निर्मिती व उद्योजकता, सरकारी योजनांविषयी माहिती व पाठपुरावा, सेंद्रिय व पारंपारिक शेतीमधून उत्पादकता वाढवणे अशा कार्यक्रमांवर आहे.
अधिक माहीती करता - http://www.maitripune.net/Home.html
मी स्वतः काही वेळा काही दिवसांकरता मेळघाटात स्वयंसेवक म्हणून जाऊन आलो आहे.
तर अशा 'मैत्री' खातर ज्यांना जसे शक्य होईल तसे त्याप्रमाणे, यथाशक्ती यथामती जी काही रक्कम देउ करायची असेल ती मैत्रीच्या खात्यावर परस्पर जमा करावी अशी मी विनंती करतो.
देणगी: “मैत्री” या नावाने चेक / रोख देणगी म्हणून देता येईल.
“मैत्री”साठी दिलेल्या देणग्या आयकर कायद्याच्या ८०जी खाली करमुक्त आहेत.
ONLINE DOMESTIC DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank
Branch : Kothrud, Pune
Savings Account Number : 01491450000152
Account Name : Maitri
MICR : 411240009
Details for RTGS / NEFT / IFS Code : HDFC0000149
ONLINE FOREIGN DONATION
Maitri Account Details (avail this facility at no cost)
Bank : H D F C Bank Limited
Branch : Kothrud, Pune, Maharashtra, India.
Savings Account Number : 01491170000017
Account Name : Maitri
MICR Code : 411240009
Swift Code : HDFCINBB
जे कोणी जी काही रक्कम जमा करेल त्यांनी इथे तसे कळवावे. जर कोणाला स्वत:चा नामोल्लेख नको असेल तर त्यांनी मला तसे संपर्कातून (९८८११५२८८४) कळवल्यास त्यांनी दिलेली रक्कम अनामिक देणगीदाराकडून म्हणून नमूद करण्यात येईल. रक्कम परस्परच जमा करायची आहे मात्र केली की इथे जरूर कळवा. तसेच मी 'खारदुंग ला' करता करत असलेल्या तयारीबद्दलही वेळोवेळी इकडे कळवत राहीनच पण असे (मनोरंजन मुल्य नसलेले) धागे लगेच मागे जातात म्हणून वेळोवेळी मला शुभेच्छा देत राहून ह्या धाग्याला वर आणत रहा. कृपया धन्यवाद. - हर्षद पेंडसे
आजवरचे एकूण देणगीदार ६४
आजवरची एकूण देणगी रक्कम १,५९,११४/-
(१६ ऑगस्ट रोजीची स्थिती).
ह्या सुंदर उपक्रमाची व तितक्याच जबरदस्त मोहिमेची माहिती इथे आपल्यासोबत शेअर करावीशी वाटली. आणि हे आव्हान व त्यांनी केलेलं आवाहन हे फक्त संस्थेला मदत करण्यापुरतं मर्यादित नाही आहे. त्यांनी आपल्याही फिटनेसला; आपल्याही शारीरिक क्षमतेला आवाहन केलं आहे, प्रेरणा दिली आहे! मी स्वत: त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन नव्याने माझं रनिंग सुरू केलं! त्यांच्या अनुभवातून खूप प्रेरणा मिळाली. रनिंगचाही आनंद घेता आला. आणि फिटनेसबद्दलही अनेक गोष्टी समजल्या. आणि अर्थातच संस्थेला रू. १००० देऊन माझाही छोटा हातभार लावता आला.
आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांच्या तयारीची "धाव" बघताना वाटतं की, मी अर्धा तास नेटवर बसतो असं आपण जितकं सहज म्हणतो, तितकं सहज ते म्हणतात, मी आज धावलो, पण ३५ किमी च धावलो! आणि विशेष म्हणजे त्यांच्या बोलण्यात कुठेही हे काही अतिशय कठीण आहे, असा भाव येत नाही. उलट ते सतत हेच म्हणतात की, मला हे जमू शकतंय तर कोणीही हे करू शकतं. आणि इतक्या मोठ्या "धावफलकाबद्दल" मीही तितकाच आश्चर्यचकीत आहे, असंही ते सांगतात! हे सर्व आपल्यासोबत शेअर करावसं वाटलं. म्हणून त्यांच्या अनुमतीने ही पोस्ट इथे करत आहे. ह्या सुंदर उपक्रमाची नोंद इथले सर्व मान्यवर घेतील आणि त्यापासून सर्वांना नक्कीच प्रेरणा मिळेल, असं वाटतं.
हर्षद पेंडसेंचं फेसबूक पेज: https://www.facebook.com/runformaitri/ इथे त्यांच्या तयारीचे अपडेट बघता येतील. मीही मधून मधून त्यांचे अपडेट इथे कळवेन. सर्वांना धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
इथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद.
प्रेरणादायक व स्पृहणिय
चुकिचि लिन्क
अनेकानेक शुभेच्छा!
धन्यवाद!
अपडेटेड वेब साईट
उपक्रमाची माहिती
फारच प्रेरणादायी. खूप खूप
योगदान
हर्षद पेंडसे ह्यांना शुभेच्छा!
मोहीमेला हार्दिक शुभेच्छा !
हो ना,
खाली माहिती दिली आहे. ती
शुभेच्छा.
अरे वा!
मोहीम अंतिम टप्प्यात
शुभेच्छा!
अपडेट
शुभेच्छा!
मोहीम फत्ते
अभिनंदन!!!
हार्दीक अभिनंदन !
सविस्तर मार्गदर्शन!!
अभिनंदन..!!!!!
हार्दिक अभिनंदन !
मस्तच..७२ किमी तेही अशा विरळ
तपशील
Khardung La Challenge मध्ये
अरे वा,