✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चुकचुकली पाल एक...!

ख
खेडूत यांनी
Mon, 08/01/2016 - 12:44  ·  लेख
लेख
गीत : चुकचुकली पाल एक, कालचक्र क्षण चुकले नकळत या रात्रीला मी माझे दिन विकले रंग तुझे स्वप्नमयी ल्यालेली ती पहाट धुक्यामधुन मी तुझी शोधियली वाट वाट परि दिशेस पुन्हा पुन्हा वळण नवे का फुटले अशी हरवले तशी मलाच मी अनोळखी इथेतिथे दंवातही तुझीच मूर्ती सारखी गीतातील सूर असे का मधेच पण तुटले तुजवाचून दूर दूर मी अशीच राहणार ही अशीच तव छाया पण मागे धावणार सावल्यांत साऱ्या, या चित्र असे मम कुठले गीत: वसंत निनावे , संगीत श्रीनिवास खळे, गायिका: लता मंगेशकर. वर्ष : १९७६ *** अत्यंत आवडीचे हे गीत कितीही ऐकले तरी 'अजून एकदाच' ऐकल्याशिवाय थांबवत नाही. सुरुवातीच्या ओळी भावगीतासाठी म्हणून काहीश्या विचित्र अन गूढ वाटतात. त्याचा अर्थ शोधावा का? खरं तर नकोच. कांही हाती लागेल का नाही माहीत नाही. आणि बाकीची कविता मात्र अन्य कोणत्याही विरहगीतासारखीच वाटते. पालीचे चुकचुकणे हे व्यत्यय येणे या अर्थाने आपण वापरतो. म्हणजे कांही विपरीत घडले अन अपेक्षित असे कालचक्र चुकले. आपल्या व्यवहारी जगात कालचक्र म्हणजे घड्याळाची टिक-टिक असेल तर त्याची लय पालीच्या चुक-चुक आवाजाने चुकतेच. या गीतातही अर्थातच ही प्रेमिका आपल्या प्रियाच्या विरहाने दिवस रात्र तळमळत आहे. व्यवहारी जगात त्याला शोधण्यात कांही अर्थ नाही हे तिला उमगले आहे. आता तिच्या भावविश्वातच फक्त ती प्रियकराला शोधत आहे. त्याच्याशी संवाद साधत आहे. अतिशय तरल कविता आणि भावपूर्ण स्वर फक्त अनुभवावेत असेच झालेत. गाणी तयार होतात कशी ? हा आपण रसिकांना नेहेमीच पडणारा प्रश्न असतो. संगीतकार प्रवासात, गप्पात असले तरी त्यांना एक से एक चाली सुचल्याचे आपण वाचतो. गाण्यांच्या जन्मकथा रंजक असतात. 'चुकचुकली पाल' एक या गाण्याची गोष्ट अशीच कांहीशी आहे. २०११ च्या दिवाळीच्या सुमारास लोकप्रभेत खळेकाकांवर लिहिलेला श्री. अनंत पावसकरांचा एक लेख आला होता. त्यात या गाण्याची जन्मकथा सविस्तर वर्णन केली होती. ती अशी: १९६७ साली वसंत निनावेंची ‘चुकचुकली पाल एक.’ ही कविता खळेकाकांना मिळाली. त्यांनी त्या कवितेला छान चालही लावली. या गाण्यासाठी त्यांना महंमद रफी हवे होते ! रफीसाहेब गायला तयार झाले. खूप रिहर्सल्स केल्या, पण गाडी मुखडय़ातच अडकली. ‘चुकचुकली’ हा शब्द उच्चारताच येईना. मराठीतला हा ‘च’ इतर कोणत्याच भाषेत नाहीय. रफीसाहेबांनी ढोरमेहनत घेतली, पण पहिले पाढे पंचावन्न! ‘चुकचुकली’तल्या ‘च’चा उच्चार ‘चूडी’तल्या ‘च’ सारखाच यायचा. हात टेकले दोघांनी. खळेकाकांनी हे गाणं इतर कोणाही गायकाला न देता सरळ बासनात गुंडाळून ठेवून दिलं. (यावरून आठवले- रफीसाहेबांची मराठी आणि संस्कृत उच्चारांची समस्या असावी. 'जहाँ डाल डाल पर सोने की चिडियाँ करती हैं बसेरा' या गाण्याच्या सुरुवातीस जी प्रार्थना आहे, त्यातलं 'तस्मै श्री गुरवे नमः' हे नमः हे लम्हा सारखं म्हटलं गेलंय. सगळेच संगीतकार परफेक्शनिस्ट नसतात. बाबूजी किंवा खळेकाकांनी हे चालवून घेतले नसते. बाकी गोड आवाजापुढे छोट्या त्रुटी झाकल्या जातात. ) १९७६ साल उजाडलं. एके दिवशी खळेकाकांनी लतादीदींकडे या गाण्याचा विषय काढला. लतादीदींनी ती चाल ऐकताच चट्कन होकार भरला. गाणं रेकॉर्ड झालं. एल. पी. रेकॉर्डवर प्रसिद्धही झालं. आकाशवाणीवरही ते बऱ्याचदा वाजायचं. पण नंतर का कुणास ठाऊक. हे गाणं एच.एम.व्ही.ने फडताळात लपवून ठेवलं की काय. ते कुठेच सहजी उपलब्ध होत नव्हतं. १९९३ साली लतादीदींच्या सल्ल्याने जेव्हा ‘माझी आवडती गाणी’ हा आठ कॅसेट्सचा संच प्रकाशित झाला, त्यात हे गाणे गवसले. आता हे गाणं ऐकायला कांही संस्थळांवर उपलब्ध आहे. खळेकाकांच्या वैशिष्ट्यानुसार प्रत्येक कडवे वेगळे, चाल वैशिष्ट्यपूर्ण आणि नितांतसुंदर झालीय. एखाद्या गीताचं सोनं व्हायचंच असेल तर ते असं होतं ! लतादीदीना हे गाणे मिळाले म्हणून बरे. इतर कुणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. गाण्याची ही रोचक जन्मकथा ऐकल्यावर एक मोठठी शंका राहातेच, ती म्हणजे हे एका प्रेमिकेचे बोल असणारे गाणे रफीसाहेब कसे काय म्हणणार होते ? की त्यांच्यासाठी वरील शब्द बदलण्यात आले असते ? जाऊद्या. आपण आपले गाणे ऐकूयात .. ! गाणे इथे ऐकता येईल.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
संगीत
वाङ्मय
कविता
भाषा
साहित्यिक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
आस्वाद
संदर्भ
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
8822 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

बहुत शुक्रिया या नज्मसाठी!

एस
Mon, 08/01/2016 - 12:49 नवीन
बहुत शुक्रिया या नज्मसाठी! गाण्याची चित्तरकथा रोचक आहे.
  • Log in or register to post comments

यप

विनायक प्रभू
Mon, 08/01/2016 - 12:51 नवीन
१+
  • Log in or register to post comments

+१००

अजया
Tue, 08/02/2016 - 09:02 नवीन
गाण्यामागची गोष्ट आवडली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

+१०००

सस्नेह
Tue, 08/02/2016 - 12:47 नवीन
कविता आणि कवितेची गोष्ट दोन्ही आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

सुंदर लेख!

बोका-ए-आझम
Mon, 08/01/2016 - 12:56 नवीन
माणसांप्रमाणेच गाण्यांनाही नशीब असतं.
  • Log in or register to post comments

सुरेख...

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 08/01/2016 - 13:49 नवीन
खळे काकांची सगळीच गाणे श्रवणीय असतात, त्यात ते गाणे लता ने गायले असले तर चेरी ऑन द केक. हे गाणे पहिल्यांदाच ऐकले छान वाटले. आणि तुम्ही सागितलेल्या इतिहासाच्या पार्श्र्वभुमिवर ऐकताना अजून मजा वाटली. रफीच्या आवाजात हे गाणे कसे वाटले असते असे इमॅजिन करतो आहे. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

असे किस्से अजुन असतील तर येउ द्यात.

दुर्गविहारी
Mon, 08/01/2016 - 17:24 नवीन
असे किस्से अजुन असतील तर येउ द्यात. गाणी तयार होण्याची प्रक्रिया रोचक असते. सध्या लोकसत्ताच्या चतुरन्गमध्ये उत्तरा केळकर यान्चे पाक्षिक सदर अशीच छान माहिति देत.
  • Log in or register to post comments

खूप सुरेख लिहिलंय,

यशोधरा
Mon, 08/01/2016 - 18:26 नवीन
खूप सुरेख लिहिलंय, दुर्गविहारी म्हणतात, तशी मालिका बनवा.
  • Log in or register to post comments

लेख आवडला....

मुक्त विहारि
Mon, 08/01/2016 - 19:02 नवीन
हे गाणे कधी ऐकले नाही. गाण्याची लिंक मिळाली तर उत्तम.
  • Log in or register to post comments

सर्व वाचक आणि प्रतिसादक यांचे

खेडूत
Mon, 08/01/2016 - 19:36 नवीन
सर्व वाचक आणि प्रतिसादक यांचे आभार. @मुवि, गाण्याचा दुवा वरती दिलाय. खूप जणांना हे गाणं माहीत नसतं, म्हणून निवडलंय. @दुर्गविहारी, आणि यशोताई, प्रयत्न करेन. फार पूर्वी कांही दिग्गजांना भेटण्याची संधी मिळालीय.
  • Log in or register to post comments

गाण्याच्या दुव्यावर क्लिक केल्यावर खालील लिंक दिसते....

मुक्त विहारि
Mon, 08/01/2016 - 19:39 नवीन
https://en.wikipedia.org/wiki/LP_record पण गाणे ऐकता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

ती नाई हो, ही...http://www

खेडूत
Mon, 08/01/2016 - 19:42 नवीन
ती नाई हो, ही... http://www.aathavanitli-gani.com/Song/Chukachukali_Paal_Ek
  • Log in or register to post comments

ती पण लिंक चेक केली...

मुक्त विहारि
Mon, 08/01/2016 - 19:44 नवीन
पण पण पण गाणे ऐकता येत नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

मुवि ही घ्या आठवणीतील

प्रमोद देर्देकर
Tue, 08/02/2016 - 11:36 नवीन
मुवि ही घ्या आठवणीतील गाण्याच्या साईटवर ते गाणे आहे त्याची लिंक. इथे ऐका. http://www.aathavanitli-gani.com/Song/Chukachukali_Paal_Ek ही साईट मस्त आहे. या साईटवर सगळी मराठी दुर्मिळ गाणी बहुतेक करुन उपल्ब्ध आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

बरोबर, तीच. खाली उजव्या कोपर्

खेडूत
Tue, 08/02/2016 - 12:31 नवीन
बरोबर, तीच. खाली उजव्या कोपर्‍यात प्लेयर आहे. फक्त्र मोबाईलवरून ऐकता येत नाहीये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

आवडलं

ज्योति अळवणी
Tue, 08/02/2016 - 00:01 नवीन
आवडलं
  • Log in or register to post comments

खूप छान लिहिलंय.

पद्मावति
Tue, 08/02/2016 - 03:13 नवीन
खूप छान लिहिलंय.
  • Log in or register to post comments

काही

नाखु
Tue, 08/02/2016 - 08:53 नवीन
गाणी त्याच नशीब घेऊन आलेली असतात तर काही गाण्यानीच नशीब बदलते.. अरूण दातेंच्या बाबतचा किस्सा लोक्सत्तामध्ये उत्तरा केळकरांच्या लेखात आला आहे. मस्त लेख आणि गाणे पहिल्यांदाच वाचतोय. नितवाचक नाखु
  • Log in or register to post comments

छान !

ब़जरबट्टू
Mon, 08/08/2016 - 10:07 नवीन
गाण्यामागील गोष्ट आवडली.
  • Log in or register to post comments

वा!

पैसा
Mon, 08/08/2016 - 10:17 नवीन
गाणे, आणि त्यामागची कथा सगळेच आवडले. १९७६ म्हणजे तेव्हा आम्ही आकाशवाणी आणि भावगीते भरपूर ऐकत होतो. पण हे गाणे ऐकल्याचे आठवत नाही. इथे लिंक दिल्याबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा