गीत :
चुकचुकली पाल एक, कालचक्र क्षण चुकले
नकळत या रात्रीला मी माझे दिन विकले
रंग तुझे स्वप्नमयी ल्यालेली ती पहाट
धुक्यामधुन मी तुझी शोधियली वाट वाट
परि दिशेस पुन्हा पुन्हा वळण नवे का फुटले
अशी हरवले तशी मलाच मी अनोळखी
इथेतिथे दंवातही तुझीच मूर्ती सारखी
गीतातील सूर असे का मधेच पण तुटले
तुजवाचून दूर दूर मी अशीच राहणार
ही अशीच तव छाया पण मागे धावणार
सावल्यांत साऱ्या, या चित्र असे मम कुठले
गीत: वसंत निनावे , संगीत श्रीनिवास खळे, गायिका: लता मंगेशकर. वर्ष : १९७६
***
अत्यंत आवडीचे हे गीत कितीही ऐकले तरी 'अजून एकदाच' ऐकल्याशिवाय थांबवत नाही.
सुरुवातीच्या ओळी भावगीतासाठी म्हणून काहीश्या विचित्र अन गूढ वाटतात. त्याचा अर्थ शोधावा का? खरं तर नकोच. कांही हाती लागेल का नाही माहीत नाही. आणि बाकीची कविता मात्र अन्य कोणत्याही विरहगीतासारखीच वाटते.
पालीचे चुकचुकणे हे व्यत्यय येणे या अर्थाने आपण वापरतो. म्हणजे कांही विपरीत घडले अन अपेक्षित असे कालचक्र चुकले. आपल्या व्यवहारी जगात कालचक्र म्हणजे घड्याळाची टिक-टिक असेल तर त्याची लय पालीच्या चुक-चुक आवाजाने चुकतेच. या गीतातही अर्थातच ही प्रेमिका आपल्या प्रियाच्या विरहाने दिवस रात्र तळमळत आहे. व्यवहारी जगात त्याला शोधण्यात कांही अर्थ नाही हे तिला उमगले आहे. आता तिच्या भावविश्वातच फक्त ती प्रियकराला शोधत आहे. त्याच्याशी संवाद साधत आहे. अतिशय तरल कविता आणि भावपूर्ण स्वर फक्त अनुभवावेत असेच झालेत.
गाणी तयार होतात कशी ? हा आपण रसिकांना नेहेमीच पडणारा प्रश्न असतो. संगीतकार प्रवासात, गप्पात असले तरी त्यांना एक से एक चाली सुचल्याचे आपण वाचतो. गाण्यांच्या जन्मकथा रंजक असतात. 'चुकचुकली पाल' एक या गाण्याची गोष्ट अशीच कांहीशी आहे.
२०११ च्या दिवाळीच्या सुमारास लोकप्रभेत खळेकाकांवर लिहिलेला श्री. अनंत पावसकरांचा एक लेख आला होता. त्यात या गाण्याची जन्मकथा सविस्तर वर्णन केली होती. ती अशी:
१९६७ साली वसंत निनावेंची ‘चुकचुकली पाल एक.’ ही कविता खळेकाकांना मिळाली.
त्यांनी त्या कवितेला छान चालही लावली. या गाण्यासाठी त्यांना महंमद रफी हवे होते !
रफीसाहेब गायला तयार झाले. खूप रिहर्सल्स केल्या, पण गाडी मुखडय़ातच अडकली. ‘चुकचुकली’ हा शब्द उच्चारताच येईना. मराठीतला हा ‘च’ इतर कोणत्याच भाषेत नाहीय. रफीसाहेबांनी ढोरमेहनत घेतली, पण पहिले पाढे पंचावन्न! ‘चुकचुकली’तल्या ‘च’चा उच्चार ‘चूडी’तल्या ‘च’ सारखाच यायचा. हात टेकले दोघांनी. खळेकाकांनी हे गाणं इतर कोणाही गायकाला न देता सरळ बासनात गुंडाळून ठेवून दिलं. (यावरून आठवले- रफीसाहेबांची मराठी आणि संस्कृत उच्चारांची समस्या असावी. 'जहाँ डाल डाल पर सोने की चिडियाँ करती हैं बसेरा' या गाण्याच्या सुरुवातीस जी प्रार्थना आहे, त्यातलं 'तस्मै श्री गुरवे नमः' हे नमः हे लम्हा सारखं म्हटलं गेलंय. सगळेच संगीतकार परफेक्शनिस्ट नसतात. बाबूजी किंवा खळेकाकांनी हे चालवून घेतले नसते. बाकी गोड आवाजापुढे छोट्या त्रुटी झाकल्या जातात. )
१९७६ साल उजाडलं. एके दिवशी खळेकाकांनी लतादीदींकडे या गाण्याचा विषय काढला. लतादीदींनी ती चाल ऐकताच चट्कन होकार भरला. गाणं रेकॉर्ड झालं. एल. पी. रेकॉर्डवर प्रसिद्धही झालं. आकाशवाणीवरही ते बऱ्याचदा वाजायचं. पण नंतर का कुणास ठाऊक. हे गाणं एच.एम.व्ही.ने फडताळात लपवून ठेवलं की काय. ते कुठेच सहजी उपलब्ध होत नव्हतं. १९९३ साली लतादीदींच्या सल्ल्याने जेव्हा ‘माझी आवडती गाणी’ हा आठ कॅसेट्सचा संच प्रकाशित झाला, त्यात हे गाणे गवसले.
आता हे गाणं ऐकायला कांही संस्थळांवर उपलब्ध आहे. खळेकाकांच्या वैशिष्ट्यानुसार प्रत्येक कडवे वेगळे, चाल वैशिष्ट्यपूर्ण आणि नितांतसुंदर झालीय.
एखाद्या गीताचं सोनं व्हायचंच असेल तर ते असं होतं ! लतादीदीना हे गाणे मिळाले म्हणून बरे. इतर कुणाची आपण कल्पनाही करू शकत नाही.
गाण्याची ही रोचक जन्मकथा ऐकल्यावर एक मोठठी शंका राहातेच, ती म्हणजे हे एका प्रेमिकेचे बोल असणारे गाणे रफीसाहेब कसे काय म्हणणार होते ? की त्यांच्यासाठी वरील शब्द बदलण्यात आले असते ?
जाऊद्या. आपण आपले गाणे ऐकूयात .. !
गाणे इथे ऐकता येईल.
वाचने
8854
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
बहुत शुक्रिया या नज्मसाठी!
यप
+१००
In reply to यप by विनायक प्रभू
+१०००
In reply to +१०० by अजया
सुंदर लेख!
सुरेख...
असे किस्से अजुन असतील तर येउ द्यात.
खूप सुरेख लिहिलंय,
लेख आवडला....
सर्व वाचक आणि प्रतिसादक यांचे
गाण्याच्या दुव्यावर क्लिक केल्यावर खालील लिंक दिसते....
In reply to सर्व वाचक आणि प्रतिसादक यांचे by खेडूत
ती नाई हो, ही...http://www
ती पण लिंक चेक केली...
In reply to ती नाई हो, ही...http://www by खेडूत
मुवि ही घ्या आठवणीतील
In reply to ती पण लिंक चेक केली... by मुक्त विहारि
बरोबर, तीच. खाली उजव्या कोपर्
In reply to मुवि ही घ्या आठवणीतील by प्रमोद देर्देकर
आवडलं
खूप छान लिहिलंय.
काही
छान !
वा!