✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पोशाखावरून पात्रता ठरवता येते काय?

अ
अमृता_जोशी यांनी
Mon, 04/04/2016 - 02:01  ·  लेख
लेख
आज शनिवार म्हणून नेहमी प्रमाणे मी प्रोझोन मॉल मधील स्टार बजार मध्ये भाजीपाला वैगेरे खरेदी करण्यासाठी गेले होते. खरेदी केल्यानंतर बील करण्यासाठी मी काऊन्तर वर आले तर तेथेच स्टार बझारच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात खालील जाहिराती पहिल्या ad ad हे दोन्ही फोटो पाहून सुरुवातीला कसेतरी वाटले; पण नंतर राग आला. लगेच बिलिंग काऊन्तर वरच्या मुलाला म्यानेजरला बोलवायला सांगितले; पण म्यानेजर रजेवर होता म्हणून त्याच्या जागेवर असलेल्या इनचार्जला बोलावून आणायला सांगितले. ते लगेच आले. गळ्यातल्या ओळखपत्रावर नाव 'राहुल भिसे' "क्या हुआ म्याडम?" "मला या जाहिरातीचा नेमका अर्थ कळला नाही, जरा सांगता का?" "आं? चेष्टा करताय काय म्याडम?" "नाही, खरंच कळाला नाही. सांगता का?" "ते आमच्या 'Easy shop prepaid card' ची जाहिरात आहे ही' "ते कळले हो, पण या दुसऱ्या जाहिरातीत 'So easy even she can use it' या वाक्याचा अर्थ काय? 'Even she' म्हणजे काय?" "याचा अर्थ आमचे कार्ड वापरायला एवढे सोपे आहे की ती देखील वापरू शकते." "ती म्हणजे कोण?" "ही फोटोतली बाई" "हो, पण ती आहे कोण?" "अडाणी किंवा ग्रामीण असा काहीसा अर्थ आहे त्याचा." "कशावरून?" आता तो इनचार्ज गप्प होऊन इकडे तिकडे पहायला लागला. मला अजूनच राग आला. "सांगाना कशावरून ती अडाणी आहे?" "काय म्याडम, कशाला शाळा घेताय माझी. त्या जाहिराती मी बनवत नाही हो, आम्हाला वरून येतात." "वरून कुठून? ढगातून? आणि अगोदर मला हे सांगा की ही बाई अडाणी आहे हे कशावरून?" मी अजूनच चिडले. "ते फोटोत दिसत नाही का?" आता त्या म्यानेजरचा सूर उद्धटपनाचा झाला. "काय दिसतंय या फोटोत?" "त्या मोडेलचे कपडे वैगेरे." "तिचे कपडे पारंपारिक आहेत; ग्रामीण किंवा अडाणी नाही. आणि हे सांगा, 'So easy even she can use it' असे तुम्ही या पहिल्या बाईच्या फोटोपुढे का लिहिले नाहीत? तिचे कपडे ही पारंपारिक पंजाबीच आहेत." "का भांडताय?" "कारण या फोटोतली बाई कुठल्याच अंगलने अडाणी वाटत नाही. काहीसे असलेच कपडे घालणारी बाई लोकसभेची अध्यक्ष आहे." "मान्य आहे, पण आता मी काय करावे?जे वरून येते ते लावून टाकतो आम्ही. " "ही जाहिरात आत्ताच्या आत्ता काढून टाका; आणि तुमच्या कंपनीत माझी ही तक्रार पाठवून द्या. पुढच्या आठवड्यात आल्यानंतर परत मला ही जाहिरात दिसली नाही पाहिजे." "ठीक आहे; टाकतो काढून" एवढे बोलून तो निघून गेला. घरी येईपर्यंत एवढाच विचार करत होते की मी फक्त त्याला शांतपणे समजाऊन सांगायला हवे होते, हे असे भांडल्याने लोकांना कदाचित मीच मूर्ख वाटली असणार. स्वार्थी राजकीय पक्षांनी हे मराठी अभिमानाचे मुद्दे बोलून बोलून एवढे बिलबील करून टाकले आहेत की आता बोलायची सोयच राहिले नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिसाद

प्रतिक्रिया द्या
40138 वाचन

💬 प्रतिसाद (200)

प्रतिक्रिया

मला वाटते स्टोअर इनचार्जचे

रुपी
Tue, 04/05/2016 - 01:40 नवीन
मला वाटते स्टोअर इनचार्जचे ओळखपत्रावरचे नाव इथे देणे बरोबर नाही.
  • Log in or register to post comments

काय ठरलं मग?

यशोधरा
Tue, 04/05/2016 - 09:16 नवीन
काय ठरलं मग?
  • Log in or register to post comments

इस्रो मधल्या शास्त्रज्ञ

पैसा
Tue, 04/05/2016 - 10:57 नवीन
Image removed. Image removed. या बघा मंगळावर यान पाठवणार्‍या इस्रोच्या शास्त्रज्ञ. अजून काही सांगायला पाहिजे का?
  • Log in or register to post comments

सौ सुनार की और एक पैसाताईकी

तर्राट जोकर
Tue, 04/05/2016 - 11:15 नवीन
सौ सुनार की और एक पैसाताईकी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सौ सुनार की और एक पैसाताईकी

माहितगार
Tue, 04/05/2016 - 11:59 नवीन
सौ सुनार की और एक पैसाताईकी
+१+१..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

क्षमा करा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/05/2016 - 12:09 नवीन
आपण म्हणता या इस्रोच्या शास्त्रज्ञ आहेत म्हणून विश्वास ठेवतील. पण माझ्या गल्लीतल्या स्रियांना पाककृतीचं बक्षीस मिळाल्या म्हणून या महिला एकत्र आल्या आहेत आणि तो आनंद साजरा करत आहेत असंही वाटू शकतं. - दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

मुद्दा

माहितगार
Tue, 04/05/2016 - 12:16 नवीन
बिरुटे सर, आपल्याला काय वाटलं त्यावरुन त्यांची पात्रता कमी होत नाही आणि म्हणून पोषाखावरुन अथवा संस्कृतीवरुन कमी लेखू नका हा तर मुद्दा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मान्य.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/05/2016 - 12:24 नवीन
पोषाखावरुन कोणी कोणालाही कमी लेखुच नये. पण दुर्दैवाने पोषाखावरुन बर्‍याच गोष्टी ठरवल्या जातात ही गोष्टही मान्य केली पाहिजे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

केवळ पहिला प्रभाव - माझे मत

माहितगार
Tue, 04/05/2016 - 12:48 नवीन
पण दुर्दैवाने पोषाखावरुन बर्‍याच गोष्टी ठरवल्या जातात ही गोष्टही मान्य केली पाहिजे.
अंशतःच सहमत आहे. कस्टमर रिलेशन मध्ये तुम्ही बोलायला चालू करता तो पर्यंतच तुमचे व्यक्तीमत्व आणि पोषाख म्हणजे पहिल्या प्रभावा पर्यंतच मर्यादीत असते, त्यानंतरचे तुम्ही काय बोलता त्यावर अवलंबून असते, तसेच अभिनयात दृष्य रुप अभिनयाची संधी मिळे पर्यंतच पहिला प्रभाव म्हणून उपयूक्त असू शकते, नंतरचे करीअरमध्ये प्रत्यक्ष अभिनय जमतो की नाही याचा संबंध राहतो एकदा कलाकार अभिनयासाठी तुम्ही स्विकारला की त्याचे दिसणे आणि त्याने घातलेला पोषाख दुय्यम ठरतो. एखादा गर्भ श्रीमंत भिकार्‍याचा वेष घालून जरी फिरला तरी लोक त्याला मुजराच करतील की नाही. ज्याच्याकडे गर्भ श्रीमंती नसते त्याला त्याचे प्रदर्शन करावे वाटते म्हणून लोक दिसणे आणि पोषाखादी वरच्या गोष्टीच्या मागे लागतात. गर्भ श्रीमंतीत वाढलेली व्यक्ती कदाचित तेवढी प्रदर्शनोत्सुक राहणार नाही माझे मत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पहिल्याच प्रभावाबाबत पोषाखाचा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/05/2016 - 13:02 नवीन
पहिल्याच प्रभावाबाबत पोषाखाचा परिणाम असतो. नंतरच्या संभाषणात पोषाखाला महत्व नसतं. तिथून पार्ट टू, पार्ट थ्री, पार्ट फोर सुरु झालेला असतो, तरीही पहिल्या प्रभावाचा परिणाम इतर भागांवरही टीकून असतो. म्हणजे इतका हुशार माणुस आहे पण किती गबाळा दिसत होता. पेहराव ही तुमची पहिली ओळख असतेच असते. गर्भश्रीमंत भिकार्‍याचा वेष घालून जर फिरला तर त्याला सर्वच लोक मुजरा करणार नाही. कारण तो माझ्या ओळखीचा नाही, मी त्याला पाहिलेलं नाही. त्याचा पहिला प्रभाव पेहराव ठरवेल, जो पर्यंत त्याची माझ्याशी नीट ओळ्ख होत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

त्याचा पहिला प्रभाव पेहराव

माहितगार
Tue, 04/05/2016 - 13:11 नवीन
त्याचा पहिला प्रभाव पेहराव ठरवेल, जो पर्यंत त्याची माझ्याशी नीट ओळ्ख होत नाही.
असे बरेच लोक करतात मी तसे करणे आवर्जून टाळतो, मी समोरच्या व्यक्तीला पूर्ण संधी देतो आणि मगच निर्णय करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपा कट्ट्यांचीच गोष्ट घ्या,

माहितगार
Tue, 04/05/2016 - 12:19 नवीन
मिपा कट्ट्यांचीच गोष्ट घ्या, - मी कट्ट्यात अद्यापतरी सहभाग घेतला नाही तरीही- अत्यंत चांगले तुम्हाला आवडणारे लेखन करणार्‍या व्यक्तीं तुम्हाला अनपेक्षीत पोषाखात अथवा अनपेक्षीत व्यक्तीमत्वाच्या आढळून आल्या असतील. म्हणजे पोषाखावरुन पात्रता मुद्दा गैरलागू होतो की नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मुद्दा पटला. मेनेजरला विचारून

साहना
Tue, 04/05/2016 - 12:09 नवीन
मुद्दा पटला. मेनेजरला विचारून फायदा नाही, त्यांच्या ट्विटर ला पाठवा आणि जाब विचारा.
  • Log in or register to post comments

काही गोष्टी जाहिरात

सस्नेह
Tue, 04/05/2016 - 12:38 नवीन
काही गोष्टी जाहिरात बनवणाऱ्यांनी आणि काही इथे प्रतिसाद देणाऱ्यांनी गृहित धरलेल्या दिसल्या. त्या खरोखरच तशा आहेत का हे तपासावे लागेल. (दया, पता करो...) १. महाराष्ट्रीय साडी नेसलेल्या स्त्रिया कार्ड सहजपणे वापरू शकत नाहीत. (जा. बनवणारे) २. बिल सद्गृस्थांच्या बायकांनी देणे कमीपणाचे आहे. (जा. बनवणारे) ३. सदर जाहिराती मॅनेजरने बनवलेल्या आहेत व त्याच्या आशयाशी तो सहमत आहे. (धागाकर्ती) ४. महाराष्ट्रीय साडी नेसलेल्या स्त्रिया अडाणी आहेत. (मॅनेजर) ५. जाहिरातीतील साडी नेसलेली स्त्री मोलकरीण आहे. (काही प्रतिसादक.) ६. पंजाबी पोशाख केलेल्या स्त्रिया अडाणी/गावठी आहेत. (काही प्रतिसादक.) ७. साडी नेसलेल्या स्त्रिया मठ्ठ असतात. (एक प्रतिसादक) ८. पोशाखावरून व्यक्तीचा दर्जा ठरतो. (काही प्रतिसादक)
  • Log in or register to post comments

अहो, मुळात अमुक एक कार्ड

गवि
Tue, 04/05/2016 - 12:46 नवीन
अहो, मुळात अमुक एक कार्ड शॉपिंगसाठी वापरायला "सोपं" किंवा "अवघड" कसं असू शकतं? हा प्रश्न इथे आधीच उपस्थित केला होता. पण तो दुर्लक्षित झाला. या क्षेत्राशी संबंध आलेला असल्याने आणि तसंही कोणताही कार्डयूजर हे सांगू शकेल की कार्ड कोणतंही असलं तरी ते वापरण्याचा प्रोटोकॉल एकच असतो आणि त्यात कार्डधारकाला सोपं पडणारी आणि अवघड पडणारी कार्ड्स असू शकत नाहीत. म्हणजे एखाद्याला एकूण कार्ड वापरणंच अवघड वाटत असेल तर फक्त स्टार बाझारचं को-ब्रँडेड कार्डच तेवढं सोपं वाटणं शक्यच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

ओक्के !

सस्नेह
Tue, 04/05/2016 - 12:48 नवीन
गृहितक नं. १. शॉपिंगसाठी वापरायचे कार्ड वापरण्यास अवघड असते. (कंपनीवाले)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अनुषंगिक अवांतर

माहितगार
Tue, 04/05/2016 - 12:53 नवीन
:) गवि तुमचा मुद्दा अंशतः बरोबर, सगळेच प्रेशर कुकर शिट्ट्या मारतात मग आम्ही तुम्हाला दिलेला प्रेशकुरर शिट्टी मारेल हे सांगण्यात काय हशील ? तेच तर जी गोष्ट आहे ती समोरच्या व्यक्तीस कशी उपयूक्त आणि सुलभ आहे हे सांगण्यासाठी म्हणून जाहीरात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

फरक आहे.

गवि
Tue, 04/05/2016 - 13:22 नवीन
फरक आहे. आमच्या कुकरची शिट्टी सुलभपणे ऐकू येते कारण ती मोठ्या आवाजात वाजते. हा इतरापेक्षा वेगळा गुण म्हणता येईल. किंवा शिट्टी वाजली की कुकर आपोआप गॅस / वीजप्रवाह बंद करतो.. हेही इतरांपेक्षा वेगळं फीचर. इथे तसं नाहीये. इथे इतरांपेक्षा आमचं कार्ड सोपं आहे असा भाव आहे. कारण "ईझीशॉप कार्ड, सो ईझी दॅट इव्हन शी कॅन यूज" म्हणजे हे ईझीशॉपकार्ड इतर कार्डांपेक्षा वापरायला जास्त सोपं, कमी क्लिष्ट आहे.. इतकं की हिलाही वापरता येईल. कार्डचा वापर हा त्यावरचा डिजिटल मजकूर मशीनद्वारे आपोआप रीड होऊन वेगवेगळ्या स्विचेसवाटे त्या कार्डला इश्यू करणार्‍या बँकच्या सर्वरकडे संदेश पाठवून पैसे अप्रूव्ह करुन घेण्यासाठी असतो. ही प्रक्रिया इथे स्विच आणि बँकऐवजी स्टार बाझारने स्वतःचंच प्रीपेड कार्ड देऊन घडवली आहे. इन ऑल केसेस, कार्ड विसा असो, मास्टर असो, रुपे असो किंवा बिग बाझार, स्टारबाझारचं स्वतःचं अंतर्गत कार्ड असो. ते काउंटरवरच्या माणसाला देणं आणि पिन नंबर टाकून कार्ड आणि पावती घेणं या क्रियेत बदल नाहीच. तेव्हा वापरायला सोपं हा दावा जो जाहिरातीचा मुख्य मुद्दा आहे त्यातच अर्थ वाटत नाही. अगदीच चिकित्सा करायची तर उलट ही प्रीपेड कार्डं रिचार्ज करुन भरुन घेण्याचा वेगळा ताप होतो आणि त्यासाठी स्टार बाझारचेच पाय धरावे लागतात. "इतर" बँक बेस्ड कार्ड्सला ही कॉम्प्लिकेशन नाही. अकाउंटला पैसे असले की वेगळं काही करावं लागत नाही. कार्ड कोणत्याही दुकानात चालतं, स्टार बाझारच हवा असं नाही. अकाउंट व्हॅलिड असला की पैसे सुखरुप राहतात. त्याला टाईम लिमिट नसते. कार्डची एक्सपायरी जवळ आली की कार्ड आपोआप घरी पाठवतात बँका. उलट जास्त सोपं आणि स्वातंत्र्ययुक्त नाही का? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

+१ सहमत.

माहितगार
Tue, 04/05/2016 - 13:24 नवीन
+१ सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

गविसर,

संदीप डांगे
Tue, 04/05/2016 - 13:33 नवीन
गविसर, एजन्सीला काय ब्रिफ मिळालं असेल ह्याचा उल्लेख मी केला म्हणून तुमच्या प्रश्नावर उत्तर देणं आवश्यक आहे. एखादं कार्ड हे कशाच्या तुलनेत सोपं आहे ह्याचा आपला थोडा गैरसमज झालाय. हे कार्ड इतर कोणत्या कार्डाच्या तुलनेत सोपं आहे असे जाहिरातदाराने म्हटलेले नाही. ह्याचा खोलात जाऊन बघितलं तर काही मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत. पहिलं की ही जाहिरात औरंगाबाद शहरात लावली आहे. जिथे मुंबई-दिल्ली-बेंगलोर सारखा टेक्नोसॅव्ही क्राऊड कमी आहे. येथे येणारे लोक कॅशवाले जास्त, क्रेडिट-डेबिटवाले थोडे कमी. डेमोग्राफिक्स बघायला पाहिजे. (हीच, अशीच जाहिरात पुणे-मुंबई-बँगलोर इथे नाही हे मी गृहित धरत आहे) दुसरा मुदा असा की स्टार बाझारला कायमस्वरुपी ग्राहक मिळवण्यासाठी काहीतरी शक्कल लढवायची आहे. कॅश वा क्रेडिट कार्ड वापरणारे ग्राहक लॉयल्टी कस्टमरमधे बदलण्यासाठी स्टारचे स्वतःचे कार्ड काढले. जेणेकरुन ते कार्ड इथेच वापरता येत असल्याने ग्राहक इकडे येण्याची शक्यता वाढते. पाच हजाराचा रिचार्ज एकदाच मारला पण काही खरेदी करुन दोन हजार उरलेत तरी ते इथेच वापरायचे आहेत. रोखीचे व्यवहार कमी होऊन कामाचा वेग वाढतो. असे अनेक स्टारचे फायदे लक्षात घेऊन कार्ड काढले. आता तिसरा मुद्दा आला की पारंपरिक विनिमय माध्यमे वापरणार्‍या ग्राहकांना ह्या नव्या व्यवस्थेकडे वळवायचे कसे? कॅशवाले ग्राहक जास्त असल्याने त्यांना ही कार्डवाली व्यवस्था कशी सोपी सुटसुटीत उपयोगी आहे हे समजावून सांगणे आले. त्यांच्या जाहिरातीतल्या मजकुरावरुन हे कळते * कॅशलेस, * रिचार्जेबल, * सोयिस्कर, * गिफ्टींग. हे कार्ड का वापरायचे ह्याची ही चार कारणे स्टारने दिली आहेत. तर ह्यावरुन कळतं की हे कार्ड दुसर्‍या कोणत्या कार्डच्या नव्हे तर रोख पैसे देण्याघेण्याच्या तुलनेत अधिक सोपं आहे व जास्त टेक्नोसॅव्ही नसणार्‍यांसाठीही सोयिस्कर आहे असे जाहिरातदारास म्हणायचे आहे असे दिसते. माझ्या आकलन व अनुभवानुसार उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. काही शंका असतील तर नक्की चर्चा करु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तुम्ही माझाच मुद्दा सपोर्ट

गवि
Tue, 04/05/2016 - 13:50 नवीन
तुम्ही माझाच मुद्दा सपोर्ट करताय पूर्णपणे. त्यामुळे बरंच वाटलं. कार्ड सोयीचं आहे ते त्यांच्यासाठी म्हणजे स्टार बाझारसाठी. पण ते एक असो, कारण शेवटी जाहिरात करताना असा प्रामाणिकपणा हास्यास्पद ठरेल. आता तुमचा हा मुद्दा:
एखादं कार्ड हे कशाच्या तुलनेत सोपं आहे ह्याचा आपला थोडा गैरसमज झालाय. हे कार्ड इतर कोणत्या कार्डाच्या तुलनेत सोपं आहे असे जाहिरातदाराने म्हटलेले नाही.
तसं थेट म्हटलेलं नाही, पण शब्दरचना पहा. "कार्ड सो ईझी दॅट इव्हन शी कॅन यूज इट" हा मजकूर वरच्या पोस्टरपेक्षा वेगळा आहे. इथे वापरायला सोपं असणं हाच मुद्दा आहे. आणि हे कार्ड इतकं सोपं आहे की तीही वापरु शकेल, याचा अर्थच मुळी इतर काही कार्ड्स ही वापरु शकली नसती, पण ईझीकार्ड मात्र सोपेपणामुळे तिलाही वापरता येईल. अन्यथा या स्पेसिफिक कार्डला काही खास गुण नसल्यासारखंच होईल की. बाकी मुद्दे मी खाली एका प्रतिसादात दिलेच आहेत. मुळात तुम्ही म्हणताय तसं ब्रिफमधे चुकलंय. जे मुद्दे पुढे आणायला हवेत ते न आणता भलत्याच मुद्द्याला हायलाईट केलंय. इथे जाहिरात बनवणारा गंडलाय. प्रीपेड कार्डमधे रिस्क कमी असते. जितके पैसे लोड केलेत तितकीच मॅक्झिमम रिस्क असते. ते लोड करताना त्रासच होतो. शिवाय एकाच दुकानाचं बंधन येतं, पण अगेन्स्ट ऑल धिस, तुम्ही कामवालीला ते कार्ड देऊन (कॅशऐवजी) तिला पाठवू शकता, कारण अगदी पिन असल्यास आणि तो शेअर केल्यासही, प्रीपेड कार्ड फक्त स्टारबझारमधून सामान खरेदी करण्यापुरतंच व्हॅलिड असल्याने आणि तुमचा बँक अकाउंट याच्याशी निगडीत नसल्याने त्याची प्रायव्हसी जपली जाते. दुरुपयोगाची शक्यता एका दुकानातल्या सामानापुरती आणि टॉप अप केलेल्या रकमेइतकी मर्यादित राहते. हा रिस्कचा / सेफ्टीचा मुद्दा हायलाईट करण्याऐवजी नॉन एक्झिस्टिंग सोपेपणाचा मुद्दा हायलाईट केलाय. तुम्ही तर क्षेत्रातले तज्ञ आहात. तुम्हीच सांगा, सोपेपणा ही पर्टिक्युलर कन्सेप्ट कधीतरी तरी इतर तत्सम प्रॉडक्ट्सशी तुलना केल्याशिवाय अस्तित्वात येऊ शकेल का? "आमच्या डिटर्जंट पावडरने कपडे स्वच्छ होतात" हे विधान इतकं ट्रिव्हियल आहे की त्याला शून्य जाहिरातमूल्य आहे. यात निश्चितच इतरांपेक्षा जास्त शुभ्र होतात, किंवा इतके टक्के मळ जास्त निघतो असाच भाव असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

तुम्ही म्हणताय तो मुद्दाही

संदीप डांगे
Tue, 04/05/2016 - 14:56 नवीन
तुम्ही म्हणताय तो मुद्दाही रास्तच आहे. कॅशपेक्षा कार्ड सोपं हा एक भाग, पुढचा प्रश्न तोच येतो की कार्ड सोपं आहेतर इतर कार्ड चं काय? ह्यात असं म्हणता येईल, जे तुम्ही पुढच्या प्रतिसादात स्पष्ट केलं आहेच, की बँकाच्या क्रेडिट-डेबिट्कार्डप्रमाणे रिस्क कमी आहे. त्यामुळे दोन गोष्टींशी एकाच वेळी केलेली तुलना आहे. कॅश व इतर क्रेडिट-डेबिट कार्ड्स. अर्थात आपलेच प्रॉडक्ट जगात भारी दाखवायला इतर सगळ्या संबंधित गोष्टी सोयिस्कर नाहीत हे सांगणे आलेच. इथे आपल्याशी पुर्ण सहमत आहे. ब्रीफ चुकलंय हे तर खरंच आहे. रिस्कचा / सेफ्टीचा मुद्दा हायलाईट करण्याऐवजी नॉन एक्झिस्टिंग सोपेपणाचा मुद्दा हायलाईट केलाय. हे तुमचं मत बरोबर आहे. क्रीएटीव हेड व कॉपीरायटरने स्वतःही सोपेपणाचा मार्ग पत्करला आहे. ह्यातून त्यांचे स्वतःचे बायस दिसलेत. एजन्सीतलं वातावरण (स्टारचं काम जे करत असतील) बघता तिथे काम करणारे कॉपीरायटर यांची पार्श्वभूमी, शिक्षण, संस्कार, वय, अनुभव ह्यातून असे विचार जन्मतात. दुसरा प्रचंड महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेळ. अशा प्रोजेक्ट्सवर फार विचार करायला त्यांना वेळ मिळत नाही. काथ्याकुट चालतात पण ते एकूण मार्केटींग, ब्रँडींग, इमेज ह्यांची स्ट्रॅटेजी ठरवायला. अशी छोटी कामे फार डोकं, वेळ लावून केली जात नाहीत, परवडत नाही. त्याचा एकूण जनमानसावर किती सूक्ष्म व दुरगामी परिणाम होतोय एवढा विचार करायची चैन त्यांना परवडणारी नाही.
तुम्ही तर क्षेत्रातले तज्ञ आहात. तुम्हीच सांगा, सोपेपणा ही पर्टिक्युलर कन्सेप्ट कधीतरी तरी इतर तत्सम प्रॉडक्ट्सशी तुलना केल्याशिवाय अस्तित्वात येऊ शकेल का?
येऊ शकते. एक प्रोडक्ट दुसर्‍यापेक्षा 'सोपेपणात अधिक चांगले' असे होऊ शकते. पण 'ह्याच्यापेक्षा ते सोपं' हे तत्व 'तत्सम' प्रोडक्टबद्दल डिफरंशीएट करणारा घटक असू शकत नाही. कारण मग ते प्रोडक्ट 'तत्सम' राहणार नाही, त्यापेक्षा अ‍ॅडव्हान्स होईल. त्याची कॅटेगीरी बदलेल. एकामेकांशी स्पर्धा करणारे प्रॉडक्ट्स ते करत असलेलं काम दुसर्‍यापेक्षा अधिक चांगलं कसं करु शकतात हे सांगू शकतात. पण पद्धत वेगळी असेल तर स्पर्धा संपते. जसे दिल्लीहून बेंगलोरला बस, ट्रेन, विमान ह्या प्रकारे जाता येते. म्हटलं तर आपल्याला ह्यात स्पर्धा दिसेल. पण तसे नाही ह्या कॅटेगीरी आहेत. ह्यात कोणीही कोणाशी स्पर्धा करत नाही. (कधीतरी कोणत्यातरी दोहोंचे रेट्स एकाच पातळीवर आल्यावर होऊ शकते. मागे कुणा विमानसेवेचे दर कमी झाल्यावर त्यांनी ट्रेनच्या पैशात विमानाने लवकर पोचा अशी जाहिरात केल्याचे स्मरते.) ह्यात बससेवावाले एकमेकांशी दर, आरामदायक प्रवास, वेळेची शिस्त पाळणे इत्यादी बाबतीत स्पर्धा करतील. पण विमानवाले बसवाल्यांशी त्याच बाबतीत स्पर्धा करत नाहीत. तुम्ही दिलेले डिटर्जंटचेच उदाहरण घेऊया. डिटर्जंट यायच्या आधी लोक पाण्याने, लवण वापरुन कपडे धुवत होते. त्यात कष्ट होते, डिटर्जंट आल्यावर कपडे धुणे 'सोपे' झाले. आता अनेक डिटर्जंट बाजारात आल्यावर ते सोपेपणात स्पर्धा करणार नाहीत तर त्या सोपेपणाला मदत करणारे घटक अधिक चांगले कसे आमच्याच पावडरीत आहेत असे सांगतात. लाँड्री-ड्रायक्लिनरवाला डिटर्जंटशी स्पर्धा करणार नाही. भले तो सांगेन घरी कपडे धुण्याची कटकट करण्यापेक्षा माझ्याकडे द्या, धुवुन इस्त्री करुन देइल. म्हणजे तो सोपेपणाची पुढची पायरी घेतोय. ह्यात अनेक लाँड्रीवाले आमच्याकडे कसे जास्त चांगले कपडे धुतल्या जातात याची जाहिरात करतील. केस धुण्याचे शाम्पू व केस धुण्याचा इतिहास-भविष्य बघितले तर हेच उदाहरण अजून गमतीदार होईल. शाम्पूत विटामीन टाकणारे महाभाग केस धुण्याच्या रिठे-शिकेकाई वापरण्याच्या तुलनेत सोपी असलेल्या क्रियेत इतर तत्सम प्रॉडक्टच्या तुलनेत फक्त घटक (तेही कल्पनेतले) वाढवल्याने आपलं शाम्पू इतरांपेक्षा जास्त चांगलं आहे असं सांगत आहेत. माझ्यामते माझा काही गोंधळ होत नाही आहे. पण तुम्हाला काही खटकले तर नक्की सांगा. त्यावर विचार करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

रोचक प्रतिसाद आहे. नवीन

गवि
Tue, 04/05/2016 - 15:02 नवीन
रोचक प्रतिसाद आहे. नवीन कन्सेप्ट आणि माहिती समजली. आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

प्रतिसाद आवडला

श्रीरंग_जोशी
Tue, 04/05/2016 - 20:14 नवीन
जाहिरात क्षेत्रात काम करणार्‍या माणसाचा अनुभवावर आधारित प्रतिसाद आवडला. अमेरिकेत आल्यावर मला भारतातल्या व तिथल्या जाहिरातीमंध्ये असणारा महत्वाचा फरक जाणवला. भारतात स्पर्धक कंपनी व उत्पादनांचे नाव चुकूनही जाहिरातीत चालत नाही. अप्रत्यक्षपणे संदर्भ बरेचदा सुचवला जातो पण नाव अजिबात येऊ दिले जात नाही. अमेरिकेत थेट स्पर्धक कंपनीच्या उत्पादनाचे नाव, फोटो, इतर तपशील छापून त्याची तुलना स्वतःच्या उत्पादनासोबत केली जाते. त्यामुळे भारतात जाहिरातदारांना जसा द्राविडी प्राणायम करावा लागतो तो करावा लागत नाही. जो काही दावा करायचा आहे तो थेट करता येतो. Comparative advertising हे विकीपान या प्रकारावर अधिक माहिती देते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

नाही पंत.

बोका-ए-आझम
Wed, 04/06/2016 - 00:29 नवीन
आजकाल भारतातही चालतं. बिझनेस चॅनेल्स करतात की comparative advertising. Times Now तर नेहमीच करतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

अरे वा

श्रीरंग_जोशी
Wed, 04/06/2016 - 00:37 नवीन
या प्रकाराची आता भारतातही सुरुवात झाली असेल तर उत्तमच. अगोदरच्या प्रतिसादात उदाहरण द्यायचे राहून गेले होते. ते आता देतो. Kindle Fire HD vs iPad - Screen Comparison — Commercial.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

दुरुस्ती आणि सत्य.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/05/2016 - 12:52 नवीन
१. काही साड्या नेसलेल्या स्त्रीया कार्ड सहजपणे वापरु शकत नाहीत. ४. काही साड्या नेसलेल्या स्त्रीया या अशिक्षित असू शकतात. ६. काही पंजाबी पोशाख केल्या स्त्रीया या.... .....असू शकतात. ७. काही साडी नेसलेल्या स्त्रीया या ..... असू शकतात. ८. पोषाखावरुन व्यक्तीचा अंदाज बांधता येऊ शकतो मात्र ते बरोबरच असू शकत नाही. टीप. पुरुषांच्या पेहरावाबाबतही अशीच मतं मांडता येऊ शकतात. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

धन्यवाद !

सस्नेह
Tue, 04/05/2016 - 12:55 नवीन
सर्वांनी जर असा मतितार्थ समजून घेतला तर धाग्याचे प्रयोजनच रहात नाही, हो ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हो .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 04/05/2016 - 13:12 नवीन
सर्वांनीच जर सर्व नीट समजून घेतलं तर वाद आणि काथ्याकुट कशावर करायचे. एवढ्या पोटतिडकीने कुठे बोलता येणार. मग काथ्याकुटाचा उपयोग काय. काथ्या खुप कुटला पाहिजे पण ती चर्चा व्यक्तिगत होऊ नये. पहिल्या प्रतिसादाला सर्वच खुश दिसतात तशा शेवटच्या प्रतिसादापर्यंत सर्व खुश असले पाहिजे. आपली सोडून कोणाची तरी मतं पटली पाहिजे. एक मजा आली पाहिजे. असो, दुसरा विषय घ्या आता. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

दुसरे विषय..

ब़जरबट्टू
Tue, 04/05/2016 - 15:58 नवीन
१) दुस-या जाहिरातीत दाखवलेली स्त्री साडी नेसलेली आहे का नऊवारी ? २) हिंन्दी सिनेमात कामवाली बाई नऊवारीच का नेसते ? (संदर्भ - नो एन्ट्री ) सध्या एव्हढेच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

का रे भुललासी......

शंतनु _०३१
Tue, 04/05/2016 - 17:57 नवीन
मुद्दा पटला, आशयाशी सहमत
  • Log in or register to post comments

आक्षेप पटला. वास्तवात काय

मेघना भुस्कुटे
Tue, 04/05/2016 - 20:34 नवीन
आक्षेप पटला. वास्तवात काय असतं ते तपासणं जाहिरातीसाठी पुरेसं नसतं, नसावंही. उदाहरणार्थ बबन येरमामे किंवा भीमराव कांबळे असं नाव असलेला माणूस बाय डिफॉल्ट अडाणी असलेला दाखवला (दर्शवला), तर आपल्याला चालेल का? आपण ते चालवून घ्यावं का? वास्तवात अनेक दलित व्यक्ती बरेचदा कमी शिकलेल्या आणि / किंवा कष्टकरी समाजातल्या आणि / किंवा गरीब असतात. त्याला सणसणीत अपवादही असतात. पण म्हणून आपण अशा प्रकारची जाहिरात चालवून घेऊ का? नाहीच घेणार आणि तेच योग्य आहे. कारण जाहिरातींमध्ये फक्त वास्तवाचं प्रतिबिंब असतं असं नाही. वास्तवावर त्यांचा प्रभावही पडत असतो. बाकी मराठीपणाचा अभिमान वगैरे ठीकच आहे. पण माझ्या मते 'पॉलिटिकली करेक्ट' असणे जाहिरातींसाठी जास्त आवश्यक आहे. निदान तसा प्रयत्न तरी असावाच.
  • Log in or register to post comments

काय ठरतंय शेवटी???

रमेश भिडे
Wed, 04/06/2016 - 00:50 नवीन
काय ठरतंय शेवटी??? साडी ऑर नो साडी? कार्ड ऑर नो कार्ड?????
  • Log in or register to post comments

What that poor chap can do in

PIYUSHPUNE
Wed, 04/06/2016 - 09:42 नवीन
What that poor chap can do in this case? He can only escalate the matter to higher authorities. It's sad and funny that people don't know anything how retail sector works. There are processes for many things!!! Raising voice doesn't provides you with immediate solution.
  • Log in or register to post comments

It's sad and funny that

तर्राट जोकर
Wed, 04/06/2016 - 11:44 नवीन
It's sad and funny that people don't know anything how retail sector works. There are processes for many things!!! >> थेन योउ टेल्ल होव इत वोर्क्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: PIYUSHPUNE

हिंदीत एक कहावत आहे, एक नूर

विवेकपटाईत
Wed, 04/06/2016 - 21:47 नवीन
हिंदीत एक कहावत आहे, एक नूर आदमी, दस नूर कपडा. अर्थात १०% प्रतिभा आणि ९०% पोशाख. देशातील मोठ्या परीक्षेच्या साक्षात्कारला सुद्धा हि बाब लागू होते. (आजकाल अधिकाऱ्यांचे स्तर खालावत का जात आहे, त्याचे हेच कारण).
  • Log in or register to post comments

@अभ्या , डांगे

कपिलमुनी
Wed, 04/06/2016 - 22:01 नवीन
तुम्ही जाहीरातीमधे अडाणी बाई / पुरुष आणि सुशिक्षित व्यक्तीं कशा दाखवाल ( फोटू मधे )?
  • Log in or register to post comments

+ १

तुषार काळभोर
गुरुवार, 04/07/2016 - 12:09 नवीन
हाच प्रश्नः ज्यांना त्या जाहिराती आक्षेपार्ह वाटल्या त्या सर्वांना. (तिथे बायोडाटा लिहिता आला असता, पण जाहिरात ही काही क्षणात क्लिक होणे अपेक्षित असते, असं आपलं मला वाटतं.) Hungry Kids असं गुगलमध्ये इमेज सर्च केलं तर काय रिजल्ट्स येतात? मग गुगलच्या मॅनेजरवर ओरडून किंवा मिपावर धागा काढून त्याचा निषेध करावा काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

ह्याच लेखात ३ दिवस आधीच हा

अभ्या..
गुरुवार, 04/07/2016 - 14:33 नवीन
ह्याच लेखात ३ दिवस आधीच हा प्रश्न मी विचारलाय. जर मला उत्तर द्यायचे असेल तर ते "दोन पुर्‍या दाखवा. एक तुपात अन एक तेलात तळलेली" अशा टाइपच्या प्रश्नाचे उत्तर ग्राफीकली कसे देणार? ग्राफीक्स हे सिम्प्लीफाइड आणि सर्वांना समजेल असे असावे. त्याने कम्युनिकेट करावे हा उद्देश असतो. अडाणी आणि सुशिक्षितामधला फरक मी अंगूठाछाप आणि लफ्फेदार सही करताना दाखवू शकेन पण ते समजायला कीती समजेल. आणि ती साक्षरता अभियानाची जाहिरात वाटेल हाही मुद्दा आहेच. जाहीरातीतले मॉडेल काय वाटते किंवा काय रिप्रेझेंट करते ते महत्त्वाचे. तो छोटासा रोल केल्यासारखा असतो. त्या रोलमध्ये आपण कन्सीडर करायचे असते. तशा हिशोबाने सन्नी देवल ट्रक्टरची जाहीरात करुन शेतकरी नसतो की डीश वॉशिंग सोपची जाहीरात करणारी माधुरी दिक्षीत भांडेवाली नसते. बघणार्‍याला काय वाटते ह्याचा हिशोब मास नुसार करतात. उद्या कसलेही मॉडेल अडाणी बाई म्हणून दाखवले तरी विरोध करायचा ठरवला तर करता येईल. अगदी अ‍ॅक्चुअल अडाणी बाई दाखवली तरी. सो असे आक्षेप जास्त इचार नाही करत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

प्रश्न लै म्हणजे लै आवडला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 04/08/2016 - 11:00 नवीन
क्लास. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

एखाद्या व्यक्तीचं 'अडाणी'

संदीप डांगे
Fri, 04/08/2016 - 13:31 नवीन
एखाद्या व्यक्तीचं 'अडाणी' असणे हे सापेक्ष असते. ज्या कोणाला ढोबळ अर्थाने सुशिक्षित लोक अडाणी मानतात, त्याचीच दुसरी बाजू बघितली तर ते तथाकथित अडाणी लोक सुशिक्षितांना 'एवडी बुकं शिकलं तरी अडाणीच' असे म्हणतांना दिसतात. अडाणी म्हणजे अज्ञानी. हा झाला सरळ अर्थ. समाजात रुढ अर्थ आहे अशिक्षित, गावंढळ, कुठे कसं वागावं, बोलावं याची जाण नसलेला, फारसं तंत्रज्ञान, विज्ञान समजत नसलेला, देवभोळेपणा असलेला असा काहीसा अर्थ जनमानसात रुढ आहे. सध्या एवढंच, नंतर उदाहरणांसह सविस्तर उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. गुडीपाडवा आणि नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

त्यापेक्षा दोन वेगवेगळ्या

अत्रे
Fri, 04/08/2016 - 14:23 नवीन
त्यापेक्षा दोन वेगवेगळ्या वेशभूषेतल्या स्त्रिया दाखवल्या, साइड बाय साइड, आणि खाली लिहिले, आम्हाला वापरायला एकदम सोपे जाते, तर? कोण अडाणी, कोण सुशिक्षित ते सांगण्याच्या फंदातच पडायचं नाही. लोकांना काय समजायचं ते समजू देत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

मराठी माणूस म्हणजे नोकर ही प्रतिमा ठसवणारे हे बघा दोघे

दा विन्ची
गुरुवार, 04/07/2016 - 09:08 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

पण

तुषार काळभोर
Fri, 04/08/2016 - 15:33 नवीन
त्या दोघांनी उत्तरभारतीय नोकरांची भूमिका केलीय ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दा विन्ची

फुकाची कळकळ

आजानुकर्ण
Fri, 04/08/2016 - 18:11 नवीन
खरं तर विस्ताराने लिहायचं होतं. पण कामाच्या गडबडीत थोडक्यात मतप्रदर्शन करतो. मराठी माणसाला अडाणी म्हणून का दाखवतात ते ही चर्चा वाचून कळतं! अगदी साधी जाहिरात आहे. दोन वेगवेगळ्या पोशाखातील, किंवा सामाजिक पार्श्वभूमीतील बायकांनी 'स्टार बाजार'चे कार्ड का वापरावे यासाठी दोन चित्रं वापरलीत. यातील एक स्त्री समकालीन पोशाखातील आहे. आधुनिक गोष्टींचा तिला सोस असावा असं प्रथमदर्शनीच वाटतं. कार्ड हे पेमेंटचे आधुनिक साधन आहे. त्यामुळे कार्ड वापरण्यात तिला अडचण वाटत नाही उलट कार्डमुळे नवरा सोबत नसला तरी शॉपिंग करणं सोपं झालंय असा (स्टीरिओटाईप) संदेश तिने दिलाय. उलट दुसरी बाई ही थोड्या पारंपरिक पोशाखातील आहे. त्या स्त्रीला समकालीन पोशाखांऐवजी पारंपरिक साडी सोयीस्कर वाटते. कदाचित तिला समकालीन कार्ड ऐवजी कॅशही सोयीस्कर वाटत असावी. त्यामुळे तिलाही कार्ड वापरणं अगदी सोपं, सोयीचं आहे हे जाहिरातदारांना ठसवायचं आहे. त्यासाठी त्यांनी ती ओळ टाकली आहे. पण 'पुणेरी गावरान शेंग' ते 'आमच्या आळीचा गणपती रांगेत कितवा' याचा अभिमान बाळगणाऱ्या आम्हाला ताबडतोब जाहिरातीत न दाखवलेल्या काही गोष्टी खटकल्या. १. साडीतील बाई ग्रामीण, अडाणी वाटते. (कुठेही ती ग्रामीण अडाणी आहे असे लिहिलेले नाही पण आम्हाला वाटले बॉ. २. महाराष्ट्रीय पोशाखातील बाई अडाणी दाखवली आहे. त्यामुळे मराठी लोकांचा अपमान झालाय. (शिववडा झिंदाबाद!). ३. मोलकरीण म्हणून कायम मराठी बाईच का दाखवतात. (हे कसं काय दिसलं बॉ?) तर या आक्षेपांना वर विठाकाकांनी उत्तरं दिलीच आहेत. साध्या जाहिरातीला अस्मिता - अभिमान चिकटवल्यामुळे काय विचका होतो ते इथं दिसलंय. दोन अनुत्तरित आक्षेपांना उत्तरं देण्याचा प्रयत्न. १. कमीत कमी शिकलेली दाखवण्याचा एकमेव मार्ग पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख घालणे हा आहे का? चित्रात दाखवलेली साडी हा फक्त महाराष्ट्रीयन पोशाख आहे का? कर्नाटकातल्या बायका काय घालतात? आंध्रातल्या बायका काय घालतात? मध्य प्रदेशातल्या बायका काय घालतात? आणि पंजाबी ड्रेस हा पारंपरिक महाराष्ट्रीयन पोशाख का नाही म्हणे? महाराष्ट्रातल्या गावापासून शहरापर्यंत सगळ्या शाळाकालेजातल्या तरुणी पंजाबी ड्रेसच घालतात. का नावात पंजाबी आलं म्हणून तो 'आपला' पोशाख नाही? २. मराठी लोकांचा अपमान! आजकाल मराठी माणसाची अक्कल शिववड्यावर पोसली जात असल्यामुळे हे असं सुचतंय. नक्की कसलाकसला अभिमान बाळगायचा? कपड्यांनाही अस्मिता चिकटवायची का? मग साडीच कशाला, वल्कलांचाही अभिमान बाळगूया! तिथून सुरुवात करुन मग येऊ नऊवारी, पैठणीपर्यंत. ज्या प्रतिष्ठित मराठी लोकांना खरंच 'महाराष्ट्रीय पोशाखांविषयी' कळकळ आहे त्यांनी असं निषेध व्यक्त करण्याऐवजी आता कॉलेजात, इन्फोसिस-टीसीएसमध्ये, हॉस्पिटलमध्ये, मस्तपैकी साड्या घालून पोशाखाला खरंच प्रतिष्ठा प्राप्त करुन द्यावी ना. आम्हीच 'लाज वाटते', 'सोयीस्कर वाटत नाही', वगैरे काहीतरी कारणे देऊन हे पोशाख समारंभांपुरते मर्यादित केले आहेत. त्यात स्टार बाजार किंवा जाहिरातदारांचा काय दोष.
  • Log in or register to post comments

..

lgodbole
Fri, 04/08/2016 - 18:40 नवीन
छान
  • Log in or register to post comments

इथे जर धोतर पांढरा सदरा किंवा

हेमंत लाटकर
Sun, 04/10/2016 - 12:07 नवीन
इथे जर धोतर पांढरा सदरा किंवा मुंडासं फेटावाला खेडेगावातला दिसणारा पुरुष दाखवला असता आणि यालाही कार्ड वापरता येतं असा उल्लेख असता तर तितकाच खटकला असता का? स्त्री म्हणून खटकला. सध्या सगळीकडे स्त्रियांची दबंगगिरी चालू आहे.
  • Log in or register to post comments

"काय म्याडम, कशाला शाळा घेताय

जिन्क्स
Sun, 04/10/2016 - 22:38 नवीन
"काय म्याडम, कशाला शाळा घेताय माझी. त्या जाहिराती मी बनवत नाही हो, आम्हाला वरून येतात." इथेच वाद मिट्वायला हवा होता. संपादित सर्व सदस्यांनी व्यक्तिगत पातळीवरची टिप्पणी / ताशेरे / हल्ले टाळावेत.
  • Log in or register to post comments

इथे जर धोतर पांढरा सदरा किंवा

हेमंत लाटकर
Mon, 04/11/2016 - 11:47 नवीन
इथे जर धोतर पांढरा सदरा किंवा मुंडासं फेटावाला खेडेगावातला दिसणारा पुरुष दाखवला असता आणि यालाही कार्ड वापरता येतं असा उल्लेख असता तर तितकाच खटकला असता का?
नाही. स्त्री म्हणून खटकला कारण सध्या सगळीकडे स्त्री दबंगगिरी चालली आहे.
  • Log in or register to post comments

२०० बद्दल अभिनंदन.

शलभ
Tue, 04/12/2016 - 14:30 नवीन
२०० बद्दल अभिनंदन. सत्कारसमिती किधर हय.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा