ए टी एम केंद्राची सुरक्षितता कुणाची जबाबदारी ?
पार्ल्याच्या श्री. प्रकाश जोशींचे युनियन बँकेच्या पार्ले पूर्व येथील शाखेत खाते आहे. १ मे २०१५ रोजी बँकेच्या ए टी एम केंद्रातून पैसे काढत असतांना एक माणूस आत शिरला. “मदत करू का ?” असे विचारू लागला. श्री. जोशींनी त्याला हटकलं. त्यावर मी सुरक्षा रक्षक आहे असे त्याने सांगितले. त्याचा गणवेष आणि ओळखपत्र कुठे असे विचारता त्याने अजून गणवेष मिळाला नाही असे सांगितले. जोशींनी त्याला बाहेर काढला. पण केंद्राच्या दाराला आतून कडी लावायची सोय नव्हती. पैसे काढून बाहेर आल्यावर २ मिनिटे थांबून इकडे-तिकडे कानोसा घेतला. ‘तो’ माणूस कुठे दिसला नाही. काही दिवसांनी जोशी यांनी बँकेचे पासबुक भरून घेतले असता बँकेतून २४००० रुपये काढून घेतल्याचे लक्षात आले. ‘त्या’च माणसाने पैसे घेतले याची त्यांना खात्री पटली. त्यांनी लगोलग बँकेच्या शाखा प्रमुखाकडे जाऊन तक्रार केली. त्यावर सीसीटीव्ही फुटेज पाहावे लागेल आणि त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे त्यांनी सांगितले. श्री. जोशी याला राजी झाले. परंतु नंतर १. ए टी एम केंद्रात सीसीटीव्ही नाही, २. तिथे रक्षक नेमलेला नाही आणि ३. ए टी एम केंद्राचे दार आतून बंद करण्याची सोय नाही हे त्यांना मान्य करावे लागले.
परंतु तरीही घडल्या घटनेची जबाबदारी घेण्यास आणि श्री. जोशी यांना भरपाई देण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. उलट ए टी एम केंद्राची जागा भाड्याची असल्यामुळे रक्षक नेमण्याची जबाबदारी बँकेची नाही अशी भुमिका घेतली. बाजूलाच दुसऱ्या बँकेचे ए टी एम केंद्र आहे, तिथे सीसीटीव्ही आणि संबंधित बँकेचा रक्षक आहे ही बाब लक्षात आणून दिली असता तो त्या बँकेचा प्रश्न आहे, आमचा काही संबंध नाही असे आणखी एक बेजबाबदार कारण दिले.
आता काहीतरी हालचाल करणे गरजेचे ठरले. आपलं नशीब असं म्हणून हातावर हात धरून बसून राहणे शहाणपणाचे कधीच नसते. त्यांनी बँकेत लेखी तक्रार दिली. त्यात इतर सर्व तपशिलाबरोबर त्यांनी एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे बँकेचे लक्ष वेधले. त्यांनी पैसे काढले त्याचा व्यवहार क्रमांक (transaction no.) होता ३२३२. त्यानंतर शिल्लक चौकशी व्यवहार क्रमांक ३२३३ आणि २४००० रुपये काढल्याच्या व्यवहाराचा क्रमांक ३२३४ असे होते हे बँकेच्या नोंदीवरून दिसत होते. पैसे काढतांना मिळालेल्या पावतीवर शिलकीची नोंद असतांना लगेचच पुन्हा शिलकीची चौकशी कोणी का करील ? याचा अर्थ श्री. जोशी तिथून निघून गेल्यावर चोराने शिल्लक पाहिली आणि २४००० रुपये चोरले. बँकेत दिलेल्या तक्रारीची एक प्रत पोलीस ठाण्यात देऊन तिथे चोरीची तक्रार नोंदवली. पोलिसांनी सहकार्य करून ‘अज्ञात इसमा’च्या विरोधात गुन्हा नोंदवून घेतला.
पुढे काय करायचं त्याचा सल्ला घेण्यासाठी श्री. जोशी मुंबई ग्राहक पंचायतीच्या मुख्य कार्यालयात गेले. त्यांची सर्व हकीगत जाणून घेतल्यानंतर तिथल्या कार्यकर्त्यांचे म्हणणे पडले की श्री. जोशी बँकेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. इतकेच नव्हे, तर चोरी झाल्या दिवसापासून बँकेकडून भरपाई मिळेपर्यंत दर दिवशी शंभर रुपये याप्रमाणे नुकसान भरपाई सुध्दा ते बँकेकडे मागू शकतात.
ए टी एम केंद्रात कोणत्या सुविधा असणे बंधनकारक आहे त्याबद्दलचे रिझर्व बँकेचे काही नियम आहेत. पण त्याची छापील प्रत मिळू शकली नाही. मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर अशी प्रकरणे हाताळणाऱ्या खात्याच्या अधिकाऱ्यांना श्री. जोशी भेटले. तिथे कळलेली माहिती अधिकच धक्कादायक होती. १.जेवढ्या रकमेची चोरी झाली असेल, त्याच्या एक तृतीयांश रक्कम तिथे शुल्क म्हणून भरावी. २.जुलै २०१५ पूर्वीच्या सुय्मारे दहा महिन्यात अशा कोणत्याही प्रकरणाची सुनावणी झालेली नाही. तक्रारी दफ्तर दाखल आहेत. ३.सुनावणी केव्हा सुरु होईल कोण सांगणार?
अखेर श्री. जोशी रिझर्व बँकेच्या बँक लोकपाल (ombudsman) कार्यालयात गेले. तिथे श्री. मधुकर सावंत यांनी सर्व कागदपत्रे पाहून दावा खरा असल्याचा निर्वाळा दिला आणि शक्य ती सर्व कारवाई त्वरित करण्याचे आश्वासन दिले. अखेर युनियन बँकेला रिझर्व बँकेने दिलेल्या आदेशानुसार २९ सप्टेंबर रोजी युनियन बँकेने श्री. जोशी यांच्या खात्यात २४००० रुपये भरले. श्री. जोशी यांनी लगेच सर्व पैसे काढून घेतले, तिथल्या ठेवी काढून घेतल्या आणि यानंतर युनियन बँकेशी कोणताही व्यवहार करायचा नाही असे ठरवले.
सार्वजनिक क्षेत्रातल्या (राष्ट्रीकृत) बँकांचे व्यवहार चोख आणि सुरक्षित असतात असा अनेकांचा समज आहे. परंतु वरील हकीकतीवरून तो निव्वळ गैरसमज असल्याचे लक्षात येईल. आपल्या पैशांबाबत आपण जागरूक राहिलेच पाहिजे आणि सुरुवातीला म्हटलं तसं नशिबाला बोल लावत स्वस्थ बसून राहण्यापेक्षा शक्य त्या सर्व मार्गांनी प्रयत्न करीत राहिले पाहिजे. मुंबई ग्राहक पंचायतीच्या मदतीने मी माझे पैसे परत मिळवू शकलो.
राधा मराठे
मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग
सदर लेख मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ऑके.
तुमच्या या धाग्यांबद्दल तुमचे
धन्यवाद,
+१
+१
+११
मागे ठाणे कि मुंबईत एका
त्यांना पैसे परत मिळाले हे
हल्ली लिमिटेड फ्री
एटिएम मशिन असणार्या केबिनला
एटिएम मधे प्रवेश करताना कार्ड
छान लेख!
माहितीपूर्ण लेख, धन्यवाद!
माहितीपूर्ण लेख आहे.
सार्वजनिक क्षेत्रातल्या