Skip to main content

शब्दांची ताकद

लेखक shawshanky यांनी मंगळवार, 01/03/2016 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या खोल गाभाऱ्यात काय घडतंय त्याचा उपसा करून इतरांसमोर ठेवण्याचे प्रभावी माध्यम म्हणजे शब्द. कितीतरी अक्षरांचे निरर्थक तुकडे गोळा केले, की शब्दाची निर्मिती होते. पण समर्पक अर्थाचे भार वाहणारे, पेलणारे आणि तोलणारे शब्द किती वापरावे लागतात .शब्द धीर देतात, हसवतात, रडवतात आणि कधी कधी जखमीही करतात. धारदार हत्यारांनी केलेल्या वारापेक्षाही शब्दांनी झालेली जखम अतिशय खोल आणि सतत भळभळून वाहणारी असते.शब्दांनी मने उभी राहतात. मनामुळे माणूस उभा राहतो. माणसामुळे समाज, समाजामुळे एखादं गाव, गावांपासून राज्य,असा अनंत प्रवास छोट्याशा शब्दांपासून सुरू होतो.कौतुकाच्या शब्दांचे मूठभर मांस अंगावर चढवून माणूस दुप्पट क्रियाशील होतो. तर तिरस्काराच्या शब्दांनी निराशेच्या खोल गर्तेत गटांगळ्या खाऊन खचतो. जागेवरच थांबतो. दिलासा देणाऱ्या शब्दांमध्ये दुःखाचे डोंगर उद्ध्वस्त करण्याची ताकद असते. फक्त तो दिलासा निव्वळ अक्षरी शब्दांचा असू नये. तो अंतर्मनातून भिजलेल्या शब्दांचा असावा, एवढेच. शब्दांमुळेच युद्ध होते आणि शब्दांच्या वापरातून तहदेखील. एकूण काय परस्पर संवादाचे हे दुधारी शस्त्र आपण कसे, कधी, कोठे वापरतो, हेदेखील तितकेच महत्त्वाचे नाही काय?

वाचने 2749
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया