गीत गाता चल (पण नक्की का..?)

चलत मुसाफिर's picture
चलत मुसाफिर in काथ्याकूट
28 Dec 2015 - 10:03 pm
गाभा: 

भारतीय सिनेमाची पायाभरणी झाली, तेव्हापासून आजतागायत गाणी हा प्रत्येक चित्रपटाचा अविभाज्य भाग होऊन राहिलेला आहे. इतकेच नव्हे तर चित्रपटांची अख्खी बांधणी ही गाण्यांचे बिंदू पकडून अवतीभवती केली जाते. (इथे फक्त हिंदी सिनेमा नव्हे तर सर्वभाषिक भारतीय व्यावसायिक चित्रपट अभिप्रेत आहेत). हे भारतीय उपखंडाबाहेर कोणत्याच सिनेमा उद्योगात आढळत नाही. युरोपीय किंवा हॉलिवूड सिनेमात संगीताचा वापर केलेल्या चित्रपटाला 'म्युझिकल' असा वेगळा शब्द वापरतात. भारतीय सिनेमाला ही संकल्पना लागू होऊ शकत नाही.

असे का, हे कोडे मला अनेक वर्षांपासून छळत आलेले आहे. प्रत्येक सिनेमात गाणी असायलाच हवी या धारणेमागे काही मानसशास्त्रीय किंवा समाजशास्त्रीय कारण आहे असा माझा ठाम समज झालेला आहे. पण अजून ते कारण मला उमगलेले मात्र नाही.

जी कारणे सामान्यपणे पुढे केली जातात ती मला कधीच पूर्णपणे पटलेली नाहीत. पैकी काही अशी:

* मुंबईत जन्मलेल्या सिनेमाला मराठी, गुजराती व पारशी संगीत नाटकांशी स्पर्धा करण्यासाठी गाणी दाखवणे भाग होते. (ती स्पर्धा सिनेमाने केव्हाच नाटकाला धूळ चारून जिंकली. आता तर नाटकच आमूलाग्र बदलले.)

* प्रेक्षकांना लहानपणापासून अंगाई, भजने, ओव्या, कवाल्या, लोकगीते ऐकण्याची सवय होती (नामंजूर. ती सवय जगात सगळ्यांना तेवढीच असते. भारतीयही काही रोज नेमाने बागेत जाऊन गात नाहीत)

* गाण्यांमुळे दोन घटका करमणूक होते (चूक. लोक गाणी सुरू झाली की विड्या ओढायला बाहेर जातात)

* सिनेमाची प्रसिद्धी होते. (मग बाकीच्या देशांत फिल्मी गाणी का नाहीत?)
*****

सिनेमातील गाण्यांचे काही विशेष गुणधर्म आहेत (प्रत्येकी सन्माननीय अपवाद अर्थातच आहेत).

* पंचाण्णव टक्के गाणी ही मोजक्या मूठभर प्रसंगांवर बेतलेली असतात. खोखोच्या भोज्याप्रमाणे प्रत्येक चित्रपटाला हे सर करत पुढे जायचे असते. त्यात नावीन्य कधीच नसते. उदा. आई बाजारात भाजी घेतानाचे गाणे, ड्रायव्हर आपली गाडी ओव्हरहॉल करतानाचे गाणे, पशुवैद्य म्हशीला तपासतानाचे गाणे किंवा पोलीस पंचनामा लिहितानाचे गाणे वगैरे कधीही चित्रपटात असू शकत नाहीत (ही पात्रे मात्र असू शकतात).

* कोणती पात्रे गाणी म्हणू शकतात आणि कोणती नाही हे ठरलेले असते आणि त्यात फार बदल होत नाही.

* गाण्यांच्या सुरावटी, संगीतरचना, वाद्यवृंद, आवाज यात प्रयोग होत असतात. पण शब्दरचनेत आणि कल्पनाशक्तीत फार फरक करता येत नाही.

* बहुतेक गाणी ही generic (मराठी प्रतिशब्द?) असतात आणि त्यांना चित्रपटापेक्षा स्वतंत्र असे आपले अस्तित्व असते. चित्रपटांतील पात्रे ती गाणी एकमेकांना उद्देशून म्हणत असली, तरी गाण्यांच्या ओळीत त्यांची नावे कधीच गुंफलेली नसतात.

* शेकडा नव्व्याण्णव गाणी ही प्रशिक्षित गायकांच्या आवाजात मुद्रित होतात.

* मुळात पात्रांनी गाणी म्हणणे हेच अवास्तव असल्यामुळे की काय, गीत चित्रीकरणात वास्तवाला पूर्णपणे तिलांजली देऊन नर्तकांचे समूह, भपकेदार नेपथ्य, सफाईदार पदन्यासावली, अशक्य कोटीतील कपडेलत्ते, चित्रणस्थळे इत्यादिचा सढळ हस्ते वापर केला जातो.

* गाणे संपताच चित्रपट मख्खपणे मूळपदावर येतो आणि पुढे चालू लागतो. म्हणजे काय की,
"ए, आपण ते मेक्सिकोच्या समुद्रावर नाचत होतो ना, तेव्हा मला एकदम गुहागरच्या आईआजी आठवल्या. भेटल्या नाहीत किती दिवसात",
किंवा
"अगं, परवा मला लोकलमध्ये तो नायर दिसला. अगं, तो तुझ्यामागे निळं बनियन घालून नाचत होता तोच"
असे प्रसंग कधीही चित्रपटात नसतात. (इथे विनोद अभिप्रेत नाही). मूळ चित्रपटापासून संपूर्ण फारकत घेतलेली असते.
****

या मुद्द्याचा कुणी विशेष अभ्यास केलेला आहे काय? यावरून भारतीय समाज, मानसिकता, जडणघडण यावर काही खास प्रकाश पडतो काय?

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

28 Dec 2015 - 10:12 pm | यशोधरा

सिनेमॅटीक लिबर्टी हे एक सोप्पे आणि सद्ध्या प्रचलित असलेले उत्तर सुचत आहे.

एस's picture

29 Dec 2015 - 2:06 am | एस

खिक्क!

चलत मुसाफिर's picture

29 Dec 2015 - 6:14 am | चलत मुसाफिर

ही लिबर्टी फक्त भारतातल्यांनाच का घ्यावीशी वाटते? आणि प्रत्येकाच्या लिबर्टीमध्ये तीच गाणी त्याच संकेतांसह कशी उगवतात?

असले प्रश्न विचारता म्हंजे कॉय? सेन्सॉरशिपचा निषेध हाँ!
क्रियेटीव्हीटीवर घाला घालताय? छे! छे! सिनेमा काढतील, बघणारे बघतील. तसे वागायचे नसते हे बहुतांशी लोकांना कळते बरं..आणि ज्यांना कळत नाही, त्यांना काय म्हणायचे हेपण मिपावर इतरत्र सांगितलेय!

चलत मुसाफिर's picture

29 Dec 2015 - 12:57 pm | चलत मुसाफिर

विनोदाचे स्वागत आहे. पण प्रश्नाचे उत्तर सापडले नाही

बोका-ए-आझम's picture

29 Dec 2015 - 9:36 am | बोका-ए-आझम

१. सेक्सचं प्रकटीकरण - आपल्या देशातच असं का असा एक अत्यंत समर्पक प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आपल्या देशात लैंगिक भावनांच्या प्रकटीकरणावर अनेक बंधनं आहेत. पूर्वी तर अजून होती. अशा वेळी गाणी ही प्रणय दाखवण्यासाठी एक चांगली पळवाट होती आणि अजूनही आहे.
२. मार्केटिंग - आजकाल प्रत्येक प्रथितयश चित्रपट निर्माता चित्रपटाच्या मार्केटिंग आणि प्रमोशनवर भरपूर खर्च करतो. काही चित्रपटांच्या प्रमोशन बजेटमध्ये एक छोटा मल्टीप्लेक्स चित्रपट बनू शकतो. पूर्वी यालाही मर्यादा होत्या, कारण आपल्या देशात प्रसारमाध्यमं मर्यादित होती. इंटरनेट नव्हतं. आकाशवाणी आणि दूरदर्शन सरकारी मालकीचे होते जाहिराती स्वीकारणारी विविध भारती १९७० नंतर आली (चुभूद्याघ्या). अशा वेळी जर निर्माता आपला चित्रपट पूर्ण भारतभर प्रदर्शित करत असेल, तर त्याला लोकांपर्यंत हा चित्रपट पोहोचावा म्हणून गाणी हा एक उत्कृष्ट पर्याय होता.
लोक गाणी ऐकतील, ती त्यांना आवडतील, आणि मग तीच गाणी पाहायला ते चित्रपटगृहात येतील असं साधं सरळ गणित होतं.
३. तुम्ही जर आपल्या हिंदी चित्रपटांचा इतिहास पाहिलात, तर तुम्हाला पुचाट अभिनेते आणि अभिनेत्री (हे शब्द वापरणं हा काहींच्या बाबतीत अशक्य आहे, पण तरीही) बरेच दिसतील. पण गायक आणि संगीतकार हे असामान्य दर्जाचे होते. त्यामुळे निदान गाणी तरी जबरदस्त हवीत. पडद्यावर कोणीही माठ किंवा दगड का गाईना ही मनोवृत्ती होती. 'मन तरपत हरी दर्शन को आज ' हे बैजू बावरा मधलं गाणं पहा. रफीचा आवाज अत्यंत दर्दभरा आणि पडद्यावर भारतभूषणने त्याची लावलेली वाट पाहिलीत, तर तुम्हाला मी काय म्हणतोय ते कळेल.
४. आज निर्मात्याला अनेक मार्गांनी पैसे मिळतात. परदेशी बाजारपेठ उपलब्ध आहे. पूर्वी असं नव्हतं. त्यामुळे संगीताचे हक्क विकून निर्माता थोडे पैसे कमवू शकत होता, कारण जर चित्रपट पडला, तर तो कदाचित रस्त्यावरच आला असता. आणि त्यावेळी एच.एम.व्ही., पॉलिडोर आणि म्युझिक इंडिया अशा इन मीन तीन चार कंपन्या होत्या. तिथल्या लोकांनी तुमच्या चित्रपटाचे सांगीतिक हक्क जर तुम्हाला घ्यायला have असतील तर गाणी जबरदस्त हवीत. त्याला संगीत चांगलं हवं.

चलत मुसाफिर's picture

29 Dec 2015 - 12:56 pm | चलत मुसाफिर

1. Repressed sexuality and taboos thereof हा मुद्दा विचार करण्याजोगा आहे. पण मग इराणी किंवा जपानी चित्रपटांतूनही ढिगांनी गाणी सापडायला हवीत, नाही का?
2. मार्केटिंग म्हणाल, तर हॉलीवूडच्या सिनेमांचे बजेट हिंदीच्या कैकपट जास्त असते. ते हा साधासोपा रस्ता का धरत नाहीत?

त्यांना त्यांच्या ''अभिनयावर'' विश्वास असेल

बोका-ए-आझम's picture

29 Dec 2015 - 6:05 pm | बोका-ए-आझम

मध्येही musicals आहेत. इराणी आणि जपानी चित्रपटांत गाणी नसण्याचं एक कारण म्हणजे त्यांच्या संस्कृतीत गाण्यांना आपल्याप्रमाणे महत्व नसावं. रच्याकने आपले चित्रपट इराण आणि जपान या दोन्ही ठिकाणी प्रचंड लोकप्रिय आहेत. बाकी मजिद मजिदी किंवा अकिरा कुरोसावा यांच्यासारख्या सेल्युलाॅइडवरच्या कवींना गाण्यांची गरज भासली नसावी असं म्हणू शकतो. शिवाय इराण आणि जपानमध्ये भारताएवढी विविधता नसल्यामुळे गाणी ही माध्यमाची गरज वगैरे नाहीयेत. आपल्या देशात मुंबई, जयपूर, पाटणा आणि भुवनेश्वर यांना एकत्र जोडण्यासाठी संगीत हा common denominator आवश्यक आहे.

चलत मुसाफिर's picture

29 Dec 2015 - 6:32 pm | चलत मुसाफिर

भारतीय संस्कृतीत गाण्यांना इतर देशांपेक्षा जास्त महत्व आहे, हेच मला मान्य नाही.

विजुभाऊ's picture

29 Dec 2015 - 3:58 pm | विजुभाऊ

बोका भौ योग्य स्पष्टीकरण दिलंत.
अजून काही मुद्दे खालीलप्रमाणे.
गाणी हा आपल्या समाजाचा अविभाज्य भाग आहे.
आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगानुसार गायली जाणारी लोकगीते आहेत.
उदा: ओटी भरणाची गाणी ,बारशाची गाणी , मुलीला न्हाण आले त्या प्रसंगी गायची गाणी( पहा चित्रपट २२ जून), प्रेमात पडलेल्याची गाणी , छेडाछेडी करण्याची गाणी ( उदा: गवळण) विरह गीते , लग्नप्रसंगात तर बहुतेक प्रत्येक वेळेसाठी सेपरेट लोकगीत असते मुलगी दाखवण्याच्या वेळेपासून हळदी आणि लग्न लावण्यापर्यन्त ( मंगलाष्टके ही गाणीच आहेत की),पाठवणीची गीते , विरहाची गीते , बहुतेक प्रसंगावर आधारीत लोक गीते आहेत.
त्या परंपरेचा आधार घेत हिन्दी मराठी सिनेमावाल्यानी घेतला.
या शिवाय गाणी ओठावर रहातात. गुणगुणली जातात आपोआप झैरात होतेच.
रेडिओवर सकाळी ऐकलेले गाणे दिवसभर मनात घुटमळत रहाते. ही गोष्ट बीन गाण्याच्या चित्रपटा बाबतीत घडणे शक्य नसते.

बोका-ए-आझम's picture

29 Dec 2015 - 9:38 am | बोका-ए-आझम

असे वाचावे.

राहू द्या की ओ गाणी! आम्हांला तर गाणी जाम आवडतात. चित्रपट कितीही धन्यवाद असला तरी त्यातली गाणी जर फक्कड बनलेली असतील तर तो सुसह्य होतो जरासा! ;-)

चलत मुसाफिर's picture

29 Dec 2015 - 1:00 pm | चलत मुसाफिर

मुद्दा मनापासून मान्य. पण प्रश्न वेगळा आहे.

नया दौर सारखा संगीतमय चित्रपट देणाऱ्या बी.आर.चोप्रांनी 'कानून' मध्ये त्या काळात गाणी अजिबात न ठेवण्याचा प्रयोग केला होता, आणि दिग्दर्शक जर चांगला असेल - म्हणजे बिमल रॉय, मेहबूब खान, गुरुदत्त, विजय आनंद, राज खोसला, राज कपूर यांच्यापैकी असेल, तर तुम्हाला कधीच उगाचच टाकलेली गाणी दिसणार नाहीत. ती कथेच्या ओघात येतील आणि त्यांचं चित्रीकरणही सुंदर असेल. बंदिनी, गाईड, प्यासा, मेरा साया, आवारा - यामध्ये गाणी ही कथेचा अविभाज्य भाग झाली, कारण या दिग्दर्शकांनी तसा विचार केला.

चलत मुसाफिर's picture

29 Dec 2015 - 12:49 pm | चलत मुसाफिर

1. ते प्रयोगच राहिले.

2. भारतात सिनेमा हा प्रेमकथा, मारधाडपट, कॉमेडी, पोशाखी, सामाजिक, रहस्य, काहीही असो, गाणी हवीच हवी असा संकेत अगदी सुरुवातीपासूनच का निर्माण झाला आणि अजून कसा प्रचलित आहे? गाण्यांचा चपखल वापर करून सिनेमा काढावा असे द'मिल किंवा हिचकॉकला कधीच का वाटले नसावे?

हुप्प्या's picture

29 Dec 2015 - 9:57 am | हुप्प्या

भारतातील सिनेमे हे नाटकांना स्पर्धक म्हणून आले. जेव्हा सिनेमे बोलू लागले तेव्हा त्यात गाणी अपरिहार्य होती नाहीतर नाटकांपेक्षा सरस ठरले नव्हते. हळूहळू सिनेमातले गाण्याचे तंत्र सुधारत गेले. रेकॉर्डिंग, पार्श्वगायक, गीतकार, संगीतकार वगैरे हळूहळू उत्क्रांत होत गेले आणि ते लोकांना पसंत पडत गेले. रेकॉर्ड वगैरे तंत्र आल्यामुळे त्या गाण्यांचे स्वतंत्र अस्तित्वही दिसू लागले म्हणजे सिनेमा न पहाता गाणी मात्र अनेकदा ऐकली असे होत गेले.
एक मुख्य कारण म्हणजे अनेक प्रतिभावान संगीतकार, गीतकार, गायक, वादक हे सिनेमात मिळणार्‍या पैशामुळे तिथे आकर्षित झाले. गायकाला निव्वळ उत्तम गायन येणे पुरेसे होते. गीतकाराला उत्तम गीतरचना करता येणे वगैरे. त्यामुळे एक स्पेशलायझेशन तयार झाले. विविध संगीतकारात, गायकात असणारी स्पर्धा ह्यामुळे सिनेमासंगीत हे फारच पुढे गेले. भारतीय व पाश्चिमात्य संगीत ह्यांचा एक उत्कृष्ट मिलाप झाला आणि ते कमालीचे लोकप्रिय झाले. मग ते सिनेमाचा अविभाज्य घटक बनले आणि आता मागे फिरणे नाही अशी स्थिती आली आहे.

चलत मुसाफिर's picture

29 Dec 2015 - 1:06 pm | चलत मुसाफिर

आजही हिंदी चित्रपट संपूर्ण नृत्यसंगीतासह देशोदेशी पाहिले जातात. पण तेथील स्थानिक चित्रपट हा साचा अवलंबत नाहीत. उदा. रशिया.

चलत मुसाफिर's picture

29 Dec 2015 - 1:10 pm | चलत मुसाफिर

तुम्ही सांगितलेला घटनाक्रम आणि त्याचा कार्यकारणभाव बरोबर आहे. पण हे "यशस्वी बिझनेस मॉडेल" इतर देशांतील चित्रपटउद्योगांनी का उचलले नाही?

आजही हिंदी चित्रपट संपूर्ण नृत्यसंगीतासह देशोदेशी पाहिले जातात. पण तेथील स्थानिक चित्रपट हा साचा अवलंबत नाहीत. उदा. रशिया.

उगा काहितरीच's picture

29 Dec 2015 - 11:44 am | उगा काहितरीच

खरं आहे , काही काही चित्रपटात गाणे दाताखाली खडे आल्यासारखे वाटतात. पण काही चित्रपटात कथेला पुढेही नेतात . वर काही लोकांनी जी कारणे दिली आहेत तेही पटण्याजोगेच आहेत.

आदूबाळ's picture

29 Dec 2015 - 1:11 pm | आदूबाळ

माझ्या मते bellwether effect हे त्याचं एकमेव कारण आहे. सुरुवातीला चित्रपट बोलका झाल्यावर निर्मात्यांना संगीत नाटकाचा प्रेक्षकवर्ग खेचून आणण्यासाठी गाणी घालणं क्रमप्राप्त होतं. अन्याने केलं म्हणून गन्यानेही केलं, मग संप्या आणि पक्याही करायला लागले. हळुहळू तो प्रंप्रेचा भाग झाला.

त्यामध्ये काही डीप थियरी वगैरे नाही. ठराविकच पात्रं गाणी म्हणतात वगैरेही निरीक्षणं bellwether effect चंच द्योतक आहे.

चलत मुसाफिर's picture

29 Dec 2015 - 6:21 pm | चलत मुसाफिर

बेलवेदर परिणाम सुरुवातीच्या काळात असू शकतो. पण सिनेमा हे व्यावसायिक आणि खर्चिक माध्यम असल्यामुळे केवळ "तो करतो म्हणून" हे कारण कायमस्वरूपी असू शकत नाही. प्रेक्षकांना गाणी हवी असतात हे कारण असू शकते. यात अभारतीय किंवा अनिवासी प्रेक्षकही आले.

एकेकाळी संगीत नाटकात वारेमाप गाणी असण्याचे हेच कारण होते. पण प्रेक्षकवर्ग ओसरल्यावर त्यांना बदलणे भाग पडले.

प्रेक्षकांना भारतीय सिनेमाकडून गाणी हवी असतात का? जर होय, तर कारण काय?

आदूबाळ's picture

29 Dec 2015 - 7:06 pm | आदूबाळ

बेलवेदर परिणाम ...

हा फक्त चित्रपटकर्त्यांकडूनच नाही, तर प्रेक्षकांकडूनही आहे / असतो. बेलवेदर बघून प्रेक्षक आपली आवड तशी मोल्ड करून घेतात, आणि चित्रपटकर्त्याला तसेच चित्रपट देणं सेफ वाटतं.

आता भारतीय टेलिव्हिजनचं बघा. ब्रेकिंग बॅड**सारखी मालिका भारतीय कवटीत शिजू शकत नाही का? शकते. पण ती घ्यायला कुठला चॅनल धजावेल का? आई|कुंकू|लग्न|सासू|सून|नांदणे याच प्रकारच्या मालिका सातत्याने देणार्‍या झी मराठीला असली मालिका झेपेल का?

कारण बेलवेदर आहेत आई|कुंकू|लग्न|सासू|सून|नांदणे मालिका. (झी मराठीने "दिल दोस्ती.." घेतली हेच एक महदाश्चर्य आहे. अर्थात त्यात संजय जाधवांसारख्या तगड्या प्रॉडक्षन हाऊसचं गुडविलही आहेच.)

दोन उदाहरणं बघा - श्री० ज० जोशींच्या कादंबरीवर आधारित, दिलीप प्रभावळकर अभिनित "साळसूद" नावाची मालिका होती. त्याच्या लोकप्रियतेनंतरही अशा प्रकारच्या इतर मालिका तगल्या नाहीत. तसंच "साराभाई वर्सेस साराभाई" सत्तरेक भागांनंतर बंद पडली ती पडलीच. मार्केट फोर्सेसपुढे सगळे विनम्र असतात.

**खुद्द ब्रेकिंग बॅडचा निर्माता व्हिंस गिलिगनही पायलट घेऊन वाहिन्यांचे उंबरठे झिजवत होता. शेवटी एएमसी नेटवर्कसारख्या दुय्यम वाहिनीने ती स्वीकारली.

एकेकाळी संगीत नाटकात वारेमाप गाणी असण्याचे हेच कारण होते. पण प्रेक्षकवर्ग ओसरल्यावर त्यांना बदलणे भाग पडले.

संगीत नाटकातली गाणी बदलली नाहीत. घाशीराम कोतवालसारखा एखादा अपवाद वगळता सौभद्रपासून ते कट्यार काळजात घुसली ते [प्रशांत दामलेचं कोणतंतरी नाटक] या सगळ्या दीडशे वर्षांच्या कालावधीत मराठी नाट्यसंगीताचा आकृतीबंध तोच राहिला.

त्याउलट बॉलिवुड चित्रपटसंगीत सतत बदलतं आहे. संगीतकार रोशन यांची "बॉलिवुडात भारतीय संगीत आणणारे" म्हणून प्रसिद्धी आहे. सलील चौधरी, आरडी, रेहमान, (फॉर व्हॉट इट इज वर्थ) हिमेस आणि आत्ताचे स्नेहा खानवलकर हे सगळे बॉलिवुड संगीतप्रवासातले टर्निंग पॉईंट्स आहेत. तिथे बोट ठेवून म्हणता येतं - इथून संगीत बदललं बरंका.

मराठी कथालेखक's picture

29 Dec 2015 - 3:00 pm | मराठी कथालेखक

मला वाटतं आपल्याकडे चांगली गाण्यांसाठी दसरे काही मोठे व्यासपीठ उपलब्ध नाही. पूर्वी नाटक होते आता सिनेमा आला. बाकी मनोरंजन म्हणजे काहितरी गाणे किंवा पद्यात असावे, किमान ठेका तरी असावाच असावा असा आग्रह आपल्याकडे आहे. पुर्वी लोककला होत्या (लावणी, पोवाडा) त्यात पद्य हे असायचेच.
आता रेकॉर्ड केलेले गाणे अनेकांपर्यंत पोहोचवण्यास सिनेमा हे चांगले आणि अत्यंत प्रभावी माध्यम आहे (अपवाद भक्तीगीतांचा) गैरफिल्मी गाण्यांचं फारसं प्रस्थ नाही. काही अतिशय टुकार व पडेल सिनेमातली गाणीसुध्दा अजरामर झाली आहेत (आठवा 'बिन तेरे सनम मर मिटेंगे' किंवा 'नीले नीले अंबरपर' )
याखेरीज प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कलाकारांना (मुख्यतः अभिनेत्रींना) नृत्य करताना बघायला आवडत असावं.
तसेच भावनांना अधिक उठाव देणे गाण्यांमुळे सोपे होते (प्रेम, विरह , मस्ती ई) , "ड्रायव्हर आपली गाडी ओव्हरहॉल करताना" फारशी भावूकता नसल्याने त्या प्रसंगाचे गाणे बनत नाही.

मराठी कथालेखक's picture

29 Dec 2015 - 7:01 pm | मराठी कथालेखक

मी गेले १५-२० वर्षांच्या काळाबद्दल बोलू शकतो की चित्रीत केलेले गाणे लोकप्रिय होणे सोपे असते. चित्रित न केलेले गाणे कितीही श्राव्य असले तरी फारशी लोकप्रियता नाही मिळवत. उदा बाजीगर सिनेमाच्या कॅसेटमध्ये 'समजकर चांद ' एक खूप छान गाणे आहे, पण ते सिनेमात नाही तर आज ते कुणाला फारसे आठवणार नाही.
मग गाणे चित्रित करायचे आहेच तर ते लोकप्रिय कलाकारांवर केल्याने अधिक जास्त लोकप्रिय होणार शिवाय चित्रपटाचे मोठे बजेट असल्याने जाहिरात म्हणून टीवी चॅनेलवर सतत दाखवणे परवडतेही. मग या जाहिरातीचा फायदा सिनेमाला मिळतो. कधी सिनेमाचा फायदा गाण्यांना , म्हणजे हा एक जोडधंदा झाला की नाही ?
मी अन्वरच्या २ गाण्यांवर फिदा होवून 'अन्वर' हा चित्रपट सहन केला (मी तो पायरेटेड कॉपी डाउनलोड करुन पाहिला आणि निर्मात्याला /वितरकाला त्याचे उत्पन्न मिळाले नाही तरी चित्रपट पाहिला गेला हे महत्वाचे)
तर या उलट कधी एखादा सिनेमा खूप आवडतो आणि मग त्यातले बर्‍यापैकी ठीक असलेले गाणेही लक्षात राहून जाते.
पूढे जावून असं पहा ही अगदी एखादा गैरफिल्मी गाण्यांचा अल्बम हिट झाला तरी त्यातली खरंतर फक्त तिच गाणी जास्त लक्षात राहतात ज्यांचे चित्रीकरण केलेय (मला चुईमुईसी तुम लगती हो गाणे आठवतेय, त्यातली सगळी गाणी चित्रीत झाली नव्हती आणि म्हणूनच फारशी हिट पण झाली नव्हती)

भंकस बाबा's picture

29 Dec 2015 - 5:02 pm | भंकस बाबा

आपण कदाचित चित्रपट बघत नसाल,
रशियात राज कपुरचे चित्रपट पाहिले जातात तेव्हा त्यातल्या गांण्यासाठी लोक वेडे झालेले टीवीवर पाहिलेले आहेत. आवारा हु आपल्या तरुण पिढीला कदाचित माहीत नसेल पण रशियन लोकांना माहीत असते.
राजेन्द्र कुमार, मनोज कुमार,देव आनंद असा कोणता छप्पर फाडके अभिनय करायचे की पब्लिक त्यांचे पिक्चर बगायला जायचे? किशोरकुमार, रफ़ी, मुकेश ,हेमंतकुमा,मन्नाडे यांच्यामुळे कित्येक नटाच्या घरच्या चुली पेटल्या. रफीची गाणी वगळून दोस्ती सिनेमा , मी विचार देखिल करु शकत नाही.

चलत मुसाफिर's picture

29 Dec 2015 - 5:28 pm | चलत मुसाफिर

आक्षेप नक्की कशाला आहे?

सिनेमात गाणी असणे योग्य की अयोग्य हा मुद्दाच नाहीये. भारतीय सिनेमात गाणी का असतात असा प्रश्न विचारलेला आहे.

हा धागा काढला, यावरूनच मी चित्रपट पाहतो हे सिद्ध होते, नाही का? हां, कदाचित तुमच्याइतके पाहिले नसतील. दोघांच्या याद्या तपासल्याशिवाय ते कळणारही नाही :-)

प्रतिसादाचे स्वागत!

भंकस बाबा's picture

29 Dec 2015 - 5:52 pm | भंकस बाबा

तुम्ही जी स्पष्टीकरण दिली आहेत ती!
मी वर उदाहरणे दिली आहेत.
तुम्ही म्हणता की गाणी लागल्यावर लोकं विडया फुकायला जातात. माझ्या माहितिप्रमाणे पूर्वी लोक गाणी अनुभवायला थेटरात जायची.
अगदी आजचे ठोकळे अभिनेते व् शोभेच्या भावल्या गाण्यावर तरी अभिनय करतात.

चलत मुसाफिर's picture

29 Dec 2015 - 6:12 pm | चलत मुसाफिर

फिल्मफेअर मासिकाच्या वार्षिक यादीत सुमारे 200 हिंदी चित्रपटांची नावे असतात. शिवाय इतर 20 ते 25 भाषांतून विपुल संख्येने चित्रपटनिर्मिती होते. यापैकी 95% चित्रपटांत सरासरी 3 ते 4 गाणी असतात. भारतीय सिनेमा उद्योगाला 100 हून अधिक वर्षे झाली. हिशोब घालून पहावा. (या संख्या अंदाजे आहेत. काही मोठी चूक असेल, तर निदर्शनास आणावी)

आपण जे गाणी अनुभवणे इ. म्हणताय ते यापैकी फारतर 10% गाण्यांना लागू होत असेल. पण तरीही गाण्यांवाचून भारतीय सिनेमाचे पान हलत नाही. असे का?

अभ्या..'s picture

29 Dec 2015 - 6:14 pm | अभ्या..

कारण ते सोनेरी पान आहे.

चांदणे संदीप's picture

29 Dec 2015 - 6:38 pm | चांदणे संदीप

कसे हलणार?? सोनेरी पान!
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))

बोका-ए-आझम's picture

29 Dec 2015 - 6:44 pm | बोका-ए-आझम

सोनेरी, प्लॅटिनम, हिरा - काय म्हणाल ते.

मराठी कथालेखक's picture

29 Dec 2015 - 6:49 pm | मराठी कथालेखक

एकद ट्रेंड सेट झाला की तोच मार्ग सहसा अवलंबला जातो.
मोठ्या बॅनरनी (राज कपूर वगैरे) यांनी केले, त्यांची गाणी आणि सिनेमा हिट झाला की मग लहान निर्मात्याला पण वाटत की सिनेमा म्हणजे गाणी हवीतच मग शंकर-जयकिशन नाही परवडले तर आणि कुणी अशी तडजोड करीत गाण्यांचा दर्जा खालावला जातो.

भंकस बाबा's picture

29 Dec 2015 - 7:24 pm | भंकस बाबा

भारतीय माणूस गानसेन नसला तरी कानसेन असतो. अगदीच कोणीतरी ओरंगजेब निघतो.
नाट्यसंगीत निघण्याच्या आधी दखिल राजदरबारी गवयाना मान होताच.
पूर्वी संगीत वा गाणे ऐकन्यासाठी महफिलि होत असत. पण ते श्रीमंताना उपलब्ध होते.
नाट्यसंगीताने गाणे सामान्य माणसापर्यंत पोहोचवले. पण तरिही ते पिटातल्या पब्लिकला रुचत नसे.
फ़िल्मी संगीताने सामान्य माणूस गाणी गुणगुणायला लागला. स्वतःला तो देवआनंद वा दिलीपकुमार समजून त्यांचे अनुकरण करायला लागला. चित्रपट सृष्टीने सर्व प्रसंगाना अनुरूप गाणी दिली.
आता ही गाणी व्यवस्थित ऐकायची असतील तर माध्यम चांगले पाहिजे.
तेव्हाचे रेडियो व् ग्रामोफोन काय भयानक आवाज काढायचे. मग चांगल्या आवाजात गाणे ऐकायचे तर थेटर गाठावे लागे. लताबाईचे 'रसिक बलमा' ट्रांस्जितर वर ऐका नंतर अद्ययावत म्युझिक सिस्टम वर ऐका.
आता डिमांड तसा पुरवठा हां सिम्पल एकोनोमिक्स नियम असल्यामुळे चित्रपटात गाणी येत गेली.
माझ्या माहितिप्रमाणे अलबेला चित्रपट त्यावेळी पब्लिकने फ़क्त गाण्यासाठि बघितला होता.
राज कपूर आपल्या चित्रपटातील गाणी श्रवणीय असतील याची काळजी घ्यायचा.

मराठी_माणूस's picture

29 Dec 2015 - 5:40 pm | मराठी_माणूस

किशोरकुमार, रफ़ी, मुकेश ,हेमंतकुमा,मन्नाडे यांच्यामुळे कित्येक नटाच्या घरच्या चुली पेटल्या.

किशोरकुमार, रफ़ी, मुकेश ,हेमंतकुमा,मन्नाडे यांच्या चुली कुणामुळे पेटल्या ?

चांदणे संदीप's picture

29 Dec 2015 - 5:47 pm | चांदणे संदीप

पण शेवट मराठी माणसावर होईल अशी दाट शंका आहे! :)

बोका-ए-आझम's picture

29 Dec 2015 - 6:08 pm | बोका-ए-आझम

दादासाहेब फाळके मराठीच होते की. त्यामुळे या सगळ्यांच्या चुली एका मराठी माणसामुळे पेटल्या असं म्हणू शकतो.

बोल्पट बोल्पट. नाहीतर लुमिए ब्रदर्स आहेत मध्ये फ्रेन्च चुली घेऊन.

भंकस बाबा's picture

29 Dec 2015 - 5:58 pm | भंकस बाबा

भारत भूषण, प्रदीप कुमार, अनिल धवन, विश्वजीत, उत्तम कुमार यादि लांबत जाईल

अवतार's picture

31 Dec 2015 - 7:40 pm | अवतार

...यांच्यामुळे कित्येक नटाच्या घरच्या चुली पेटल्या.

प्रचंड सहमत !

तिमा's picture

29 Dec 2015 - 7:13 pm | तिमा

चल-चित्र गाणे हे भावना व्यक्त करण्याचे एक उत्तम माध्यम आहे. जनरली, चित्रपटांतील गाणी ऐकताना लोक त्यातल्या काव्याकडे नीट लक्ष देत नाहीत. जुन्या गाण्यांमधे मधुर चालींबरोबरच उत्तम अर्थ भरलेला असायचा. एकाच वेळेला उत्तम चाल, उत्तम आवाज आणि उत्तम काव्य याचा रसास्वाद घेताना जो स्वर्गीय आनंद मिळतो त्याला तुलना नाही. त्यांतच त्यावर, उत्तम अभिनयही केला असेल तर सोन्याहून पिवळे. या सर्व कारणांसाठी, आणि मुख्य म्हणजे हे सगळे अनुभवायला जो निवांतपणा लागतो तो, त्याकाळी मुबलक असल्याने चित्रपटांत गाणी रुजली.

चलत मुसाफिर's picture

29 Dec 2015 - 7:23 pm | चलत मुसाफिर

"उत्तम चाल, उत्तम आवाज आणि उत्तम काव्य... आणि निवांत वेळ" हा काळ सुमारे साठ वर्षांपूर्वी सुरु होऊन चाळीस वर्षांपूर्वी संपला. पण गाणी आहेतच.

का?

(मला आज बराच निवांत वेळ आहे ही गोष्ट वेगळी!!) :-)

भंकस बाबा's picture

29 Dec 2015 - 7:34 pm | भंकस बाबा

हिंदी वा अन्य कुठल्याही चित्रपटासाठी हां नियम लागू होतो.
अन्यथा चित्रपटात मारामारी होते तेव्हा 'ढीशॉव' या आवाजाला देखिल आक्षेप घेतला पाहिजे.

मित्रहो's picture

30 Dec 2015 - 9:26 am | मित्रहो

म्हणजे नाच गाणे ही भारतीय मानसिकता आहे त्यामुळेच अगदी सिनेमा यायच्या आधीपासून संगीत नाटकात, त्या आधीच्याही मनोरंजनाच्या कार्यक्रमात गाणी होतीच आणि तोच ट्रेंड सुरु राहीला.
काहीसे गंमतीदार पण मला वाटत मुळात आपली प्रवृत्ती ही पॅकेजची आहे. आपल्याकडे थाळीच चालनार सबवे सारख प्रत्येक गोष्ट निवडायला दिली तर सामान्य भारतीयाला लवकरच कंटाळा येतो. त्यामुळे नाट्य आणि संगीत या दोन्ही गोष्टी एकत्रच हव्या ही वृत्ती प्रबळ होत गेली. आपल्याकडे ऑपेरा वेगळा आणि नाटक वेगळे किंवा ऑस्कर अवॉर्ड आणि ग्रॅमी अवॉर्ड वेगळे हा प्रकार नाही. दर आठवड्याला मी सिनेमा बघायला वेगळ्या थेटरात जातो आणि गाणे ऐकायला वेगळ्या थेटरात जातो ही कल्पनाच करवत नाही. भारतीयांच्या या पॅकेज प्रवृत्तीचा मार्केटींग वाल्यांनी उपयोग केला. पिझ्झा हॉटेलात सुद्धा मिळनारा मिल ऑप्शन बघितला की हसायला येते.
एकदा काही गोष्टी सुरु झाली की ती बदलने कठीण असते. खरे खोट माहीत नाही पण असे म्हणतात दोन रेल्वे रुळात जे अंतर असते त्याचे कारण कुठेतरी बैलगाडीच्या दोन चाकातील अंतराशी संबंधित आहे.

संदीप डांगे's picture

30 Dec 2015 - 10:06 am | संदीप डांगे

अगदी हेच टंकायला आलो होतो.

कानडाऊ योगेशु's picture

12 Apr 2020 - 9:49 pm | कानडाऊ योगेशु

>>पण असे म्हणतात दोन रेल्वे रुळात जे अंतर असते त्याचे कारण कुठेतरी बैलगाडीच्या दोन चाकातील अंतराशी संबंधित आहे.
बाबौ. हा विचार कधी मनात आला नव्हता. अगदी प्रचंड मोठी इन्वेन्शन्स ला कशी साधारण गोष्टींची पार्श्वभूमी असते हे पुन्हा प्रत्ययास आले.

भंकस बाबा's picture

30 Dec 2015 - 5:21 pm | भंकस बाबा

पुष्कळदा लंब्याचवड्या डायलॉगबाजी पेक्षा एक गाणे फार मोठे काम करुन जाते.
श्री 420 सिनेमात राज व् नर्गिसवर चित्रित झालेले 'प्यार हुवा इकरार हुवा' हे गाणे,
पाऊस आला म्हणुन एकाच छत्रित यायचा प्रयत्न करणारे प्रणयी युगल, पण ओळख इतकी नाही की जवळ घेऊन उभे राहु. मग आळीपाळीने पावसात भिजत निरुपाय म्हणुन जवळ येत प्रेमावर शिक्कामोर्तब!
राज व् नर्गिसचा अभिनय ,त्यातल्या त्यात नर्गिसचा अभिनय लाजवाब! आजही ही जवळ येतानाची घालमेल दुसऱ्या कोणी इतक्या चांगल्या प्रकारे दाखवली असेल.
मधुबालाच्या सौंदर्याबद्दल कोणाला आक्षेप नसावा, ही मधुबाला अभिनय करताना नाही तर गाण्यातच जास्त लावण्यवती वाटलेली आहे. पाहा आइये मेहरबान, एक लड़की भीगी भागिसि, अच्छा जी में हारी चली

भंकस बाबा's picture

30 Dec 2015 - 5:41 pm | भंकस बाबा

संत तुकाराम बोलले की मला बुवा 'आधी बीज एकले' च आठवते.
'तेरी गलियोंमें ' हे नितांतसुंदर गाणे पडद्यावर अनिल धवन गातो हे पाहून मला मोठा धक्का बसला होता. शिवाय सिनेमा पण काय? हवस, सत्यानाश!

हुप्प्या's picture

31 Dec 2015 - 9:37 pm | हुप्प्या

जेव्हा सिनेमे काळेपांढरे होते, जेव्हा कॅमेरा तंत्र फार विकसित नव्हते तेव्हा गाणी हेच हिंदी सिनेमाचे मोठे पाठबळ होते. बाकी भाषांनी सिनेमाची लांबी कमी ठेवली, कथेला जास्त प्राधान्य दिले, गाण्यापेक्षा पार्श्वसंगीतावर भर दिला.

बाकीच्या देशात तसे का नाही घडले? करमणूक कशी करावी ह्याला गाणी हे एकमेव उत्तर नाही. बाकी लोकांनी अन्य प्रकारे आपली उत्तरे शोधली. त्याकाळी दळणवळण प्रगत नसल्यामुळे प्रत्येक् सिनेमा स्वतंत्रपणे उत्क्रांत झाला असे मला वाटते.

चलत मुसाफिर's picture

7 Apr 2020 - 9:55 am | चलत मुसाफिर

संचारबंदी (Lockdown) चालू असल्यामुळे मिपाकरांना खल करण्यास व प्रतिसाद लिहिण्यास मुबलक वेळ असेल असा अंदाज करून हा लेख पुन्हा वर काढून आणला आहे :-)

चौथा कोनाडा's picture

11 Apr 2020 - 1:27 pm | चौथा कोनाडा

नायक-नायिका स्वतः गात नाचत नाहीत, नाचणार्‍यांच्या फौजा नाहीत, युरोप स्विझरलंड सारखी डोळे दिपवणारे स्थळदर्शन नाही, पण ..
साधं-सुधं गाणं, पार्श्भुमीवर वाजणारं, प्रेम भावना व्यक्त करणारं, ....

सूक्ष्मजीव's picture

11 Apr 2020 - 5:38 pm | सूक्ष्मजीव

भारतीय संगीतातील वैविध्य आणि जनमानसावरील त्याचा प्रभाव या दोन बाबी ध्यानात घेणे खूप आवश्यक आहे.
कीर्तन, तमाशे, सोंगी भजने, इत्यादी सर्व कलाप्रकारांमध्ये संगीताला खूप महत्व आहे, ही बाब सिनेमात सुद्धा सारखी आहे.
आज आपल्याला अनेक चित्रपटांच्या नाव व कथेपेक्षा पेक्षा त्यांची गाणी आठवणीत आहेत यातच सर्व आले असे मला वाटते.

चलत मुसाफिर's picture

12 Apr 2020 - 8:00 pm | चलत मुसाफिर

चित्रपट सपशेल विसरला जातो आणि गाणी मात्र मुळाबरहुकूम याद रहातात यात काहीतरी गफलत आहे असे नाही वाटत तुम्हाला?

चांदणे संदीप's picture

11 Apr 2020 - 7:01 pm | चांदणे संदीप

इशारा : हे गाणं अतिशय रक्तरंजित आहे.

D-Day चित्रपटातलं हे गाण आहे. सुंदर किंवा पुन्हा पुन्हा बघण्यासारखे आजिबातच नाही पण हे गाणं ज्या पद्धतीने चित्रीत केलं आहे ते जबरदस्त आहे. संवादांऐवजी आणि फ्लॅशबॅक वगैरेंऐवजी गाण्यातून घडलेला प्रसंग कथेतील नायकाला आणि प्रेक्षकांना सांगितल्यानेच ते अतिशय परिणामकारक झालेलं आहे. असं उदाहरण विरळच. या गाण्यानंतर मी थिएटरमध्ये उभा राहून टाळ्या वाजवल्या होत्या.

सं - दी - प

चौथा कोनाडा's picture

13 Apr 2020 - 1:30 pm | चौथा कोनाडा

बघून काटा आला अंगावर !

हे गाणं बघणं झेपलं नव्हतं.

हुप्प्या's picture

13 Apr 2020 - 2:17 am | हुप्प्या

हिंदी म्हणवले जाणारे सिनेमे वास्तविक हिन्दी वा उर्दू भाषेतले असतात. भारताच्या अनेक भागात ही भाषा तितकीशी चांगली कळत नसावी (स्वानुभव!). महाराष्ट्र, गुजराथ, बंगाल, ओरिसा आणि दक्षिणेतील राज्ये जिथे हिंदी सिनेमे बघितले जातात तिथे पल्लेदार, उच्चभ्रू भाषेतले संवाद तितकेसे समजत नाहीत.
उलट संगीत हे भाषेच्या मर्यादा ओलांडून अंतःकरणाला भिडते. विशेषतः जेव्हा संगीताचे सुवर्णयुग होते तेव्हा अत्यंत प्रतिभाशाली संगीतकार, गीतकार, गायक आणि वादक हे संगीत निर्मिती करत होते. गाण्याच्या गेयतेमुळे जरी भाषा १००% कळली नाही तरी गाणी सर्वदूर लोकप्रिय झाली आणि त्यामुळे ते पुण्य सिनेमाच्याच पदरात पडले असेल. अगदी लग्न वा अन्य समारंभात अगदी बिगर हिंदी भाषिक लोक आवडीने हिंदी सिनेमातली गाणी वाजवतात, गातात आणि ऐकतात, त्यावर नाचतात.

अशा प्रकारे उत्तम संगीत असलेले सिनेमे उत्तम धंदा करत आहेत असे लक्षात आल्यावर निर्माते हा घटक सिनेमात नेहमीच समाविष्ट करू लागले आणि ह्या उद्योगाला चालना मिळाली आणि ते संगीत अधिकधिक समृद्ध झाले.

बाकी भागात जसे इराण, जपान, कोरिया जिथे उत्तम सिनेमे बनतात तिथे भाषेचे इतके वैविध्य नाही. अगदी हिंदी भाषिक लोक पाहिले तरी वेगवेगळ्या राज्यात स्थानिक पातळीवर हिंदी सिनेमापेक्षा वेगळी भाषा वा बोली बोलली जाते. जसे राजस्थानी, भोजपुरी, हरियाणवी इ. संगीत हा ह्या भाषिक अडथळ्यांना ओलांडून जोडणारा दुवा आहे असे मला वाटते.

चलत मुसाफिर's picture

13 Apr 2020 - 8:03 am | चलत मुसाफिर

मराठी, तामिळ किंवा बंगाली चित्रपट केवळ त्या विशिष्ट भाषिक समूहातच पाहिले जातात. भाषा न समजण्याचा प्रश्नच येत नाही. मग तिथे गाणी टाकायचे काय कारण?

हुप्प्या's picture

13 Apr 2020 - 10:29 pm | हुप्प्या

प्रादेशिक भाषांत गाणी का? संगीत नाटकांची परंपरा. सुरवातीला सिनेमाला संगीत नाटकांशी स्पर्धा करावी लागत होती म्हणून त्यात गाणी असणे अपरिहार्य होते. नंतर हिंदी सिनेमांचे अनुकरण म्हणून गाण्याची परंपरा चालू राहिली असेल.
प्रत्येक स्थानिक भाषेत काही तरी पारंपारिक संगीत आहेच. भांगडा, तमाशा, गरबा, दांडिया इ. हे सगळे सिनेमात आणून जास्त प्रेक्षक यावेत आणि जास्त पैसे मिळावेत हा उद्देश असेल.
काही गोष्टी अशा असतात की एकदा का पुरेशी प्रेरणा मिळाली की मग ती पद्धत सुरु होते आणि आपल्या इनरशियामुळे चालूच रहाते. एकदा संगीत बनवायची यंत्रणा सिनेमा उद्योगाचा भाग बनली की मग नव्या सिनेमांना आपल्या सिनेमाला संगीत असलेच पाहिजे असे वाटू लागते. इतके कलाकार उपलब्ध आहेत तर का नाही चार पाच गाणी घालायची असा निर्माताही विचार करत असेल.
कदाचित नजीकच्या काळात कुठल्या प्रतिभावान दिग्दर्शकाने कमी वेळेचे, गाणी नसलेले सिनेमे बनवले आणि ते खूप लोकप्रिय झाले तर ही पद्धत बदलू शकते.

कानडाऊ योगेशु's picture

13 Apr 2020 - 11:47 pm | कानडाऊ योगेशु

भारतीय चित्रपटाला संगीत नाटकाची परंपरा आहेच. मग प्रशन असा पडतो कि संगीत नाटकातही नाट्यपदे का होती? त्याचा विचार करता असे दिसते कि भारतात निर्माण झालेले सगळे पुराणकथा संबंधित साहित्य,धर्मग्रंथे वगैरे पद्यात्मक शैलीत आहेत. महाभारत रामायण ही तर सर्वश्रेष्ठ महाकाव्ये आहेत. हा प्रकार इतर धर्मासंबंधित साहित्यात नसावा. त्यामुळे एकदा पद्यात्मक शैली वा काव्य आले कि अशा साहित्याच्या सादरीकरणात तत्संबंधी गायन वगैरे प्रकार ही आपोआपच आले असणार त्यामुळे संगीत हा अश्या सादरीकरणाचा अविभाज्य भाग झाला असावा. आणि एकुणच चित्रपटासारख्या आधुनिक माध्यमाला जिथे मार्केटींगची अतोनात गरज आहे तिथे चपखल बसला. भारतीय माणुस उत्सवप्रिय असल्याने ह्यावेळी वाजवल्या जाणार्या गाण्यांनी चित्रपटांची आपसूकच प्रसिद्धी होते. दुसरा उपप्रश्न निर्माण होतो कि भारतीय पुरातन साहित्यात इतक्या पद्यमय रचना होण्याचे कारण काय असावे. तर त्याचे उत्तर अशा रचना पाठ करायचा सोप्या जात असाव्यात असे असावे.

चौथा कोनाडा's picture

14 Apr 2020 - 11:49 am | चौथा कोनाडा

अगदी पर्फे़ट मांडलंय !

चलत मुसाफिर's picture

14 Apr 2020 - 2:44 pm | चलत मुसाफिर

मुळात व्यावसायिक नाटक हा कलाप्रकार भारताच्या काही मोजक्या भागातच आढळतो. भारतीय चित्रपट उद्योगाचा पाया ज्या मुंबईत रचला गेला तिथे व्यावसायिक रंगभूमी सशक्त होती व अजूनही आहे, हे मान्य. परंतु जिथे आता नाटकानेच संगीताचा त्याग केला आहे, तिथे चित्रपट मात्र ही उधारीची शैली अजून का रेटत आहेत?

दुसरे म्हणजे संगीत रंगभूमी जिथे अजिबात अस्तित्वात नव्हती अशा प्रांतांतील प्रेक्षकवर्गातूनही सिनेमात पाचसहा गाणी हवीच अशी अपेक्षा कशी काय निर्माण झाली असेल?

याचा उलगडा करावा.

कानडाऊ योगेशु's picture

14 Apr 2020 - 6:55 pm | कानडाऊ योगेशु

ह्याचे मूळ आपल्या भारतीयांच्या मनोवृत्तीत असावे. प्रत्येक प्रसंगात काहीतरी सेलिब्रेशन (संपन्न करणे ह्या अर्थाने) हवे असते आपल्याला. ते गीत संगीताच्या माध्यमातुन बाहेर पडते.अगदी बारश्यापासुन ते पार अंत्ययात्रेपर्यंत च्या प्रसंगात ह्या प्रकाराची रेलचेल आढळते. जेव्हा नाटक चित्रपट नव्हते तेव्हाही मंगळागौरी,हादगे, भोंडले,गरबा,पिहु ,बैसाखी,पोंगल्,ओणम वगैरे जिऑग्राफिकली दूर असलेल्या प्रदेशातले उत्सव गीत संगीताचा वापर करुनच साजरे केले जात होतेच कि. इन फॅक्ट महाराष्ट्रातच पूजेत म्हटल्या जात असलेल्या आरत्या सुध्दा हेच सिध्द करतात. असा प्रकार पाश्च्यात्य देशात नसावा. ख्रिसमस मध्ये म्हणण्यात येणार्या केऱोल चा अपवाद. पण हा एक आखीव रेखीव प्रकार असतो. पण आपल्या कडे एखाद्या लग्नात कोणेही स्वरचित मंगलाष्टके उच्च स्वरात गाऊन आपापली गायन कलेची हौस भागवु शकतो. मुद्द्याचे सांगायचे म्हणजे चित्रपट नाटक जरी आधी गीत विरहीत असले असते तरी कालांतराने त्यांचा शिरकाव झालाच असता.

हुप्प्या's picture

14 Apr 2020 - 9:14 pm | हुप्प्या

एक उत्सुकता म्हणून भारतातील कुठल्या भागात व्यावसायिक नाटक हा प्रकार नाही? आणि व्यावसायिकच का? विविध सण सोहळे जत्रांच्या निमित्ताने पारंपारिक नाटके, गाणी, नाच हे सगळ्या भागात होतेच. (निदान मला तरी असे वाटते.) त्यातील काही सिनेमात ऐकू आले तर आश्चर्य काय?

आणि संगीत नाटकांमुळे सिनेमात गाणी आली ह्याचा अर्थ असा नाही की ज्याक्षणी नाटकातील गाणी गायब होतील त्यानंतर लगेचच सिनेमातीलही व्हावीत. हा वैज्ञानिक परिणाम नव्हे. सिनेमातील संगीत हा एक मोठ्या उलाढालीचा व्यवसाय आहे. पुरवठा आणि मागणी मोठी आहे. हल्लीची गाणी १-२ महिनेच चालतात ही गोष्ट वेगळी पण तरी जवळपास सगळ्या सिनेमात ती असतात. त्यामुळे संगीतकार, गायक, वादक, रेकॉर्डींग कलाकार, मिक्सिंग, एडिटिंग आणि शिवाय वितरण, प्रसिद्धी वगैरे करणारे हे सगळे क्षणार्धात कसे थांबेल?

पूर्वी जेव्हा एका इमारतीत एकच थेटर असायचे तेव्हाची गोष्ट आहे. सिगरेट, विडी वगैरे ओढणार्‍या लोकांकरता गाणी हा एक हमखास ब्रेक असे. निवांतपणे, गर्दी वगैरे टाळून हे कार्यक्रम करण्याकरता गाणी ही एक चांगली संधी होती! आता बहुधा थेटरात वा आवारात धूम्रपान बंदी आहे असे वाटते.