✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

विश्वाचे आर्त - भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर

र
राजेश घासकडवी यांनी
Tue, 12/08/2015 - 18:58  ·  लेख
लेख
भाग १ - काळाचा आवाका http://www.misalpav.com/node/33974 भाग २ - नासदीय सूक्त http://www.misalpav.com/node/33987 भाग ३ - अस्तिस्तोत्र http://www.misalpav.com/node/34009 ---- कधी जन्मली पृथ्वी ? जमल्या निळ्या वायूच्या लगडी सलग कधी ? कधी अन् जडतेला त्या मनामनाचे आले पोत ? - बा. सी. मर्ढेकर ---- मर्ढेकरांचा हा प्रश्न कळीचा आहे. ‘काही नाही’ या अवस्थेपासून आपल्याला दिसणार्‍या या जगड्व्याळ विश्वाचा पसारा कसा निर्माण झाला? वायूच्या लगडी जमून त्यांची हवा, पाणी, जमीन तयार झाली याची एक वेळ कल्पना करता येते - साध्या भौतिक आणि रसायनशास्त्राच्या नियमांनी ते समजता येते. पण निर्जीव, अचेतन पदार्थांपासून हाडामांसाचे जीव आणि धडधडणारी हृदये कशी काय झाली? मर्ढेकरांनी ही कविता लिहून साठेकच वर्षे झाली असतील पण शतकांनुशतकांपासून मानवाला या प्रश्नाने झपाटलेले आहे. 'आपण का आहोत?' 'या सृष्टीचे कारण काय?' 'माझ्या जगण्याचे उद्दिष्ट काय?' यासारख्या असाध्य पण पाठ न सोडणाऱ्या प्रश्नांसाठी - विंदा करंदीकरांच्या शब्दांत ‘काही केल्या, काही केल्या न जाणाऱ्या निळ्या पक्ष्या’साठी - 'देव' हे एक सुबक सोपे उत्तर आहे. पण हे उत्तर म्हणजे अनुत्तराचा कळस आहे. "या सर्व रचनांचा अर्थ लावायचा असेल तर मला शरण या. मला असा जादूगार माहिती आहे जो या सर्व रचना केवळ एक कांडी फिरवून करू शकतो." म्हणजे आपल्याला पडलेले सर्व प्रश्न घाऊक पातळीवर एकाच सतरंजी खाली लपवता येतात. या सर्वाचे एकच उत्तर - विधात्याची मर्जी. भाषांतर - माहीत नाही, विचारू नका, आणि विचारही करू नका. पण एक महान अतिप्रश्न शिल्लक राहतोच - जर हे सर्व प्रश्न फेकून ज्या अत्त्युच्च शक्तीच्या भरोशावर फेकून द्यायचे, तर ती कशी निर्माण झाली? याचे उत्तर "ती आहेच". या उत्तराचा ‘फायदा’ असा की फक्त एकच प्रश्न अनुत्तरित राहतो. तेवढा एक सहन केला की बाकी सर्व प्रश्नांची उत्तरे ‘सोपी’ होतात. हे म्हणजे हजार हजारची दहा वेगवेगळी कर्जे विकून टाकून त्या बदल्यात पाच लाखाचे एकच कर्ज (वरचे पैसे न मिळवता!) कबूल करण्यासारखे आहे. पण मर्ढेकरांनी या ओळी लिहिल्या त्याच्या जवळपास शतकभर आधी या प्रश्नाचे उत्तर - निदान त्या उत्तराचा गाभा - एका शास्त्रज्ञाला सापडला होता. त्याचे नाव चार्ल्स डार्विन, आणि त्याने जे उत्तर दिले ते होते उत्क्रांतीवादाचे. एका नामवंत प्राणी शास्त्रज्ञाने म्हटले आहे "दुर्दैवाने उत्क्रांतीवादाचा प्रॉब्लेम असा आहे की तो आपल्याला कळला आहे असे सगळ्यांना वाटते." ते खरेही आहे. आपल्याला शाळेत शिकवल्यापैकी 'माकडापासून माणूस झाला' 'माणसाची शेपटी न वापरल्याने झिजून गेली' 'जिराफाची मान लांब झाली' 'सर्वायव्हल ऑफ द फिटेस्ट' 'समूहाच्या भल्यासाठी..' अशा तुकड्यापलिकडे फारसे काही लक्षात नसते. मानवाला सतावणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे त्यात आहेत हे तर कोणी सांगितलेलेही नसते. डार्विनच्या काळात प्राण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा मुख्यत्वे मानवकेंद्रित होता. बायबलमधल्या विचारांचा त्या दृष्टिकोनावर मोठा पगडा होता. देवाने मानवासाठी ही सृष्टी बनवली, आणि त्याच्या सुखासाठी प्राणी, पक्षी, फुले, फळे, झाडे निर्माण केली. अर्थातच देवाने एकदा प्राणी बनवले की ते बदलतील कसे? घोडा हा घोडा राहाणार, माकड हे माकडच राहाणार. त्यांच्यात बदल होणे शक्य नाही. पण हे तितकेसे खरे नाही हे हळूहळू उघड होत होते. आता अस्तित्वात नसलेल्या पण एके काळी पृथ्वीवर वावरत असलेल्या प्राण्यांचे अवशेष सापडत होते. एकाच लांडग्यासारख्या प्रजातीपासून शेकडो प्रकारचे कुत्र्यांची माणसांनीच पैदास माणसांनी केलेली दिसत होती. डार्विन गॅलापेगोस बेटांवर गेलेला असताना 'केवळ याच बेटांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे फिंच आणि इतर अनेक प्राणी निर्माण करण्यामागे देवाचा काय बरे हेतू असेल?' असा प्रश्न त्याला पडला. आणि अर्थातच या बेटांवर दिसणाऱ्या प्रजाती मुद्दामून वेगळ्या केलेल्या नसून, त्या त्या बेटावरच्या परिस्थितीशी जुळवून घेणाऱ्या आहेत - तेव्हा परिस्थितीप्रमाणे प्राणी बदलतात हे त्याच्यासाठी उघड झाले. पण परिस्थितीमुळे प्राण्यांचे गुणधर्म कसे ठरू शकतील? त्याचे उत्तर आहे प्राण्यांमध्ये होणाऱ्या जगण्यासाठीच्या स्पर्धेत. या स्पर्धेत टिकून राहाण्यासाठीचे गुणधर्म ज्या प्राण्याकडे अधिक असतात त्यांना अधिक संतती जोपासता येते, आणि ज्यांच्याकडे नसतात त्यांना कमी संतती होते. आईवडिलांचे गुण पुढच्या पिढीत उतरत असल्यामुळे हे गुणधर्म पुढच्या पिढीत अधिक संख्येने दिसतात, आणि ते गुणधर्म नसलेल्या प्राण्यांची संख्या कमी झालेली दिसते. हरणे पकडण्यासाठी चित्त्यांना त्यांचा पाठलाग करावा लागतो. अशा वेळी ज्या चित्त्यांचा पुरेसा वेग असतो अशांना अन्न मिळते, आणि त्यांना आपली पिलावळ जपता येते. ज्यांचा पुरेसा वेग नसतो त्यांना कमी अन्न मिळते, आणि त्यांना पुरेशी पिले जगवता येत नाहीत. दरम्यान हरणांच्या बाबतीतही हेच होते. अधिक वेगवान हरणे जगण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे एखाद्या जंगलातली चित्त्यांची आणि हरणांची एक लाख वर्षांपूर्वीची पिढी आणि आजची पिढी यांच्या वेगाची तुलना केली तर आजची पिढी अधिक वेगवान असू शकते. थोडक्यात, हरणांमध्ये आणि चित्त्यांमध्ये बदल होण्यासाठी त्यांची परिस्थिती कारणीभूत ठरते. मात्र 'हे चित्ते वेगाने धावतात. आणि वेग वाढवणे चांगले आहे, तेव्हा यांना ठेवूया. आणि जे कमी वेगवान आहेत त्यांना मारून टाकूया' असे कोणी म्हणत नाही. कमी वेगवानदेखील लगेच मरून जात नाहीत. वेगवान चित्त्यांचे लोकसंख्येतले प्रमाण पुढच्या पिढीत एखाद दोन टक्क्यांनी जास्त, त्याच्या पुढच्या पिढीत अजून एखाद दोन टक्क्यांनी जास्त असे होत होत शेकडो पिढ्यांनी कमी वेगवान चित्त्यांचा मागमूसही राहात नाही. नैसर्गिक निवड ही डोळस नाही, त्यामुळे काळी-पांढरीही नाही. पण त्यात महत्त्वाची बाब म्हणजे हे कोणा व्यक्तीने, शक्तीने करण्याची गरज पडत नाही. वरून सोडलेली वस्तू आपोआप गुरुत्वाकर्षणाने खाली यावी त्याप्रमाणे विशिष्ट परिस्थितीत उपयुक्त असणारे गुणधर्म टिकून राहातात, आणि निरुपयोगी गुणधर्म नाहीसे होतात. अन्न मिळवण्याच्या गरजेतून चित्त्यांचा सरासरी वेग पुढच्या पिढ्यांमध्ये वाढतो. म्हणजे निवड करणारा कोणी नसला तरी निसर्गात असलेल्या परिस्थितीचा परिणाम म्हणून ते होते. म्हणूनच याला 'नैसर्गिक निवड' म्हणतात. निवड हा शब्द काहीसा गोंधळात टाकणारा आहे. कारण त्यामागे 'कोणीतरी निवड करतो' असा छुपा अर्थ आहे. पण आपोआप होणाऱ्या निवडीची इतर उदाहरणंही आपल्याला दिसून येतात. पृथ्वीकडे बघितले तर सर्व जलसमुदाय एकीकडे आणि जमीन एकीकडे अशी बऱ्यापैकी रेखीव आखणी झालेली दिसते. ही आखणी कोणी ठरवून केली का? अर्थातच नाही. पृथ्वीच्या भूखंडांचा आकार विशिष्ट प्रकारे उंचसखल आहे ही नैसर्गिक परिस्थिती आणि पाणी उंचावरून वाहात खाली जाते एवढा भौतिक नियम, यामुळे अशी विभागणी आपोआप होते. ते कोणी घडवून आणावे लागत नाही. त्याचप्रमाणे पुरेश्या पिढ्या गेल्या की हरणे आणि चित्ते हे त्यांच्यातल्या भक्ष्य आणि भक्षक या नात्यामुळे आपोआप बदलताना दिसतात. कालांतराने, परिस्थितीनुरुप बदल घडत वेगवेगळ्या प्रजाती निर्माण होतात, हे ठीक आहे. पण यातून जीवसृष्टीचा उगम कसा सांगता येतो? याचे उत्तर काही शब्दांत सांगणे सोपे नाही. पण आपल्याला जर रेणूंपासून पेशी कशा तयार झाल्या हे सांगता आले, तर त्या पेशींपासून द्विपेशीय जीव, त्यांच्यापासून 'सुधारित' अनेकपेशीय जीव कसे झाले हे समजून घेता येते. चित्ते आणि हरणांचा वेग जसा एकमेकांमुळे वाढत गेला, तसा सर्वच प्राण्यांचा विकास अगदी साध्या सुरूवातीपासून ते आत्ता दिसणाऱ्या वैविध्यापर्यंत कसा झाला हे समजू शकते. याचे काही टप्पे आपण पुढच्या काही लेखांत खोलवर जाऊन तपासून पाहू. पण महत्त्वाचा मुद्दा असा आहे सजीवसृष्टी जन्मण्यासाठी कोणा उच्च शक्तीच्या नियंत्रणाची गरज नाही. पुनरुत्पादनाची प्रक्रिया असली की नैसर्गिक निवडीतून आपोआप हे चराचर फुलून येते. या सत्याच्या जाणीवेत जगाकडे, स्वतःकडे आणि मानवांमधल्या परस्परसंबंधाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात क्रांती करण्याची शक्ती आहे. माझ्या देवाने जग निर्माण केले की तुझ्या देवाने हा प्रश्नच या सत्यापुढे विरघळून जातो, आणि सर्व धर्मयुद्धे निरर्थक ठरतात. 'मी या जगात का आहे?' या प्रश्नाचे साधे सोपे उत्तर - 'माझ्या आईवडिलांनी मला जन्माला घातले म्हणून' हे स्वीकारता येते. आणि त्यांचे आईवडील, त्यांचे आईवडील असे मागे जात जात आपल्या सगळ्यांची नाळ चार अब्ज वर्षांपूर्वीच्या कुठल्यातरी एकपेशीय जीवापर्यंत पोचवता येते. मी अमुक जातीचा, आपण तमुक धर्माचे, त्या हरामखोर परधर्मीयांचा नायनाट केला पाहिजे वगैरे विचार मग पोकळ ठरतात. अवकाशाच्या गहन पोकळीत साडेचार अब्ज वर्षांपूर्वी एक ग्रह नैसर्गिकरीत्या निर्माण झाला. त्यावर नैसर्गिकरीत्या प्राणीसृष्टी तयार झाली. आपण मनुष्य म्हणून जे काही लाख वर्षे आहोत, आणि सुसंस्कृत म्हणवत जी काही हजार वर्षे जगतो आहोत, ती या काही अब्ज वर्षांच्या आवाक्याच्या नखाचे टोक आहे. आपणही इतर प्राण्यांप्रमाणेच आहोत, फक्त जास्त हुशार आहोत, कपडे घालतो आणि वेगवेगळ्या भाषा बोलतो इतकंच. आपल्याला बनवणारे कोणी नाही, आपण बनलो. हा निसर्ग, हे प्राणी, ही सृष्टी आपल्यासाठी बनवलेली नाही - ती फक्त आहे. आपल्याप्रमाणेच या नैसर्गिक निवडीतून आणि भौतिकी-रासायनीच्या नियमांनी घडलेली, उत्क्रांत झालेली. हा विचार स्वतःला अनेक पाशांपासून, पूर्वग्रहांपासून मुक्त करणारा आहे. हा विचार डार्विनने मांडला त्याला दीड शतक उलटून गेले. दुर्दैवाने अजूनही जगाच्या लोकसंख्येचा प्रचंड मोठा भाग या मुक्तीदायी सत्यापासून वंचित आहे. (मी मराठी लाइव्हमध्ये पूर्वप्रकाशित)

Book traversal links for विश्वाचे आर्त - भाग ४ - उत्क्रांतीचे उत्तर

  • ‹ विश्वाचे आर्त - भाग ३ - अस्तिस्तोत्र
  • Up
  • विश्वाचे आर्त - भाग ५ - कोंबडी आधी की अंडं आधी ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
26803 वाचन

💬 प्रतिसाद (76)

प्रतिक्रिया

हा हा हा.. गमतीशीर आहे. आजवर

नगरीनिरंजन
गुरुवार, 12/10/2015 - 05:29 नवीन
हा हा हा.. गमतीशीर आहे. आजवर निर्माण झालेल्या प्राण्यांच्या प्रजातींमधल्या ९०% पेक्षा जास्त प्रजाती नामशेष झाल्या आहेत आणि प्रजाती नामशेष व्हायचा वेग आता खूप वाढला आहे. तेव्हा हा स्पिरिच्युअल फोर्स कुठे जातो? काहीतरी करुन माणूसच निर्माण करायचा व टिकवायचा अशी कोणा महान शक्तीची इच्छा आहे असेच सिद्ध करायचे असे ठरवून हे म्हटल्यासारखे वाटते. शिवाय उल्का पडल्याने डायनॉसॉर्स नामशेष झाले व सस्तन प्राणी विकसित झाले. जर उल्का पडलीच नसती तर उत्क्रांतीने वेगळा मार्ग आक्रमिला असता. आता उल्कासुद्धा स्पिरिच्युअल फोर्सने पाठवली होती असे म्हणायचे असेल तर प्रश्नच मिटला. राहता राहिला प्रश्न एन्ट्रॉपीचा तर पृथ्वीच्या आकारापुढे प्राण्यांचे बायोमास बरंच कमी आहे आणि माणूस वगळता इतर प्राणी अत्यंत कमी ऊर्जा वापरतात. शिवाय पृथ्वी ही पूर्णतः "क्लोज्ड सिस्टीम" नाहीय. सूर्याकडून ऊर्जेचा पुरवठा होतो पृथ्वीला आणि त्याचा दर स्थिर असला तरी तो प्राण्यांनी वाढवलेल्या एन्ट्रॉपीला पुरुन उरत असणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोह

उत्क्रांती चे उत्तर

आरोह
Wed, 12/09/2015 - 22:47 नवीन
Murmuration ची लिंक विसरलो https://youtu.be/M1Q-EbX6dso
  • Log in or register to post comments

घासूगुरुजी, यनावाला यांनी फार

संदीप डांगे
गुरुवार, 12/10/2015 - 01:23 नवीन
घासूगुरुजी, यनावाला यांनी फार कौशल्याने संक्षिप्त अवकाशाला कर्मबंधित ग्लानीतून बाहेर काढले आहे. विवेकाच्या रुपात तो प्रकटला असून आपल्या दिव्य ज्ञानकिरणांची मुक्तपणे उधळण करण्यास त्याने प्रारंभ केला आहे.
  • Log in or register to post comments

माझ्या बालबुद्धीला प्रतिसाद

आदूबाळ
गुरुवार, 12/10/2015 - 01:59 नवीन
माझ्या बालबुद्धीला प्रतिसाद वाचून जे कळलं त्यावरून "का" हा प्रश्न उरतोच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

आदूबाळ डँबिस आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 12/11/2015 - 05:17 नवीन
आदूबाळ डँबिस आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

"का" हा प्रश्न उरतोच...

विवेक ठाकूर
Fri, 12/11/2015 - 10:05 नवीन
"का" हा एकाच वेळी प्रश्न आणि उत्तर सुद्धा आहे. `कसं' हा प्रक्रियेचा किंवा घटनेचा उलगडा आहे आणि तो शास्त्रिय दृष्टीकोन आहे . `का' हा ज्यात घटना किंवा प्रक्रिया घडते त्या स्पेसचा वेध आहे आणि तो आध्यात्मिक प्रश्न आहे. शास्त्र निर्विवादपणे उपयोगी आहे आणि त्यामुळे जीवन बव्हंशी सुखी झालं आहे पण शास्त्र म्हणजे उत्तर नव्हे. कितीही सुखासिन जीवनात, कुणीही कोणत्याही पदाला असो, शेवटी जगण्यातली अनिश्चितता उरतेच. ही अनिश्चितता शास्त्र सोडवू शकत नाही, `का' चा उलगडा ती दूर करते कारण `का' ही निश्चितता आहे. `का' ही कायम आणि एकसंध असलेली स्थिती आहे आणि घटना किंवा प्रक्रियेनं आबाधित आहे. शिवाय ती घटना किंवा प्रक्रियापूर्व अनिवार्यता आहे त्यामुळे शास्त्र तिचा उलगडा कदापिही करु शकत नाही. अध्यात्म प्रथम आणि शास्त्र पश्चात आहे. त्यामुळे लेखमाला उत्तर देऊ शकणार नाही हे सुरुवातीलाच सांगितलं. `का' चं उत्तर देणारा एक सदस्य इथे होता, तो आता उत्तर देऊ शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

तो एक सदस्य संक्षी आहेत ना?

पिलीयन रायडर
Fri, 12/11/2015 - 10:19 नवीन
तो एक सदस्य संक्षी आहेत ना? खरं सांगा... पण तसंही तुम्ही सांगु शकताच की मग.. बरं, मी तुमचा हा प्रतिसाद नीट वाचला. मला समजला सुद्धा. की "का" चे उत्तर हे फिक्स्ड कंपोनंट आहे. कोणत्याही घटनांचा, प्रकियेचा किंवा कशाचाच "का" वर परिणाम होऊ शकत नाही. आणि "का" चे उत्तर शास्त्र देऊ शकत नाही. ते तुमच्या मते अध्यात्म देऊ शकते. ओके? ठिके.. तसं तर तसं.. ही लेखमाला "कसं" बद्दल तर बोलेल? आजवर कुणी काय थिअरी मांडल्या आहेत, आत्तापर्यंत शात्रज्ञांचे मत काय आहे इ उपलब्ध माहिती सोप्या भाषेत, एकाच ठिकाणी तर मिळेल? तुम्हाला नसेल त्यात इंटरेस्ट कारण तुम्हाला मुदलात डार्विन पण मुर्ख वाटतो.. तर तुम्ही नका वाचु. सतत ह्या लेखमालेवर येऊन, ती कशी बोअर आहे, निरुपयोगी आहे हे सांगण्याचे प्रयोजन काय? तुमच्या भाषेत :- "का" असं करताय? आता ह्या प्रश्नाचे एकच फिक्स उत्तर असले पाहिजे, नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

`कसं' हा विषय निरुपयोगी नाही हे प्रतिसादात नमूद केलंय

विवेक ठाकूर
Fri, 12/11/2015 - 11:49 नवीन
फक्त लेखकाचा हा दावा : बऱ्याच वेळा अमुक `का'? याचं उत्तर अमुक `कसं'? या प्रश्नाचं उत्तर दिलं की सुटतात हे मान्य नाही. कारण प्रोसेसचा उलगडा म्हणजे स्पेसचा उलगडा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

कारण प्रोसेसचा उलगडा म्हणजे

गवि
Fri, 12/11/2015 - 13:10 नवीन
कारण प्रोसेसचा उलगडा म्हणजे स्पेसचा उलगडा नाही.
हे योग्य वाटतंय. पण राघांच्या म्हणण्यातल्या "बऱ्याच वेळा" या शब्दांतून आणि अन्य स्पष्टीकरणातून वाक्य खालीलप्रमाणे लिहीता येईल असं वाटतं. बहुतांश व्यावहारिक आणि व्यक्तिगत पातळीवर पडलेल्या "का?" रुप प्रश्नांबाबत (उदा. मलाच का झालं हे) "कसं?" रुपी उत्तर / प्रोसेस कळली तर या गटातल्या "का?" रुप प्रश्नांतल्या "का" या भागाच्या उत्तराची निकड / प्रायॉरिटी नाहीशी होते. बाकी का? हा प्रश्न हा एकच मोठ्ठा प्रश्न आहे. कोणाच्याही "ईषणे" शिवाय इतकी परस्परावलंबी व्यवस्था अस्तित्वात असू शकते हे मनाला पटवणं अतिशय अवघड असतं. त्यामुळे का हा प्रश्न निरर्थक असू शकतो हे पटवणंही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

@ गवि

विवेक ठाकूर
Fri, 12/11/2015 - 20:59 नवीन
बहुतांश व्यावहारिक आणि व्यक्तिगत पातळीवर पडलेल्या "का?" रुप प्रश्नांबाबत (उदा. मलाच का झालं हे) "कसं?" रुपी उत्तर / प्रोसेस कळली तर या गटातल्या "का?" रुप प्रश्नांतल्या "का" या भागाच्या उत्तराची निकड / प्रायॉरिटी नाहीशी होते. एक साधी गोष्ट पाहा : `आत्ता, या क्षणी, आपला श्वास का चालू आहे?' या अत्यंत फंडामेंटल प्रश्नाचं उत्तर : `आपण जीवंत आहोत म्हणून' किंवा हृदय चालू आहे म्हणून अथवा फुफ्फुसे काम करतायंत म्हणून, इतकं बाळबोध देऊन समाधान होत असेल तर प्रोसेसनं `का' चं उत्तर मिळालं म्हणता येईल. पण वस्तुस्थिती इतकी सोपी नाही. काही हजार कोटी किलोमिटर्सवर सूर्यप्रकाशमान आहे त्यामुळे पृथ्वीवर जीवसृष्टी आहे. त्यात पृथ्वी स्वतःभोवती फिरतेयं म्हणून जळून खाक होत नाही. शिवाय गुरुत्त्वाकर्षणाच्या विविक्षित फोर्समुळे ती एका ठराविक परिघातच सूर्याभोवती फिरतेय. या सगळ्या भानगडींमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होऊन ढग तयार होऊन पाऊस पडतोय. त्यामुळे झाडं जीवंत आहेत आणि त्यांचा उत्छ्वास आपला श्वास झाला आहे. आणि त्याच वेळी आपला उत्छ्वास त्यांचा श्वास झाला आहे. शिवाय हे अत्यंत ढोबळ आणि ज्ञात फॅक्टर्स आहेत. आणि त्याहून पुढे जाऊन या सर्व प्रक्रिया सायमल्टेनियस आणि डायनॅमिक आहेत त्यामुळे नक्की काय घडतंय याचा कुणाला कधीही पत्ता लागू शकणार नाही. आणि पत्ता लागला तरी पुढच्या श्वासाला सर्व काँबिम्नेशन्स बदलेली असतील. इतक्या व्यापक जगात, जिथे आपल्याला सगळ्यात निकटच्या गोष्टीचा उलगडा होऊ शकत नाही, तिथे `विश्वोपत्तीचा उलगडा झाला' आणि तेही `काल या मानव निर्मित कल्पनेवर' म्हणणे अत्यंत हास्यास्पद आहे. लेखकानं एक सोपं मोड्यूल घेऊन, फक्त स्वतःची समजूत घालण्याचा प्रयत्न चालवला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आणि हा पूर्वार्ध आहे

विवेक ठाकूर
Fri, 12/11/2015 - 22:23 नवीन
उत्तरार्धात, ज्या अवकाशात या सर्व घटना घडतायंत ते अवकाश काय याचा वेध आहे आणि तो खरा `का'? आहे. लेखकाचा सगळा फोकस प्रोसेसवर आहे, ते तर अवकाश मानायलाच तयार नाहीत. त्यात अवकाश ही प्रोसेसपूर्व स्थिती असल्यानं ती प्रोसेसला उलगडणं असंभव आहे. अवकाश काय आहे हे समजण्यातच हयात घालवावी लागते. त्यानंतर, अवकाश आत-बाहेर, यत्र-तत्र, सर्वत्र आहे आणि ते आपल्याला अंतर्बाह्य व्यापून आहे याचा उलगडा होण्याची शक्यता निर्माण होते. मग सरते शेवटी अवकाश आणि आपण एकरुप आहोत या अत्यंत दुर्लभ वस्तुस्थितीचा बोध होतो. त्या बोधात मग सर्व प्रश्न सुटतात असं नाही, तर प्रश्न विचारणाराच उरत नाही, सगळा कोलाहल शांत होतो. मग हे सर्व अस्तित्त्व एक रहस्य होतं आणि आयुष्य आनंदाचं होतं. आणि ते खरं उत्तर आहे. अर्थात, अवकाश हे शब्दाचे बुडबुडे वाटत असतील आणि गाढवाला डोक्यावर घेतलं जात असेल तर, उत्तर सोडाच प्रश्न ही कळण्याची शक्यता दुरावते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

प्रचंड मोठ्ठा बुडबुडा

गणामास्तर
Fri, 12/11/2015 - 13:42 नवीन
असं समजा कि तुम्ही या सर्व शाब्दिक बुडबुड्यांच्या मध्ये आहात..(ही मान्यता आहे, वस्तुस्थिती नाही.) त्यामुळे होतंय काय कि तुम्हाला आत मधून बाहेरचे सर्व अत्यंत डीस्टॉर्टेड आणि वेगळंच दिसतंय. बुडबुडा हा देह आहे आणि तुम्ही त्यात बंद आहात अशी तुमची धारणा झालीये, त्यामुळे तुम्हाला सगळं डीस्टॉर्टेड दिसतंय. गेस्टाल्ट बदलून बघा म्हणजे तुम्हाला आपण बुडबुड्या पासून वेगळे आहोत असं जाणवू लागेल, विचारात एक हलकेपणा येईल.तुम्ही तुम्हाला पडलेल्या प्रश्नाकडे समग्रतेने बघू शकाल.. तुमच्या आकलनाचा आवाका वाढेल आणि तुम्हाला एकदाचे कळेल कि तुम्ही बुडबुड्या मध्ये बंद नाही आहात. प्रयत्न करा तुम्हाला नक्की जमेल. पुन्हा पुन्हा हा प्रतिसाद वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचेय ते. उगाच उप प्रतिसाद द्यायची घाई करू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

@संदीप डांगे,

संदीप डांगे
Fri, 12/11/2015 - 21:01 नवीन
@संदीप डांगे, that awkward moment when you make a funny question and people take it seriously.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

ननि म्हणतात तसे मला ह्या

प्रसाद१९७१
Fri, 12/11/2015 - 14:02 नवीन
ननि म्हणतात तसे मला ह्या मालिकेचा उद्देश अजिबात कळलाच नाही. पाठ्यपुस्तकातल्या बेसिक गोष्टी कवितांची फोडणी लाऊन दिल्यामुळे त्यातुन काही न वाचलेले आणि ऐकलेले कळत नाही. कदाचित वर्तमानपत्रांच्या बाल-पुरवणीत हे ठीक दिसेल ( त्यातल्या कविता काढुन ). तसेही डार्विन थियरी बद्दल इतके आक्षेप असताना त्याला मुक्तीदायी सत्य वगैरे म्हणणे म्हणजे अति च आहे. कोणी ७ - १० दिवसात ही सॄष्टी निर्माण केली असे नक्कीच कोणाला वाटत नाही पण डार्विन ची थियरी पण अगदी बेसिक प्रश्नांना पण उत्तरे देत नाही.
  • Log in or register to post comments

.

आबा
Fri, 12/11/2015 - 15:00 नवीन
आपल्या खालच्या प्रतिसादावरून आपण पाठ्यपुस्तके वाचली असावीत असे वाटत नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

१. तसेही प्रचंड पसरलेल्या

प्रसाद१९७१
Fri, 12/11/2015 - 14:17 नवीन
१. तसेही प्रचंड पसरलेल्या रासायनिक गोष्टीतुन आरेनए, डीएनए किंवा एकपेशीय सजीव निर्माण होणे हे अशक्य आहे आणि ते शक्य असल्याचा पुरावा अजिबात नाही. २. जरी चुकुन एकपेशीय सजीव तयार झाला तर ही अत्यंत रेअर अशी घटना असणार आहे. त्या पहील्यांदाच तयार झालेल्या पेशी ला पुनरुत्पादन का करावे लागले किंवा वाटले असेल. ३. त्या एक पेशीय सजीवातुन द्वीपेशीय, चार पेशीय सजीव निर्माण होण्यामागे प्रेरणा काय? असे व्हावेच का ह्याचे काही उत्तर नाही. ४. अगदी बॅक्टेरीया सारखे सुक्ष्म जीव निर्माण झाले तरी त्यातुन त्याहुन मोठ्ठे जीव का निर्माण व्हावेत? ५. वेगात धावणारे चित्ते वगैरे सोडा पण मासे आणि कासवांच्या शरीरात सुद्धा असलेले अवयव ( हृदय, फुफुस, रक्तवाहीन्या, पचन संस्था ) असे ऑपोआप सुधारणा होत तयार का व्हाव्यात. ६. जिराफाची मान उंच वगैरे होण्याचे कारण ( उंच झाडावरचा पाला खाणे ) हे तद्दन बकवास आहे. उंचावरचे खावे लागले म्हणुन उंच मानेचे जीन तयार होत नाहीत. असे बरेच पॉईंट आहेत घासु गुर्जींकडे ह्याची उत्तरे नक्कीच नाहीत आणि तशी ती कोणाकडेच नाहीत.. मानवाला काय झाले नाही ( ७ दिवसात जीव सृष्टी वगैरे ) हे माहीती आहे पण काय नक्की झाले असेल ते माहीती नाही.
  • Log in or register to post comments

अंधश्रद्धा कुठेही घातकच मग ती देवावर असो वा शास्त्रावर.

पॉइंट ब्लँक
Fri, 12/11/2015 - 15:46 नवीन
लेखमालेत प्रचलित सिद्धांत सोपे करून सांगण्यासाठी जे तुम्ही कष्ट घेतलेत ते कौतुकास्पद आहेत. पण काही गोष्टी खटकल्या. १. बिग बँगची सुरुवात किंवा त्याच्या आधी काय झाले हा विचार निरर्थक आहे हे म्हणणे पटले नाही. हे म्हणजे देवाची लिला अपरंपार म्हणून विषय टाळण्यासारखे आहे. खरं तर ह्या गोष्टीच स्पष्टीकरण देण्याइतक सध्याच भौतिक शास्त्र प्रगत नाही हे सांगण जास्त योग्य. आणि कुणीतरी ह्या गोष्टींचा विचार करतय म्हणून क्वाँटम ग्रॅव्हिटी सारखे विषय हाताळले जातात. २. डार्विनचा सिद्धांत हा ज्याकाळात जनुकशास्त्राबद्दल काहीही माहित नव्हते त्याकाळात इतका मोठा विचार मांडला म्हणून त्याच्या कल्पना शक्तीचे खरोखर कौतुक वाटत आणि त्याविषयी आदरही आहे. पण त्यासाठी तेच एक पूर्ण सत्य म्हणून मान्य करणे योग्य नव्हे. डार्विनच्याच शब्दात सांगायच झालं तर "I am quite conscious that my speculations run quite beyond the bounds of true science." त्याच्या थेयरीच्या मर्यादा इथे पाहायला मिळतील http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3246855/ अंधश्रद्धा कुठेही घातकच मग ती देवावर असो वा शास्त्रावर. जाताजाता, आमच्या पुर्वीच्या कंपनीत मी जेव्हा कामाला लागलो तेंव्हा लोकांनी मला एक गोष्ट सांगितली होती - There are two kind of sciences logical and biological. सुरुवातीच्या काळात मला असं वाटायचे की बॉयोलॉजिस्टची टांग खेचण्यासाठी केलेला एक विनोद होता. सहा वर्ष ह्या क्षेत्रात काल केल्यावर तो विनोद नाही असं सारखं वाटायला लागलं आहे.
  • Log in or register to post comments

चपखल !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 12/11/2015 - 18:38 नवीन
चपखल !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

प्रतिसाद आवडला.पटला.

अजया
Fri, 12/11/2015 - 19:17 नवीन
प्रतिसाद आवडला.पटला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

काळाचा उगम जर एका क्षणाला

राजेश घासकडवी
Fri, 12/11/2015 - 18:40 नवीन
काळाचा उगम जर एका क्षणाला झाला असेल तर 'त्याआधी' विषयी बोलणं विसंगत ठरतं, हे बऱ्याच वेळा म्हणून झालेलं आहे, त्यामुळे त्यावर आणखी वेळ खर्च करत नाही. तुम्ही दिलेल्या दुव्यात खरं तर हे आक्षेप खोडून काढलेले आहेत. इररिड्युसिबल कॉंप्लेक्सिटी, मिसिंग लिंक्स वगैरे धार्मिक लोकांचे दावे आहेत. त्यांचा उत्क्रांतीवादावर राग आहे, कारण त्यामुळे देवाची निर्मितीक्षमता काढून घेतली जाते व मुलं नास्तिक होतात असं त्यांना वाटतं. अमेरिकेत झालेले उत्क्रांतीवादाविरुद्धचे कायदे हा फारच गमतीदार विषय आहे.
अंधश्रद्धा कुठेही घातकच मग ती देवावर असो वा शास्त्रावर.
हे किंवा अशी इतर वाक्यं कायम ऐकू येतात. पण देवावर विश्वास असणं आणि विज्ञानाच्या सत्यांवर विश्वास असणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. बायबलमध्ये लिहिलं आहे म्हणून ते सत्य म्हणून विश्वास ठेवा असं सांगितलं जातं. याउलट विज्ञानाच्या क्षेत्रात प्रत्येक सत्य डोळसपणे तपासून पाहिलं जातं. मला एक सांगा, तुम्ही विमानाने प्रवास करायचा झाला तर ते उडेल, खाली पडणार नाहीस(मिलियनमध्ये एक अपघात होतो ते सध्या बाजूला ठेवू), असा विश्वास ठेवून जाता की नाही? तो अंधविश्वास असतो का? याचं कारण तुम्ही विमानं उडताना पाहिलेली असतात. प्रत्यक्ष विमान प्रवास करून आलेले लोक तुम्हाला माहीत असतात. विमानाचं तंत्रज्ञान गेली शंभर वर्षं सुधारत चाललेलं आहे याची तुम्हाला माहिती असते. आणि अगदीच तुम्हाला गरज पडली तर हे तंत्रज्ञान काय आहे याचा अभ्यास तुम्हाला करता येतो. इतकं सगळं स्वच्छ आणि उघड असताना आपण जो डोळसपणे विज्ञानावर विश्वास ठेवतो त्याला अंधश्रद्धा का म्हणावं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

पण देवावर विश्वास असणं आणि

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 12/11/2015 - 19:10 नवीन
पण देवावर विश्वास असणं आणि विज्ञानाच्या सत्यांवर विश्वास असणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. त्यांनी "अंधश्रद्धा" शब्द वापरलाय "विश्वास" हा तुमचा शब्द आहे. हा एक शब्द बदलल्याने वाक्याच्या अर्थात जमीनस्मानाचा फरक पडतोय !!! तुम्ही विमानाने प्रवास करायचा झाला तर ते उडेल, खाली पडणार नाहीस(मिलियनमध्ये एक अपघात होतो ते सध्या बाजूला ठेवू), असा विश्वास ठेवून जाता की नाही? तो अंधविश्वास असतो का? हा विपर्यास आहे ! विमानाने केला जाणारा प्रवास हा... "लांब अंतराच्या प्रवासात विमानप्रवासामध्ये वेळ, श्रम व पैश्याची तुलनात्मक बचतच होते आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे व त्या सेवेत असलेल्या धोका टाळण्यासाठी घेतलेल्या काळजीमुळे विमानप्रवासात अपघात होण्याची शक्यता स्विकारार्ह असावी इतकी खूप खूप कमी असते"... या गृहितकांवर केला जातो. असा एखाद्या गोष्टीपासून होणार फायदा आणि तिच्यात असणारा धोका यांची तुलना करून तो धोका पत्करण्याचे अथवा न पत्करण्याचे अनेक "व्यावहारीक" ("अंधविश्वासी नव्हे") निर्णय आपल्याला रोजच्या जीवनात सतत घ्यावे लागतात. साधी उदाहरणे द्यायची झाली तर... १. "विमानप्रवासापेक्षा रस्त्यावरून केलेला प्रवास जास्त धोक्याचा आहे (उदा. दर दशलक्ष किमी प्रवासाला मृत्युचे प्रमाण, इ) हे अनेकदा सिद्ध झाले आहे. म्हणून रस्त्यानेही प्रवास करायचे टाळायचे काय की तो अंधविश्वासामुळे केला जातो ? २. शाळा-कॉलेजाची डिग्री घेतल्याने नोकरी मिळेल... इतकेच काय घोकंपट्टी पुस्तकी ज्ञानापेक्षा जास्त काही मिळेल... याचीही १००% खात्री कोणीच देत नाही. म्हणून शिक्षण घेणे अंधश्रद्धा होत नाही. दर दिवसाला आपण असे निर्णय डझनांनी घेतो. पण हातातल्या मुद्द्यासाठी इतके पुरेसे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

तुम्ही उदाहरणावर अडून बसू नका

राजेश घासकडवी
Fri, 12/11/2015 - 19:47 नवीन
तुम्ही उदाहरणावर अडून बसू नका. माझा मुद्दा त्या तंत्रज्ञानावर खात्री असण्याबाबत आहे. ती खात्री आहे कारण १. त्यामागची वैज्ञानिक तत्त्वं जगजाहीर आहेत, आणि वारंवार तपासली गेलेली आहेत. ती कोणालाही अभ्यासता येतात. २. विमान कसं बनवावं याचं शास्त्र अनेक संशोधनांनंतर अधिकाधिक समृद्ध झालेलं आहे. याचं कारण म्हणजे वेळोवेळी त्यांवर लोकांनी शंका घेतल्या, चुका काढून टाकण्याचा प्रयत्न केला. ३. या संशोधनाची आणि तंत्रज्ञान विकासाची पद्धत ही वैज्ञानिक पद्धत आहे. त्यातल्या पीअर रिव्ह्यू पद्धतीमुळे अनेकांकडून ते तपासलं जातं. ४. या तंंत्रज्ञानाचा धोका किती, सक्सेस रेट किती ही आकडेवारी सर्वत्र उपलब्ध आहे. या सगळ्या गोष्टींना मी डोळसपणा म्हणतो. म्हणून मी 'विज्ञानावर अंधश्रद्धा' या शब्दप्रयोगाला फक्त आक्षेप घेतलेला आहे. असो, मला श्रद्धा, अंधश्रद्धा वगैरे वादात पडायचं नाही. विज्ञानाच्या बाबतीत डोळसपणा आणि पारदर्शकता आहे इतकंच माझं मत मांडून थांबतो. विज्ञानातही अंधश्रद्धा असतात वगैरे मुद्दे इथे अवांतर होतील, त्यासाठी स्वतंत्र लेखन करावं ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

शास्त्रिय विषयावरचे लेख व

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 12/11/2015 - 20:23 नवीन
शास्त्रिय विषयावरचे लेख व प्रतिसाद यात केवळ आणि केवळ शास्त्रियदृष्ट्या योग्य असेच लिहावे, अन्यथा शास्त्रिय विचार पसरण्याऐवजी गैरसमज पसरवले जातात, असे मला वाटते. इतकेच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

प्रतिक्रिया निट वाचेलली दिसत

पॉइंट ब्लँक
Fri, 12/11/2015 - 19:39 नवीन
प्रतिक्रिया निट वाचेलली दिसत नाही. आपल्या लेखनमालिकेच्या प्रयत्नाचे कौतुक केले आहे. फक्त ज्या गोष्टी पुर्णपणे सिध्द झालेल्या नाहीत त्यावर ठाम भुमिका घेने हे खटकले इतकेच नमुद केले आहे. एखादी क्लिष्ट गोष्ट सोपी करून सांगताना त्यांमुळे गैरसमज पसरनार नाहीत ह्याची काळजी घेतली जावी अशी अपेक्षा आहे. अनुमान काय आणि सत्या काय हे स्पष्ट नमूद करणे विज्ञानात आवश्यक असावे अशी अपेक्षा होती.
पण देवावर विश्वास असणं आणि विज्ञानाच्या सत्यांवर विश्वास असणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
मान्य. वि़ज्ञान कशाला म्हणायचे हे एकदा स्पष्ट करा म्हणजे पुढे चर्चा करता येइल. बाकी, कोलगेटन सांगितल की विज्ञान म्हणतं की मिठ आणि कोळष्यामुळं दात खराब होतात, आम्ही वि़ज्ञानप्रेमी मिस्री सोडून पेस्ट तोंडात कोंबनार आणि पुढ २५ वर्षांनी आपके पेस्ट मे नमक और कोयला नही है अस वाकुल्या दाखवल्यावर परत त्यांची मिठ आणि कोळसा असेलेली पेस्ट वापरायला तय्यार. धन्य आहे अशा विज्ञानप्रेमींची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

बाकी, कोलगेटन सांगितल की

अनुप ढेरे
Fri, 12/11/2015 - 21:22 नवीन
बाकी, कोलगेटन सांगितल की विज्ञान म्हणतं की मिठ आणि कोळष्यामुळं दात खराब होतात, आम्ही वि़ज्ञानप्रेमी मिस्री सोडून पेस्ट तोंडात कोंबनार आणि पुढ २५ वर्षांनी आपके पेस्ट मे नमक और कोयला नही है अस वाकुल्या दाखवल्यावर परत त्यांची मिठ आणि कोळसा असेलेली पेस्ट वापरायला तय्यार. धन्य आहे अशा विज्ञानप्रेमींची.
मी नाय ब्वॉ थेट कोलगेटचं ऐकत. मी माझ्या डेंट्याला विचारतो. त्याला असल्या पेस्टांचा फायदा/तोटा माझ्यापेक्षा नक्कीच जास्तं समजतो. कोल्गेट जाहिरातून गंडवतं याचा आणि विज्ञानप्रेमींचा सबंध नाही समजला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पॉइंट ब्लँक

असं असेल तर

मार्मिक गोडसे
Fri, 12/11/2015 - 22:30 नवीन
असं असेल तर काही वर्षापूर्वी कोंग्रेसचे खासदार नवीन जिंदाल यांनी स्नायुंचे दुखणे दूर करणारे 'तिरंगा' नावाचे ब्रेसलेट बाजारात आणले होते, त्यावरही विश्वास ठेवायचा का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा